Friday, October 8, 2010

किटकभक्षी ड्रॉसेरा.

खरेतर झाडांना किटकांची नेहेमीच त्यांच्या परागीभवनासाठी मदत होत असते त्यामुळे त्यांचे कायमच मित्रत्वाचे संबंध असतात. पण प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसेच याही बाबतीत आहेत. काही काही झाडे चक्क मांसाहारी असतात आणि त्यांना त्यांच्या खाण्यासाठी हे किटक लागतात. इतर वेळी झाडे प्राणि, पक्ष्यांना अन्न पुरवत असतात. मात्र या झाडांच्याबाबतीत हे उलटसुद्धा होते. काही विशिष्ट जातीच्या वनस्पती मात्र प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न निर्मीती न करता त्यांना खाण्यासाठी सजीव जीवांची / किटकांची आवश्यकता असते. ऑर्कीड, बांडगुळ हे सुद्धा त्यांना लागणारी पोषक द्रव्ये त्यांच्या पानांमधून, मुळांमधून मिळवू शकतात मात्र ती काही दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून, त्यांना मारून, त्यांच्यावर गुजराण करत नाहीत. पण काही वनस्पती किटकांना आकर्षित करतात, त्यांना पकडतात, मारतात, त्यांची जीवनद्रव्ये शोषतातआणि पचवतात त्यांनाच खऱ्या अर्थाने किटकभक्षी वनस्पती आपण म्हणू शकतो.

किटकभक्षी वनस्पती ह्या इतर सर्वसामन्य वनस्पतींसारख्याच असतात आणि तशाच दिसतात. मात्र त्यांच्या काही खास क्लुप्त्या असतात ज्या त्यांच्या भक्षकाला सहज आकर्षित करतात आणि त्या नंतर त्यांना जखडणे, मारणे, त्यांचा जीवनद्रव शोषणे, पचवणे ह्या क्रिया सहज करतात. सर्वसामान्य वनस्पतींनासुद्धा किटकांना परागीभवनासाठी आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध सुगंधी फुले असतात. जे किटक त्या झाडांना खातात त्यांच्यापासून बचावासाठी काही विषारी द्रव्ये, काट्यांसारखी आयुधे असतात. जमिनीतील पोषक द्रव्ये शोषण्यासाठी मुळे असतात. किटकभक्षी वनस्पतींना मात्र हेसुद्धा गुण असतात.

या प्रकारच्या वनस्पती जास्त पाउस असलेल्या थंड आणि ओलसर चिखल असलेल्या भागात आढळतात. आपल्याकडे ही वनस्पती भीमाशंकर, कास, आंबोली घाट अश्या ठिकाणी आढळते. या वनस्पतीचा आकार जेमतेम २/३ इंच असून जमिनीलगत, गवतामध्ये असते आणि तीला बारकाईने शोधावे लागते. हिरव्या रंगाची ह्या वनस्पतीला फुले मात्र पांढऱ्या, गुलाबी किंवा भगव्या रंगाची असतात. ही विशिष्ट वनस्पती वार्षिक आहे. ती तीच्या विशिष्ट हंगामात उगवते, वाढते आणि फुले आल्यावर परागीभवन होऊन त्यांची बिजे खाली जमिनीत पडतात आणि त्यानंतर ते झाड मरते. पुढच्या वर्षी त्याचा जीवनक्रम असाच पुढे सुरू रहातो.

आपल्याकडे या किटकभक्षी वनस्पतीच्या ड्रॉसेरा इंडीका आणि ड्रॉसेरा बर्मानी या दोन जाती आढळतात. ह्या वनस्पतीच्या पानांवर, फांद्यांवर चिकट असे आकर्षक, गोड वासाचे थेंब असतात. आता त्यांना पाने म्हणण्यात अर्थ नाही कारण ती काही इतर पानांसारखी पसरट नसतात तर ती जेमतेम काट्यासारखी केसाळ लव आलेली असते आणि त्यावर दवबिंदू पडल्यासारखे किटकांना आकर्षित करणारे चिकट थेंब असतात. याच कारणासाठी त्यांना “दवबिंदू”, “ड्यू ड्रॉप्स”, “सन ड्यू” अशी अनेक नावे आहेत. या त्यांच्या चिकट द्रावावर बारीकसारीक किटक आकर्षित होतात आणि त्याला चिकटतात. या नंतर झाड काही वेळा पानाला वळवून त्या किटकाला जखडून ठेवायचासुद्धा प्रयत्न करते. यानंतर झाडातून पाचक द्रव स्त्रवून त्या किटकाच्या शरीराचे विघटन करायला सुरवात करतात आणि थोड्याच वेळात त्याच्या शरीरातील उपयोगी असे सर्व जीवनद्रव शोषून घेऊन जेमतेम त्याचा सांगाडा बाहेर शिल्लक ठेवतात.

ड्रॉसेरा बर्मानी वनस्पतीची रचना तर एखाद्या फुलासारखी असते. या वनस्पतीचा आकार जेमतेम २/३ सें.मी. एवढाच असतो आणि ती अगदी जमिनीलगत सपाट वाढते. अगदी कमळाच्या फुलांच्या पाकळ्यासारखीच ती दिसतात. यांचा रंग आकर्षक गुलाबी, लाल असतो आणि त्यांच्या कडांना बारीक केस असून त्यावर ते किटकांना आकर्षणारे दवबिंदू असतात. १७३७ मधे श्रीलंकेमधे जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पातीचा शोध लावला म्हणून ही “बर्मानी”. या बर्मानीची ती किटकभक्षी टोके अगदी १८०० अंशात दहा सेकंदाच्या आत वळून किटकाला पकडू शकतात

नुकताच कासला वन्य फुले बघायला गेलो असताना अगदी मुख्य रस्त्याच्या कडेलाच मी या वनस्पती शोधल्या. आम्ही ड्रॉसेरा इंडीका शोधत होतो कारण या काळात ती येते हे मला माहित होते पण ड्रॉसेरा बर्मानी मात्र ऑक्टोबर नंतर येते अशी माहिती मला मिळाली होती पण नवलाची गोष्ट अशी की मला मात्र एकाच जागी या दोन्ही वनस्पती अगदी शेजारी शेजारी चिकटून आलेल्या दिसल्या. बर्मानीचे वर्णन मला माहित असल्यामुळे मला तीला लगेच ओळखता आले. आम्ही त्यांचे छायाचित्रण करत असतानाच शेजारच्या ड्रॉसेरा इंडीकावर एक भला मोठी किटक आला आणि काही क्षणातच तिने आजूबाजूच्या फांद्या एखाद्या ऑक्टोपससारख्या त्याच्या शरीराभोवती आवाळल्या. त्या किटकाचा आकार त्या वनस्पतीच्या आकारापेक्षा मोठा होता, त्याला पाय आणि पंखसुद्धा होते पण तो तरीसुद्धा त्या दवबिंदूच्या विळख्यातून काही सुटू शकला नाही.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
किटकांचा सापळा : कंदीलपुष्प.

आपल्या आजुबाजुला असणाऱ्या प्रत्येक फळझाडांना, पिकांना आणि इतर सर्वच झाडानाफळधारणेकरता परागीभवनाची फ़रज असते. एका फुलातील परागकणांची आवक-जावक दुसऱ्या फुलांमधे झाली की त्याला परागीभवन झाले असे म्हणतात. अर्थातच या परागीभवनामधे मधमाशा, फुलपाखरे किंवा यासारख्या बऱ्याचशा इतर किटकांचा सहभाग महत्वाचा असतो. या किटकांना आकर्षित आणि उद्युक्त करण्यासाठी फुलांमधे अतिगोड मधुरस असतो आणि हा मधुरस या किटकांचे मुख्य अन्न असते. जर हे परागीभवन शक्य व्हायला हवे असेल तर फुलांना जास्तीत जास्त किटकांना आकर्षित करायला हवे आणि याकरता निसर्ग फुलांना दोन क्लुप्त्या बहाल करतो. या फुलांना किटक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतील असे उठावदार रंग असतात, इतकेच नव्हे तर आत मधाचा साठा कुठे दडलाय हे दाखवणाऱ्या दिशादर्शक रेषा किंवा खुणासुद्धा असतात. आपल्या साध्या डोळ्यांना जरी या खुणा दिसत नसल्या तरी किटकांच्या खास डोळ्यांना त्या सहज बघता येतात. किटकांना अजून आकर्षित करण्यासाठी फुले त्यांच्या सुगंधाचा वापर करतात. फुलांच्या या मादक सुवासाने बरेचसे किटक त्या फुलाकडे आकर्षित होतात. या दोनही पद्धतीत जेंव्हा किटक फुलाकडे भेट देतो तेंव्हा मात्र त्याला त्याचा मोबदला फुलाला द्यावा लागतो. मध, परागकण किंवा दोन्हीही देऊन फुल आपल्या परागीभवनाचा कार्यभाग साधून घेते.

झाडांच्या काही जातीत या परागीभवनाचे काम मात्र एकदम वैशिष्ट्यपुर्ण असते. अशीच एक खास दुर्मिळ जात म्हणजे सेरोपेजीया किंवा कंदीलपुष्प. आज जगभरात या वनस्पतीच्या २३५ जाती उपलब्ध आहेत आणि त्यातील अंदाजे ४० जाती भारतात सापडतात. मिल्कवीड किंवा रूईच्या कुळातल्या या झाडाचे उपजातीप्रमाणे वेगवेगळे आकार, प्रकार असतात. काही दुसऱ्या झाडांच्या आधाराने वाढणाऱ्या वेली असतात तर काही अगदी खुरटी झुडपे असतात. काही जातीत जमिनीवर धावणाऱ्या, पसरणाऱ्या वेली असतात. यांचा आकार वेगवेगळा असला तरी यांची खासियत असते ती यांच्या फुलामधे. कंदीलपुष्प हे नावाप्रमाणेच दिवाळीतल्या एखाद्या आकाशकंदीलासारखे भासते. या फुलाचा आकार म्हणजे फुलाच्या तळाशी, देठाभोवती फुगीर लंबगोल, त्यातून वर जाणारी अरूंद नळी आणि सर्वात वर पाच खिडक्या असलेला नक्षीदार कळस. लिनस या शास्त्रज्ञाप्रमाणे याचे सेरोपेजीया हे नाव “फाउंट्न ऑफ वॅक्स” (केरोस म्हणजे वॅक्स आणि पेगे म्हणजे फाउंट्न) असे आहे. इतर फुलांसारखी ही फुले काही खास रंगीबेरंगी नसतात. साधारणत: फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असतो आणि त्यावर लाल, जांभळे ठिपके, रेघांची नक्षी असते. यांचा रंग आकर्षक नसला तरी त्यांची रचना मात्र नक्कीच आपल्याला थक्क करणारी असते. ही जात किटकभक्षी नसली तरी ती किटकांना परागीभवन होइपर्यंत त्यांच्या पिंजऱ्यात जखडून मात्र ठेवते. या फुलांना विचीत्र, कुजका वास असतो आणि त्यावर सुक्ष्म केस असतात. यामुळे त्यांच्यावर सडक्या मांसावर ज्या माश्या आकर्षित होतात त्याच माश्या या फुलांवरपण आकर्षित होतात. फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजुला आपल्या नळीवर उतरण्याची जागा आणि पुढे कुठे जायचे ते दाखवणारे ठिपके किंवा रेघा असतात. या दिशादर्शक ठिपक्यांप्रमाणे त्या माश्या आत जायला लागतात. आत मेणचट आणि उग्र वास त्यांना अजून अजून आत शिरायला प्रवृत्त करतो. आतल्या नळीच्या घसरगुंडीवर खालच्या बाजूने वळलेले राठ केस असतात. त्यांना दाबत दाबत ती माशी आत शिरते आणि थेट जिथे पुंकेसर, परागकण आहेत तिथे पोहोचते. आता फुलाचा अगदी आत शिरलेली माशी राठे केसांमुळे उलटी परत जाउ शकत नाही. फुलाच्या मध्यभागी पुं आणि स्त्री केसारांच्या जागी अवतीबोवतीच्या अर्धपारदर्शक खिडक्यांतून प्रकाश येत असतो त्यामुळे ती माशी तिथेच घोटाळत रहाते आणि तिच्या या हालचालीमुळे त्या फुलाचे परागीभवन सहज शक्य होते. हे परागीभवन झाल्यावरच ते फुल जे पुर्वी ताठ उभे असायचे ते मलूल होऊन उलटे लटकते आणि त्याच्या आतले राठ केस सुद्धा मऊ होतात. या मऊ झालेल्या केसांमुळे आणि फुल उलटे झाल्यामुळे आत अडकलेल्या माशीला बाहेर पडायला मार्ग मिळतो आणि ती बाहेर उडून दुसऱ्या फुलाकडे जाते. परागीभवनाची एवढी क्लिष्ट प्रक्रिया असल्यामुळे आणि त्यांना विशीष्ट जातीच्या आणि आकराच्या माश्याच लागत असल्यामुळे ही वनस्पती अतिशय दुर्मिळ झालेली आहे. याच बरोबर या वनस्पतीचा जमिनीतला कंद मुंगुसा सारख्या प्राण्यांनी, आदिवासींनी उकरून काढल्यामुळे यांचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे.

अर्थातच दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे यांचे छायाचित्रण करणे म्हणजे एक मोठा “challenge” असतो. या वनस्पतीला शोधणे, त्यात ती त्यावेळी फुललेली असणे हे खुप महत्वाचे असते. कास, महाबळेश्वर या ठिकाणी यांच्या काही जाती आहेत त्या खास शोधायला, छायाचित्रण करायला गेलो. त्या सापडल्यावर त्यांचे वैशिष्ट्य कळले. त्यांना कुठे शोधायचे, त्यांना हवामान कसे लागते, जमिन कशी लागते हे कळले. त्यानंतर तर काही जाती अगदी मुंबईतसुद्धा सापडल्या. त्यांच्या फुलांचे छायाचित्रण करायला कठिण अश्या कड्यांवर कसरत करत गेलो पण त्यानंतर जी काही छायाचित्रे मिळाली त्याचा आनंद काही न्याराच होता. या सेरोपेजीया जातीविषयी फक्त माहिती देणारी एक वेबसाईट आहे (www.ceropegia.minks-lang.de) त्यांच्याकडे या आपल्याकडच्या जातींची जुनी चित्रे होती पण छायाचित्रे नव्हती ती त्यांना मी आणि माझ्या मित्रांकरवी पुरवली आणि या जातीच्या अभ्यासाकरता थोडासा हातभार लावला. उद्देश फक्त एवढाच की अधिकाधिक लोकांना या जातीविषयी शास्त्रीय माहिती मिळावी आणि चुकूनसुद्धा या वनस्पतीला न उपटता या जातींचे कायम जतन व्हावे.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
उडणारे पाचू...

आज जगभरात जिवीत असलेल्या प्राण्यांमधे सर्वात जास्त संख्या किटकांची आहे. या किटकांमधेसुद्धा ढालकीडे किंवा बीटल्स यांची संख्या सर्वात जास्त आहे. जगातील प्रत्येक काना कोपऱ्यामधे, निरनिराळ्या अधिवासांमधे हे ढालकीडे वास्तव्य करतात. या ढालकीड्यांमधे अनेक वर्ग आहेत त्यातील एक आहे “बुप्रेस्टीडी”. ह्या वर्गामधे आज सर्वात जास्त म्हणजे १५,००० उपजाती आढळून येतात आणि हा वर्ग ओळखला जातो तो ज्वेल बीटल्समुळे. हे ज्वेल बिटल्स आकाराने मोठे आणि अतिशय झळाळणाऱ्या उठावदार रंगाचे असतात. याच कारणामुळे आज जगभरात किटक छंद म्हणून गोळा करणाऱ्यांमधे त्यांना मोठी मागणी असते. जसे किटक छंद म्हणून जमवणाऱ्यांमधे यांना मागणी असते तसेच यांच्या चमकदार पंखांपासून अनेक दागिने बनवले जातात आणि त्यासाठीसुद्धा त्यांना मोठी मागणी असते. आज या किटकांच्या वरच्या पंखांपासून बनवलेल्या गळ्यातील पदकांना आणि कानातील कर्णफुलांना जगात जबरदस्त मागणी आहे आणि इंटरनेटवर फक्त “इन्सेक्ट ज्वेलरी”च्या अनेक वेबसाईट आहेत. अर्थात हा उद्योग कायदेशीर आहे की नाही हा मोठा वादाचा मुद्दा आहे.
या ज्वेल बिटल्सचा आकारान भिन्नता असते, अगदी ३ mm पासून ते १०० mm पर्यंत ते सापडतात. पण सर्वसाधारणपणे सापडणारे ज्वेल बिट्ल्स हे २० / ३० mm च्या आसपास असतात. यांचा आकार गोलाकार आणि लांबूळका असते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चिकूच्या बी सारखा यांच्या शरीराचा आकार असतो. यांच्या वरच्या पंखावरचे चमकदार, झळाळणारे रंग आणि त्यांची झालेली नक्षी ही अतिशय मनोहारी असते. पण नवलाची गोष्ट म्हणजे हे रंग त्यांच्या पंखांवरील लवकांमुळे (pigments) आलेले नसतात तर त्यांच्या पाठीवर असलेल्या अतिसुक्ष्म खाचांमधे प्रकाश वेगवेगळ्या दिशेने परावर्तित झाल्यामुळे असतात. आपल्याला CD / DVD च्या खालचे रंग हे याच कारणामुळे सप्तरंगी भासतात. यामुळे जेंव्हा जंगलात आपण हे ज्वेल बिटल्स बघतो तेंव्हा ते आपल्या हिरवे भासत असले तरी मधेच ते निळे, तपकीरी किंवा अगदी लाल भडकसुद्धा दिसतात. या बिटल्सची अळी ही झाडाखाली मुळांमधे, खोडामधे किंवा पाना मधे रहाते. यांच्यातील काही जाती या लाकूड पोखरणाऱ्या असल्यामुळे त्या कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरतात.
सध्या कॅनडामधे या ज्वेल बिटल्सवर खास संशोधन सुरू आहे. त्यांच्या अभ्यासामधे असे दिसून आले आहे की यांच्यातील काही जाती या अगदी ८० किलोमिटर दुर वर वणव्याची आग ओळखू शकतात. इतकेच काय पण जळणाऱ्या लाकडाचा फुटणारा आवाज आणि त्यावेळी येणारा धूर सुद्धा ते सहज ओळखू शकतात. या किटकांमधे उष्णता जाणवणाऱ्या खास अवयब असतात यामुळे त्यांना वातावरणातील आगीमुळे वाढलेली उष्णता त्यांना लगेच जाणवते. ही उष्णता जाणवल्यावर तिथे या किटकांच्या माद्या त्वरीत उड्डाण करतात आणि त्या तिथल्या जळक्या लाकडात आपली अंडी घालतात. त्या जळक्या लाकडात त्यांच्या अळ्या पुढे वाढतात. आजूबाजूला आग / वणवा लागल्यामुळे त्या ज्वेल बिटलच्या अंड्यांना आणि अळ्यांना तिथे त्यांचे शत्रु नसणार ही मानसिक भावना त्यापाठी असते. सध्या हे किटक ज्या अवयवानी ही आग ओळखतात त्याचा वापर आपल्याकरता कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे.
आपल्याकडे पावसाळ्यात या झळाळत्या रंगाच्या ज्वेल बिटल्सच्या अनेक जाती दिसतात. यामधे काही अगदी लहान असतात तर काही अगदी २ इंचा एवढ्या मोठ्याही असतात. नुकताच वसईजवळच्या तुंगारेश्वर अभयारण्यात गेलो असताना मला एका झाडावर या ज्वेल बिटलची मादी दिसली. तीचे छायाचित्रण करत असतानाच एक मोठा नर तीच्या बाजूला येऊन क्षणभर विसवला पण अगदी लगेचच दोघेही अगदी उंच झाडावर जाउन बसले. दुपारच्या तळपत्या उन्हात ते अगदी खालुनही जोरदार चमकत होते. मी तिथेच थोडे लांब जाउन त्यांची वाट बघत उभा राहिलो. थोड्या वेळाने ती मादी परत त्याच झाडावर खाली येऊन बसली. आता मला माहित असल्यामुळे मी थोडे लांबूनच तिचे छायाचित्रण केले. तेवढ्यात तो नर परत तिच्याजवळ आला आणि त्यांचे मिलन झाले, अगदी डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच हे सारे काही घडले आणि ते परत उडून उंच जाउन बसले. मी परत लांब जाउन थांबलो आणि आता एकदम तयारीत होतो. काही वेळाने ती मादी परत खाली येउन बसली आणि तो नर तिच्या कडे झेपावतानाच मला त्यांचे छायाचित्र ट्पिता आले. त्यानंतर मल त्यांची मिलनाची आणि बाजूबाजूला बसले असतानाची अनेक छायाचित्र घेता आली.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com