Friday, May 8, 2009

सुगंधी फुलोरा.
ज्या वेळी आपल्याकडे होळी, रंगपंचमीची धमाल सुरू असते त्याचवेळी आपल्या जंगलात तशाच पण नैसर्गिक रंगांची उधळण सुरू असते. पळस, पांगारा, काटेसावर, बहावा, खवस अशी अनेक रंगीबेरंगी फुले मोठ्या प्रमाणावर झाडांवर झळकत असतात. डोळ्याला थंडावा देणारी ही फुले असली तरी सुगंधाच्या बाबतीत मात्र ती कमी पडतात. अर्थात त्यांच्या रंगाचाच प्रभाव एवढा असतो की त्यांच्या परागीभवनाचे काम किटक आणि पक्ष्यांकडून सहज होते. पण अश्या रंगीबेरंगी फुलांबरोबरच निसर्गात अनेक पांढरीशुभ्र किंवा फिकट रंगाचीसुद्धा फुले असतात. त्यात काही तर रात्रीसुद्धा फुलणारी असतात. ह्या अश्या फुलांच्या मदतीकरता त्यांचा सुगंधच त्यांच्या कामी येतो. आकर्षक रंग नसल्यामुळे जरी किटक यांच्याकडे आले नाहीत तरी यांचा मादक सुगंधच त्या किटकांना ह्या फुलांना भेट देण्यास उद्युक्त करतो.
ह्या सुगंधी फुलांमधे गुलाब, मोगरा, सोनटक्का, कवठी चाफा, सोनचाफा अशी अनेक सहज दिसणारी, आढळणारी फुले आहेत. ही फुले आणि त्यांची रोपे, झाडेसुद्धा आपल्याला घरी, बागांमधे सहज बघायला मिळतात. पण या सुगंधी फुलांमधे काही अशी आहेत की जी सहजासहजी दिसत नाहीत किंवा दिसली तरी त्यांचे झाड आपल्याला माहित नसते. सुरंगी हे फुल असेच काहीसे सहसा न दिसणारे. वर्षातील काही मोजक्या दिवसांमधे यांचे गजरे बाजारात विकायला दिसले तर दिसतात. ह्या फुलांचा वास पण एवढा मादक आणि दमदार की तो अगदी अर्ध्या किलोमिटर एवढ्या अंतरावरूनसुद्धा येतो. हा वास एवढा गोड असतो की त्या बाजारातल्या फुलांच्या गजऱ्यावरसुद्धा मधमाश्याअ घोंगावताना दिसतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधेच फक्त आढळणारे हे स्थानीक झाड जगात कुठेच आढळत नाही. मध्यम आकाराचे हे झाड सदाहरित असून याची पाने लांबट आणि गडद हिरवी असतात. यांच्या फुलांचे गुच्छ थेट खोडालाच लगडतात. गोलाकार, गुच्छात येणाऱ्या ह्या कळया अतिशय आकर्षक दिसतात. पांढरट, गुलाबी रंगाच्या चार गोलाकार पाकळ्या असून आत पिवळे धम्मक पुंकेसर असतात. हे पुंकेसर एवढे मोठे आणि छान असतात की त्यांचाच पसारा पटकन नजरेत भरतो. मुंबईमधे अगदी कमी दिसणारे झाड फणसाडच्या जंगलात मात्र सहज बघायला मिळते.
सुरंगीसारखेच अजुन एक फुल म्हणजे बकुळीचे. ह्या दोन्ही फुलांची खासियत म्हणजे ही फुले सुकल्यावर सुद्धा पुढे कित्येक दिवस यांचा सुगंध टिकून रहातो. सुरंगीपेक्षा बकुळ जरा जास्त प्रमाणात दिसते. ह्यांचे झाड उंच, सदाहरित असते आणि पाने मध्यम आकाराचे पण चकचकीत असतात. नाजुक चांदण्यांप्रमाणे पांढरट, पिवळसर अशी यांची फुले असतात आणि सहसा झाडाखाली यांचा सडा पडलेला असतो. अतिशय थंडगार सावली असणाऱ्या या झाडाला सध्या अनेक बागांमधे, घरांमधे लावले जाते. आयुर्वेदीक अनेक उपयोग असणाऱ्या या झाडाची फळेसुद्धा खायला छान लागतात. रानजाईचा वेलसुद्धा असाच जंगलात जाता जाता वासावरून ओळखता येतो. जंगलातील पायवाटेवरून जाता जात जर का तुम्हाला या फुलांचा सुगंध आला की तुमची पावले आपसुक थांबतात आणि त्या सुगंधाचा उगम शोधायला नजर आजुबाजुला जाते. पांढऱ्या फुलांचे घोसच्या घोस त्या नाजूक वेलीवर लगडलेले असतात. आणि त्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळत असतो.
वर्षाच्या काही मोजकेच वेळी फुलणारी ही फुले असल्यामुळे त्यांच्या फुलण्याचा काळ हा कायम लक्षात ठेवावा लागतो. बकुळीसारखे मोठे झाड असेल, त्यांची फुले वर टोकावर लागणारी असतील तर त्यांच्या छायाचित्रणासाठी एकतर छोटे झाड शोधावे लागते किंवा लांब पल्ल्याची लेन्स वापरावी लागते. अश्या अनेक दुर्मिळ, सहज न दिसणाऱ्या फुलांना शोधून त्यांचे छायाचित्रण करणे म्हणजे खरोखरच आनंददायक बाब ठरते. ह्या झाडांचे, फुलांचे छायाचित्रण करून ती कशी दिसतात, कशी फुलतात हे दाखवता येते मात्र त्यांचा सुवास, सुगंध कसा आहे हे मात्र दाखवण्याचे, साठवण्याचे तंत्र आपल्याला अजुन अवगत झालेले नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८

रंग माझा "वेगळा".
सरड्यासारखा रंग बदलू नकोस असे आपल्यात म्हणायची सवय असते ती या सरड्यांचा रंग बदलण्याच्या सवयीवरूनच. शॅमेलीऑन किंवा इतरही सरडे आजूबाजूच्या परिसरात मिसळून जाण्यासाठी आणि शत्रुंपासुन लपण्यासाठी आपला मुळचा रंगच बदलतात, अर्थात या करता या सर्व सरडे मंडळींचे रंगाचे ज्ञान एवढे प्रगत झालेले असते की त्यांना इतर प्राण्यांपेक्षा रंगाबद्दल जरा जास्तच कळते. साधारणत: सापासारखे दिसणारे हे सरिसृप त्यांच्यापेक्षा काही बाबतीत वेगळे असतात. ह्या सरड्यांना शरीराची हालचाल करण्यासाठी व्यवस्थीत जाणवू शकणारे चार पाय असतात. ह्यामुळे जमिनीवरून जोरात पळणे अथवा झाडावर चढणे, लटकणे त्यांना सहज जमते. सापांना मात्र पाय नसतात पण तरीसुद्धा पळण्यात किंवा झाडावर चढण्यात त्यांचे काहीच अडत नाही. सरड्यांना हवेतून ऐकू येणारे आवाज येतात कारण त्यांना कान असतात. सापांना मात्र स्पंदनातून हालचालींचा अंदाज येतो. सरड्यांना व्यवस्थीत दिसते, त्यांना रंग ओळखता येतात आणि त्यांना उघडमीट होणाऱ्या पापण्या असतात. सापांना मात्र या पापण्या नसतात.
सर्व सरपटणारे प्राणी जेंव्हा त्यांचे शरीर वाढते तेंव्हा कात टाकतात. यावेळेस त्यांची जुनी कातडी पापुद्रयासारखी निघून जाते आणि त्याखाली त्यांना नवीन अधीक लवचीक कातडी जी त्यांचे मोठे वाढलेले शरीर सामावून घेते. सापांच्या बाबतीत सहसा एकसंध कात निघते कारण त्यांच्या शरीरावर कुठेही खंड पडलेला नसतो. सरड्यांची कात मात्र तुकड्या तुकड्यात निघते कारण त्यांच्या शरीराव पायांचे सांधे असतात. ह्या सरड्यांच्या हजारो उपजाती आहेत. यात साधे सरडे, शॅमेलीऑन, पाली, घोरपडी असे वेगवेगळे प्रकार असतात. यांच्या आकारात प्रचंड तफावत जातीनुसार आढळते. जेमतेम काही सेंटीमिटरएवढे शॅमेलीऑन आहेत तर त्याच वेळेस साडे नऊ फुट वाढणारे कोमोडो ड्रॅगनसुद्धा आहेत. हे सरडे सापांसारखे असले तरी विषारी नसतात मात्र त्यांच्या कठीण जबड्याने कडकडून चावू मात्र शकतात. त्यांचे प्रमुख अन्न किटक, कोळी असले तरी काही घोरपडीसारख्या मोठ्या जाती पक्षी, पक्ष्यांची अंडी किंवा छोटे छोटे सस्तन प्राणीसुद्धा मटकावतात.
सापांएवढे हे प्रसिद्ध नाहीत कारं यांच्याबद्दल तेवढ्या गैरसमजुती आपल्याकडे नाहीत. पालींबद्दल भयंकर किळस, ती विषारी असे काही गैरसमज मात्र आपल्याकडे आहेत. अंदमान डे गेको, बॅंडेड गेको किंवा रॉक गेको अश्या अनेक देखण्या पाली आपल्याकडे आहेत. पण एकंदरच यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले गेले आहे. त्यांच्यावर फारसा अभ्यासही झालेला नाही, सर्वसामान्यांकरता त्यांच्यावर पुस्तकेही उपलब्ध नाहीत आणि परदेशात जसे यांना पाळण्याचे खुळ आहे तेसुद्धा आपल्याकडे नाही. गावात / शहरात सरडा दिसला की मुले त्याच्यावर दगड भिरकावणारच. प्रत्यक्षात ते आपल्याला काहीच त्रासदायक ठरत नाहीत. अश्या या निरुपद्रवी सरड्यांच्या छायाचित्रणाचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात असतो. एकतर तो त्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे बरेचदा आपल्याला त्यांच्या जोड्या एकत्र दिसतात. नर आपला लालभडक तुरा आणि डोके मीरवत मादीला आकर्षीत करण्यासाठी "उठा बशा" काढत असतात. मात्र यावर्षी मला भर उन्हाळ्यात त्यांची चांगली छायाचित्रे मिळाली. येऊरच्या जंगलात फुलपाखरांचा चिखलपानाचा हंगाम असल्याने मी थोडासा उन्हापासून बचाब म्हणून मोठ्या दगडाच्या आडोश्याला बसलो होतो. समोर लायसॅनीड जातीच्या "ब्लू" फुलपाखरांचा एक मोठा थवाच्या थवा जमिनीवर चिखल पान करत होता. मी मात्र कुठले मोठे, वेगळ्या जातीचे फुलपाखरू येते का याची वाट बघत होतो. एका छोट्या दगडामागून हा सरडा दबकत दबकत पुढे आला. चिखलपान करण्यात दंग झालेल्या त्या चिमुकल्या फुलपाखरांवर त्याचा डोळा होता आणि त्यातली २/४ जरी त्याला मिळाली असती तर त्याचे काम नक्की होणार होते. अर्थात मी त्याजागी दगडामागे लपून बसलो होतो म्हणून केवळ नशिबामुळेच मला त्यांची छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

"किल्ले"कर वाळव्या.
वाळवीला जरी इंग्रजीमध्ये व्हाईट ऍंट अथवा टरमाईट असे म्हणत असले तरी त्यांचा मुंग्यांशी काही संबंध नाही. पण त्यांची उत्क्रांती झुरळापासून सुमारे १५० कोटी वर्षांपुर्वी झाली. आज जगभरात सुमारे २५०० जातींच्या वाळव्या आढळतात आणि ह्या सर्व एकत्रीत, समुहाने रहाणाऱ्या असतात. ह्या वाळव्या त्यांच्या रहाण्यासाठी उंच उंच किल्ल्यांसारखी वारूळे बनवतात. काही काही जातीत तर ही वारूळे अगदी २० फुटांपर्यंतसुद्धा उंच असतात. आपल्या भारतात काही जंगलात ६/७ फुटांची वारूळे सहज दिसतात. ही वारूळे प्रामुख्याने माती, त्यांची लाळ आणि लाकडातील खास द्र्व्याने बनवलेली असतात. ही वारूळे जेवढी उंच जमिनीवर दिसतात तेवढेच त्यांचे बांधकाम जमिनीखाली सुद्धा असते. ही अनेक खोल्या असलेली वारूळे म्हणजे स्थपत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून समजली जातात. या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या वारूळात अक्षरश: लाखो वाळव्या एकत्र नांदत असतात. वारूळात राणीची "खास" खोली असते आणि तिथे तीची योग्य ती बडदास्त ठेवली जाते. इतर भागात पिल्लांसाठी खोल्या, त्यांच्या अन्नासाठी बुरशी वाढवायच्या खोल्या इतकेच नव्हे तर वारूळ आतून थंड रहावे म्हणून वातानुकूलीत खोल्यासुद्धा खास रचना करून बांधलेल्या असतात.
वाळवीचे मुख्य खाणे हे लाकूड असते आणि त्या निसर्गातील मृत झाडांचे जैवीक विघटन करण्यासाठी मोलाची मदत करतात. पाण याच वेळेस त्यांच्या कित्येक जाती ह्या मानवाने बनवलेल्या इमारती आणि इतर लाकडी सामानावर पण ताव मारत असल्यामुळे आपल्याकरता त्या त्रासदायक आणि उपद्रवी ठरतात आणि त्यांचे वेळीच योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. अतिशय नाजूक शरीर असलेल्या या वाळव्यांची तोंडे आणि जबडे मात्र धारदार असतात आणि त्यांच्या सहाय्याने त्या कठिण अश्या लाकडाचे क्षणात बारीक बारीक तुकडे करतात. त्यांच्या आतड्यात असलेल्या खास रचनेमुळे हे पचण्यास कठिण असणारे लाकूड आणि त्यातील सेल्यूलोज त्वरीत विघटन करून पचवले जाते. या वारूळात राजा आणि राण्या असतात, सैनीक आणि कामकरी असतात, तसेच त्यांची पिल्ले आणि अप्रगत वाळव्या असतात. राणी मादी दिवसाला शेकडो अंडी देण्याचे काम फक्त करते आणि प्रसंगी २००० अंडी दर दिवशी घालते. या करता तिचे शरीर प्रचंड मोठे आणि पोट लांब असते आणि तिला तीचे स्वत:चे काहीही काम करता येत नाही. अर्थात तीच्या दिमतीला अनेक कामकरी वाळव्यांची फौज तैनात असते. मुंग्यांमधे नराचे राणी मादीशी एकदाच मिलने होते आण त्यानंतर तो मरतो किंवा त्याला घरट्यातून हाकलून दिले जाते. मात्र वाळव्यांचे राजे हे कायम वारूळातच रहातात आणि त्यांचे मादीबरोबर प्रजोत्पादनासाठी मिलन कायम सुरू असते.
मुंबईच्या आसपास आपल्या जंगलात ह्या वाळव्यांची वारूळे अगदी लहान असतात. मात्र दक्षिण आणि मध्य भारतातील जंगलात ही वारूळे पुरूष उंचीपेक्षा सहज उंच असतात. ह्या वारूळाच्याआतील वाळव्यांचे छायाचित्रण मी कधी केले नाही कारण त्यासाठी ते वारूळ मोडायला लागले असते. पण जंगलात जर वठलेले, जमिनीवर पडलेले झाडाचे खोड असेल तर त्याखाली बऱ्याच वेळेला या वाळव्या सहज सापडतात आणि मग त्यांचे छायाचित्रण सह्ज शक्य होते. मागे असाच एकदा झाडाच्या खोडाखालील वाळव्यांचे छायाचित्रण करत असताना एक काळा मुंगळा तिथे आला आणि त्याने पटापट त्याच्या तोंडात ५/६ वाळव्या पकडून नेल्या. पावसाळ्याच्या सुरवातीज जेंव्हा नुकता पाऊस पडतो तेंव्हा जंगलात ह्या वारूळाच्या आजूबाजूने किंवा झाडांच्या खोडाखालून असंख्य पंख असलेल्या वाळव्या बाहेर पडतात आणि आकाशा उडायला लागतात. अश्या वेळेस त्यांचे निरिक्षण आणि छायाचित्रण चांगले होते. जंगलातील वाळव्यांचे आणि त्यांच्या घराचे छायाचित्रण करायला मजा येते मात्र घरातल्या फर्निचरल्या लागलेल्या वाळवीचे छायाचित्रण करायची वेळ न येवो एवढे मात्र नक्की.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

उड्डाण "चक्र".
किटक आपण चिमुकले, नगण्य म्हणून संबोधत असलो तरी त्यांच्या जगण्याच्या क्षमता आपल्याला नेहेमीच अचंबीत करतात. आता फक्त चतूर आणि टाचण्यांचेच बघा ना !! एखाद्या जिमनॅस्ट प्रमाणे चपळ आणि सडसडीत असणारे ह्यांचे शरीर त्यांच्या सारखेच लवचीक आणि शक्तीमान असते. त्यांच्या डोळ्यात असलेल्या हजारो भिंगांमुळे त्यांची दृष्टी तर तिक्ष्ण असतेच पण त्यांच्या शरीरातील एकंदर स्नायुंच्या ६५% स्नायु हे फक्त उड्डाणाकरता खास असतात यावरून त्यांचे उडणे कीती उच्च क्षमतेचे असेल याचा आपल्याला अंदाज येतो. चतूर आणि टाचण्यांची बाल्यावस्था ही कित्येक महिन्यांची, वर्षांची असते आणि ती पाण्याखाली जगली जाते तर त्यांची प्रौढ अवस्था केवळ काही आठवड्यांची असते आणि ती जमिनीवर असते. यातीलसुद्धा बराचसा काळ ते हवेत उडण्यातच घालवतात. या उडण्याचा मुख्य उद्देश शिकार पकडण्याचा असू शकतो किंवा त्यांची हद्द सांभाळण्यासाठी, मादी मिळवण्यासाठी असू शकतो.
चतूर आणि टाचण्यांच्या अनेच जाती ह्या हद्दप्रिय असतात. त्यांना त्यांची हद्द राखायला, सांभाळायला अतिशय आवडते आणि कोणी इतर नर जर त्यांच्या हद्दीत आला तर तर त्याला ते पळवून लावतात. यासाठी ते एकतर त्यांच्या हद्दीत पहारा केल्यासारखी गस्त घालतात किंवा उंच झाडावर, फांदीवर बसून आपल्या हद्दीत कोणी येत तर नाही ना याची काळजी घेतात. मात्र जर ला एखादी मादी त्याच्या हद्दीत आली तर मात्र तीला गटवण्यासाठी त्याची धावाधाव होते. नर उडता उडताच खात्री करून घेतो की ती मादी त्याच्याच जातीची आहे आणि मिलनास तयार आहे. मादीसुद्धा आजूबाजूला उडून खात्री करून घेते की हा नर तीच्या योग्य आहे की नाही आणि त्याची हद्द ही अंडी घालण्यासाठी उपयोगी आणि उचित आहे की नाही. जर का दोघांना या सर्व अटी योग्य वाटल्या तर ते मिलनासाठी तयार होतात.
यांच्या मिलनाची अजब तर्हा असते. नर मादीचे डोके अथवा धड आपल्या लांबलचक शेपटीच्या टोकाने गच्च पकडतो. ह्या स्थितीत तो तीला घेउन उडू सुद्धा शकतो. काही वेळानंतर ते एका जागेवर स्थीर बसतात. यानंतर नर आपली पकड अजून घट्ट करून मादी सरकणार नाही याची खात्री करून घेतो. यानंतर मादी आपली लांबलचक शेपटी पुर्ण गोलाकार वळवून नराच्या धडाच्या आणि शेपटीच्या सांध्यावर आणून चिकटवते. यामुळे तीच्या अंड्यांचे या नराकडून फलन होण्यासाठी मदत होणार असते. यावेळी जर त्यांची शरीर आकृती बघितली तर ती पुर्ण गोलाकार असते आणि म्हणूनच त्याला चक्री मिलन असे म्हणतात. या वेळेस आणि त्याच स्थितीत नर मादीला घेऊन उडूसुद्धा शकतो आणि नविन जागी या चक्राच्याच अवस्थेत बसतो. यामुळे या उड्डाणाला "चक्री उड्डाण" असे म्हणतात. यावेळी नर खात्री करून घेत असतो की त्याच्याकडून त्या मादीच्या अंड्यांचे फलन पुर्ण झाले आहे. जोपर्यंत मादी पाण्यात अंडी घालत नाही तो पर्यंत काही जातीचे नर मादीला सोडत नाहीत आणि तिचे डोके आपल्या शेपटीच्या टोकाने घट्ट धरून ठेवतात.
चतूर आणि टाचण्यांची जर अशी छायाचित्रे हवी असतील तर खचीतच पाण्याच्या जवळ आपल्याला वाट बघत बसावे लागेल. नदी, नाले, तलाव, डबकी, धबधबे, खाडीच्या पाणथळ जागा अश्या अनेल ठिकाणी आपल्याला हे चतूर आणि टाचण्या दिसू शकतात. यांचा विणीचा हंगाम एकतर पावसाळ्यानंतर लगेच किंवा मे महिन्यामधे पावसाळ्याच्या थोड्या आधी असतो. अर्थातच यांच्या उडण्याचा वेग भन्नाट असल्यामुळे यांची मनाजोगती छायाचित्रे मिळवताना खुप वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे हे प्रचंड हद्दप्रिय असल्यामुळे आपण यांचे छायाचित्र काढायला गेलो आणि बटन दाबणार याच वेळात जर का दुसरा आगंतुक नर त्यांना आसपास दिसला तर त्याला पळवायला ते त्याच्या मागे जातात आणि मग परत काही आपल्याला त्यांचे छायाचित्र मिळत नाही. जर का एखादी मिलन जोडी आपल्याला दिसली तर ती बराच वेळ एकाच जागी शांत बसलेली असते त्यामुळे त्यांची छायाचित्रे सहज मिळतात. अर्थात त्यावेळी त्यांच्या जास्त जवळ न जाता लांबूनच छायाचित्रे काढणे नेहेमीच उचीत ठरते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

ओळखा पाहू !!!
मार्च / एप्रिल महिन्या अजून झाडे उघडी बोडकी असतात किंवा नुकती त्यांना हिरवीगार पालवी फुटायला सुरवात झालेली असते. पानगळीमुळे आपली नजर जास्त दूरवर जाउ शकते आणि एरवी पानान दडून रहाणारे पक्षी आपल्याला सहज आणि जास्त चांगले दिसू शकतात. झाडांच्या या पर्णहीन काळात ही रंगीबेरंगी मंडळी खरोखरच डोळ्यांना आनंद देणारी ठरतात. निसर्गात हे पक्षी, फुलपाखरे, फुले ही त्यांच्या आकर्षक रंगसंगतीमुळेच आपल्याला कायम ओळखता येतात आणि लक्षातही रहातात. हे रंग बऱ्याच वेळेला इतरांना "मी इथे आहे" अशी जाहिरात करून दाखवतात, पण हेच जर त्यांचे शत्रु किंवा शिकारी असतील तर ते त्यांना भारी ठरते. याच कारणासाठी कित्येक इतर प्राणी. पक्षी, किटक, मासे हे त्यांच्या आजुबाजुच्या परिसरात अगदी मिळूनमिसळून जातात व बिलकूल जाणवणार नाही अश्या रंगसंगतीचे असतात.
निसर्गात मिळून मिसळून जाणाऱ्या रंगसंगतीत साधारणत: दोन रंगाचे प्रामुख्याने अस्तित्व जाणवते. यात हिरवा आणि तपकिरी रंगच जास्त आढळतात कारण सहसा निसर्गात झाडीमध्ये रहाणऱ्या ह्या प्राण्यापक्ष्यांना हिरव्या अथवा सुक्या झाडांचे रंगच "मॅच" करणे सोयीचे ठरते. या त्यांच्या रंगसंगतीमुळे हे प्राणी त्याचा दुहेरी फायदा घेउ शकतात. निसर्गात एकदम लपून गेल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या भक्षकांना हे सापडत नाहित अथवा लक्षात येत नाहित आणि त्यांच्यापासून यांचा बचाव होतो. त्याचप्रमाणे हे अगदी आजुबाजुच्या भागात लपले असल्यामुळे इतर किटकांना अथवा प्राण्यांना यांचे अस्तित्व पटकन जाणवून येत नाही आणि मग हे स्वत:च त्यांची शिकार अगदी सहज करू शकतात.
छायाचित्रणासाठी एरवी आम्ही निसर्गात नेहेमीच रंगीबेरंगी प्राणी, पक्षी, किटक शोधत असतो. बऱ्याच वेळेला ते आम्हाला सहजासहजी सापडतात सुद्धा मात्र हे असे निसर्गात समरूप होणारे प्राणी सापडणे किंवा शोधणे खरोख्ररच खुप जिकीरीचे काम असते. बऱ्याचवेळेला तुम्ही अगदी त्यांच्या अधिवासात फिरत असता आणि तुम्हाला अगदी नक्की माहित असते की तो प्राणी तीथे असणार पण शोधुनही तो काही सापडू शकत नाही. कीत्येक वेळेला आम्ही पायवाटांवरून जात असताना माझ्यापुढे २/३ अगदी सहज त्या प्राण्याला ओलांडून जातात पण त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही की तो प्राणी अगदी पायवाटेच्या बाजूलाच झाडावर बसला होता. जेंव्हा तुमची सराईत नजर त्यावर पडते किंवा त्याची थोडीशी हालाचाल होते तेंव्हा मात्र तुम्ही त्याला ओळखू शकता आणि मग त्याचे छायाचित्रण शक्य होते.
झाडांच्या खोडावर रहाणाऱ्या पाली ह्या अशाच सहज न दिसणाऱ्या असतात. त्यांचा रंगसुद्धा थोडाफार त्या झाडाच्या खोडाच्या रंगाप्रमाणे बदलत पण असतो. जेंव्हा मी या पालीचे छायाचित्रण करत होतो तेंव्हा माझ्या बरोबरच्या मित्रांना बराच वेळ मी कसले छायाचित्रण करतो आहे हेच कळत नव्हते. आता ती छायाचित्रात स्पष्ट दिसून येत आहे मात्र प्रत्यक्षात निसर्गात ती एवढी बेमालूम छपली होती की तिथे कोणी आहे हेच जाणवत नव्हते. छायाचित्रातील प्रार्थना किटक सुद्धा असाच छोट्या झुडपाच्या कोवळ्या पालवीवर बसला होता. त्याचा एकंदर रंग, आकार आणि अविर्भाव यामुळे तो जिवंत हालचाल करणारा किटक आहे हेच पटत नव्हते. एका निळ्या माशीवर त्याने अयशस्वी हल्ला चढवला म्हणून तो माझ्या लक्षात आला. त्यामुळे छायाचित्रण करताना दरवेळेस आकर्षक, रंगीत प्राणीच छायाचित्रणासाठी मिळतील अशी अपेक्षा न करता कधी कधी हे "ओळखा पाहू" असे कोडे घालणारे प्राणीही मिळू शकतात. मात्र त्यासाठी कायम सतर्क राहून जंगलात कुठे काय काय आहे हे पहावे लागते. मला नक्की खात्री आहे ही जी काही छायाचित्रे मला मिळाली आहेत ती जेमतेम १ % असतील आणि बाकीची ९९ % मंडळी त्यांच्या प्रभावी छपवणाऱ्या रंगसंगतीमुळे मला दिसलीच नसतील.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Saturday, March 7, 2009

भूताचे झाड.....
या झाडाला मराठीत कांडोळ किंवा पांढरीचे झाड म्हणतात आणि इंग्रजीमधे "इंडियन घोस्ट ट्री" म्हणतात. या झाडाचे खोड पांढरेशुभ्र आणि काहिसे चंदेरी असते. ह्या तुळतुळीत खोडावर त्वचेवर भाजून काळे डाग पडावेत तसे व्रण असतात. अंधाऱ्या रात्री हे पांढरे, चंदेरी खोड चमकल्यासारखे दिसून काहीसे भयावह वाटते म्हणून हे "घोस्ट ट्री". या झाडाचा बुंधा अगदी आखीव रेखीव आणि छत्रीसारखा पसारा असलेला असतो. डिसेंबर - जानेवारीच्या सुमारास या झाडावर एकही पान नसते आणि फांदीच्या टोकाला मॉस (शेवाळे) गुंडाळल्यासारखा फुलोरा असतो. आता त्या पसाऱ्याला फुलोरा किंवा फुले का म्हणतात हा प्रश्नच आहे कारण लांबून ना त्यांचा आकार दिसतो ना अस्तित्व. अगदी जवळून निरिक्षण केल्यावर लक्षात येते की ती फुले चांदणीच्या आकाराची आणि अतिशय छोटी असतात. पाच पाकळ्यांची ही फुले हिरवट रंगाची असतात आणि थोडीफार त्यावर लालसर रंगाची नक्षी असते. जशी ही दिसायला अनाकर्षक आणि नगण्य असतात तसाच त्यांचा वासही घाण असतो, कारण या स्टर्कुलिया कुटूंबातील वृक्षांना दुर्गंध असतोच.
जेवढी ह्याची फुले अस्ताव्यस्त असतात तेवढीच यांची फळे व्यवस्थीत, निटनेटकी आणि आकर्षक असतात. जेंव्हा या झाडाला फळे धरायला लागतात तेंव्हा त्याचे सारे रूपच बदलून जाते. स्टारफीशसारखी किंवा पंचपाळ्यासारखी दिसणारी फळे अतिशय उठावदार किरमीजी रंगाची असतात आणि त्यावर मखमली लव असते. काही काही जातीत हा फळांचा रंग गुलाबी असतो. अतिशय साजरी दिसणारी ही फळे जरी मखमली भासत असली तरी ती लव एखाद्या काट्यासारखी रूपते. ही फळे थोडी मोठी होत असतानाच फांद्यांच्या टोकावर पालवी फुटायल लागते. पांढऱ्याशुभ्र झाडावर ही पोपटी हिरवीगार पालवी अगदी शोभून दिसते. या पानांचा आकारही पाच कोन असलेल्या द्राक्षासारखा पण थोडा विस्तारीत असतो. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी ही पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसायला लागते. फळांवर जशी लव असते तशीच लव ह्या पानांवरसुद्धा असते त्यामुळे ही स्पर्शाला अगदी मऊसुत लागतात.
तद्दन भारतीय असलेल्या या झाडाची साल आणि डिंक आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. ह्या झाडाची साल अतिश्य औषधी आहे आणि डायरियावर गुणकारी म्हणून वापरली जाते. दातांच्या कवळ्या बनवण्यासाठी साच्यांमधे पावडर टिकून रहाण्यासाठी याचा डिंक वापरला जातो. खाद्यपदार्थांच्या उद्योगातसुद्धा याचा डिंक वापरला जातो.
ह्या झाडाची माझी पहिली ओळख झाली ती ताडोबाच्या जंगलात. कॉलेजमधे असताना डब्लू.डब्लू.एफ़ च्या कॅंपला गेलो असताना ताडोबाच्या प्रवेशद्वारापाशीच हा एक भलामोठा, पसरलेला वृक्ष होता आणि त्याच्या पारावरच आमची नोंदणी सुरू होती. असा पांढराशुभ्र, पसरलेला वृक्ष पहिल्यांदाच पहात असल्याने त्याच्य सौंदर्याने तो पटकन नजरेत भरला आणि कायमचा लक्षातसुद्धा राहीला. त्यानंतर आमच्या येऊरला आणि अनेक वेगवेगळ्या जंगलात परत परत भेटत गेला, प्रत्येक मोसमात त्याचे बदलणारे रूप न्याहाळताना, छायाचित्रण करताना वेगळाच अनुभव यायचा. येऊरच्या सुक्या धबधब्याच्या उतरंडीवर हा वृक्ष आहे. त्याला फळे धरल्यावर त्यांचे छायाचित्रण करायली गेलो असताना, ती फळे जरा जास्त उंचावर असल्यामुळे पाय उंचावून एका हाताने फांदी खाली खेचली आणि दुसऱ्या एकाच हाताने छायाचित्रण सुरू केले. मात्र ही कसरत करताना पायाखालची माती सरकली आणि वर फांदीवर धरलेला माझा हात खाली थेट फळांवर आला. आता जर फळांचे काटे टोचतात म्हणून फांदी सोडली असती तर मी कॅमेरासकट खाली कोसळलो असतो, त्यामुळे मला त्या काटेरी, टोचणाऱ्या फळांचा आधार घेउनच स्थिर व्हायला लागले. अर्थात या काळात काही मोजकी छायाचित्रे मिळाली होती पण त्यानंतर मात्र २/३ दिवस हातातले खाजणारे काटे काढण्यातच माझे गेले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, March 5, 2009

परोपजीवन.
परोपजीवन म्हटले की आपल्याला लगेच झाडांवरची बांडगुळे आठवतात. मात्र फुलपाखरासारख्या नाजूक आणि गोंडस किटकावरसुद्धा जगणारे बरेच परोपजीवी किटक आहेत. फुलपाखरांच्या अळ्या ह्या अशा परोपजीवी किटकांना पटकन बळी पडतात कारण त्यांची रचना ही परोपजीवी किटक वाढायला उपयोगी असते. एरवी यजमान आणि परोपजीवी प्राणी किंवा झाड दोघेही जगतात. मात्र फुलपाखरांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांच्यात यजमान अळी किंवा कोष हमखास मरतो आणि परोपजीवी किटकअगदी आनंदात आपली प्रजा वाढवतात. ह्या परोपजीवी माश्यांच्या यजमान अळ्या ठरलेल्या असतात. विशीष्ट्य जातीच्या अळ्यांवरच ते आपली अंडी अथवा कोष करतात. ब्रॅकोनिडी कुळातील माशी फुलपाखराच्या अळीला एक सूक्ष्म छिद्र पाडून त्यात अंडी घालतात. ही अंडी टाकायला त्यांच्याकडे तीक्ष्ण असा सुईसारखा अवयव त्यांच्या पोटाच्या टोकाशी असतो. ही अंडी आतल्या आत उबून आत अळीचे मांस अन्न म्हणून खायला सुरूवात करतात. प्रथम ते चरबी खातात, मग ते पचनसंस्था, मज्जासंस्था यांच्यावर हल्ला चढवतात. अशाप्रकारे ती फुलपाखराची अळी मरून जाते अथवा मलूल होते. यानंतर त्या अळ्या उरलेले मांस खातात आणि पुर्ण वाढ झाल्यावर तिथेच त्या अळीच्या मृत शरीरावर किंवा बाजूला सोनेरी किंवा पांढरे तांदळाच्या दाण्याएवढे कोष करतात. यथावकाश त्यातून त्या परोपजीवी माश्या बाहेर येतात.
टॅचनिडी कुळातील परोपजीवी माश्यासुद्धा काहीशी अशीच पद्धत वापरतात. पण जास्तीकरून त्या त्यांची अंडी अथवा अळ्या ह्या फुलपाखराच्या अळीच्या अन्नझाडावर टाकतात. मग या परोपजीवी अळ्या यजमान अळीला चिकटतात आणि स्वत:च तिच्या शरीरात शिरतात. माईटस जातीचे परोपजीवी किटक बाहेर राहून अळीच्या शरीरातील रस शोषून घेतात. कधी कधी कोषांनासुद्धा ह्या माश्या टोचून त्यात अंडी घालतात. ह्या परोपजीवी किटकांबरोबरच अळ्यांना इतरही रोग होऊ शकतात. बऱ्याचदा अळ्या मरगळलेल्या आणि सुरकुतलेल्या अवस्थेत टांगलेल्या दिसतात किंवा त्यांच्या शरीरातून एक चिकट द्राव आलेला दिसतो. असे होण्याची बरीच कारणे असू शकतात. एकाच झाडावर अळ्यांची जास्त गर्दी, अस्वच्छता, ओले खाणे अथवा उपासमार यामुळे असे रोग होतात. काही अळ्यांना व्हायरसमुळे किंवा बुरशीजन्य रोगसुद्धा होतात. ह्या सर्वांवर मात करूनही काही अळ्या यशस्वीपणे कोष करून मग त्यातून प्रौढ फुलपाखारू बाहेर येते आणि याच कारणासाठी मादीने जरूरीपेक्षा जास्त अंडी घातलेली असतात.
फुलपाखरांवर घडणाऱ्या या परोपजीवनाची छायाचित्रे निसर्गात क्वचीतच आणि नशीबाने मिळतात. सोबतच्या छायाचित्रात दिसणाऱ्या कॉमन नवाबच्या हिरव्या अळीच्या शरीरातून बाहेर येउन परोपजीवी माशीच्या पिवळसर अळ्या कापसासारख्या धाग्यांनी कोष विणत आहेत. त्यांनी एवढ्या सफाईने कॉमन नवाबच्या अळीचे शरीर खाल्ले होते की त्या तिचे शरीर फाडून बाहेर आल्यवरसुद्धा पुढे कित्येक वेळ ती अळी जिवंतच होती. असे होण्यासाठी या परोपजीवी अळ्यांचा जीवनक्रम एवढा जलद वाढतो की नवाबची अळी कोष करण्याच्या आधी त्यांना त्यांचा कोष करायचा असतो. त्यांचा कोषसुद्धा होतो तो नवाबच्या अळीच्या शरीराखालीच, बीचारी ती अळी मात्र त्यांच्या कोषावर मलूलपणे बसून रहाते. एकदा लिंबाच्या झाडावर लाईम जातीच्या फुलपाखराने कोष केला. काही दिवसानंतर कोष काहीसा काळपट झाला अर्थात दुसऱ्या दिवशी ते फुलपाखरू कोषातून बाहेर येण्याची ती लक्षणे होती. मी पहाटेपासून कोषावर लक्ष ठेवून बसलो होतो. मात्र कोषातून छानसे पिवळ्या, काळ्या रंगाचे फुलपाखरू बाहेर यायच्या ऐवजी अतिशय बारक्या काळ्या रंगाच्या माश्या एका छोट्या भोकातून बाहेर यायला लागल्या. त्या एका कोषातून २७ परोपजीवी माश्या त्या सकाळी बाहेर आल्या आणि मला मात्र फुलपाखराऐवजे त्या छोट्या माश्यांचीच बाहेर येतानाची अनेक छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

कामसू मधमाशी.
सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते. बदाम, सफरचंद, जरदाळू, कलींगड, खरबुज, आंबा, स्ट्रॉबेरी, मोसंबी, काकडी, वांगी, लाल भोपळा, मोहरी, सूर्यफुल अश्या अनेक पिकांच्या परागीभवनाकरता आणि अर्थात त्यनंतरच्या फलधारणेसाठी केवळ किटक आणि किटक यांचीच गरज असते. या परगीभवनात मधमाश्यांचा मोठा सहभाग असतो. मधमाश्या त्यांच्याकरता फुलांतील मध आणि त्यांच्या पिल्लांच्या वाढीसाठी फुलातील मकरंद गोळा करत असतात. या मधमाश्या जेंव्हा मधप्राशन करत असतात तेंव्हा आजुबाजुचे परागकण त्यांच्या शरीरावर चिकटतात आणि त्यांच्या पायावर असलेल्या खास "पराग परडीत" जमा होतात. मधमाशीची शरीररचना अशी काही निसर्गाने बनविली आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा फुलांना परागीभवनाकरता होतो. तिच्या शरीरावर आणि पायांवर असंख्य बारीकबारीक केस असतात. या केसांत अतिसुक्ष्म परागकण व्यवस्थीत चिकटून बसतात आणी जेंव्हा मधमाशी दुसऱ्या फुलाला भेट देते तेंव्हा तिथे या परागकणांचा संयोग होऊन परागीभवनाची शक्यता वाढते.
मधमाशीच्या पोळ्यामधे राणीमाशी, नर माश्या आणि कामकरी माश्या अशी वर्गवारी असते. राणीमाशीचे मुख्यकाम अंडी घालण्याचे असते. नर माश्या प्रजोत्पादनासाठी असतात तर कामकारी माश्या ह्या अप्रगत माद्या असतात. यांची संख्या सर्वात जास्त असून त्यांचे प्रमुख काम राणीची, पिल्लांची आणि पोळ्याची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे असे असते. याच माश्या बाहेर जाउन फुलांतील मध आणि मकरंद गोळा करण्याचे काम करतात. एका मोठ्या पोळ्यात अश्या ६०,००० पर्यंत अश्या कामकरी मधमाश्या असू शकतात. या सगळ्या माश्या पोळ्याच्या रक्षाणाकरता अथक परिश्रम करत असतात. मध आणि मकरंद गोळा करण्याचे कामसुद्धा खुप मेहेनतीचे आणि वेळखाउ असते. फुलांच्या ताटव्यापासून पोळ्यापर्यंतचे अंतर २/३ कि.मी. लांब सुद्धा असते. एकदा का एका कामकरी मधमाशीला फुलांचा ताटवा आणि त्यातला योग्य असा मधाचा साठा सापडतो तेंव्हा ती पोळ्यामधे परत येते आणि इतर माश्यांना ही उपयुक्त माहिती पुरवते. याकरता त्यांना त्यांच्या खास "नाचाची" भाषा वापरावी लागते. पोळ्यावर इंग्रजी आठच्या आकड्याप्रमाणे ती उडत रहाते आणि यावरून इतर माश्यांना त्या फुलांचे पोळ्यापासूनचे अंतर आणि दिशासुद्धा कळते आणि क्षणार्धात सगळी फौज सुसाट वेगाने नविन जागेवर मध गोळा करायला बाहेर पडते. कधी कधी कामकरी मधमाशी आपल्या तोंडातून दुसऱ्या मधमाशीला मध भरवून त्या मधाचे "सॅंपल"सुद्धा देतात. जंगलामधे किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्य कुठल्याप्रकारची फुले फुलली आहेत यावर बनणाऱ्या मधाचा प्रकार आणि चव ठरली जाते, म्हणजे जर त्या काळात जंगलात कारवीची फुले मोठ्या प्रमाणावर असतील तर बनणारा मध हा कारवीच्या गुणांनी बनलेला असतो. सध्या महाबळेश्वर आणि महाराष्टात इतरत्रही मोठ्या प्रमाणात मधुमक्षिकापालन केले जाते.
पुर्वी कर्नाळ्याच्या सुळक्यावर किंवा इतरही गड किल्ल्यांवर गिर्यारोहण करताना आग्या मधमाश्यांची मोठी मोठे पोळी दिसायची. त्यावेळेस त्या उठणार नाहीत, त्रास देणार नाहीत आणि आपल्या पाठी लागणार याची काळजी घेत होतो. आता मात्र छायाचित्रणासाठी या मधमाश्या जास्तीत जास्त कश्या दिसतील हाच विचार करत असतो. या माश्यांचे पोळे नेहेमी उंचावर असल्यामुळे सहसा त्यांचे जवळून छायाचित्रण शक्य होत नाही. मात्र एकेकट्या माश्या जेंव्हा फुलांवर घिरट्या घालताना दिसतात किंवा फुलांतील मध पिताना दिसतात तेंव्हा त्यांचे चांगले छायाचित्रण जमू शकते. कुठल्या फुलांमधे मध जास्त असतो आणि त्यावर या मधमाश्या आकर्षित होतात असे माहित असेल तर त्याठिकाणी जर आपण वाट बघत बसलो तर या मधमाश्यांची हमखास चांगली छायाचित्रे मिळतात. पण या मधमाश्यांचा उडण्याचा वेग आणि दिशा यांचा थोडाफार विचार आधी करावा लागतो. दुसरे हमखास या मधमाश्या दिसण्याचे ठिकाण म्हणजे पाणवठे. ओढे, नाले, विहीरी इथे या मधमाश्या पाण्याच्या कडेवर हमखास दिसतात, अश्या ठिकाणीसुद्धा त्यांची छायाचित्रे मिळू शकतात, पण फुलावरच्या मधमाशीची सर नक्कीच त्यांना येत नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
विंचवाला जिवंत जीवाष्म समजले जाते कारण गेल्या ४०० कोटी वर्षांमधे त्यांच्यामधे फार कमी बदल झाला आहे. आज जगात अंटार्क्टीका सारखे अगदी कमी प्रदेश सोडले तर विंचू सर्वत्र आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशा सहज सामावून जाणाऱ्या त्यांच्या जिवनपध्हती. त्यांच्या एवढे कमी अन्न कुठल्याच प्राण्याला लागत नाही. त्यांच्या बिळामधे त्यांच्या आयुष्याचा ते ९७% वेळ ते घालवतात. याच बरोबर त्यांना वर्षभर खायला नसले तरी ते जिवंत राहू शकतात एवढेच नव्हे तर त्यांना पाण्याची सुद्धा गरज लागत नाही. ही पाण्याची तहान त्यांनी खाल्लेल्या प्राण्याच्या शरीरातील द्रवपदार्थामुळे सहज भरून निघते. बरेचसे विंचू हे जीथे त्यांना त्यांचे खाणे अतिशय कमी असते आणि सहजा सहजी न मिळेल अश्या ठिकाणी रहातात. या विंचवांचे आयुष्यही त्याच्या आकाराच्या मानाने मोठे असते. यामुळे काही विंचवांचा वंशवृद्धीचा वेग अतिशय कमी असतो. या सगळ्या अडचणींवर मात करण्यात विंचवाचे शरीर त्यांना पुर्णपणे साथ देते आणि नवलाची बाब अशी की गेल्या कित्येक हजारो वर्षांत त्यांच्या शरीरात काही मोठा बदलही झालेला नाही आणि म्हणूनच हे विंचू प्रगत समजले जातात.
या विंचवांच्या रहायच्या जागा त्यांच्या जातीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. काही विंचू झाडावर रहातात, काहींना खडक प्रिय असतात तर काही मऊ वाळून रहातात. सर्वसाधारणपणे विंचू हे त्यांनी खास खणलेल्या बिळात रहातात. विंचवाच्या जीवनक्रमातील सगळ्यात वैशिष्टपूर्ण कृती म्हणजे मिलनापूर्वीचे नर मादीचे नृत्य. मिलनासाठी उत्सुक असलेला नर विंचू काळजीपूर्वक मादीजवळ जातो आणि तिच्या नांग्या आपल्या नांग्यांमधे पकडतो. अशाप्रकारे मादीचे आक्रमणाचे शस्त्र नाकाम केल्यावर, नरमादीचे अनोखे मिलननृत्य सुरू होते. एकेमेकांच्या नांग्या एकमेकांत गुंतवून आणि शेपट्या उभारून मागे-पुढे सरकत त्यांचा नाच सुरू होतो. असा नाच काही तास केल्यावर विंचवाचे मिलन होते. विंचवाची अंडी मादीच्या शरीरातील पिशवीमध्येच उबवली जातात. विंचवाची मादी एकावेळेस एक अश्या अनेक पिल्लांना लागोपाठ जन्म देते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले आपल्या आईच्या पाठीवर जाउन बसतात. म्हणून तर विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी म्हण पडली आहे. एकंदर पिल्लांची संख्या ही त्या त्या जातीनुसार बदलत जाते. पण १०५ पिल्लांचे लटांबर फिरवणाऱ्या मादीचीही नोंद झाली आहे. ही मादी अपल्या स्वत:च्या पिल्लांना त्यांच्या वासावरून बरोबर ओळखते आणि त्यांच्या पाठीवरून उतरलेले पिल्लू परत पाठीवर आणून बसवते. प्रसंगी नर आणि इतर माद्या यांच्याशीही तीची लढायची तयारी असते. ही पिल्ले सहसा पहिल्यांदा कात टाकेपर्यंत आईच्या पाठीवर रहातात आणि त्यानंतर ती स्वतंत्र त्यांचा जीव जगवतात. त्यांच्या वाढायच्या काळात नर ५ वेळा कात टाकतात तर माद्या ६ वेळा कात टाकतात. पहिल्या दोन कात टाकतानापर्यंतचा काळ त्यांच्या करता महत्वाचा असतो. एकदा का हा काळ त्यांनी पार केला की त्यांना फारसा धोका नसतो.
विंचवाचे आतापर्यंत मी छायाचित्रण बऱ्याच वेळेला केले आहे. दांडेलीच्या जंगलात तर एकाच नेचर ट्रेलमधे अनेक जातींचे विंचू बघितले होते. येऊरलासुद्धा पावसाळ्यात खुप वेळा त्यांचे दर्शन आणि छायाचित्रण झाले होते. मात्र आतापर्यंत पिल्लांना पाठीवर बाळगणारी "लेकूरवाळी आई" काही मला पहायला मिळाली नव्हती. या करता दरवेळेस जंगलात गेल्यावर न चुकता त्यांच्या संभाव्य जागांवर प्रत्येक दगड उलटून बघितला होता पण नशिबाने काही साथ दिली नव्हती. परवा मात्र येऊरला फुलपाखरांच्या "चिखलपानाच्या" छायाचित्रणासाठी गेलो असताना सुक्या ओढ्याच्या आसपास पहिलाच दगड उलटला आणि काय आश्चर्य !!! भारतातील सर्वात जहाल समजली जाणारी विंचवाची मादी छानपैकी आपल्या पाठीवर ५/६ पिल्लांना घेउन बसली होती. आमची चाहूल लागल्यावर काही पिल्ले हळूच पाठीवरून तिच्या पोटाखाली जाउन लपली. बराच वेळ थांबून आम्ही त्यांची बाहेर यायची बाट बघत बसलो. थोड्या वेळानंतर २/३ धिट पिल्ले हळूहळू आईच्या पाठीवर परत येऊन बसली आणि आपापसात खेळायला लागली. काही पिल्ले मात्र अजूनही आईच्या पोटाखालीच स्थिरावली होती. मनाजोगते त्यांचे छायाचित्रण झाल्यावर परत त्यांना खाली दगडाखाली आसरा दिला आणि तृप्त मनस्थितीत परत आलो ते गेल्या कित्येक वर्षांची स्वप्नपुर्ती झाल्याच्या आनंदातच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, February 3, 2009

झळाळते उडते कासव ?
कासव ढालकीडे साधारणत: १ से.मी. एवढे वाढतात आणि यांना "कासव" ढालकीडे म्हणण्याचे कारण म्हणजे यांच्या शरीराच्या पुढच्या आणि बाजुच्या भागाला जो पारदर्शक भाग असतो तो अगदी तंतोतंत कासवासारखा दिसतो. प्रौढ कीडयाच्या अंगावरील पंखाच्या कडा या जास्त प्रसरण पावलेल्या असतात. त्यांच्या डोक्याच्या आणि शरीराच्या भागापेक्षा त्या जास्त बाहेर आल्या असतात. हा जास्त आलेला भाग बिनरंगाचा आणि पारदर्शक असतो. कासवाचे जसे ढालीतून चार पाय आणि शेपुट बाहेर येते तसेच ठीपके या पारदर्शक रंगावर असतात आणि म्हणुनच ती कासवाच्या छोटया प्रतिकृतीसारखी दिसते आणि म्हणुनच याचे नाव "कासव" ढालकीडा. या प्रकारचे ढालकीडे हे जगातील सर्वात सुंदर आनि रंगीबेरंगी असल्यामुळे त्यांचा वापर दागीने बनवीण्याकरता होतो.
निसर्गात फिरताना हे कीडे अतिशय सहज इतरांचे लक्ष वेधून घेतात, कारण ह्यांचा झळाळणारा, चमकणारा सोनेरी रंग. हे कीडे रताळे आणि त्या जातीच्या इतर झाडांवर वाढतात. या ढालकीडयाची मादी पानांच्या खालच्या बाजुला अंडी घालते. अंडयातुन चार ते सहा दिवसात अळ्या बाहेर येतात. अळ्या बाहेर आल्या आल्या पाने खायला सुरवात करतात. ह्या अळ्या चपटया, पीवळट रंगाच्या असुन त्यांच्यावर फांद्या असलेले काटे असतात. ह्या अळ्यांचे एक मजेदार वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कात टाकलेली जुनी कातडी आणि त्यांची विष्ठा त्यांच्या शरीरावरील काटयांवर त्या सांभाळुन ठेवतात. हे काटेसुद्धा वैशिष्ट्यपुर्ण असतात आणि ते हलू शकतात. त्यामुळे ते कुठल्याही दिशेला त्यांच्यावरचे सामान फीरवू शकतात. याच्यामुळे त्यांच्या अंगावर एक प्रकारची संरक्षक ढालच तयार होते. त्यांच्या बरयाचश्या भक्षकांपासुन त्यांचे संरक्षण होते. या अळ्या कायम मोठया संख्येनी बरोबर असतात. एकाच वेळी, एकाच पानाच्या खाली कमीत कमी ३०-४० अळ्या ते जास्तीत जास्त १०० अळ्यांपर्यंत असु शकतात. जेंव्हा हे ढालकीडे प्रौढ होऊन बाहेर येतात तेंव्हा त्यांचा रंग आधी पांढरा शुभ्र असतो. नंतर २/३ दिवसानंतर ते जर्द भगव्या रंगाचे असतात. छायाचित्रात याच अवस्थेतला ढालकीडा दिसत आहे. नंतर त्याचा रंग झळाळणारा, चमकदार, परावर्तीत होणारा असा सोनेरी होतो.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, January 6, 2009

फुलपाखराशी झटापट.
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते. पण वेळप्रसंगी ते इतर कोळी एवढेच नव्हे तर त्यांच्याच जातीतील अशक्त कोळ्यांवरसुद्धा ताव मारायला पुढेमागे बघत नाहीत. सर्वसाधारणपणे कोळी जरी असले लहानसहान भक्ष्य खात असले तरी काही जातीचे कोळी हे बेडूक, सरडे, उंदीर आणी लहान पक्ष्यांचीसुद्धा शिकार करतात. कोळ्यांचे तोंड हे फक्त द्रव पदार्थ पिण्याकरता खास बनलेले असते. भक्ष्याच्या शरीरातील सर्व जीवनरस हा त्याच्या खास मुखावयातून शोषला जातो. अर्थातच हा द्रव पदार्थ ते पीत असल्यामुळे त्यांना खास वेगळे असे पाणी अगदी कमी लागते. कोळी जरी खादाड असले तरी प्रसंगी मोठ्या काळाकरता ते सहज उपास सोसू शकतात. कोळी त्यांच्या धारदार आणि तिक्ष्ण सुळ्यांनी भक्ष्याच्या शरीरात विष पसरवतात आणि त्यांना बेशुद्ध करून मग त्यांच्यावर ताव मारतात.
जाळे विणणाऱ्या कोळ्यांमधे जेंव्हा जाळ्यात किटक सापडतो तेंव्हा कोळी आधी खात्री करू घेतो की ते त्याच्यासाठी योग्य खाद्य आहे की नाही. जर एखादी विषारी गांधीलमाशी सारखी माशी कोळ्याच्या जाळ्यात अडकली तर कोळी सावधपणे जाउन, तीच्यामधे योग्य अंतर ठेवून तीला जाळ्यातून हळूहळू सोडवण्याच्या प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला चविष्ट नसलेले किटक किंवा विषारी, अखाद्य फुलपाखरे जाळ्यार अडकतात तेंव्हासुद्धा त्यांना न चावता त्यांना हळूहळू जाळ्यातून सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यामुळे त्याचे उपयोगी रेषमाचे धागे आणि विष यांची बचत होते. खाण्याजोग्या फुलपाखरांना मात्र लगेचच दुसऱ्या प्रकारच्या जाळ्याने वेटोळे घातले जातात आणि नंतर सावकाश भुख लागल्यावर त्याच्यावर ताव मारला जातो.
कुठल्या जातीचा किटक जाळ्यात सापडला आहे याच्यावरूनसुद्धा त्याला कुठे आणि कसे चावे घ्यायचे हे ठरलेले असते. गांधीलमाशी असेल तर तीला डंख करणारा काटा पोटाला असतो, तिथे चावा घेतला जातो. मधमाशी असेल तर तीच्या तोंडाचा चावा घेतला जातो. लाथा मारणारा नाकतोडा असेल तर त्याच्या लांब पायाचा चावा आधी घेतला जातो. पण त्याच वेळेला जर पतंग किंवा घरमाशी असे निरूपद्रवी भक्ष्य असेल तर थेट त्याच्या धडाचा आधी चावा घेतला जातो. जाळे बनवणारे कोळी अश्या प्रकारे शिकार करतात पण फुलात लपून रहाणारा "क्रॅब स्पायडर" हे त्याच्या रंगामुळे आजूबाजूला मिसळून जातात आणि मग तीथे आकर्षित होणाऱ्या किटकावर हल्ला करतात. जमीनीवर रहाणारे कोळी धावत जाउन, उडी मारून इतर किटक, मुंग्या ह्यांना पकडून त्यांची शिकार करतात.
बऱ्याच वेळेला फुलपाखरांचे छायाचित्रण करताना त्यांच्यावर ताव मारणारे, त्यांची शिकार करणारे कोळी बघायला मिळतात. येऊरच्या जंगलात सुंदर, रंगीबेरंगी "कॉमन जझबेल" या फुलपाखराचे छायाचित्रण करत होतो. अचानक ते फुलपाखरू घाणेरीच्या झुडपात बांधलेल्या मोठ्या "जायंट वूड स्पायडर"च्या जाळ्यात अडकले. त्या कोळ्याची भलीमोठी मादी जाळ्यावर त्या फुलपाखराच्या धडपडीची स्पंदने जाणवून लगेचच धावून आली आणि काही सेकंदातच त्याला दुसऱ्या चिकट रेषमाच्या धाग्यांनी वेढून टाकले. फक्त काही सेकंद चाललेला हा शिकारीचा खेळ खरोखरच थरारक होता. दुसऱ्या छायाचित्रात दिसणारे "ग्लासी टायगर" जातीचे फुलपाखरू फुलावर आकर्षित झाले होते पण त्याची हालचाल थोडी वेगळी जाणवत होती. जवळ जाउन निरीक्षण केले तेंव्हा कळले की त्या फुलाच्य खाली "क्रॅब स्पायडर" लपला होता आणि त्याने त्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या फुलपाखराला पकडले होते. काहे सेकंदातच त्या फुलपाख्रराच्या शरीरातील सर्व जीवनरस शोषून घेतला आणि फोलकटासारखे उरलेले त्याचे पंख खाली सोडून दिले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


Monday, January 5, 2009

देवाने धाडलेले किटक.
ह्या किटकाला लेडी बीटल अथवा लेडीबर्ड बीटल असे म्हणतात. या किटकाच्या जवळपास सर्व जाती आपल्याला खुप उपयोगी ठरतात. ह्यांचा आकर्षक आकार आणि रंगसंगती यामुळे एकंदरच यांच्याबद्दल चांगले मत असते आणि फ्रेंच लोक तर यांना "देवाने धाडलेले किटक" असेच संबोधतात. आज जगभरात ह्यांच्या ४००० हून अधिक जाती आढळतात आणि त्यातील बहूतकरून सर्व ह्या त्यांच्या पंखांवरील ठिपक्यांच्या रचनेमुळे वेगवेगळे ओळखता येतात. इतर ढालकीड्यांप्रमाणेच या लेडीबर्ड ढालकीड्याचासुद्धा पुर्ण जीवनक्रम असतो आणि अंडी, अळी, कोष व प्रौढ अश्या चारही अवस्था असतात. साधरणत: अंडी ते प्रौढावस्था ह्या एकंदर कालावधीस ३/४ आठवड्यांचा काळ जावा लागतो. झाडाच्या पानाखाली सुक्ष्म, पिवळी, लांबट १० ते ५० अंडी समुहात घातली जातात. ह्या अंड्यातून ३ ते ५ दिवसात अळी बाहेर येते. ही अळी मावाकीड्यांवर वाढते आणि तीच्या या वाढीसाठी तीला अंदाजे २ ते ३ आठवडे लागतात. यानंतर तीचा कोष होतो आणि त्या कोषातून प्रौढ किटक अंदाजे ७ ते १० दिवसानंतर बाहेर येतो.
ह्या ढालकीड्यांमधे प्रौढ किटक आणि त्यांच्या अळ्या हे दोघेही मावा कीड्यांवर तुटून पडतात. त्याच बरोबर पिकांवर, फुलबागांवर येणारे इतर त्रासदायक किटकही त्यांना खाण्यासाठी चालतात. यांचे एक अळी अंदाजे ४०० मावा कीडे तीच्या अवस्थेमधे फस्त करते आणि प्रौढ कीडा त्याच्या आयुष्यामधे अंदाजे ५००० हून अधिक मावा कीडे फस्त करतो. याच कारणाकरता परदेशात हे लेडीबर्ड ढालकीडे शेतकऱ्यांना मावा कीड्यांचा नाश करायला विकले जातात. हे कीडे एकाच जागेवर वर्षांमागुन वर्षे जमतात. त्यामुळे या किटकांना या जागांवर पकडून मग त्यांना शेतकऱ्यांना, बागायतदारांना विकले जाते. शेतकऱ्यांना मात्र नैसर्गिक कीड नियंत्रण झाल्याने त्याचा अतोनात फायदा होतो.
ह्या ढालकीड्यांना बचावाकरता काही आश्चर्यकारक नैसर्गिक साधने बहाल केलेली आहेत. त्यांचा लाल, भगवा, काळा रंग पक्ष्यांना हे काही फारसे चांगले खाणे नाही याची जाणीव कायम करून देतो. पक्ष्यांना उपजतच जाण असते की जे किटक लाल, भगवे, पिवळे, काळे असतात ते एकतर विषारी असतात किंवा त्यांची चव अतिशय घाणेरडी असते, त्यामुळे ते सहसा अश्या रंगाच्या किटकांच्या वाटेला जात नाहीत. अर्थातच यामुळे हे किटक जरी चावत नसले तरी वाईट चवीचे नक्कीच असतात. त्याच प्रमाणे जेंव्हा त्यांना धोक्याची जाणिव होते तेंव्हा ते मेल्याचे सोंग घेतात. बऱ्याच शिकारी प्राणी पक्ष्यांना जीवंत भक्ष्य खायची सवय असल्यामुळे सहसा ते मृत प्राण्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. याशीवाय हे कीडे आपल्या पायाच्या सांध्यातून एक खास प्रकारचा घाण वास येणारा स्त्राव सोडतात, यामुळे भक्षक त्यांच्यापासून लांबच रहाण्यात समाधान मानतात.
हा लेडीबर्ड ढालकीडा खरातर भलताच लहान म्हणजे जेमतेम मसुराच्या दाण्याएवढा आणि क्वचीतच दिसणारा. त्यामुळे ठरवून याचे छायाचित्रण मुश्कीलच असते. पण कधी कधी मात्र नशीबाने साथ दिली तर अशी दृश्येसहज मिळूनही जातात. पुणे शहरात सहज टेकडीवर फिरायला गेलो असताना, फुलपाखरांच्या अळ्या शोधता शोधता एका पानावर हा ढालकीडा आजूबाजूच्या मावा कीड्यांवर ताव मारताना आढळला. मात्र सतत पाउस असल्याने याची जास्त काही छायाचित्रे काढता आली नाहीत. तरीसुद्धा त्या थोड्या वेळात या कीड्याने २/३ मावा कीडे फस्त केले. दुसऱ्या छायाचित्रात ह्या लेडीबर्ड ढालकीड्याची अळी दिसत आहे. ही अळी आकाराने प्रौढ ढालकीड्यापेक्षा मोठी असते. भयंकर चपळ असणारी ही अळी सतत एका पानावरून दुसऱ्या पानावर धावपळ करत असते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

सात वर्षांनी फुलणारी कारवी.
फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो. ही फुले जगातल्या प्रत्येक अधिवासात, प्रत्येक कानाकोपऱ्यात आढळतात. ह्या फुलांच्या अक्षरश: लाखो जाती आज आहेत आणि त्यातील प्रत्येकाचे स्वत:चे असे वैशीष्ट्य आहे. आपल्याला जरी ही फुले मनमोहक वाटत असली तरी त्या झाडाकरता ती त्यांच्या वंशवृद्धीकरता फार उपयोगी ठरतात. झाडाची फलधारणा होण्याकरता परागीभवन आवश्यक असते आणि हे परागीभवन या फुलांमार्फतच होते. जातीनुसार फुलांमधे पुरूष आणि स्त्री भाग वेगवेगळे असतात आणि त्या फुलांचे परागीभवन त्याच जातींच्या दुसऱ्या फुलांबरोबर होते. वेळप्रसंगी त्याच फुलामधेसुद्धा परागीभवन होऊ शकते.
अतिप्राचीन काळी जेंव्हा झाडांना बिया येत असत त्यावेळी त्यांचे परागीभवन वाऱ्यामार्फत होत असे. मात्र त्यानंतर जेंव्हा फुले येणारी झाडे उत्क्रांत झाली तेंव्हा हे पराग वाहण्यासाठी खास यंत्रणा सज्ज झाली. ही फुले खास प्राण्यांना आकर्षित करण्यासाठे बनवली गेली. अर्थातच हे परागाचे "कुरीयर" ने आणण्यासाठी अनेक किटक कामाला लागले आणि त्यामोबदल्यात त्यांना त्यांचे खास अन्न मिळाले. हा त्यांचा मोबदला म्हणजे उच्च प्रथिनयुक्त मधुरस. ह गोड मधुरस अनेक किटकांचे मुख्य अन्न आहे. यात फुलपाखरे, मधमाश्या, ढालकीडे असे कीतीतरी किटक आहेत. या किटकांना हा मधुरस फुलांना भेट देण्यासाठी प्रवृत्त करतो आणि कळत नकळत परागाचे इथुन तिथे प्सरण झाल्याने त्या फुलाचे परागीभवन होते.
फुलांतील मधुरस आणि परागकण हे तर या किटकांना मोबदला म्हणून तर मिळतातच पण ह्या फुलांवर आकर्षित होण्यसाठी फुले अनेल क्लुप्त्या वापरतात. या फुलांचे रंग अतिशय उठावदार आणि आकर्षक असतात त्यामुळे त्यावर हे किटक सहज आकर्षिले जातात. त्याचप्रमाणे बऱ्याच फुलांचा सुगंध अतिशय मनमोहक असतो यामुळे सुद्धा अनेक किटक त्या फुलांवर आकर्षीत होतात. ज्या फुलांना सुवास असतो ती सहसा पांढऱ्या रंगाची असतात आणि प्रसंगी रात्री फुलतात. पण रात्री जरी फुलत असली तरी त्यांचा गंध एवढा जबरदस्त असतो की किटक त्यावर आकर्षित होतातच.
आपण नर्सरीमधुन जेंव्हा गुलाबाचे किंवा इतर फुलझाड आणतो तेंव्हा आपण अशी अपेक्षा करतो की त्यावर सारखी फुले यावीत. मात्र निसर्गात असे कायम घडत नाही. प्रत्येक फुलाचा फुलायचा हंगाम ठरलेला असतो आणि त्या हंगामातच त्या झाडाला फुले बहरतात. ह्या "कारवी"ची तर न्यारीच तर्हा आहे. ही चक्क दर सात वर्षांनी फुलते. पण फुलते ती अशी जबरदस्त की डोंगरच्या डोंगर अगदी जांभळे करून सोडते. ही कारवी किटकांमधे अतिशय प्रिय आहे आणि सतत त्यावर अनेक किटक घोंगावत असतात. सात वर्षांनी फुलल्यामुळे तीच्यापासून मिळणारा मधही तसा थोडास महाग आणि दुर्मीळच असतो. २००० साली कारवी फुलली होती त्यावेळी माझ्याकडे "फिल्म" कॅमेरे होते आज २००७ साली परत कारवी "डिजीटल"च्या जमान्यात फुलली आहे. सध्या ठाण्याच्या जंगलात, राजमाची, कर्नाळा, वाडा, सिंहगड, पुरंदर, कास अश्या अनेक ठिकाणी ही गडद जांभळ्या रंगाची फुले आपल्याला आढळतील. पण जर का आपण या वर्षी ही फुले बघीतली नाहीत तर थेट २०१४ सालापर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


कुंभारमाशी : मातीतील कुशल कलाकार.
अगदी आपण वापरत तेच सामान वापरून काही काही किटक अतिशय सुंदर, आकर्षक आणि मजबूत घरे बनवतात. कधी कधी तर त्यांची ही घरबांधणी ही आपल्यापेक्षा जास्त सुंदर, टिकाऊ आणि झटपट बनवलेली असते. "वास्प" हा किटकांचा गट मुंग्या आणि मधमाश्या यांच्या बरोबरचा आहे. ह्या माश्या सहसा उत्तम सहजीवनाचे उदाहरण असतात. या त्याच वेळेस इतर उपद्रवी किटकांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवून आपल्याला त्या उपयोगीच ठरतात. कुंभारमाशी ही मातीतील काम करण्यात सर्वात जास्त कुशल आणि हुषार समजली जाते. ही माशी आधी योग्य जागेची निवड करते. मग त्या फांदीच्या बेचक्यावर किंवा अगदी आपल्या घरातील खिडकीच्या फ्रेमवरसुद्धा ती मातीचा पसरट, उथळ खळगा बनवते. या खळग्यावर अजून अजून मातीचे गोळे आणून हळूहळू ती साधारण अर्ध्या इंचाचे एक मडके बनवते. सर्वात सुंदर म्हणजे ह्या मडक्याचा आकार आणि त्याचे तोंड हुबेहुब आपल्या मडक्यासारखेच असते. ह्या मडक्याचा काठ सुद्धा अगदी गोलाकार आणि बाहेरच्या बाजूस वळलेला असतो. हे मडके बनवण्यासाठी ती आपल्या पुढच्या पायांचा आणि तोंडाचा वापर करते.
हे मडके बनवण्यासाठी तीला माती लागते ती जवळपासच्या नदी, नाल्याच्या, ओढ्याच्या ओलसर काठावरून आणलेली असते. ही माती वाहून आणण्यासाठी तीला अनेक फेऱ्या माराव्या लागतात. दर १०/१५ मिनीटांनी ती एक ओल्या मातीचा गोळा आणून तीचे घरटे लिंपायला घेते. साधारणत: एक ते दोन दिवस तीला एक मडके बनवायला लागतात. यानंतर ती आपले पोट मडक्याच्या आत घालून तीथे तीचे अंडे एका रेशमाच्या धाग्याने लटकवते. यानंतर ती शिकारीकरता बाहेर पडते. फुलपाखरांच्या, पतंगांच्या अळ्या हे तीचे मुख्य लक्ष्य असते. त्या अळ्यांना ती डंख मारून बेशुद्ध करते आणि घरट्यात आणून आत कोंबते. या वेळी घरट्याच्या आत असणाऱ्या अंड्याला धक्का लागणार नाही याची ती योग्य ती काळजी घेते. यानंतर ती त्या मडक्याचे तोंड परत माती आणून लिंपून टाकते. एका मडक्या करता तीचे काम पुर्ण झालेले असते पण अजूनही तीला नवीन घरटी बनवायची असतात म्हणून ती परत झटून कामाला लागते आणि अंदाजे अशीच ५/६ मडकी आजूबाजूला बनवते.
योग्य वेळी घरट्याच्या आत अंड्यातून अळी बाहेर येते आणि तीला लगेचच तिथे साठवलेले ताजे अन्न बेशुद्धा अळीच्या स्वरूपात आयते मिळते. या अळीकरता तीच्या आईने योग्य तेवढेअ अन्न बरोबर साठवलेले असते, आता ही कुंभारमाशी तीच्या अळीला पुरेल इतकेच अन्न कसे ठरवते, ते कीती दिवस ताजे राहीला याचा अंदाज कसा बांधते ही नैसर्गिक कोडी अजूनही उलगडलेली नाहीत. कालांतराने ती अळी तिथेच कोष बनवते आणि काही दिवसानंतर आपल्या मजबूत आणि धारदार तोंडाने मडके आतून पोखरून बाहेर पडते.
आतापर्यंत जंगलात अनेक वेळेला कुंभारमाशीला नदी काठावर ओली माती घरटे बांधायला नेताना बघितले आहे किंवा त्यांची लहान लहान मडकी बघितली आहेत. पण त्यावेळेस त्यांचा पुर्ण जिवनक्रम काही छायाचित्रण करता आला नाही. मात्र काही दिवसांपुर्वी माझ्या घरीच या कुंभारमाशीने मडके बनवायला सुरवात केली त्यामुळे मला अगदी सगळ्या स्थितीमध्ये आणि अवस्थांमधे त्यांची छायाचित्रे घेता आली. अर्थात या करता मला सतत २०/२१ दिवस त्यांचे निरिक्षण करावे लागले. या काळात ती जेमतेम इंचभर लांबीची माशी एवढे अथक प्रयत्न तीचा वंश वाढवण्याकरता करत होती की त्याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. एवढे करूनसुद्धा शेवटपर्यंत मला काही त्या मडके फोडून बाहेर येणाऱ्या नवीन वंशाच्या कुंभारमाशीला बघता आले नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

चिमुकल्यांचे स्थलांतर.
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजुकसुद्धा असणारे हे किटक प्रचंड लां अंतराचेसुद्धा स्थलांतर सहजासहजी करतात. पण तरीसुद्धा पक्ष्यांचे स्थलांतर आणि फुलपाखरांचे स्थलांतर यात थोडा फरक आहेच. पक्ष्यांचे स्थलांतर दुमार्गी असते तर फुलपाखरांचे एकमार्गी असते. पक्ष्यांसारखी फुलपाखरे परत त्यांच्या जन्मस्थळाला भेट देत नाहीत. पण तरीसुद्धा ही नाजुकशी फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात आणि हे अंतर अगदी २ कि.मी. पासुन ३००० कि.मी. पर्यंत लांब असू शकते. तापमानातील आणि आर्द्रतेतील बदल, अन्नझाडांची कमतरता आणि अचानक वाढणारी संख्या ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणे असू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे.
पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यतियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पीढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाचे दिशेने दोन भौगोलीक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सुर्यप्रकाश चांगला असे त्या दिवशी होतात. या सुर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती उर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उदायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्यी ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपुर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजुन पर्यंत उलगडलेले नाही.
आपल्या भारतातसुद्धा दोन प्रकारचे फुलपाखरांचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे मिल्कवीड आणि व्हाईट्स जातीची फुलापाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चीत असतो. दुसऱ्या प्रकारात हवामानात प्रतिकुल बदल झाल्यामुळे फुलपाखरे दुसरीकडे जातात. या प्रकारात सहसा त्यांची संख्या कमी असते आणि ही डोंगराळ प्रदेशातून खालच्या बाजूस उडतात. अतिथंड हवामान किंवा प्रचंड पाउस हेच याचे मुख्य कारण असते. आज भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात अशी नोंद आहे. यात प्रामुख्याने कॉमन क्रो, स्ट्राईप्ड टायगर, ब्लु टायगर, डार्क ब्लु टायगर, पी ब्लु, कॉमन अल्बाट्रॉस या जाती आहेत. आज परदेशात फुलपाखरांच्या स्थलांतराच्या वेळी फुलपाखरांचे तज्ञ अक्षरश: ग्लायडर विमान घेउन त्यांचा मागोवा घेतात. पण सध्यातरी आपल्याकडे अश्या सोयीही नाहीत आणि असे लोकही नाहीत. तरीसुद्धा अगदी अलीकडे दक्षिण भारतात यावर जोरात काम सुरू झाले आहे आणि लवकरच त्या अभ्यासाचा, नोंदींचा आपल्या सर्वांना फायदा होइल.
आज भारतात या फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे कठिणच काम आहे. पण जर का तुम्ही हिवाळ्यात जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला यदाकदाचीत ही स्थलांतर करणारी फुलपाखरे दिसली तर मात्र त्यांचे छायाचित्रण करायचा मजा येते. याचे कारण एरवी आपल्याला एखाद दुसरे फुलपाखरू दिसते पण यावेळी मात्र हजारो फुलपाखरे एकाच वेळेस त्या जागी आपल्याकरता उपलब्ध असतात आणि या हजारो उडणाऱ्या, बसलेल्या फुलपाखरांपैकी कोणाचे छायाचित्र काढू ? असाच प्रश्न कायम पडतो. एकाच झाडावर बसलेली अगदी शेकडो फुलपाखरे मी आंबोली, वेळास, फणसाड, येऊर येथे बघीतली आहेत. त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर त्यातली बरीचशी उडतात पण तरीसुद्धा तुमच्या "फ्रेम"मधे १०/१२ फुलपाखरे तरी हमखास येणारच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Thursday, January 1, 2009

या कोषामागे दडलय काय ?
काही किटक त्यांच्या आयुष्यामधे संपुर्ण अवस्थांतर करतात. याचा अर्थ असा की त्यांच्या अयुष्यातील एकंदर जीवन अवस्थांमधली कुठलीही अवस्था दुसऱ्या अवस्थांसारखी नसते. या किटकांची लहान पिल्ले ही त्यांच्या पालकांपेक्षा आकाराने, रंगाने, रूपाने एकदम वेगळी दिसणारी असतात. फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या बाबतीत असेच घडते. फुलपाखराची मादी अंडी घालते ती अंडी एकदम वेगवेगळ्या आकाराची, रंगाची असतात. त्यानंतर त्यातून बाहेर येणारी अळी ही तर वेगळेच रंग असलेली असते. ही अळी वाढता वाढता पाच वेळा कात टाकते आणि त्यानंतर तीचा वेगळ्याच आकाराचा, रंगाचा कोष होतो. हा कोष मात्र बिलकुल वाढत नाही आणि हालचालही करत नाही. काही दिवसानंतर या कोषातून एक सुंदर, नाजूक पण वेगळ्याच रंगाचे फुलपाखरू बाहेर येते.
असेच हे "टॉनी कोस्टर" फुलपाखरू नुकतेच कोषातून बाहेर येत आहे. याचा रंग त्याच्या काटेरी, लालसर तपकीरी अळीपेक्षा कीतीतरी वेगळा आहे. जरी याचे पंख पुर्ण उलगडलेले नाहीत, सुकलेले नाहीत तरी त्याचा रंग पिवळसर भगवा आहे आणि त्यावर पांढरे, काळे ठिपके आहेत हे स्पष्ट दिसत आहे. साधारणत: महिन्याभरापुर्वी हे एक अतिशय बारके पिवळसर अंड्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर त्यातून अळी बाहेर आली आणि तीने तीच्या कवचावरच उच्च प्रतीच्या प्रथीनांकरता ताव मारला. या जातीची फुलपाखरे कृष्णकमळाच्या वेलीवर मोठ्या संख्येने अंडी घालतात. बऱ्याच वेळा त्यातून एकाच वेळेस अळ्या बाहेर येतात आणि त्याच पानावर काही काळ रहातात. या वेळेस त्या पानाचा वरचा नाजूक पापुद्रा खाउन ते दिवस काढतात. काही दिवसानंतर मात्र त्या स्वतंत्र, वेगळ्या होऊन नवीन पानावर जातात आणि एकट्या रहातात. ही लालसर काळपट दिसणारी अळी प्रचंड खादाड असते आणि अक्षरश: पानामागून पान आणि फांदीमागून फांदी संपवत जाते.
यांचा कोष मात्र दिसायला अतिशय सुंदर असतो. फांदीवर लटकणारा हा कोष जेमतेम पाउण इंचाएवढा लांब असतो. याचा रंग परत वेगळा आणि फिकट गुलबट, पांढरा असतो आणि त्यावर काळ्या रेघांची नक्षी असते. त्यावर भगवे बारीक ठिपकेसुद्धा असतात. अंदाजे ७/८ दिवस हा कोष वेलीवर उलटा लटकत असतो. ज्या दिवशी फुलपाखरू बाहेर येणार त्याच्या आदल्या दिवशी हा कोष काळपट होतो. त्याचे बाह्याआवरण पारदर्शक होते आणि आतल्या पंखांचा रंग, आणि अवयव स्पष्ट दिसू लागतात.
बदलापुरला मला ह्या फुलपाखराचा संपुर्ण जीवनक्रम एका दिवसात एकाच वेळेस अचानक दिसला. कृष्णकमळाच्या वेलीचा एक मोठा मांडव होता. तिथे एका ठिकाणी कोषातून नुकतेच फुलपाखरू बाहेर आले होते. नंतर आजूबाजूला बारकाईने बघीतले तर काही पानांवर पिवळसर अंड्यांचे पुंजकेच पुंजके मला दिसले. काही पानांवर अर्धी अंडी शाबूत होती तर अर्ध्या अंड्यातून अळ्या नुकत्याच वळवळत बाहेर आल्या होत्या. इतर काही पानांवर वेगवेगळ्या अवस्थांमधील अळ्या, वेगवेगळ्या आकारात होत्या. काही काही अळ्यांनी नुकतीच कात टाकलेली होती आणि त्यांचे चमकदार रंग आणि बाजूला जुनी कातही तशीच दिसत होती. पलीकडे एका फांदीवर ह्या जातीच्या फुलपाखरांची जोडी मिलनावस्थेमधे दिसली. मांडवाच्या खालच्या बाजूला एक मादी आपले पोट वळवून अंडी घालतानासुद्धा दिसत होती. एकाच दिवशी ह्या फुलपाखरांच्या सर्व अवस्था आणि जिवनक्रम एकाच ठिकाणी दिसणे म्हणजे खरोखरच नवलाची गोष्ट होती.
नंतर यातला कोष घरी आणून त्यातून फुलपाखरू बाहेर येतानाचे छायाचित्रण करायाला दिवाळीच्या दिवशी अक्षरश: पहाटे पाचला उठून बसलो. अंदाजे सव्वा सातच्या सुमारास हलकेच तो कोष फाटून ते फुलपाखरू बाहेर आले आणि त्याने पंखांची उघडमीट केली. त्यावेळेस ते पंख ओले आणि आक्रसलेले होते. ज्या क्षणाची मी दोन अडीच तास वाट बघीतली ते फुलपाखरू बाहेर येणे मात्र काही सेकंदातच पार पडले आणि जेमतेम काही छायाचित्रे मिळाली. अर्थातच एका स्थीर कोषातून ते चळवळे फुलपाखरू बाहेर येताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव मला आणि माझ्या कॅमेरालाही होता.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/

जमिनीवर धावणारा मासा.
जमिनीवर चलाणारा मासा हीए कल्पनाचा आपण करू शकत नाही कारण मासे म्हटले की की ते पाण्यातच पोहत असणार असी आपली समजूत असते. अर्थात बऱ्याच अंशी ते खरेसुद्धा आहे पण प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसाच याला पण अपवाद नक्कीच आहे. नीवटी किंवा इंग्रजी मध्ये मड स्किपर हा मासा अगदी बेडकासारखा उभयचर प्रवृत्तीचा आहे. आज जगभरात अनेक जातीच्या निवट्या आहेत आणि त्या प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात सापडतात. खाडीचे पाणी ओसरले की तीथल्या चिकट चीखलावर या हमखास आपल्याला दिसतात. बारके जीवजंतू आणि शेवाळे खाण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. साधारणत: यांचा रंग आजूबाजूच्या चीखलाशी अगदी मिळताजुळता असतो त्यामुळे समुद्रपक्ष्यांना ते पटकन दिसत नाहीत आणि त्यांचा सहज बचाव होऊ शकतो. यांचे शरीर मागे निमुळते होत गेलेले असते आणि त्यांना पाठीवर व शरीराच्या दोन्ही बाजूंना कल्ले असतात. हे बाजूचे कल्ले अगदी त्यांच्या पायासारखे दिसतात आणि तसेच कामसुद्धा करतात. चीखलावर पटपट पळायला आणि दगडावर आधार घ्यायला त्यांना ते उपयुक्त ठरतात. खालच्या कल्ल्यांना पकड घेण्यासाठी खास सोय असते यामुळे ते खडकावर, तिवराच्या झाडाच्या मुळांवर सहज चिकटून अन्न शोधू शकतात. वरचे कल्ले मात्र वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे असतात. जातीप्रमाणे यात बदल होत जातो आणि एकमेकांना संदेश आणि धोक्याचा इशारा देण्यासाठी वापरले जातात. याकरता त्यांची जलद उघडमीट केली जाते आणि प्रसंगी अगदी ते झेंड्यासारखे पण फडकवले जातात.
साधरणत: यांची लांबी ६ ते ८ इंच असते. मागे निमुळती होणारी त्यांची शरीररचना असून यांचे डोके जरा अंमळ मोठेच असते आणि त्यातूनही त्यांचे डोळे अतिशय बटबटीत आणि बाहेर आलेले असतात. हे मोठे डोळे ते कायम पाण्याबाहेर काढून आजूबाजूच्या परिस्थीतीचा अंदाज घेत रहातात. मधे मधे डोळ्यांचे उघडमीट करून त्यात आर्द्रता कायम राहील असे बघतात. त्यांच्या रंगामुळे ते खाडीतील चीखलात सहज मिसळून जातात पण तरीसुद्धा जर एखादा पक्षी त्यांच्यावर चाल करून आला तर ते अतिशय शिताफीने लांब उडी मारून जवळपासच्या पाण्यात शिरतात किंवा कुठल्यातरी बीळात घुसतात. याशीवाय त्यांचे शरीर इतके बुळबुळीत असते की त्यांना पकडणे म्हणजे मोठे बिकट काम असते. यांचा विणीचा हंगाम सहसा पावसाळ्याआधी असतो. या काळात नर त्यांच्या जागेची राखण करतात. पाण्याबाहेर आपले सर्व कल्ले ताणून ते लांब उड्या मारून "मी मिलनास तयार आहे" अशी जाहिरात करत रहातात. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी नरांनासुद्धा ते त्यांच्या भागातून पळवून लावतात. मिलनास मादी तयार झाली की ती त्याच्या पाणी भरलेल्या चीखलाच्या बीळा शीरते आणि तीथे अंडी घालते. जेंव्हा भरतीच्या वेळी पाणी चढत जाते तेंव्हा ती त्या बीळाचा तोंड आपल्या तोंडाच्या सहाय्याने चीखलानी बंद करते.
खरेतर माशांचे छायाचित्रण करायचे म्हणजे अंडरवॉटर कॅमेरा हवा पण या जमीनीवरच्या माश्यांमुळे पाण्यावरही यांचे छायाचित्रण करता येते. अर्थात अतिशय चिकट असलेल्या चीखलात हे मासे रहात असल्यामुळे अतिशय सावकाश आणि जपून त्यांच्याइथे जावे लागते. मुंबईच्या आसपास जीथे तिवरांची जंगले जास्त आहेत अशा ठिकाणी यांचे छायाचित्रण शक्य होऊ शकते. परदेशात या माश्यांना फीश टँकमधे ठेवण्यासाठी आणि त्यांची कृत्रीम पैदास करण्यासाठी मोठी मागणी असते. आपल्याकडे मात्र हे मासे अजून निसर्गातच बघायला मिळू शकतात.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/