Wednesday, December 31, 2008

हम साथ साथ !!!
जगभरात मुंग्या ह्या जहाल, चावऱ्या आणि शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे कडकडून चावणे, मोठ्या संख्येने एकत्र हल्ला करणे यामुळे बरेचसे प्राणी, पक्षी त्यांच्यापासून लांबच रहाणे पसंद करतात. पण तरीसुद्धा आज जवळपास लाखभर वेगवेगळ्या जातींची झाडे, प्राणी, पक्षी, किटक आज त्यांच्याबरोबर रहातात हे सत्य आहे. ह्या बऱ्याचशा जाती नुसत्या गुण्यागोविंदाने रहातात तर बऱ्याच वेळेला दोन्ही जणांना एकमेकांपासून काही खा फायदेसुद्धा होतात. जर का लायसॅनीड अथवा "ब्लू" जातीच्या फुलपाखरांच्या अळ्या काही जातीच्या मुंग्यांना सापडल्या तर त्या अळ्यांना चक्क ते दत्तक घेतात. जर का दुसऱ्या कुठल्या प्रकारची अळी ह्या मुंग्यांना दिसली तर ते सरळ तीचा फन्ना उडवतात पण जर का ती अळी अशी "स्पेशल" असेल तर असे होत नाही. त्या अळीला ह्या मुंग्या त्यांच्या स्पर्शिकांनी स्पर्श करत रहातात. ह्यामुळे त्या अळीच्या पाठीवरच्या एका खास ग्रंथीतून एक प्रकारचा गोड द्राव स्त्रवला जातो जो ह्या मुंग्यांना अतिशय प्रिय असतो. हा द्राव स्त्रवल्यानंतर त्या अळ्या त्यांचे शरीर पाठीकडे चपट करतात आणि मग त्या मुंग्या त्यांना त्याठिकाणी धरून त्यांच्या वारूळात, घरट्यात घेउन जातात.
मुंग्यांच्या घरट्यात ह्या फुलपाखरांच्या अळ्या त्यांच्या अळ्यांच्या बरोबर ठेवल्या जातात आणि तेवढ्याच काळजीने वाढवल्या जातात. त्यांना त्याच्यासाठी लागणाऱ्या अन्नझाडाच्या द्राव आणून आणून कामगार मुंग्या भरवतात. वेळप्रसंगी मुंग्यांच्या अळ्यांपेक्षा जास्त बडदास्त ह्या फुलपाखरांच्या अळ्यांची ठेवली जाते. ह्या फुलपाखरांच्या अळ्यांबरोबरच मावाकीडे, मीली बग्ज, बुश हॉपर्स, लीफ हॉपर्स अश्या अनेक प्रकारच्या किटकांबरोबर मुंग्यांचे या प्रकारचे सहजीवन असते. ह्या किटकांचे मुंग्या योग्य त्या रितीने पालन पोषण तर करतातच पण त्यांचे इतर किटक आणि कोळ्यांपासून रक्षण करतात. काही खास जातीच्या मुंग्या ह्या किटकांच्या आसपास रेषमाचे अथवा पानांचे आच्छादन करतात त्यामुळे त्यांचे इतरांपासून संरक्षण होते आणि त्याचबरोबर हवामानातील प्रतीकूल बदलांचा त्राससुद्धा त्यांना जाणवत नाही. त्यांना अशी वरून रेषमाची जाळी लावल्यामुळे मावा कीड्यांना आतमधे सहज त्या झाडाचा रष शोषून रहाता येते.
आपल्याकडे साधी मुंगी अर्जुनाच्या झाडावर चढते आणि त्या झाडावर रहाणाऱ्या लीफ हॉपर्सना आपल्य स्पर्शिकांनी स्पर्श करते. जेंव्हा ते किटक ह्या मुंग्यांना आपले मित्र समजून घेतात तेंव्हा त्यांच्या पाठीवरच्या ग्रंथीतून गोड द्रव पाझरवतात. जर का ती मुंग्यांची जात वेगळी असेल तर हा द्राव पाझरत नाही. मुंग्या तो गोड द्राव त्वरीत संपवतात आणि थोडासुद्धा द्राव वाया जाउ नये म्हणून ती ग्रंथी आणि आजूबाजूची जागासुद्धा चाटूनपुसून साफ करतात. या बदल्यात ती मुंगी त्या किटकाची अगदी काटेकोरपणे रक्षा करते. दुसरे किटक आणि दुसऱ्या मुंग्यासुद्धा त्या लीफ हॉपरच्या जवळपास फिरकणार नाहीत अशी ती खबरदारी घेते. या किटकांबरोबरच कित्येक झाडांचेसुद्दा मुंग्यांबरोबर अतिशय सख्य असते. रूफस वुडपेकर हा सुतारपक्षीसुद्धा आपल्या जंगलात पॅगोडा जातीच्या मुंग्यांच्या घरट्यात त्याचे घर बनवतो. पण आजसुद्धा ह्या अतिशय चिडक्या आणि चावऱ्या मुंग्या त्या सुतार पक्ष्याच्या अंड्यांना आणि पिल्लांना त्रास का देत नाहीत हे कोडे शास्त्रज्ञांना उलगडलेले नाही.
मुंग्या तश्या चावऱ्या आणि जास्त रंगीबेरंगी नसल्यामुळे निसर्गात फिरताना त्यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. मात्र जर का त्यांचे आपण बारकाईने निरिक्षण केले तर त्यांच्या ह्या अश्या सहजीवनाची आपल्याला छान छायाचित्रे मीळू शकतात. साधारणत: पावसाळ्यात आपण जर नीट बारकाईने बघीतले तर काही जातीच्या मुंग्या ह्या फुलपाखरांच्या अळ्यांचे, मावा किड्यांचे संगोपन करताना आढळतात. अर्थात त्यांचे छायाचित्रण करायचे असेल तर आपल्याकडे "क्लोज अप" छायाचित्रणाचे योग्य ते साधन असायला हवे कारण त्या अगदीच लहान आकाराच्या असतात. याचबरोबर या मुंग्या अतिशय चळवळ्या आणि चपळ असल्यामुळे त्यांचे जलद छायाचित्रण करावे लागते. एरवी कडाडून चावणाऱ्या ह्या मुंग्या प्रेमाने त्या बारक्या किटकांना सांभाळताना बघून खरोखरच निसर्गाचे महत्व आपल्याला पटते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

गोगलगाय पोटात पाय.
साधारणत: पावसाळ्यात आपल्याला जमिनीवर, बागांमधे गोगलगायी दिसतात. पण इतरवेळीसुद्धा विविध जातीच्या गोगलगायी तळ्यांमधे, नद्यांमधे आणि समुद्रातसुद्धा कायम आढळतात. या गोगलगायी मऊ शरीर असलेल्या "मोलस्क" या प्राणीवर्गात वर्गिकरण केल्या जातात. याच वर्गात शंख, शिंपले, कालवे हे प्रकारसुद्धा येतात. या वर्गाचे प्रमुख वैशीष्ट्य म्हणजे यांचे अतिशय मऊ शरीर जे एकसंध असते. हे त्यांचे एकसंध, लांब शरीर कायम ओले आणि चिकट असते आणि या नाजूक शरीराच्या संरक्षणासाठी ते कठीण शंख वापरतात. जेंव्हा त्यांना धोका जाणवतो तेंव्हा ते लगेचच त्यांचे शरीर ह्या संरक्षक कठीण शंखाच्या आत ओढून घेतात. प्रखर उन्हाळ्यात अथवा अतिशय गरम वातावरणात सुद्धा या गोगलगायी त्यांचे शरीर शंखाच्या आत ओढून घेतात आणि त्याचे दारसुद्धा एका झाकणाद्वारे बंद करतात. यामुळे त्यांचे ओले शरीर गरम वातावरणामधे सुकण्यापासून वाचते. सुर्यप्रकाशाशी वावडे असल्यामुळे अर्थातच बऱ्याच गोगलगायी निशाचर असतात. रात्री अथवा ढगाळ वातावरणात त्यांचा वावर जास्त असतो. त्याचप्रमाणे अतिथंड हवामानात किंवा हिवाळ्यात त्या जमिनीखाली शीतनिद्रेत जातात.
गोगलगायीच्या शरीरावरचा चिकटपणा किंवा श्लेष्म हा त्यांना सुकण्यापासून वाचवतो. जर ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणी त्यांच्या शरीरातून वाळून गेले तर त्यांचा मृत्यु ओढवू शकतो म्हणून हा श्लेष्म त्यांना सतत ओले ठेवण्याचा प्रयत्न करतो. जमिनीवरच्या काही जातीच्या गोगलगायींना शिंगांच्या दोन जोड्या असतात, अर्थातच ही शिंगे मऊ आणि नरम असतात. ह्यातील लांब शिंगांच्या टोकावर त्यांचे डोळे असतात आणि ही शिंगे त्या डोळ्यासकट ते आत शरीरात ओढून घेउ शकतात. दुसरी शिंगाची जोडी ही आखुड आणि जाडसर असते. हीचा उपयोग वास घेण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसराचा स्पर्श करण्यासाठी, त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी होतो. निसर्गात ह्या गोगलगायी सडलेल्या भाज्या अथवा पाने, बुरशी, अळंबी, सडलेले लाकूड वगैरे खातात. काही जातीमात्र शेतातल्या पिकांवर, झाडांवर सुद्धा हल्ला चढवतात. ह्या गोगलगायी सहसा त्यांच्या शंखाच्या आकारावरून. रंगावरून वेगवेगळ्या ओळखता येतात. हा शंख मुळात कॅल्शीयमपासुन बनलेला असतो आणि त्याच्या वाढीसाठी गोगालगायीची वाढ, त्यांचे खाणे, पाण्यातील आम्लाचे प्रमाण आणि पाण्याचे तापमान यावर अवलंबून असते.
ह्या गोगलगायीची हालचाल अथवा तीचे "चालणे" अतिशय वेगळ्या पद्धतीने होते. या गोगलगायीच्या मऊ शरीराच्या खाली एक सपाट, सरळ चपट पट्टीसारखा "पाय" असतो. ह्या पायातील स्नायूंचे पट्टे आकुंचन आणो प्रसरण पावतात. यामुळे जी स्पंदने निर्माण होतात ती गोगलगायीला पुढे सरपटण्यासाठी मदत करतात आणि ती पुढे जाउ शकते. अर्थात या सगळ्या क्रिया इतक्या पटकन आणि सहजासहजी होतात की तीची हालचाल एकदम सहज आणि सुरळीत वाटते. ह्या तीच्या खास पायावर ग्रंथी असतात ज्या सतत एक चिकट, चमकदार स्त्राव स्त्रवतात. हा द्राव पुढच्या भागातून स्त्रवला जातो आणि हवेशी संपर्क आल्यवर लगेचच सुकून कठीण होतो आणी त्यामुळे तीला चालायला मदत होते. ह्या तीच्या खास चिकट द्रावामुळे ती अतिशय कठीण, धारदार जमिनीवर, काट्यांवरसुद्धा चालू शकते आणि तीच्या मऊ आणि नाजूक शरीराला त्रास अथवा जा होत नाही. विणीच्या हंगामात मिलनानंतर मादी सहसा मऊ मातीत किंवा पाण्याजवळ अंडी घालते. ही अंडी समुहात घातली जातात आणि अंदाजे ५० ते १०० अंडी एकत्र घातली जातात. ह्या अंड्यांचा रंग पारदर्शक किंवा पांढरा असतो.
आपल्याकडेसाधारणत: तपकीरी रंगाचे शंख असलेल्या पांढरट रंगाच्या गोगलगायी आढळतात. पण मला ही काळ्या रंगाच्या शंखाची आणि लालसर शरीर असलेली गोगलगाय केरळच्या अरालम अभयारण्यात आढळली. त्याचप्रमाणे ओढ्याकाठी आतापर्यंत पाण्यातील गोगलगायींनी घातलेले अंड्यांचे पुंजके बघीतले होते पण पुण्याच्या ताम्हीणी घाटात ओढ्यातील खडकाच्या खाली बेडकाच्या अंड्यांचे छायाचित्रण करताना मला ही गोगलगाय अंडी घालताना दिसली. अतिशय कमी अभ्यासलेल्या आणि छायाचित्रण झालेल्या या दुर्लक्षीत छोट्या जिवांचे छायाचित्रण मोठ्या प्रमाणावर होऊन त्यांची अधिकाधिक माहिती, अभ्यास होणे खरोखरच जरूरीचे आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
पाठीवरचे कुटूंब.
कोळ्यांच्या नराला मिलनानंतर लगेच पळ काढावा लागतो कारण यात त्याने जरादेखील दिरंगाई केली तर बलवान मादी त्याचाच फन्ना उडवायला कमी करत नाही. त्यामुळे मिलनानंतर नर तेथून लगेच पळ काढतो आणि पुढेसुद्धा तो अंड्यांची, पिल्लांची काहीही काळजी घेत नाही. मादी एकटीच याकरता पुर्णपणे समर्थ असते आणि ती तीच्या या पालनपोषणाच्या कर्तव्यात कुठीही कमी पडत नाही. मिलनानंतर अंदाजे २/३ आठवड्यानंतर अंडी घातली जातात. ही अंडी मादीनेच विणलेल्या खास मऊसूत पण मजबूत अश्या धागयांच्या पिशवीत ठेवली जातात. ही पिशवी सुरक्षीत जागी ठेवली, बांधली जाते आणि मादी स्वत: तीचे रक्षण करते किंवा अगदी दरवेळेस तीच्य बरोबर घेउन फिरते. ही अंड्यांची पिशवी मजबूत रेषमाच्या धाग्यांनी बनवेलेली असून तीचा रंग आणि आकार कोळ्याच्या जातीप्रमाणे बदलत जातो. ज्या कोळ्यांच्या जाती जमिनीवर धावू शिकार करतात आणि कधीही जाळी बनवत नाहीत त्या जातीत सहसा ह्या अंड्यांच्या पिशव्या त्यांच्या बरोबर घेउन फिरतात. ह्या पिशव्या त्यांच्या पोटाला किंवा जबड्याला धाग्यानी घट्ट बांधल्या जातात. इतर जातींमधे ह्या पिशव्या दगडाखाली, झाडाच्या खोडाला अथवा त्यांच्याच जाळ्यामधे विणल्या जातात. यासाठी जास्तीत जास्त सुरक्षीत जागा शोधली जाते आणि त्यातसुद्धा त्या पिशवीचा रंग आजुबाजुच्या रंगाशी मिसळून जाणारा ठेवला जातो जेणेकरून त्यांना नैसर्गिक समरूपतेचा फायदा मिळतो. कित्येक वेळेस पानाखाली किंवा अगदी पानाची सुरनळी करूनसुद्धा तीथे ह्या अंड्यांच्या पिशव्या ठेवल्या जातात.
कोळ्यांची अंडी अर्थातच अतिशय लहान असतात आणि त्यातल्या जीवाचा विकास एखाद्या पक्ष्याच्या पिल्लासारखाच होतो. योग्य वेळी कोळ्यांची चिमुकली पिल्ले आपल्या अंड्याचे कवच तोडून बाहेर येतात. त्यांना तिथे रेषमाच्या पिशवीचे अजून एक संरक्षक आवरण असते त्यामुळे सगळी बाहेर आलेली पिल्ले घोळक्याने त्या पिशवीतच काही काळ वास्तव्य करतात. त्यांच्या शरीरातच त्यांना पुढे काही दिवस पुरेल असा अन्नसाठा साठवलेला असतो. तो संपेपर्यंत ते तिथेच आत सुरक्षीत रहातात आणि या काळात त्यांची वाढ जोमाने होते. ज्या जातींमधे त्यांची आई त्यांच्याबरोबर रहात नाही ते हळूहळू पिशवी बाहेर पडून स्वतंत्रपणे आपल्य आयुष्य जगायला सुरवात करतात. यापुढे त्यांचे संरक्षण, अन्न मिळवणे हे त्यांचे त्यांनाच करावे लागते. काही काही जातींमधे मात्र पिशवीतून बाहेर आलेली पिल्लेसुद्धा आईच्या बरोबर रहातात. अश्या वेळेस त्यांना रक्षण आणि खाणेसुद्धा आईच पुरवते.
आपल्याकडे कोळी हा सुद्धा तसा दुर्लक्षिलेलाच विषय आहे आणि अगदी सध्या सध्या त्यांचा थोडाफार अभ्यास सुरू झाला आहे. राजस्थानचा माझा मित्र धर्मेंद्र खंडाल याने काही काळापुर्वी मुंबईच्या कोळ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या नोंदीप्रमाणे फक्त मुंबईच्या आसपास २००हून अधिक कोळ्यांच्या जाती आढळतात. त्यातसुद्धा कित्येक जाती आपल्या विज्ञानात आतापर्यंत नोंद झाल्याच नव्हत्या. अश्या दुर्लक्षित, छोट्याश्या पण अनेक रंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या ठिकाणी रहाणाऱ्या कोळ्यांची छायाचित्रे जमवणे म्हणजे निखळ आनंद देणारे पण थोडेफार किचकट काम आहे. हे वेगवेगळे कोळी शोधणे म्हणजे मोठा व्याप असतो. पण अश्याच शोधाअंती मात्र धी कधी त्यांची छान छायाचित्रे मिळून जातात. सोबतच्या छायाचित्रात "टू टेल्ड हर्सिलीया" जातीची मादी खोडावर आपल्या अंड्यांची पिशवी बांधून त्याची राखण करत बसली होती आणि जणू काही सांगत होती "याद राखा !! जवळ येऊ नका मी यांच्यासाठी इथे ठाम उभी आहे". दुसऱ्या छायाचित्रात नुकताच पाउस सुरू झाल्यानंतर ही जमीनीवर शिकार करणाऱ्या कोळ्याची मोठी मादी तर आख्खी पिल्लावळ पाठीवर घेउन फिरत होती. अंदाजे ५०/७५ पिल्ले तीच्या पाठीवर बसून आरामात रपेट मारत होती. हिवाळ्यात "जायंट वूड स्पायडर"ची भलीमोठी मादी अंड्यांची पिशवी लपवून मरून जाते मात्र उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्या पिशवीतून अशे शेकडो पिवळी पिवळी पिल्ले बाहेर पडतात. त्यांची ती असंख्य पायांची चळवळ टिपायला खरोखरच मजा येते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

"बग्ज"ची पिल्लावळ."
पावसाळा सुरू झाला की जंगालाच्या वातावरणात एकदम फरक जाणवायला लागतो. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, काळोखी दाटून येणे ह्यासारखे हवामानातले बदल तर जाणवतातच पण जेंव्हा पावसाच्या काही सरी पडून जातात तेंव्हा जमिनीवर हिरवळ उगवायला लागते. इतके दिवस शुष्क, निष्पर्ण भासणारे जंगल सापाने कात टाकल्याप्रमाणे हिरवेगार होऊन चमकायला लागते. अर्थातच याबरोबर अनेक जातीची फुलपाखरे, नाकतोडे, मुंग्या, माश्या, कोळी, वाळव्या, चतूर, ढालकीडे आणि ढेकूणकीडे दिसायला लागतात. याच काळात एकदम मोठ्या प्रमाणात हे कीडे दिसायचे कारण म्हणजे बहुतांशी किटकांची बाल्यावस्था ह्या नवीन आलेल्या झाडाझुडपांवर अवलंबून असते. या झाडाझुडपांची संख्या जसजशी पावसाळ्यात वाढते तसतशी या किटकांची पण संख्या वाढते.
मोठ्या प्रगत सस्तन प्राण्यांमधे अथवा पक्ष्यांमधे आपल्या पिल्लांची काळजी ते खुप दिवस घेतात. पण या चिमुकल्या किटकांमधे ते प्रत्येक जातीत होतेच असे नाही. कित्येक किटक तर जन्मत:च अनाथ असतात आणि पुढे आयुष्यभर त्यांनाच त्यांची स्वत:ची काळजी वहायची असते. आता मुळातच किटकांमधे एवढी विविधता आही की या त्यांच्या पालनपोषणाच्या सवयींमध्ये सुद्धा प्रचंड तफावत जातीनुसार आढळते. काही जातींमधे माद्या अंडी घालतात, त्यांचे जीवापाड, सतत रक्षण करतात मात्र अंडी फुटून त्यातून बारकी पिल्ले आली की त्या तीथून निघुन जातात. काही दुसऱ्या जातींमधे माद्या आधी अंड्यांचे आणि मग पिल्ले थोडी मोठी होइपर्यंत त्यांचे रक्षण, पालन पोषण करतात आणि मग निघून जातात. काही काही जातीत तर फक्त नरच अंड्याची काळजी वाहताना दिसतात. काही जातीत वयाने मोठ्या असलेल्या माद्या आपली अंडी दुसऱ्या तरूण मादीच्या हवाली करून स्वत: स्वतंत्र होतात. काही जातीत पहील्यांदाच अंडी घालणाऱ्या माद्या अतिशय कमी संख्येत अंडी घालतात कारण जर अंडी जास्त घातली तर त्यांना त्यांचे रक्षण करता येइल की नाही याची खात्री नसते. या कमी संख्येतल्या अंड्यांचे रक्षण मात्र त्यांनी व्यवस्थीत केल्यामुळे त्यांच्या पिल्लांचा मरण्याचा दर खुप कमी होतो.
या किटकांना स्वसंरक्षणाकरता खुप शक्ती नसली, वीष नसले तरी ते बचावाच्या अनेक युक्त्या वापरतात. घरट्याचे ठिकाण, त्याचा आकार, रंग असा काही असतो की तो भक्षकापासून बचावला जातो. जर घरटे नसले तर तो त्यांच्या स्वत:चा आकार किंवा रंग आजूबाजूच्या वातावरणाशी एवढा मिळून मिसळून जातो की बाजूने जाणारा त्यांचा शत्रुही बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो. बचावाचे अजुन एक प्रभावी तंत्र हे ढेकूणकीडे अथवा "बग्ज" वापरतात ते म्हणजे मोठ्या संख्येने एकत्र रहाणे. अनेक बारकी बारकी पिल्ले एकत्र राहून त्यांचा एक मोठा समूह तयार होतो. हा एकत्रीत समूह बाजुने जाणाऱ्या भक्षकाला कोणीतरी वेगळाच आणि आकाराने मोठा किटक किवा प्राणी आहे असे समजतो आणि त्याला सोडून देतो.
किटकांच्या अश्या पिल्लांचे छायाचित्रण करायचे असेल तर अर्थातच भर पावसाळ्यात जंगलात फेरफटका मारायला लागतो. कारण जवळपास सर्व किटकांच्या पिल्लांची वाढ ही ह्याच मोसमात होते. ही किटकांची पिल्ले अतिशय छोटी असतात आणि त्यांना शोधणे मोठे किचकट काम असते. त्याचबरोबर पाउस असल्यामुळे आपले अत्यंत महागडे कॅमेराचे साधन संभाळणे आणि पावसात छायाचित्रण करणे कठीण जाते. बऱ्याच वेळेस झाडांच्या पानांच्या खालच्या बाजूस ही अंडी अथवा छोटी पिल्ले लपलेली असतात त्यांना तीथे खाली जाउन त्यांचे छाचित्रण करणे अजुनच जिकीरीचे होऊन जाते. पण या सगळ्या कसरती केल्या तर अशी काही मनमोहक छायाचित्रे मिळून जातात. अतिशय भडक लाल रंगाची कीवा पिवळ्या रंगाची पिल्ले अगदी उघड्यावर असतात पण एकत्रीत रहाण्यामुळेच त्यांना त्यांचे रक्षण करता येते. तेंव्हा अश्या या छोट्याश्या किटकांची अजूनच छोटीशी पिल्ले बघायची संधी ह्या पावसाळ्यात चुकवू नका.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

नजाकतदार यामफ्लाय.
पावसाळा म्हणजे कीटक, फुलपाखरे, पतंग बघण्याचा सर्वात उत्तम काळ. काही काही फुलपाखरांच्या, पतंगाच्या जाती या आपण फक्त याच काळात बघू शकतो. ऍटलास पतंगासारखा जगातला सर्वात मोठा पतंगसुद्धा आपल्याला याच काळात आपल्या जंगलामधे सापडू शकतो. ग्रास डेमन, कॉमन रेड आय, यामफ्लाय यासारखी फुलपाखरे याच काळात आपल्याला दिसू शकतात. यामफ्लाय हे छोटे पण अतिशय आकर्षक आणि उठावदार असे फुलपाखरू आहे. याच्या पंखाची वरची बाजू लालसर भगवी असते आणि वरच्या पंखाच्या टोकाला काळा रंग असतो. पंखाची खालची बाजू पिवळसर भगवी असते आणि त्यांवर अंगभूत नक्षी असते. पंखाच्या शेवटी लांब शेपट्या असतात. यांच्या टोकाला पांढरा रंग असतो आणि त्या शेवटी वळलेल्या असतात. वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्यांची हालचाल होत असते आणि याच कारणाकरता त्यांचे भक्षक सहज फसून डोके समजून शेपटीवर हल्ला चढवतात. यांची उडण्याची पद्धत संथ, हळू आणि जमीनीलगत असते. जंगलातील रस्त्याच्या आसपासच्या कमी उंचीच्या झाडाझूडपांवर ही एकेकटी उडताना दिसतात. यांच्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या आणि त्यांच्या अन्नझाडाच्या कोवळ्या पानासारख्या दिसतात. याम या कोरफडीसारख्या झाडाचे कोवळे कोंब आणि स्माईलेक्सच्या वेलीवर या अळ्या वाढतात. या अळ्यांना एका विशिष्ट्य लाल, मोठ्या मुंग्यांकडून संरक्षण मिळते.
मुंग्या ह्या खऱ्यातर फुलपाखरांच्या अळ्यांच्या प्रमूख शत्रू, पण ह्या "लायसँनीड" किंवा "ब्लु" वर्गाच्या फुलपाखरांच्या अळ्यांचे खास प्रकारचे सहजीवन बऱ्याच जातीच्या मुंग्यांबरोबर असते. ह्या सहजीवनामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. काही जातींअध्ये अळ्यांकडून मुंग्याना एक मधासारखा गोड द्राव मिळतो आणि त्याबद्दल मुंग्या त्यांचे संरक्षण करतात. तर काही जातींअध्ये ह्या अळ्या चक्क त्या मुंग्यांच्या पिल्लांचा अन्न म्हणून वापर करतात. जेंव्हा ह्या अळ्यांचा आकार वाढत जातो तेंव्हा त्यांच्या ग्रंथीमधून गोड द्राव स्त्रवण्याचे प्रमाण वाढत जाते. त्याचबरोबर त्यांना मुंग्यांकडून मिळणारे लक्ष आणि संऱक्षण पण वाढत जाते.
ठराविक काळातच हे फुलपाखरू दिसत असल्यामुळे याच्या छायाचित्रणासाठी पावसाळ्यातच बाहेर पडावे लागते. मागे गोरेगावला बी.एन.एच.एस च्या जागेवर गेलो असताना संध्याकाळी अगदी उशीरा एका अकेशीयाच्या मोठ्या झुडपावर या जातीची ७/८ फुलपाखरे एकत्र बघितली. सहसा हे फुलपाखरू एकेकटे फिरत असल्यामुळे त्यांचे असे मोठ्या संख्येने एकत्र दिसणे आमच्या करता एकंदर नविनच होते मात्र अंधार बराच पडला असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही त्या वेळेस शक्य झाले नाही. दुसरे दिवशी अगदी सकाळीच उठून त्या जागेला परत भेट दिली पण त्यावेळेस तिथे जेमतेम २/३ फुलपाखरेच दिसत होती आणि ती सुद्धा लांब लांब बसली होती. त्यांचे जवळून छायाचित्रण करताना लक्षात आले की ते त्या अकेशिया झाडाच्या खोडावरील चपट लाल ग्रंथीमधून पाझरणारा रस पिण्याकरता त्यावर आकर्षित झाली होती. नागलाच्या जंगलातील भेटीमधे प्रथमच या फुलपाखराला मुंग्यांकडून रक्षण करताना बघितले. आतापर्यंत "ब्लू" जातीच्या अळ्यांना अश्याप्रकारचे मुंग्याकडून रक्षण मिळताना बघितले होते पण यामफ्लायला असे रक्षण होताना बघाणे मजेशीर होते. त्या फुलपाखराच्या अंगावर, पंखावर त्या मोठ्या लाल मुंग्या सर्रास फिरत होत्या पण त्या फुलपाखराला त्याचे काहीच वाटत नव्हते. अरूणाचल प्रदेशाच्या घनदाट जंगालातसुद्धा या जातीचे फुलपाखरू मला सापडले. त्याची अनेक वेगवेगळी छायाचित्रेसुद्धा मिळाली पण सोबतच्या ग्रुपमधिल मित्राने जेंव्हा त्याचे पुर्ण पंख उघडले असतानाचा छायाचित्र दाखवले ते अवर्णनीय होते. हिरव्यागार पानवरचे त्याचे झळाळते पिवळे, नजाकतदार पंख, लांब वळलेल्या, पांढरे ठिपके असणाऱ्या शेपट्या ह्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य. त्यामुळे ह्या पावसाळ्यात यामफ्लायचे पंख उघडलेले असतानाचे छायाचित्र मिळवायचा प्रयत्न जरूर करणार.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


सुसाट "हॉक" मॉथ.
आज जगात या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात. आपल्याकडे नुसत्या मुंबईतच यांच्या १६/१७ जाती अस्तित्वात आहेत. मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या पतंगांचे मोठे डोके आणि बटबटीत डोळे प्रामुख्याने नजरेत भरतात. यांचे पुढचे पंख त्रिकोणी आणि निमुळते असून मागचे पंख आकाराने लहान आणि पुढच्या पंखांखाली झाकले जाणारे असतात. हे जरी पंख निमुळते आणि लहान असले तरी तरी त्यांची उड्डाणशक्ती अतिशत जलद म्हणजे ताशी ५० कि.मी. असते. ह्यातील कित्येक जाती उडता उडता डावीकडे किंवा उजवीकडे जाऊ शकतात किंवा अगदी उडता उडताच फुलांतील मधुरस पीऊ शकतात. हे पतंग सहसा सुर्यास्तानंतर उडताना दिसतात. काही काही जाती तर अगदी मध्यरात्रीनंतर उडताना आढळतात तर काही जाती अपवादात्मक दिवसाच उडताना दिसतात. या पतंगांची अजून एक खासियत म्हणजे त्यांची लांबलचक सोंड. शरीरापेक्षा कीतीतरी मोठी लांब असलेल्या ह्या सोंडेने ते घंटेसारख्या खोलगट फुलांतील मध सुद्धा सहज पीऊ शकतात. या करता यांची सोंड अगदी १० ईंचापर्यंतसुद्धा लांब असू शकते. याच कारणासाठी ऑर्किड, पपई अश्या कित्येक झाडांचे परागीभवन खास या पतंगाकडून केले जाते आणि त्यासाठी ते आपल्यासाठी अतिशय उपकारक ठरतात.
या पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते मात्र ती मादी एका हंगामात १००च्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते २१ दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खुण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत पण जाडजूड आणि गुबगुबीत असते. ह्यांचे रंग अगदी उठावदार असतात. ह्यात प्रामुख्याने हिरवा, पिवळा, तपकीरी, लालसर, काळा रंग असतो. त्यांच्यावर पट्ट्या पट्टयांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा अविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो. यात सुद्धा जर त्यांना डिवचले अथवा त्यांना धोका जाणवला तर त्या आपले डोके खाली घालून मान आणि शेपटीकडचा भाग उंचावतात. याच कारणासाठी त्यांना इंग्रजीमधे "स्फिंक्स" मॉथ असे सुद्धा नाव आहे. या आक्रमक पवित्र्याबरोबरच त्यांनी खाल्लेल्या पानांचा रस लगेचच त्या ओकतात. या कारणांकरता बऱ्याच वेळेला भक्षक त्यांच्यापासून दूर रहाणेच पसंत करतात. कोषावस्थेकरता त्या झाडाखाली उतरून पालापाचोळ्यामधे अथवा मातीमधे कोष करतात किंवा चक्क मातीआत शिरून मातीचा घुमटाकार आकार बनवून आत कोष करतात.
पावसाळ्यानंतर हिवाळ्याच्या सुरवतीस ह्यातील २/३ जाती अगदी आपल्या घरी ट्युबलाईटवर आकर्षित होऊन आपल्याला दिसू शकतात. यांच्या इतर जाती मात्र आपल्याला दाट जंगलातच आढळतात. हे पतंग दिसायला सुंदर असले तरी यांच्या अळ्या या दिसायला जास्त सुंदर असतात. त्यामुळे त्यांची छायाचित्रे छान येऊ शकतात. ह्या अळ्यांचे छायाचित्रण करण्यासाठी जर का आपल्याला त्यांचे अन्नझाड माहित असेल तर त्यांना शोधायला, ओळखायला आपल्याला जास्त सोपे जाते. कण्हेर, बारतोंडी, करवंद, काटेसावर, तेरडा अश्या अनेक प्रकारच्या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या हॉक मॉथच्या अळ्या असतात. ह्या अळ्यांचा आकार त्यांचा रंग आणि त्यावरची वेगवेगळी नक्षी यामुळे सबंध अळी तसेच त्यांचे एकदम जवळून छायाचित्र घेणे नेहेमीच जास्त उपयोगी ठरते. छायाचित्रण करताना जर का त्या फांदीला धक्का लागला तर त्या लगेचच त्यांची घाबरवणारी आक्रमक "पोज" घेतात, त्यांचा जर का असा आक्रमक पवित्रा मिळाला तर मग सोन्याहून पिवळे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
तळ्यात मळ्यातला बेडूक.
आपल्याकडे बेडूक हाच सर्वसाधारणपणे उभयचर प्राण्यांमधे सापडणारा आहे. अर्थातच अभयचर असल्यामुळे ते पाण्यामधे तसेच जमिनीवर सुद्धा सहज वावरू शकतात. पण असे जरी असले तरी बेडकांची त्वचा ही पुर्णपणे जमिनीवर रहाण्यासाठी योग्य नसते कारण त्यांना सतत ती ओलसर ठेवावी लागते. यासाठीच ते एकतर पाण्यात असतात किंवा ओलसर दमट जागी असतात. पुर्णपणे जमिनीवर जर का ते राहिले तर त्यांची त्वचा सुकुन ते मरायचीह संभावना जास्त असते. यामुळे बेडकांच्या आयुष्याची सुरवातीच्या अवस्था ह्या पाण्यामधेच वाढतात. जवळपास सगळ्या जातीचे बेडूक हे पाण्यामधेच अंडी घालतात पण काही विशिष्ट्य जातीचे बेडूक हे त्यांच्या पाठीवर अंडी घेउन फिरतात. ह्या अंड्यांची संख्या आणि ती उबायचा काळ हा प्रत्येक जातीनुसार वेगवेगळा असतो. ही अंडी साधारणत; ६ ते २१ दिवसांनी उबतात. बेडूक नेहेमीच मोठ्या संख्येने अंडी घालतात कारण त्या अंड्यांना आणि पुढच्या अवस्थांना एवढे अडथळे आणि शत्रू असतात की काही मोजकेच प्रौढ बेडूक त्यातून तयार होतात. त्यामुळे एक मादी अगदी ३०००च्या आसपास अंडी घालू शकते. ह्या अंड्यांभोवती एक जेलीसारखा अर्धपारदर्शक पदार्थ त्यांच्या संरक्षणासाठी वापरला जातो.
अंड्यातून बाहेर आलेले बेडकाचे पिल्लू (टॅडपोल) हे माश्यासारखे दिसते म्हणून याला बेडूकमासा असेच म्हणतात. हा बेडूकमासा सुरवातीला काही न खाता पाणवनस्पतींना चिकटून रहातो आणि शरीरात साठवलेल्या उर्जेवरच दिवस काढतो. हळूहळू ते आजूबाजूला स्वतंत्र पोहायला लागतात. यानंतरच्या काळात ते शेवाळे किंवा इतर वनस्पती असा शाकाहारी आहारच घेतात. असे काही दिवस काढल्यावर त्यांना हळूहळू दात यायला लागतात, पचनसंस्था विकसीत होते, कल्ले वाढतात आणि त्यांना हातपाय बाहेर दिसू लागतात. या काळात त्यांना बरेच शत्रू असतात. पाण्यात जरी असले तरी त्यांना माश्यांएवढे लिलया पोहता येत नाही त्यामुळे त्यांना इतर मासे, पाण्यातील ढालकीडे आणि खंड्यासारखे पाणपक्षी यापासून मोठा धोका असतो. यानंतरच्या अवस्थेमधे त्यांची वाढ झटपट होते आणि यावेळेस ते मांसाहारी बनतात. इतर लहानसहान किटकांचा, माश्यांच्या पिल्लांचा ते फन्ना उडवतात. या अवस्थेमधे त्यांना हात पाय आणि अगदी मोठ्या बेडकासारखे शरीर असते पण त्यांची शेपुट सुद्धा अजून शाबूत असते. या काळात ते पाण्याच्या बाहेर येउन आसपासच्या भागात फिरायला सुरवात करतात. त्यांच्या या वस्थेपर्यंत त्यांना सतत पाण्यात रहावे लागते यानंतर मात्र ते पाण्याच्या बाहेर जिवंत राहू शकतात. अर्थात ओलसर, दमट वातावरण त्यांना कायमच लागत रहाते. या अवस्थेनंतर त्यांचा आहार पुर्णपणे मांसाहारी असतो आणि किटक हेच त्यांचे मुख्य अन्न असते. या काळात ते सहसा एकटे रहातात. मात्र पावसाळ्या आधी किंवा पावसाळ्या नंतर लगेचच त्यांच्या विणीच्या हंगामात पाणवठ्याच्याजागी ते परत मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि जोडीदार मिळवायचा प्रयत्न करून आपला वंश पुढे सुरू ठेवतात.
बेडकांच्या छायाचित्रणासाठी पावसाळ्यातच बाहेर पडावे लागते कारण या एकाच काळात ते आपल्याला सहज सापडू शकतात. सर्वसाधारणपणे बेडूक निशाचर असले तरी त्यांची दिवसासुद्धा छायाचित्रे मिळू शकतात. मात्र त्या करता त्यांच्या योग्य अश्या अधिवासात सतत फिरावे लागते. गेल्या पावसाळ्यात पुण्याजवळ सिंहगड दरीत आणि ताम्हीणी घाटात असेच ओढ्याच्या काठी दगडांजवळ त्यांच्या अंड्यांची छायाचित्रे मिळाली. दगडाखाली त्यांचा एक मोठा अंड्यांचा पुंजका चिकटवलेला होता आणि त्यात चक्क अर्धवट विकसीत झालेली पिल्ले सुद्धा दिसत होती. पुढे त्याच जंगलात मला त्यांच्या पुढच्या काही अवस्थांचे सुद्धा छायाचित्रण करता आले. अतिशय छोटे छोटे बेडूक रस्त्यावर उड्या मारताना दिसत होते पण जेंव्हा बारकाईने निरीक्षण केले तेंव्हा जाणवले की त्यांना अजून शेपट्या शाबूत होत्या. अर्थात त्यांचा आकार अतिशय लहान असल्यामुळे मॅक्रो लेन्समुळे त्यांचे छायाचित्रण शक्य झाले. येउरच्या भेंडीनाल्यात सुद्धा संथ पाणी असताना पाण्याखालचे बेडूकमासे याच मॅक्रो लेन्समुळे टिपता आले. अर्थात तो बेडूकमासा पाण्याखाली असल्यामुळे फ्लॅशच्या प्रकाशासाठी योग्य तो कोन जमवणे हे थोड्याफार सवयीने जमून गेले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
चिमुकल्यांचा पुष्पोत्सव.
उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला पाउस भिजवून ओला करतो आणि पावसाळ्यात सबंध जंगल आणि आसपासचा परिसर हिरवागार होऊन जातो. या काळात हिरव्या रंगाच्या एवढ्या अगणित छटा बघायला मिळतात की त्याची गणतीच नाही. श्रावणात मात्र ह्या हिरव्या रंगाच्या बरोबरच अनेक विविध रंगसुद्धा फुलांच्या रूपाने आपल्याला दिसतात. जंगलाचा प्रकार थोडासा बदलला की तिथल्या फुलांचे प्रकार बदलत जातात. अर्थात जागा किंवा जमिन जशी बदलते त्याप्रमाणे ही फुले आणि त्यांची फुलायची पद्धत बदलत जाते. दाट जंगलात गेलो तर तीथे वेगळ्या प्रकारची फुले दिसतात. गवताळ, उघड्या माळरानांवर गेलो तर ही फुले अजुन नाजूक आणि वेगळी असतात. डोंगरावर, पठारांवर, उंचीवर ही फुलझाडे अजुनच बारकीशी असतात आणि त्यांना फुलेसुद्धा तेवढीच लहानशी आणि रंगीबेरंगी येतात. गड किल्ल्यांच्या कडे कपारीत, खडकांवर अजुनच वेगळ्या जातीची फुले येतात. पाणथळीच्या जागी, तलावांच्या भोवती ह्या फुलांचे प्रकार बदलत जातात.
दाट जंगलांमधे सहसा ही फुलझाडे एकेकटी फुलतात. त्यामुळे अर्थातच त्यांना शोधावे लागते. काही झुडपे तर एवढी लहान आणि जमिनीलगत असतात की त्यांच्या साठी खास शोधमोहिमच आखावी लागते. पावसाळ्यातील ह्या सर्वच फुलझाडांची एक खासियत असते ती म्हणजे त्यांचे अस्तित्व संपुर्णपणे पावसाच्या पडण्यावर अवलंबून असते. थोडा जरी पाउस लांबला किंवा आधी झाला तर त्यांचा फुलण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे त्यांचे आयुष्य एवढे कमी असते की काही काही फुलझाडांचे फुलणे अगदी २/४ दिवसात संपून जाते आणि मग थेट पुढच्या वर्षापर्यंत त्यांची वाट बघावी लागते. जंगलातील फुलांपेक्षा डोंगरावर, पठारांवर फुले येतात ती मोठ्या संख्येने येतात. एकाच ठिकाणी शेकडो झुडपे एकाच वेळेस फुलतात. चक्क एकाच विशिष्ट्य फुलांचा, विशिष्ट्य रंगाचा गालिचाच तिथे फुललेला दिसतो. अर्थात त्यांचेही आयुष्य कमी असल्याने खात्रीने ती नेमकी त्याच महिन्यात किंवा जास्त दिवस दिसतीलच असे नाही.
ह्या चिमुकल्या फुलांचे छायाचित्रण मात्र इतर किटक, फुलपाखरे, पक्षी यांच्यापेक्षा नक्कीच सोपे असते कारण एकदा का तुम्ही ती फुललेल्या जागेवर पोहोचलात की ती फुले तिथेच असल्यामुळे त्यांच्या मागेमागे जास्त फिरावे लागत नाही किंवा ती उडून गेली असेही होत नाही. असे असले तरी काही काही जातीची फुले ही अतिशय लहान आकाराची असतात आणि थोडा वारासुद्धा त्यांना गदागदा हलवतो. त्यामुळे त्यांचे छायाचित्रण फुरसतीत करावे लागते. बऱ्याच वेळेला पावसामुळे, वाऱ्यामुळे किंवा किटकांमुळे फुलांच्या पाकळ्या खराब झालेल्या असतात त्यामुळे जास्तीत जास्त चांगले फुल छायाचित्रणासाठी निवडावे लागते.
महाराष्ट्रातील जवळपास सगळे गड किल्ले, माथेरान, महाबळेश्वर किंवा कास ही या चिमुकल्या वन्य फुलांसाठी अतिशय योग्य ठिकाणे. या ठिकाणी पावसाळ्यातील दर महिन्यात एखादी चक्कर मारली तर दर वेळेस तुम्हाला ३०/४० जातीची फुले हमखास दिसतात. उत्तराखंडातील "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स"ला जाणे जमले नाही तर महाराष्ट्रातील कासच्या पुष्पपठारावर आपण सहज जाउ शकतो. एकतर अतिशय जवळ आणि मोठ्या संख्येने इथे फुले सहज बघायला मिळू शकतात. आतापर्यंत गेली कित्येक वर्षे मी जुलै ते सप्टेंबर या वेगवेगळ्या महिन्यात इथे बऱ्याच फेऱ्या मारल्या आहेत. दरवर्षी नवनविन जाती आणि छायाचित्रे कायम मिळत गेली आहेत. पावसाच्या हल्लीच्या लहरी स्वभावार जरी इथल्या फुलांचे फुलणे अवलंबून असले तरी आतापर्यंत माझी खेप कधीच फुकट गेलेली नाही. आतासुद्धा यावर्षी २०/२१ सप्टेंबर २००८ ला खास फुलांच्या छायाचित्रणासाठी जाण्यासाठी आयोजन सुरू आहे आणि आता यावर्षी नविन काय बघायला मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
उडणारे "पान".
नैसर्गिक समरूपता हा बऱ्याचशा किटकांनी अवलंबलेला बचावाचा पवित्रा आहे. हे किटक त्यांच्या ह्या रंगामुळे आणि आकारामुळेसुद्धा आजूबाजूच्या वातावरणात एवढे तंतोतंत मिसळून जातात की त्यांच्या भक्षकांना त्यांना वेगळे ओळखणे शक्य होत नाही. ह्याच कारणासाठी आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे ते "ऑरेंज ओकलीफ" अथवा "डेड लीफ" ही फुलपाखराची जात. ही जात भारतात पुर्वेकडे आणि दक्षिणेतील काही जंगलात आढळते. महाराष्ट्रात आणि मध्य भारतात जरी ही जात दिसत नसली तरी त्यांचेच चुलत भावंड असणारे "ब्लू ओकलीफ" आपल्याकडे आढळते. "कॅलीमा" हे या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ’अतिशय सुंदर दिसणारे’, अर्थातच हे नाव या फुलपाखराला योग्य असेच आहे.
या फुलपाख्रराच्या पंखांचा आकार, त्यांच्या पंखाखालचा रंग आणि नक्षी त्यांना अगदी सुक्या, वाळक्या पानाचा अविर्भाव देतात. बऱ्याचशा जातीमधे या फुलपाखराच्या पंखांची खालची टोके अथवा शेपट्या ह्या थोड्याशा बाहेर आलेल्या, बोथट आणि वळलेल्या असतात. जेंव्हा ते विश्रांती घेताना झाडाच्या खोडावर किंवा फांदीवर बसतात तेंव्हा उलटे बसतात. यावेळेस ह्या शेपट्या त्या फांदीला अथवा खोडाला अगदी पानाच्या देठासारख्या चिकटवतात आणि या सगळ्याचा एकंदर परिणाम म्हणजे एखादे वाळके पानच झाडावर आहे असा आभास निर्माण होतो. या सगळ्यावर वरताण म्हणून सुकलेल्या पानावर जशा शिरा, डाग, ठिपके अथवा बुरशी आलेली असते तसे सर्व काही या फुलपाखरावर असते. या फुलपाखरामदे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वेगवेगळी रंगसंगती बघायला मिळते. फुलांच्या आसपास हे फुलपाखरू दिसायची शक्यता जरा कमीच असते. या उलट सडलेली, अतिपक्व फळे, झाडांचा रस, चीक, डिंक, प्राण्यांची विष्ठा यावरच ही जास्त आकर्षित झालेली आढळतात.
माझे ब्लू ओकलीफ हे आवडते फुलपाखरू असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जंगलांमधे मी याचे छायाचित्रण केले आहे. अगदी उन्हाळ्यातील याचा फिकट निळा रंग असू दे किंवा पावसाळ्यातील गडद निळ्या रंगाच्या छटा असू देत, ते कायमच आकर्षक दिसते. मात्र काहीसे उंच रहात असल्यामुळे किंवा वरतीच बसायच्या याच्या सवयीमुळे दरवेळेस ते दिसले तरी त्याचे छायाचित्रण होतेच असे नाही. अरूणाचल प्रदेशात खास फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी गेलो असताना तीथे ऑरेंज ओकलीफ दिसेल अशी आशा होतीच. त्याप्रमाणे सकाळी ते मला उंच झाडावर बसलेले आढळले. नेहेमीच्या सवयीप्रमाणे "रेकॉर्ड शॉट" घेतला आणि ते लगेचच तिथून उडले. यामुळे त्याची काही व्यवस्थीत छायाचित्रे मिळाली नाहीत. दुसऱ्या दिवशी थोड्या कमी उंचीवर ते फुलपाखरू आढळले, थोडे जवळ गेल्यावर ते लगेचच उडले पण त्याच्या पंखांवरचा झळाळता भगवा रंग दिसला. आपल्याइकडच्या ब्लू ओकलीफपेक्षा कितीतरी वेगळे आणि आकर्षक रंग त्याचे होते. अर्थात फक्त बाहेरूनच त्याचे छायाचित्र मिळाल्यामुळे मला सारखी हळहळ लागून राहिली होती.
नंतर नाम्दाफाच्या जंगलातून परत येताना एका छोट्या पायवाटेवर याच जातीची दोन फुलपाखरे अगदी खाली बसलेली दिसली. अगदी जपून, सावकाश पावली टाकत त्यांच्याकडे गेलो असताना दोन्ही फुलपाखरे विरूद्ध वेगवेगळ्या दिशांना अगदी आत दाट जंगलात उडून गेली. शेवटचा दिवस असल्यामुळे निराश होऊन तिथेच रस्त्यात बसकण मारली असताना अलगद एक फुलपाखरू अगदी समोरच्या झुडपावर येऊन बसले आणी त्याने हळूहळू पंख उघडायला सुरवाते केली. चक्क माझे नशीबच उघडले म्हणायचे. कॅमेरा धडधडू लागला, पण सोबतच्या मित्रांनासुद्धा छायाचित्रण करता यावे म्हणून मी त्यांना पुढे यायची संधी दिली आणि अलगद मागे सरकलो, अर्थात कॅमेरामधे २/४ उघडलेल्या स्थितीतील छायाचित्रे घेउनच आणि माझ्या फळफळलेल्या नशिबाचा विचार करतच.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

Tuesday, December 30, 2008

जहरीले विंचू.
शक्तीशाली दोन नांग्या आणि जहाल विषारी डंख मारणारी शेपटी असलेला विंचू म्हणजे आपल्याला कायम भितीदायकच वाटतो. पण प्रत्यक्षात मात्र हे विंचू अतिशय शांत आणि बऱ्याच वेळेला निरूपद्रवी असतात. अष्टपाद वर्गातील विंचवाच्या जगभरात सुमारे ८०० जाती आढळतात. विंचवाच्या वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे त्यांची वर्गवारी "स्कॉर्पिओनिडा" या खास वर्गात केली जाते. तुकड्या तुकड्यांनी बनलेले त्यांचे शरीर टोकाकडे निमुळते होऊन शेपटीचा आकार घेते. याच शेपटीच्या टोकाला विंचवाची सुप्रसीद्ध दंश करणारी नांगी असते. तर भक्ष्य पकडण्यासाठी शरीराच्या पुढील भागात दोन चिमट्याप्रमाणे नांग्या असतात. या बळकट हातांनी विंचू आपले भक्ष्य पकडतात, फाडतात आणि त्याचा जीवनरस शोषून घेतात. आकाराने सर्वात मोठे असलेले विंचू आफ्रिकेत आणि भारतात सापडतात आणि ते सहज एक फुटापर्यंत वाढतात.
विंचू त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी जमिनीच्या स्पंदनांचा आणि वाऱ्याच्या दिशेचा वापर करतो. ही वाऱ्याची दिशा जाणवण्यासाठी त्यांच्या शरीरावर केस असतात. या केसांच्या सहाय्याने विंचवाला भक्ष्याच्या हालचालीने होणाऱ्या वाऱ्याची जाणीव होते. भक्ष्य पकडण्यासाठी विंचू आपल्या पुढच्या नांग्यांचा वापर करतो आणि आपल्या शेपटीत असलेल्या विषारी काट्यने त्याला डंख करून बेशुद्ध करतो. काही मोठ्या जातीचे विंचू मात्र त्यांच्या शक्तीशाली नांगीनेच त्यांची शिकार पकडतात आणि फाडून खातात. त्यांना बऱ्यचशा वेळेस त्यांचे विष वापरायची गरजच पडत नाही. हे विंचू फक्त द्रव पदार्थच घेऊ शकत असल्यामुळे ते त्यांनी शिकार केलेल्या प्राण्याच्या शरीराला त्यांच्या नांगीने फाडतात आणि त्यांचे लाळेसारखे द्रव भक्ष्याच्या शरीरात सोडतात. यामुळे त्या प्राण्याच्या शरीरातील अवयव त्या लाळेमुळे विरघळतात आणि यांना ते जीवनरष शोषून पिता येतात.
हे विंचू अतिशय प्रतिकूल परिस्थीतीतसुद्धा अनेक दिवस अन्नाशिवाय राहू शकतात. मात्र ज्या वेळेस त्यांना शिकार मिळते तेंव्हा ते मोठ्या प्रमाणावर अन्न खाउन घेतात. पुढे कित्येक दिवस त्यांनी अन्न मिळाले नाही तरी चालते आणि त्यांना त्यांच्या जगण्यासाठी अतिशय कमी उर्जा लागते. त्यांची पाण्याची गरजसुद्धा अशीच कमी असते आणि त्यांना त्यांच्या खाण्याच्या वेळेस मिळालेल्या द्रवावरच ते राहू शकतात. हे विंचू जसजसे वाढत जातात तेंव्हा ते इतर किटक किंवा साप यांच्याप्रमाणेच कात टाकतात. ही कात टाकण्याची प्रत्येक वेळ त्यांच्याकरता अतिशय महत्वाची आणि कठीण असते. या वेळेस त्यांचे शरीर इतके नाजूक असते की त्यांना ती कात व्यवस्थीत काढता आली नाही तर तिथेच त्यांचा मृत्यु ओढवतो किंवा या काळात त्यांना इतर प्राण्याचे भक्ष्य बनावे लागते.
हे विंचू अतिशत लाजरे बुजरे असल्यामुळे सहसा त्यांची आपली भेट होत नाही. त्यातून बरेचसे विंचू निशाचर असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वावर रात्रीच असतो. दिवसा मात्र जर आपण दगडांच्या कपारी किंवा छोट्या मोठ्या दगडांखाली बघितले तर आपल्याला बरेच वेगवेगळे विंचू दिसू शकतात. हल्ली शहरांमधे या विंचवांचे दिसणे होतच नाही पण गावात अजूनही पावसाच्या काळात हे विंचू घराच्या, शेताच्या आसपास दिसतात. यांच्या छायाचित्रणासाठी एकतर आपल्याला रात्री फिरावे लागते किंवा दिवसा ते सापडण्याच्या संभाव्य जागा शोधत बसावे लागते. अतिशय चपळ असणारे हे विंचू पटकन दगडाखाली, बिळात किंवा फटीत जाउन बसल्यामुळे दरवेळेस त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे नाही. मी आतापर्यंत कान्हा, कॉर्बेट इथे मोठे ९/१० ईंचाचे काळे विंचू बघितले आहेत. पण सर्वात जास्त आणि वेगवेगळ्या जातीचे विंचू बघितले ते कर्नाटकातील दांडेलीच्या जंगालात. या जंगलात रात्री बाहेर पडलो आणि एक दोन विंचू बघितले नाहीत असे कधी झालेच नाही. फणसाडच्या किंवा येऊरच्या जंगालात सुद्धा दगडांचे उलथापालथ केल्यावर अनेक विंचू आढळले, अगदी नुकते कात टाकलेले नाजूक आणि मऊ शरीराच्या विंचवांचेसुद्धा छायाचित्रण केले. आतामात्र "विंचवाचे बिर्हाड पाठीवर" या म्हणीप्रमाणे विंचवाची मादी आणि तिच्या पाठीवर तीची छोटी छोटी पिल्ले असे छायाचित्र कधी मिळेल याचीच वाट बघतोय.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

हूडेड ग्रासहॉपर.
नाकतोडे तसे आपल्याला अगदी लहानपणापासूनच माहित असतात कारण ते आपल्याला अगदी घरात, बागेत सहज आढळतात. यांचे हे नाव विचित्र असले तरी ते का पडले हा उलगडा अजून झालेला नाही. इंग्रजीमधे मात्र यांना ग्रासहॉपर या नावाने ओळखले जाते जे त्यांच्या उडी मारण्याच्या सवयीशी अगदी उचीत आहे. हे नाकतोडे जवळपास सर्व जगभर सापडतात. जीथे जीथे त्यांना खायला भरपूर प्रमाणात पाने मिळतात तीथे तीथे त्यांचा वावर असतो. यांचे मागचे पाय यांना ओळखायची सोपी खुण आहे. हे पायच त्यांना इतर किटकांपेक्षा सहज वेगळे ओळखता येतात. हे पाय इतर पायांपेक्षा लांब, मोठे, दणकट आणि काटेरी असतात. ह्या पायानेच त्यांना लांब आणि उंच उड्या मारता येतात. किटकांची उत्क्रांती झाली तेंव्हा बऱ्याचशा किटकांना त्यांच्या बचावासाठी त्यांचे रंगच उपयोगी पडू लागले. ह्या बचाव करणाऱ्या रंगसंगतीमुळे ते आजूबाजूच्या वातावरणात इतके मिळूनमिसळून जातात की त्यांना तिथून वेगळे ओळ्खणे अगदी मुश्कील होऊन जाते. सहसा यांचे हे तंत्र इतके प्रभावी असते की त्यामुळे त्या किटकांना विष, तिक्ष्ण सुळे अथवा इतर बचावाच्या साधनांची काहीच गरज पडत नाही.
सोबतच्या छायाचित्रातील "हूडेड ग्रासहॉपर" हे असेच तंत्र स्वत:च्या बचावासाठी वापरतात. त्यांना रंगाचे ज्ञान इतके पक्के असते की सोबतच्या वातावरणाप्रमाणे, बदलत्या हवामनाप्रमाणे त्यांचे रंग ठरले जातात. आता त्यांना किंवा त्यांच्या पालकांना ह्या हवामानाचे किंवा वातावरणाचे ज्ञान कसे कसे होते हे एक मोठे नैसर्गिक कोडे आहे. अगदी सुरवातीच्या पावसाळ्याच्या महिन्यात जर का आपण ह्या प्रकारचा नाकतोडा बघितला तर तो अगदी हिरवागार पानासारखा असतो. अगदी पानावर शिरा असतात तश्याच शिरा त्यावरपण आढळतात. जसजसा पावसाळा ओसरत जातो तस तसे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ह्यांचा रंग थोडा हिरवा, थोडा पिवळसर तपकिरी आढळतो. थंडीच्या महिन्यात हे फिकट तपकिरी रंगाचे किंवा राखाडी दिसतात. जर का हे आपल्याला उन्हाळ्यात पानगळीच्या वेळेस आढळले तर त्यांचा रंग एकदम शुष्क वाळक्या पानासारखाच असतो.
या नाकतोड्याचे छायचित्रं म्हटले तर सोपे आहे म्हटले तर एकदम कठिण आहे. सोपे या करता कारण जर का तो तुम्हाला दिसला तर तो सहसा पळत, उडत नाही आणी मग तुम्ही त्याचे यथेच्छ छायाचित्रण करू शकता. त्याचे छायाचित्रण कठिण अशाकरता कारण तो निसर्गात दिसणे भयंकर कठिण काम आहे. इतर नाकतोडेसुद्धा निसर्गाच्या मिळत्याजुळत्या रंगाचे असतात पण ही जात एवढी बेमालूमपणे लपलेली असते की ती सापडणे महाकर्मकठीण. अतिश बेमालूम तर त्यांचे रंग असतातच पण त्यांच्या हालचालीही इतक्या मजेशीर असतात की एखादे हिरवे पान किंवा एखादे वाळके पानच वाऱ्याने हलत आहे असा भास आपल्याला होतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. आतापर्यंत मी ह्या प्रकारचे नाकतोडे अनेक जंगलात वेगवेगळ्या हंगामात बघीतले आहेत. जेंव्हा जेंव्हा मी त्यांचे छायाचित्रण करत असतो तेंव्हा सगळ्या वेळेस माझ्या बरोबरच्या मित्रांना मी कोणाचे छायाचित्रण करत आहे हे कळतच नाही. माझा कॅमेरा आणि लेन्स त्यावर रोखलेले असते पण तरीसुद्धा त्यांना तो किटक तीथून वेगळा ओळखता येत नाही. या छायाचित्रात ते "क्लोज अप्स"मुळे एकदम वेगळे आणि उठून दिसत आहेत पण प्रत्यक्षात ते तसे अजीबात दिसत नाहीत. हल्ली तर मी हा किटक दिसल्यावर माझ्या बरोबरच्या मित्रांना एक काल्पनिक चौकट आखून त्यात कोणता प्राणी आहे ते ओळखायला सांगतो पण आजवर माझ्या अनुभवाप्रमाणे कोणीही तिथे हा हूडेड ग्रासहॉपर आहे हे ओळखलेले नाही. यावरून त्याचे हे बचावाच्या रंगसंगतीचे तंत्र किती जालीम आहे हे आपल्याला जाणवेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

स्मॉल ग्रीन आऊलेट.
स्किपर ही जात फुलपाखरांची असली तरी त्यांचा एकंदर अविर्भाव हा पतंगासारखा असतो. पतंगासारखेच त्यांचे शरीर जाडसर असते आणि त्यांचे रंग साधारणत: मातकट असतात. यांच्यातील काही जाती पतंगांसारख्याच पंख पसरवून बसतात तर काही जाती मात्र फुलपाखरांसारख्या पंख मिटून बसतात. आज जगात सुमारे ३५०० या जातीची फुलपाखरे आहेत आणि त्यातील ३२१ जातींची फुलपाखरे आपल्याकडे भारतात आढळतात. यांचा वावरसुद्धा भल्या पहाटे किंवा संध्याकाळी उशीरा असतो. काही काही जाती मात्र दिवसासुद्धा उडताना दिसतात. यांचा एकंदर मातकट, मळखाउ रंग, जलद उडण्याची पद्धत आणि अंधाऱ्या वेळी उडण्याच्या सवयीमुळे ही सहसा आढळून येत नाहीत. पण यातील काही काही जाती अगदी सहज दिसतात तर काही काही जाती शोधूनही सापडत नाहीत.
२००६ साली आम्ही "बटरफ्लाय मीट"ला जयरामपूर, अरूणाचल प्रदेश इथे गेलो होतो. पाच दिवसाच्या यशस्वी सभेनंतर आमचे आम्ही जवळच्या नाम्दाफाच्या जंगलात जायला निघालो होतो. मधल्या नदीच्या पाण्याला पावसामुळे जोर होता आणि त्यात आमची जीप सतत दोनदा अडकल्यामुळे आम्ही पुढे जाउ शकत नव्हतो. मुंबईपासून एवढ्या लांब आलो होतो, परत इथे कधी येऊ हे सांगता येत नव्हते, समोर घनदाट जंगल दिसत असून जाता येत नाही याचे राहून राहून वाईट वाटत होते. खिन्न मनाने आम्ही परत येत असताना नदीच्या काठावर एक भलामोठा फुलपाखरांचा थवा चिखलपान करताना आढळला आणि आम्ही आमचे दुख: विसरून छायाचित्रणाला लागलो. यात दुपारची संध्याकाळ कधी झाली हेच कळले नाही. आम्ही आता मात्र प्रसन्न चित्ताने परत निघालो ते दुसऱ्या दिवशी पर त्याच ठिकाणी भेट देण्याचे नक्की करूनच.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकळी लवकर उठून त्याच ठिकाणी निघालो. मात्र आदल्या दिवशी एवढी फुलपाखरे काही त्या दिवशी नव्हती. तरीसुद्धा काही वेगळ्या जातीची फुलपाखरे, पक्षी दिसले त्यांचे छायाचित्रण करत करत आम्ही पुढे गेलो. दिवसभर असे छायाचित्रण करून संध्याकाळी आम्ही परत फिरलो. बरोबरच्या काही मित्रांना गाडी मिळाल्याने ते पुढे गेले आणि आम्ही दोघे तिघेच मागून चालत येत होतो. सूर्य अस्ताला टेकला होता मात्र अजुनही त्याचा प्रकाश जाणवत होता. एका ठिकाणी अगदी सहज दिसणारी दोन पिवळी फुलपाखरे उड्ताना दिसली, त्यांच्याकडे बघताना जाणवले की त्यांच्या बाजूला काहीतरी वेगळीच हालचाल आहे. मी जवळ जाउन बघितले तेव्हा एक वेगळीच फुलपाखरांची जोडी दिसली. आतापर्यंत अशी फुलपाखरे कधी बघीतलीच नव्हती. त्यांच्या एकंदर अविर्भावावरून कळले की ती स्किपर जातीतली आहेत पण नक्की कोणती जात हे काही ओळखता आले नाही. यामुळे नक्कीच ती जात दुर्मिळ होती. अंधारून आल्यामुळे बॅगेत गेलेले आमचे कॅमेरे फटाफट बाहेर आले आणि म्ही त्यांचे छायाचित्रण सुरू केले. ती अगदी जमीनीवर असल्यामुळे आम्हाला चक्क रस्त्यात लोळण घेउन त्यांचे छायाचित्रण करावे लागत होते. त्यातले एक फुलपाखरू लगेचच उडून वर उंच फांदीवर जाऊन बसले मात्र दुसऱ्याने व्यवस्थीत छायाचित्रण करून दिले. सहसा न आढळणाऱ्या या रंगीत चमकदार फुलपाखराचे नंतर नाव शोधून काढले ते म्हणजे "स्मॉल ग्रीन आऊलेट". संध्याकाळी उशीरा उडण्याच्या यांच्या सवयीमुळे आणि फक्त काही मोजक्या अरूणाचल प्रदेश, सिक्कीम या भागातच आढळणाऱ्या यांच्या सवयीमुळे याचे छायाचित्रण फारसे झाले नव्हते आणि म्हणूनच हे छायाचित्र नुकत्याच प्रसीद्ध झालेल्या श्री. आयझॅक किहीमकर यांच्या "द बुक ऑफ इंडियन बटरफ्लाईज" या संदर्भ ग्रंथात स्किपर या वर्गाच्या प्रमुख पानावर प्रकाशीत झाले आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

मिलनाचा जुगार.
कोळ्यांमधे नर हे सहसा मादी पेक्षा आकाराने लहान असतात. आज जगभरात आपल्या भारतात सापडणारे जायंट वूड स्पायडर (नेफिला जाती) आणि हेरेनिया जातीच्या नर मादीतील आकाराची भिन्नता अतिशय प्रसिद्ध आहे. नरांच्या या लहानश्या आकारामुळे मादी बऱ्याचदा त्यांना भक्ष्य म्हणूनच खाउन टाकते. यासाठी मिलनाकरता मादीजवळ जाणे हे कित्येक वेळा त्यांच्या नराकरता अतिशय धोक्याचे आणि जिवघेणे ठरते. अर्थात नरसुद्धा त्यांच्या मादीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेतातच. मादी ज्या वेळा तिची शिकार खाण्यात गुंगलेली असते त्यावेळी तिच्याजवळ जाउन मिलन करणे आणि लगेचच तिथून पळ काढणे असे काहे प्रयोग त्यांच्या सोयीचे ठरतात.
नर कोळी आकाराने लहान असल्यामुळे त्यांची वाढ झटपट होते. यामुळे अर्थातच ते मादी पेक्षा लवकर वयात येतात. या वयात आलेल्या नरांपुढे मोठा प्रश्न असतो तो मादी शोधण्याचा आणि तीला मिळवण्याचा. पण या करता त्याला काही जाळ्यातील विशीष्ट्य रेषमाचे धागे किंवा हवेत सहज पसरणाऱ्या संप्रेरकांचा फायदा होतो आणि तो त्याच्या जातीच्या मादीला शोधू शकतो. काही वुल्फ जातीच्या कोळ्यांमधे मादी जेंव्हा तीचे जाळे विणते तेंव्हा त्यातील काही रेषमाचे धागे हे विशीष्ट्य संप्रेरकाने बनवले जातात किंवा त्यावर या आकर्षित करणाऱ्या संप्रेरकाचे आवरण चढवले जाते. ह्या रेषमाच्या धाग्यांचा शोध घेत घेत नर मादी पर्यंत पोहोचू शकतो. कधी कधी नुकतीच वयात आलेली मादी स्वत:ही अशी उद्दीपीत करणारी संप्रेरके हवेत पसरवते. यामुळे तिच्याकडे जो नर लगेच आणि प्रथम आकर्षित होतो त्याबरोबर तीचे मिलन होते. अर्थात हे मिलन झाल्यावर मादी तो गंध पसरवण्याचे थांबवते आणि त्यामुळे दुसरे नर तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
जेंव्हा एखाद्या नराला त्याची मादी दिसते तेंव्हा तो आधी आपली "संभाव्य जोडीदार" अशी ओळख पटवून देतो. असे जर केले नाही तर कदाचीत ती मादी त्याला भक्ष्य म्हणून खाण्याचाही प्रसंग येउ शकतो. यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या वापारतो. जाळे बनवणाऱ्या जातीमधे जाळ्याचे विशीष्ट्य धागे हलवून साद दिली जाते. वुल्फ जातीचे कोळी जमिनीवर आपले पोट आपटून त्यांची जाणीव करून देतात तर ज्या कोळ्याची दृष्टी अगदीच अधू असते अश्या जातीचे नर तर चक्क मादीसमोर जाउन नाच करून दाखवतात. फनेल वेब कोळी बोगद्यासारख्या जाळ्याच्या दरवाज्याचे रेशीम हलवून मादीला बोलवतात. एवढे प्रयत्न केल्यावर जर मादी तयार असेल तर त्याला स्विकारते नाहीतर त्याला पळवून लावते, त्याचा एखादा पाय तोडते किंवा चक्क त्याला खाउनसुद्धा टाकते.
कोळ्यांच्या जोडीचे छायाचित्रण करायचे असेल तर साहजिकच त्यांचा थोडा अभ्यास करावा लागतो. जर का हा अभ्यास नसेल आणि आपण जायंट वूड स्पायडरच्या भल्या मोठ्या जाळ्यात बसलेली मोठी मादी आणि अगदी चिमुकला नर बघीतला तर आपण नक्कीच त्याला तीचे पिल्लू किंवा दुसराच कुठल्या जातीचा कोळी म्हणून समजणार किंवा दुर्लक्ष करणार. कित्येक वेळेला हे कोळी एकेकटे बरेच वेळेला दिसतात आणि त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते पण नर मादी दोघेही जवळजवळ मिळणे खुपच कठीण असते. अगदी जवळ दिसले तरी ते इतक्या तत्परतेने वेगळे होतात की एकाच छायाचित्रात त्यांना टिपणे खुपच नशिबाचे ठरते. मागे एकदा पावसाळ्यात, अंधाऱ्या जंगलात एका झाडावर क्रॅब स्पायडरने मधमाशी पकडली होती. तिथे त्याचे झटपट छायाचित्रण केले आणि घरी येउन कॉंप्यूटर वर छायाचित्रे डाऊनलोड केली आणि मोठ्या स्क्रीन वर बघीतली तेंव्हा जाणवले की त्या क्रॅब स्पायडरच्या मोठ्या मादीच्या पाठीवर अगदी चिमुकला नर बसला होता. तो काळपट, तपकिरी रंगाचा नर एखाद्या डागासारखा असल्यामुळे नगण्य वाटत होता आणि त्यामुळेच त्याच्याकडे माझे दुर्लक्ष झाले होते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/









अवाढव्य "बिटल्स".
किटक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नगण्य, चिमुकले, नाजूक, तुरतुर पळणारे, ऊडणारे प्राणी अशीच प्रतिमा उभी रहाते. हे पुर्णत: खोटे नसले तरी हेच कित्येक चिमुकले जीव फक्त काही दिवसात हजारो मैलांचे अंतर स्थलांतराकरता उडतात आणि ते नाजूक नाहीत हे सिद्ध करून दाखवतात. त्याच प्रमाणे काही काही किटक चक्क एक फुटाएवढे मोठे असल्यामुळे ते व्हिमुकले आणि नगण्य आहेत असेही म्हणता येत नाही. जगातील सर्वात वजनदार आफ्रिकेतील गोलीएथ ढालकीडा हा १०० ग्रॅम वजनाचा असून त्याची लांबीसुद्धा १२ सें.मी. एवढी असते. दिवसा उडणारा हा भलामोठा ढालकीडा फुलांतील परागकण, फळे, फळातील रस पीउन जगतो आणि बऱ्याच वेळेला जंगलातील झाडांच्या फांदीवर आपल्या सहा बळकट पायांनी धरून उलटा लटकलेला आढळतो. जगातील सर्वात लांब असणारा दक्षिण अमेरीकेतील रायनोसोरस ढालकीडा हा तर अजूनच मोठा म्हणजे जवळपास ८ इंचाएवढा मोठा असतो. ह्या त्याच्या शरीराच्या एकंदर लांबीत जास्त मोठा त्याच्या शिंगाचाच भाग असतो. निशाचर असलेला हा भलामोठा ढालकीडा पालापाचोळा खाऊन रहातो आणि ह्या त्याच्या मोठ्या शिंगाचा वापर दुसऱ्या प्रतिस्पर्धी नरांबरोबर मारामारी करण्यासाठी केला जातो.
आपल्या भारतातसुद्धा मोठ्या मोठ्या आकाराचे ढालकीडे सापडतात. यात सर्वात सहज दिसणारे मोठे ढालकीडे म्हणजे "लॉंग हॉर्न बिटल". सहसा हे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर आपल्याला दिसू शकतात. क्वचीत तर घरीसुद्धा ट्युबलाईटच्या प्रकाशावर आकर्षित होऊन घरात आलेले दिसतात. सहसा यांचा रंग काळपट, तपकीरी, कॉफीच्या रंगाचा असतो आणि त्यांच्या स्पृशा अथवा ऍंटेना या लांबलचक म्हणजे अगदी २/३ ईचाएवढ्या पण मोठ्या असू शकतात. संयुक्त असलेल्या यांच्या भल्यामोठ्या डोळ्यांनी चेहऱ्याचा बराचसा भाग व्यापलेला असतो आणि त्यातील प्रत्येक भिंग वेगवेगळे दिसत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा क्लोज अपही छान येतो. मात्र यांचे मुखावयव अतिशय धारदार आणि तिक्ष्ण असल्यामुळे त्यांना हाताळताना अतिशय काळजी घ्यावी लागते. ह्या कीड्याच्या आपल्याकडे अगणीत जाती आढळतात. छायाचित्रात दिसणारी जाते अतिशय सुंदर होती. गडद तपकीरी रंगाच्या पाठीवर त्याला सुरेख, चमकदार चंदेरी रंगाच्या मोठ्या ठिपक्यांची नक्षी होती. रात्रीच्या प्रकाशात अक्षरश: एखाद्या लोलकासारखा तो चमकत होता. याची अजून एक जात आहे जी जर्द पिवळ्या धम्म्क रंगाची असते आणि तिच्या संपुर्ण शरीरावर बारके बारके ठिपके असतात. ही जात दिसायला जरी देखणी असली तरी तीचा आकार मात्र लहानसा असतो.
नल सरोवरला पक्षी बघायला गेलो असताना रात्री जेवून परतताना मला हा "सिक्स स्पॉटेड टायगर बिटल" रस्त्यात आढळला. अतिशय तुरूतुरू जलद पळणाऱ्याला त्या किटकाला थांबवताना माझ्या नाकी नऊ आले. याचे सुद्धा धारदार मुखावयव असल्यामुळे पटकन त्याला धरतासुद्धा येत नव्हते. सावकाश त्याला टोपीमध्ये ठेवून, थोडा शांत झाल्यावर त्याला एका झाडाच्या वाळ्क्या खोडावर ठेवून त्याचे छायाचित्रण
केले. अतिशय चपळ असणाऱ्या ह्या किटकांचे छायाचित्रण करतना नेहेमीच तत्परता दाखवावी लागते. छायाचित्रात दिसणाऱ्या "स्टॅग बिटल" हा नाम्दाफाच्या घनदाट जंगलात आढळला. आकाराने तो ४/५ ईंच लांबतरी नक्कीच असावा. अतिशय चंचल असल्यामुळे तो एका जागी बिलकूल थांबत नव्हता आणि त्याचे छायाचित्रण काही केल्या जमत नव्हते. बऱ्याच वेळानंतर अगदी काही क्षण तो नदीच्या काठावर जरा वाळूत संथ झाला तेंव्हा त्याची झटपट २/३ छायाचित्रे घेता आली. असे भलेमोठे किटक बघायला मिळणे म्हणजे नशिबाचा भाग आणी त्यातसुध्दा त्यांची चांगली छायाचित्रे मिळाली तर सोन्याहूनही पिवळेच म्हणावे लागेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

गॉगल"वाली लूटारू माशी.
पावसाळ्यानंतर जेंव्हा जंगलात किटकांचा सुकाळ असतो त्याच काळात ही लूटारू माशी मोठ्या प्रमाणात दिसायला लागते. डिप्टेरा या माश्यांच्या वर्गात येणाऱ्या या माशीला इतर माश्यांसारखे दोनच पंख असतात. दुसऱ्या जोडीचे रूपांतर त्या पंखाच्या मागे एखाद्या गाठीसारखे असते आणि त्यांना "हॉल्टर" असे म्हणतात. जलद, उड्डाणाच्या वेळेस त्यांना तोल सावरण्यासाठी आणि स्थैर्य येण्यासाठी याचा उपयोग होतो. ही रॉबरफ्लाय अथवा लूटारू माशी तीच्या नावाप्रमाणेच दहशतवादी असते. जमिनीलगत अगदी लहान झुडपावर किंवा गवताच्या पात्यावर ती दबा धरून बसते. थंडीमध्ये गारठलेल्या फुलपाखरांना, पतंगांना किंवा इतर किटकांना ती सावज म्हणून शोधत असते. या किटकांनी जरा तिच्यासमोरून उडायला सुरवात केली की ती त्यांच्यावर झपाट्याने हल्ला करते. हवेतल्या हवेतच एखाद्या किटकाला पकडणे यात तीचा हातखंडा असतो. यात तीला साथ देतात ते तीचे काटेरी, मजबूत पाय. या काटेरी पायांमुळे पकडीत आलेले भक्ष्य तीच्याकडून सुटणे केवळ अशक्य ठरते. आपल्यासारखे दात त्यांना नसल्यामुळे ती त्या पकडलेल्या भक्ष्याच्या शरीरात आपली सोंड खुपसते. या सोंडेतून आपली जहाल लाळ त्या भक्ष्याच्या शरीरात सोडते. यामुळे त्याच्या शरीरातील पेशींचे विघटन होऊन ती त्या भक्ष्याला एखाद्या "फ्रुटी"सारखे पिउन टाकते. मलूल, सत्वहीन अशे शरीर आणि पंख केवळ तीच्या तावडीतून खाली काही काळानंतर गळून पडतात.
रंगीबेरंगी नसलेली, पंखावर किंवा शरीरावर काहीच नक्षी नसलेली ही लूटारू माशी दिसयला सुंदर, आकर्षक नक्कीच नसते. मात्र तीच्या डोळ्यात तीचे सारे सौदर्य साठवलेले असते. अतिशय आकर्षक, मोठे टपोरे संयुक्त डोळे हे वेगवेगळे रंग परावर्तित करतात. क्षणात हे डोळे आपल्याला उन्हात चमकताना हिरवेगार पाचूसारखे दिसतात तर क्षणात जरा प्रकाश अथवा दिशा बदलली की ते एखाद्या माणकासारखे लालभडक भासू लागतात. परत थोडासा प्रकाश कमी झाला तर तेच डोळे अगदी निर्जीव काळेभोर दिसतात. एखाद्या गॉगलसारखे रंगीबेरंगी असणारे हे डोळे असतात मात्र एकदम प्रखर. त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भिंगे सामावलेली असतात. याच कारणामुळे त्यांना आजूबाजूची थोडीशीसुद्धा हालचाल सहज टिपता येते आणि थेट त्या किटकावर हल्ला चढवला जातो.
कमी उंचीवर शिकार करण्याच्या तीच्या पद्धतीमुळे हीचे छायाचित्रण करायला सोपे जाते. तीचे छोट्या झुडपावर दबा धरून बसणे किंवा शिकार आजूबाजूलाच खाली खात बसणे यामुळे ती आपल्याला सहज सापडू शकते. त्यात ती इतकी अधाशी आणि हावरट असते की एकदा का तीच्या तोंडात सावज असले तर ती जाम हलत नाही आणि मग तुम्हाला
तीचे मनसोक्त छायाचित्रण करता येते. आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला ह्या माशीला मी जंगलात बघीतले आहे त्याच्या निम्म्या वेळेला ती तीची शिकार पकडून बसली होती. मोठे चतूर, पतंग, सिकाडा, फुलपाखरे हे तीचे प्रमुख खाणे असले तरी अगदी बारीकसारीक किटकसुद्धा तीला खायला चालतात. आताच गेल्या आठवड्यात येऊरच्या जंगलात अगदी सकाळी मी एका लूटारू माशीला बघितले. तीने नुकताच एक छोटा कीडा पकडला होता आणि त्याचे ती "रस"ग्रहण करत होती. रात्रभराच्या उपासाने तीचे पोट अगदी उपाशी आणि खपाटीला गेले होते. त्याला खाउन झाल्यावर तीने अजून एक पतंग पकडला. त्याला खाउन झाल्यावर तीचे अजून एक जवळच कीडा पकडला. मी तीचे जवळपास अर्धा तास निरिक्षण आणि छायाचित्रण करत होतो. या काळात तीने ५/६ किटक पकडून फस्त केले आणि अर्थातच माझ्या शेवटच्या शेवटच्या छायाचित्रात तीचे "भरलेले" आणि टम्म फुगलेले पोट दिसत होते. अनेक वेळा बघून, अनेक वेळा छायाचित्रण करूनसुद्धा या "गॉगल"वाल्या लूटारू माशीचे अजून अजून छायाचित्रण करायचा मोह काही टळत नाही एवढे मात्र खरे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/