सुंदरबन तिवरांचे जंगल.....


सुंदरबन जरी
तिवरांचे जगातील सर्वात मोठे जंगल असले तरी नक्कीच इकडच्या वाघांमुळे हे जास्त
प्रसिद्ध आहे. भारतातील इतरत्र आढळणाऱ्या वाघांपेक्षा इकडचे बाघ आणि त्यांच्या रहाण्याच्या
/ जगण्याच्या सवयींमधे जमिन अस्मानाचा फरक आहे. दिवसभरात इथे दोन वेळा भरती आणि
ओहोटी येते त्यामुळे जमिनीचा बराचसा भाग पाण्याखाली जातो आणि जेंव्हा पाणि ओसरते
तेंव्हा तिथे दलदल असते. यामुळे इथेल्या वाघांना धावत जाउन शिकार करणे खुप कठिण
असते. याचमुळे इथल्या वाघांना बऱ्याच वेळेला मासे आणि खेकडे मारून भूक भागवावी
लागते. सगळीकडे पाणि असल्यामुळे इथले वाघ पट्टीचे पोहोणारे आहेत आणि बऱ्याच वेळेला
जर का ते दिसले तर ते खाड्या पोहत पार करताना दिसतात. गोड्या पाण्याच्या अभावामुळे
इथला वाघ साधारणत: खारे पाणी पिताना दिसतो. ज्या बाजूला गावे वसलेली आहेत त्या
त्या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांच्या बाजूने जाळी लावलेली आहेत
जेणेकरून वाघाला त्या बाजूने गावात शिरता येणार नाही.
या खास प्रकारच्या
अधिवासामुळे इथे वाघ दिसणे हे फार दूर्मिळ. वाघांचे सोडूनच द्या पण इतरही वन्य
प्राणी इथे दिसणे म्हणजे नशिबाचीच बाब, कारण आपला सगळा प्रवास हा बोटीने होतो
त्यामुळे फक्त किनाऱ्यावर जर का कोणी प्राणी आले तरच ते आपल्याला दिसणार. पण
अर्थातच याच कारणामुळे अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आपल्याला सहज
दिसू शकतात. सुंदरबनची खासियत म्हणजे इथे आपल्या सात वेगवेगळ्या जातीचे, रंगीबेरंगी
खंड्या पक्षी दिसतात. या खंड्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, करकोचे,
पाणकावळे हे खाडीच्या कडेला असलेल्या तिवरांच्या झाडांवर दिसतात. मधेच एखाद्या
पाण्याच्या पट्ट्याच्या आत आपल्याला वेगवेगळी बदके मोठ्या थव्याने एकत्र पाण्यात
खाणे शोधताना दिसतात. सगळीकडे तिवरांचे जंगल असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार
अगदी सहज दिसतात. या तिवरांची एखाद्या भाल्याच्या फाळासारखी दिसणारी चिखलातून वर
आलेली मुळे खरोखरच मजेशीर दिसतात. आपला नशिब जर का जोरावर असेल तर खाऱ्या
पाण्यातली अजस्त्र सुसर आपल्याला काठावर विसावलेली आढळू शकते.
इथल्या आदिवासींचे
जिवन अतिशय खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोटीवर अवलंबून रहावे लागते.
माणसांची आणी सामानाची ने-आण करण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नसतो. त्यांना उपजिवीकेसाठी
मासेमारी, जंगलातून मध गोळा करणे, लाकूडफाटा जमवणे हीच काही मोजकी साधने आहेत.
त्यातून त्यांना वाघापासून अतिशय सावध रहावे लागते. वन खात्याचे अधिकारीसुद्धा
त्यांना अभयारण्य़ात चोरून मासेमारी केल्याबद्द्ल पकडतात. जंगलातले आणि नैसर्गिक
धोके टळावे म्हणून सर्व गावकरी / आदिवासी “वन देवीची” पुजा करतात. नवलाची गोष्ट
म्हणजे अगदी हिंदू आणि मुसलमान सुद्धा भिन्न धर्मिय असले तरी दर वेळेस बाहेर जातान
या वन देवीची पुजा करतात. जंगलामधे, गावांमधे, प्रत्येक बेटावर या देवीचे देऊळ
बांधलेले आहे.
आतापर्यंत अनेक
जंगलांमधे पायी फिरलो आहे. मोठ्या मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमधे जिप अथवा उघड्या
वाहनाने फिरलो आहे. त्याठिकाणचे वन वैभव बघणे आणि छायाचित्रण करणे हे वेगळे कसब
असते. पण सुंदरबन मधे कायम तुम्हाला बोटीने फिरावे लागते. इथे तसे वन्य प्राणी
अगदी कमी दिसतात. वेगवेगळे पक्षी दिसले तरी त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे
नाही कारण एखाद्या जीपसारखी बोट पटकन बंद करता येत नाही. बोट चालता चालता
छायाचित्रण करायचे म्हटले तर बोटीची थरथर छायाचित्रणात जाणवते त्याची खास काळजी
घ्यावी लागते. असे असले तरी त्या बोटीतून नुसते फिरणे, त्या अनोख्या तिवरांच्या
जंगलाचा निरिक्षण करणे आणि मग जमलेच तर छायाचित्रण करणे ही काही वेगळीच मजा आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
No comments:
Post a Comment