Thursday, October 1, 2015

थेंबाथेंबामधले प्रतिबिंब.

डिसेंबर / जानेवारी महिना आला की आपल्याकडे थंडीचा मोसम सुरू होतो. सध्या मुंबईत जरी थोडीशी थंडी जाणवत असली तरी ती नाशिक, नागपूरच्या मानाने ती नाममात्र आहे. अर्थात उत्तर भारतातल्या थंडीशी आपण या थंडीशी तुलनाच करू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की जंगलात थंडीचे प्रमाण शहरातल्या थंडीपेक्षा जास्त असते. या काळात धुक्यामुळे आणि थंडीमुळे पक्षी, प्राणी अगदी कमी दिसतात. जंगलात फुलपाखरे आणि इतर किटकही अगदी कमी प्रमाणात दिसतात. यामुळे सकाळी जंगलात कुठलीच हालचाल जाणवत नाही. पण याच वेळी आपल्याकडे दव पडते ते इतके असते की सकाळी जंगलातफेरफटका मारताना साधारणत: पावसाळ्यात जसे झाडावरून पाणी गळते अगदी तसेच पाण्याचे थेंब या दवाचे पानांवरून ठिबकते आणि यामुळे पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यात अने्क चिमुकली रानफुले जंगालात फुललेली असतात.


 या फुलांचा आकार इतका लहान असतो की सहसा कोणाची नजर त्यांच्यावर पडत नाही. ही रानफुले ज्या झुडपांवर उगवतात तीसुद्धा इतकी लहान आणि जमिनीलगत असतात की नेहेमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जंगलात फिरताना नेहेमी मोठ्या प्राण्या / पक्ष्यांची अपेक्षा न करता जर या चिमुकल्या फुलांकडे नजर टाकली तर त्यांचे अप्रतिम सौदर्य आपल्याला अचंबित करते. या फुलांच्या रंगाबरोबरच त्यांचे आकारही वेगवेगळे आणि सुंदर असतात. या फुलांची सुंदरता छायाचित्रात टिपणे म्हणजे खरोखरच मोठ्या कौशल्याचे काम असते.

जंगलातल्या अश्या चुमुकल्या फुलांना बघितले की मला आठवण येते ती एका प्रदर्शनात बघितलेल्या छायाचित्राची. सुमारे १४/१५ वर्षांपुर्वी मी ब्रिटीश गॅस वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन बघताना एका छायाचित्राने माझी नजर खिळवून ठेवली होती. प्रदर्शनातील तो भाग खास १७ वर्षांखालील तरूण छायाचित्रकारांचा होता. त्या छायाचित्रात एका झाडाच्या फांदीवर पावसाच्या पाण्याचे थेंब ओथंबले होते आणि त्यात मागच्या डॅफोडीलच्या फुलांचे छानसे प्रतिबिंब पडले होते. त्या प्रदार्शनात एकाहून एक छान छायाचित्रे होती पण ते छायाचित्र मात्र माझ्या मनात अगदी खोलवर ठसले गेले. त्यानंतर तशाच प्रकारची अनेक छायाचित्र मी अनेक पुस्तकांमधे बघितली. पण का कुणास ठावूक पण तश्या छायाचित्रणाचा प्रयत्न मी कधी केला नाही.

नुकताच “Better Photography”  च्या एका अंकात मी स्टिव्ह वॉल या एका तज्ञ वन्यजीव छायाचित्रकाराचा याच विषयावरचा लेख आणि त्यातील छायाचित्रे बघितली. या छायाचित्रकाराने पाण्याच्या थेंबातील फुलांच्या प्रतिबिंबाच्या छायाचित्रणावर बहुतेक डॉक्टरेट्च केली असावी. तो लेख वाचल्यावर मला माझ्या त्या मनात ठसलेल्या छायाचित्राची परत आठवण झाली आणि मी मनाशी अगदी ठरवून टाकले की आता आपणसुद्धा असाच प्रयत्न जरूर करायाचा. सुदैवाने त्यानंतर लगेचच मी साताऱ्याजवळील कासच्या पुष्पपठारावर फुलांच्या छायाचित्रणासाठी जाणार होतो त्यामुळे तिथे असे पाण्याच्या थेंबात फुलांच्या प्रतिबिंबाचे छायाचित्रण करायचे नक्की केले. कासला पोहोचल्यावर मात्र तिथल्या रंबीबेरंगी फुलांच्या गालीच्यांनी मनाला भुरळ पाडली आणि ड्रॉसेराच्या किटकभक्षी वनस्पती सापडल्यावर त्यांचेच छायाचित्रण करण्यात दिवस गेला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे कासला पोहोचल्यावर मात्र रस्त्याच्या कडेला गवताच्या पात्यांवर दवबिंदू जमले होते त्यांना बघून मी प्रयोग करायचे ठरवले. चक्क खाली रस्त्यात, चिखलात बसकण मारली आणि मी योग्य अश्या गवताच्या पात्याला आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्याच्यावरच्या थेंबांना शोधायला लागलो. आता असे दवबिंदूंनी थबथबलेले गवताचे पाते नुसते सापडून चालणार नव्हते तर त्याच्या मागे कुठली तरी फुले फुललेली असायला हवी होती. थोड्या शोधाअंती मला स्मिथीया उर्फ कवळ्याची फुले योग्य अश्या गवताच्या पात्यामागे दिसली.

आता नुसत्या स्मिथीयाचे किंवा कुठल्याही फुलाचे छायाचित्रण तसे सोपे असते. ते काही फुलपाखरासारखे उडून जाणार नसते त्यामुळे आपल्याला छायाचित्रणासाठी बराच वेळ मिळतो. पण या पाण्याच्या थेंबातील फुलाच्या प्रतिबिंबाचे छायाचित्रण म्हणजे जरा कठिणच आणि वेळकाढू काम. ते गवताचे पाते अगदी लहान, त्यावर  जमलेले ते दवबिंदू अजून लहान त्यामुळे त्यांच्यावर फोकसिंग करताना अगदी दम निघतो. या नंतर ते थेंब बरोबर फोकस झाल्यावर त्यात मागच्या फुलाचे प्रतिबिंब बरोबर पडले आहे की नाही हे बघावे लागते. यावेळी जरा जरी वारा आला तर ते गवताचे पाते अगदी गदागदा हलते त्यामुळे सगळे छायाचित्रण बिघडते. हा वारा जर जास्तच जोरात आला तर ते दवबिंदू गवताच्या पानावरून ओघळून जातात आणि मग परत नविन, योग्य गवताचे पाते शोधावे लागते. यावेळी प्रकाश जर कमी असेल तर फ्लॅश मारून चालत नाही कारण त्यामुळे त्या पाण्याच्या थेंबामधे फुलाच्या शेजारी अथवा फुलावरच फ्लॅशच्या प्रकाशाचे पांढरे धब्बे दिसतात. त्यामुळे एकतर ट्रायपॉड वापरावा लागतो किंवा कॅमेरामधे ISO  वाढवायला लागतो. आता एवढी सगळी मेहनत करायची नसेल तर तुम्ही फोटोशॉप मधे अगदी सहज फुलाचे प्रतिबिंब पाण्याच्या थेंबामधे टाकू शकता पण अर्थातच त्या छायाचित्रणाला काही मजा नाही. कासला मला ते छायाचित्रण जमल्यावर मात्र मला चक्क तसेच छायाचित्रण करायचे वेड लागले आहे आणि त्या करता नवीन नवीन प्रयोग सुरू आहेत. स्मिथीयाच्या फुलानंतर सदाफुली, कॉसमॉस या फुलांचे प्रतिबिंब टिपले, एवढेच नव्हे तर ग्लोरी लिलीचे सुद्धा छायाचित्रण मला करता आले. आता हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे पहाटे एखादे फुलापाखरू शांत बसलेले असेल तर त्याचे प्रतिबिंब पाण्याच्या थेंबात पकडायचा विचार आहे.  

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com