Saturday, March 12, 2016

आयत्या बिळावर ......

पावसाळ्याच्या थोडेसे आधी कोकीळ पक्ष्याची कुहू..S...S..कुहू... आपण ऐकतो आणि आपल्याला माहित असते की ते स्वत: काही घरटे बनवत नाहित, मात्र कावळा आणि इतर पक्ष्यांच्या घरट्यातील त्या त्या पक्ष्याची अंडी ढकलून स्वत:ची अंडी तिथे घालतात. ते बिचारे पक्षी सुद्धा अगदी तेवढ्याच तळमळीने त्या परक्या पिल्लांना आपल्याच पिल्लांसारखे वाढवतात. शिंपी पक्ष्यासारखा अगदी लहानसा पक्षी असेल तर त्याच्या घरट्यातील पिल्ले त्या दांडग्या कोकीळेच्या पिल्लासमोर जगू शकत नाहित आणि ते चिमुकले आई-बापसुद्धा त्या अधाशी पिल्लाला भरवून भरवून हंगामाच्य शेवटी मरूसुद्धा शकतात. आता हे तर कोकीळ पक्ष्याबद्दल झाले पण असे काही किटकसुद्धा आहेत की जे स्वत: काही घरटी बनवत नाहित आणि असेच दुसऱ्याच्या घरात सरळ आपली अंडी घालून मोकळे होतात.

ककू वास्प हा असाच एक लहान माश्यांचा वर्ग आहे. साधारणत: या माश्या अतिशय रंगीबेरंगी, झळाळत्या निळ्या, हिरव्या किंवा लाल रंगाच्या असतात. या त्यांच्या झळाळत्या रंगामुळे त्यांना गोल्ड वास्प, ज्युवेल वास्प, रूबी वास्प अथवा एमराल्ड वास्प अशी अनेक वेगवेगळी नावे आहेत. या परावलंबी माश्या त्यांची स्वत:ची अंडी दुसऱ्या माश्या, मधमाश्या किंवा इतर किटकांच्या घरात घालतात. आज जगात यांच्या जवळपास ३००० उपजाती आढळतात. या माश्या त्यांच्या लहान आकारामुळे आणि चोरटया सवयीमुळे जंगलात, निसर्गात फार कमी दिसतात. पण कधी कधी सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या फुलांना मधाकरता भेट देतात. इतर माश्यांच्या घरट्याजवळ, पोळ्याजवळ त्या आपल्याला दिसू शकतात. त्यांच्या शरीराचे बाह्य आवरण हे टणक असते आणि त्यावर अनेक खड्डे असतात. या टणक आवरणामुळे जर का त्या घरट्याच्या मालकीण माशीने तीला दंश केला तर तीला तो जाणवत नाही. याचबरोबर ती तीच्या शरीराची अशी काही गुंडाळी करून घेते की तीचे नाजूक पोट आतल्या बाजूला सुरक्षित रहाते आणि कठीण भागावर त्या मालकीण माशीच्या दंशाचा काही परिणाम होत नाही आणि मग तिला लगेच तिकडून पळ काढता येतो. या सर्व माश्या एकेकट्या रहाणाऱ्या असतात. यांच्या सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात. काही माश्या इतर माश्यांच्या घरट्याच्या तोंडाशी लपून बसतात आणि त्या घराची मालकीण माशी आली तर तीला कडकडून दंश करून मारतात. त्यानंतर तिच्या आयत्या घरावर त्या ताबा मिळवतात आणि तिथे आपली अंडी घालतात. दुसऱ्या जातीच्या ककू वास्प मात्र त्या घराच्या मालकिणीला न मारता हळूच चोरून तिच्या घरात शिरतात आणि त्या तिथे आपली अंडी घालतात. अंडी घातल्या घातल्या मात्र त्या तिकडून लगेच पळ काढतात. आता त्या घराची मालकिण माशी मात्र तीच्या पिल्लांबरोबरच ह्या उपऱ्या माशीचीसुद्धा पिल्ले वाढवते. दुसऱ्या एक जातीची ककू वास्प मात्र फक्त इतर किटकांच्या घरटयातले अन्न चोरण्याकरता कुप्रसिद्धा आहे. ही वास्प मधमाश्या, कुंभार माशी आणि इतर माश्यांनी त्यांच्या पिल्लांकरता जमवलेले कोळी, फुलपाख्ररांच्या / पतंगांच्या अळ्या, मावा किडे त्यांच्या घरट्यातून पळवते.

मागे एकदा माझ्या घरी खिडकीच्या काचेवर अश्याच झळाळत्या हिरव्या रंगाची माशी आली होती. नेहेमीपेक्षा अर्थातच ती वेगळी असल्यामुळे मी तीचे नीट निरीक्षण केले आणि संदर्भ ग्रंथातून तीला ककू वास्प म्हणून ओळखले. त्यावेळेला तीचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. नंतरसुद्धा त्या मला आपल्या जंगलात दोन / चार वेळा उडताना दिसल्या पण त्या एवढ्या प्रचंड वेगाने तिकडून उडून गेल्या की परत त्यांचे छायाचित्रण शक्य झाले नाही. यावेळी मध्य प्रदेशातील पेंच या राष्ट्रीय उद्यानात गेलो असताना आम्ही रहात असलेल्या रिसॉर्टची बाग अगदी छान जोपासली होती. त्यामुळे सकाळी आणि दुपारी आम्ही वन खात्याने नेमून दिलेल्या वेळी आत जंगलात फिरायचो आणि मधल्यावेळी मी मात्र त्या बागेमधे फुलपाखरे, चतूर, कोळी आणि इतर काही वेगळे किटक दिसतात का हे शोधत फिरायचो. असाच एक दिवसी दुपारी जेवून परत येताना मला एका छोट्या झुडपाच्या पानाखाली काही तरी चमकलेले दिसले. मी निट निरखून बघितले तर ती या ककू वास्प ची जोडी होती आणि अगदी शांतपणे बसली होती. मी धावत रूम मधे गेलो आणि लांब पल्ल्याची झूम लेन्स बदलून मॅक्रो लेन्स कॅमेराला लावली आणि पळतच त्या ठिकाणी परत आलो. पण मधल्या वेळी त्या दोन्ही ककू वास्प तिकडून उडून गेल्या होत्या, माझी परत एकदा निराशा झाली. त्या तिकडून गेल्या होत्या तरीसुद्धा मी तिथे उन्हात त्यांची वाट बघायचे ठरवले. अंदाजे १५/२० मिनीटे तळपत्या उन्हात वाट बघितल्यावर मात्र त्यातली एक माशी अलगद त्याच झाडावर येउन बसली. मी आधी लांबूनच तीची थोडी छायाचित्रे घेतली. त्या नंतर शरीराच्या कमीत कमी हालचाली करत मी तीच्या जवळ सरकलो आणि अगदी जवळून तीची छायाचित्रे घेतली. आता मात्र मला हवी होती तशी छायाचित्रे तिने मला घेऊ दिली.
  
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment