Thursday, July 19, 2012


फुलपाखरांची अंगत पंगत.....   

मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात. याच काळात पानझडी जंगलामधे सगळ्या झाडांची पाने गळून गेल्यामुळे जंगले उघडी बोडकी दिसायला लागतात. आधीच वरून सुर्य तळपत असतो आणि हिरव्या पानांचे आच्छादन गायब झाल्यामुळे त्या उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवतो. आता या अश्या रूख्यासुक्या जंगलात भटकताना छायाचित्रण तसे कमीच होते. अर्थात या कारणामुळे जर का आपण जंगलाला भेट दिली नाही तर तो खरोखरच वेडेपणा ठरेल कारण हाच काळ फुलपाखरांच्या दिसण्याचा आणि त्यांच्या छायाचित्रणाकरता उत्तम समजला जातो. बऱ्याच जणांचा असा समज असतो की पावसाळ्यात आणि जिथे फुले खुप असतात त्या वेळी आणि त्या ठिकाणी फुलपाखरे जास्त सापडतात. मात्र या उन्हाळ्याच्या गरम दिवसात सुद्धा बऱ्याच जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने चिखलपान करताना एकत्र दिसतात.आता हे चिखलपानसुद्धा काय असते ते मला अगदी अचानकच कळले. खुप वर्षांआधी उन्हाळ्याच्या सुट्टीत पनवेलजवळच्या कर्नाळ्या किल्ल्यावर ट्रेकींगसाठी गेलो असताना, गडावरच्या टाक्यातील पाणी आणण्यासाठी आमची शोधाशोध सुरू होती. मी एका कोरड्या नाल्यामधून त्याच्या उगमाकडे वर वर चढत होतो. खरे तर तो एक कोरडा पडलेला धबधब्याचा झालेला ओढा होता. एका ठिकाणी खडकाच्या घळीमधे पाण्याचा थोडासा साठा होता आणि त्यातले काही पाणी खाली झिरपत होते आणि त्याचा चिखल झाला होता. मी एकदम पुढे गेलो तर एकदम शे / दोनशे फुलपाखरे भर्रकन उडाली. मी एकदम अचंबित होऊन थबकलो आणि बघितले तर जवळपासच्या चिखल्याच्या भागावर अनेक जातीची फुलपाखरे जणु त्यांना तिथे चिकटवले आहे अशी बसली होती. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. एरवी एकेक फुलपाखरू दिसते आणि त्याच्या मागे मागे छायाचित्रणासाठी पळावे लागते पण इथे तर वेगळाच प्रकार दिसत होता. शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे मोठ्या संख्येने एकत्र शांत आणि तीसुद्धा जमिनीवर बसलेली म्हणजे छायाचित्रकारांची तर पर्वणीच म्हणायची.

परत आल्यानंतर या प्रकाराबद्द्ल अधिक माहिती शोधली. सहसा फुलपाखरे अनेक फुलांना भेटी देउन त्यातील मधुर रस अथवा मध प्राशन करतात पण याच जोडीला त्यांच्या शरीराला अनेक इतर क्षारांची गरज असते ती फक्त त्या मधातून पुर्ण केली जाउ शकत नाही. या करता त्यांना मग इतर पदार्थांमधून ते क्षार मिळवायला लागतात. या फुलपाखरांचे नर जेंव्हा चिखलपान अथवा  mud puddling  करतात तेंव्हा त्यांना सोडियम आणि अमिनो आम्ले मिळतात. मादीबरोबर मिलन करताना ही पोषक द्रव्ये मादीला दिली जातात ज्याचा फायदा त्यांची अंडी वाढण्याकरता होतो. फुलपाखरांचे चिखलपान सहसा उन्हाळ्यात होते. पानगळी रानांमध्ये, उन्हाळ्याच्या कोरड्या दिवसात ही फुलापाखरे मोठया संख्येनी पहायला मिळतात. अतिशय जलदगतीने उडणारी ही फुलपाखरे तापमान वाढू लागले की रानातील झऱ्याजवळ, ओढयाजवळच्या ओल्या जमिनीवर, चिखलावर बसलेली पहायला मिळतात. एका वेळी अक्षरश: शेकडो वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे एकाच ठिकाणी अगदी एका ताटात जेवल्याप्रमाणे एकत्र बसलेली आढळतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, कॉमन गल, झेब्रा ब्लू, ग्राम ब्लू, लेपर्ड, ग्रास ज्वेल, सनबीम अशी अनेक फुलपाखरे असे चिखलपान करताना आढळतात. उत्तर भारतात आणि दक्षीण भारतात आपल्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या जातीसुधा असे चिखलपान करताना दिसतात. या वेळेला अर्थातच त्यांचे छायाचित्रण आपल्याला सहज करता येते आणि एकाच जागी अनेक वेगवेगळ्या जाती आपल्याला छायाचित्रणासाठी मिळू शकतात.
अर्थात असे चिखलपानाचे “स्पॉट” शोधून काढावे लागतात. सगळ्याच सुक्या ओढ्या / नाल्यांमधे हे चिखलपान होत नाही. त्या ठिकाणी थोडा चिखल, थोडी सुकी माती, मोठे दगड आणि प्रचंड उन असे सगळे व्यवस्थित जमले तर चिखलपान होते. मात्र असे एखादे ठिकाण जर आपल्याला सापडले तर मात्र दरवर्षी त्या ठिकाणी चिखलपान होतेच होते. फक्त ते होण्याचे दिवस उन्हाच्या तडाख्याप्रमाणे आणि त्या ठिकाणचे पाणी सुकण्याप्रमाणे पुढे मागे होतात. आतापर्यंत गेल्या काही वर्षात मी कर्नाळा अभयारण्य, येऊर, फणसाड, तुंगारेश्वर, बोंडला, नेत्रावली अशा अनेक जंगलात हे फुलपाखरांचे चिखलपान सातत्याने बघत आलो आहे. मार्च / एप्रिल झाला की या ठिकाणांना रणरणत्या उन्हात भेट द्यायची. तळपत्या उन्हात आणि तापलेल्या दगडांवर कुठे एखादा सावलीचा तुकडा असेल तर त्यावर बुड टेकवून तासन तास फुलपाखरांची वाट बघायची. ती बिचारी फुलपाखरेसुद्धा इतर मोठ्या प्राण्यांसारखा त्रास देत नाहित आणि आजूबाजुला उडत रहातात. हो पण दरवेळेला ते समोर बसून आपल्याला छायाचित्र देतीलच असे मात्र नक्कीच नाही. ती आपली त्यांच्याच मस्तीत, मजेत गिरक्या घेत आजूबाजूला लहरत रहातात आणि त्यांना वाटेल त्याच वेळेस बसतात. खरेच सांगतो त्या फुलपाखरांना बघताना, त्यांचे छायाचित्रण करताना त्या रणरणत्या उन्हाच्या त्रासाचे फारसे काहीच वाटत नाही. 
या फुलपाखरांमधे नाजुकशी ब्लू जातीची अनेक छोटी छोटी फुलपाखरे असतात. मोठ्या आकाराची इमीग्रंट, स्पॉट स्वोर्ड्टेल, कॉमन जे सुद्धा असतात. या फुलपाखरांचे छायाचित्रण सुरू असतानाच मधेच एक गडद रंगाचे चपळ गॉडी बॅरन जातीचे झळाळणाऱ्या हिरव्या रंगाचे लाल ठिपके असलेले फुलपाखरू बाजूला येते आणि मग त्याच्या मागे मागे पळावे लागते. त्याचे छायाचित्रण सुरू असतानाच लांबच्या चिखलाच्या भागावर अलगद ब्लू ओकलीफ अवतरते. मग काय सगळा जामानिमा सावरत त्याच्या मागे पळावे लागते. वेगवेगळ्या भागात सतत फेऱ्या मारून कुठे वेगळी आणि सहज न दिसणारे फुलपाखरे तिथे आला आहेत का हे बघावे लागते. यामुळे वर्षभरात न दिसणारी फुलपाखरे आपल्याला टिपता येतात. इथे एक कायम लक्षात ठेवायचे की “हातचे सोडून पळत्याच्याच” मागे लागायचे आणि कायम “हाजीर तो वजीर” असेच समजायचे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

सुंदरबन तिवरांचे जंगल.....  

जंगल म्हणजे आपल्याला डोंगर दऱ्यांच्या कुशीत दडलेली घनदाट झाडी अपेक्षित असते पण सुंदरबनचे जंगल याला अपवाद आहे. सुंदरबन (बंगाली भाषेतील सुंदर जंगले) म्हणजे जगातील एक मोठा चमत्कार आहे. या जगातील सर्वात मोठ्या तिवरांच्या जंगालाची व्याप्ती आहे २६,००० चौ.कि.मी. जी जगातली एकमेव सलग तिवरांची जंगले आहेत. यातील दोन तृतीयांश भाग जरी बांगलादेशात असला तरी भारतातील सुंदरबन हे ९६३० चौ.कि.मी. आहे. इथल्या वैविध्यपुर्ण प्राणि, पक्षी आणि झाडांच्या जातींमुळे, लोकांचे जनजिवन आणि त्यांची संस्कृती, नदी आणि खाड्यांचा अनोखा मिलाफ यामुळे इथे लाखो देशी / विदेशी पर्यट्क आकर्षित होतात. जगातील सर्वाधिक म्हणजे २७४ भारतिय वाघांचा वावर इथल्या जंगलांमधे आहे. इथले वाघ नरभक्षक असल्याच्या गैरसमजुती आणि त्यांच्या खाऱ्या पाण्यातील वावरामुळे त्यांच्याबद्दल अजुनच आकर्षण वाढले आहे.

१९७३ मधे घोषित झालेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधे सुंदरबन हे प्रमुख होते. इथल्या महत्वाच्या जैवविविधतेमुळे आणि सतत बदल होणाऱ्या भौगोलीक बदलांमुळे १९८७ मध्ये IUCN  ने या जंगलाला “world heritage site” म्हणून घोषित केले तर १९८९ मध्ये  UNESCO  ने या जंगलाला “Biosphere Reserve” ची मान्यता दिली. यानंतरही ही जागा उत्तम पाणथळीची आहे म्हणून तीची गणना “Ramsar Site” मध्ये करण्यात आली. इथे गंगा नदीच्या खालचा भाग ज्याला हुगळी नदी म्हट्ले जाते तो बंगालच्या महासागरात मिळ्तो. यामुळे इथे अनेक खाड्या तयार झाल्या आहेत आणि भरती ओहोटेच्या वेळेस अगदी १५ फुटांपेक्षा जास्त पाणी इथे भरले किंवा ओसरले जाते.

सुंदरबन जरी तिवरांचे जगातील सर्वात मोठे जंगल असले तरी नक्कीच इकडच्या वाघांमुळे हे जास्त प्रसिद्ध आहे. भारतातील इतरत्र आढळणाऱ्या वाघांपेक्षा इकडचे बाघ आणि त्यांच्या रहाण्याच्या / जगण्याच्या सवयींमधे जमिन अस्मानाचा फरक आहे. दिवसभरात इथे दोन वेळा भरती आणि ओहोटी येते त्यामुळे जमिनीचा बराचसा भाग पाण्याखाली जातो आणि जेंव्हा पाणि ओसरते तेंव्हा तिथे दलदल असते. यामुळे इथेल्या वाघांना धावत जाउन शिकार करणे खुप कठिण असते. याचमुळे इथल्या वाघांना बऱ्याच वेळेला मासे आणि खेकडे मारून भूक भागवावी लागते. सगळीकडे पाणि असल्यामुळे इथले वाघ पट्टीचे पोहोणारे आहेत आणि बऱ्याच वेळेला जर का ते दिसले तर ते खाड्या पोहत पार करताना दिसतात. गोड्या पाण्याच्या अभावामुळे इथला वाघ साधारणत: खारे पाणी पिताना दिसतो. ज्या बाजूला गावे वसलेली आहेत त्या त्या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाडांच्या बाजूने जाळी लावलेली आहेत जेणेकरून वाघाला त्या बाजूने गावात शिरता येणार नाही. 


या खास प्रकारच्या अधिवासामुळे इथे वाघ दिसणे हे फार दूर्मिळ. वाघांचे सोडूनच द्या पण इतरही वन्य प्राणी इथे दिसणे म्हणजे नशिबाचीच बाब, कारण आपला सगळा प्रवास हा बोटीने होतो त्यामुळे फक्त किनाऱ्यावर जर का कोणी प्राणी आले तरच ते आपल्याला दिसणार. पण अर्थातच याच कारणामुळे अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आपल्याला सहज दिसू शकतात. सुंदरबनची खासियत म्हणजे इथे आपल्या सात वेगवेगळ्या जातीचे, रंगीबेरंगी खंड्या पक्षी दिसतात. या खंड्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, करकोचे, पाणकावळे हे खाडीच्या कडेला असलेल्या तिवरांच्या झाडांवर दिसतात. मधेच एखाद्या पाण्याच्या पट्ट्याच्या आत आपल्याला वेगवेगळी बदके मोठ्या थव्याने एकत्र पाण्यात खाणे शोधताना दिसतात. सगळीकडे तिवरांचे जंगल असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकार अगदी सहज दिसतात. या तिवरांची एखाद्या भाल्याच्या फाळासारखी दिसणारी चिखलातून वर आलेली मुळे खरोखरच मजेशीर दिसतात. आपला नशिब जर का जोरावर असेल तर खाऱ्या पाण्यातली अजस्त्र सुसर आपल्याला काठावर विसावलेली आढळू शकते.
 
इथल्या आदिवासींचे जिवन अतिशय खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना बोटीवर अवलंबून रहावे लागते. माणसांची आणी सामानाची ने-आण करण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नसतो. त्यांना उपजिवीकेसाठी मासेमारी, जंगलातून मध गोळा करणे, लाकूडफाटा जमवणे हीच काही मोजकी साधने आहेत. त्यातून त्यांना वाघापासून अतिशय सावध रहावे लागते. वन खात्याचे अधिकारीसुद्धा त्यांना अभयारण्य़ात चोरून मासेमारी केल्याबद्द्ल पकडतात. जंगलातले आणि नैसर्गिक धोके टळावे म्हणून सर्व गावकरी / आदिवासी “वन देवीची” पुजा करतात. नवलाची गोष्ट म्हणजे अगदी हिंदू आणि मुसलमान सुद्धा भिन्न धर्मिय असले तरी दर वेळेस बाहेर जातान या वन देवीची पुजा करतात. जंगलामधे, गावांमधे, प्रत्येक बेटावर या देवीचे देऊळ बांधलेले आहे.

आतापर्यंत अनेक जंगलांमधे पायी फिरलो आहे. मोठ्या मोठ्या राष्ट्रीय उद्यानांमधे जिप अथवा उघड्या वाहनाने फिरलो आहे. त्याठिकाणचे वन वैभव बघणे आणि छायाचित्रण करणे हे वेगळे कसब असते. पण सुंदरबन मधे कायम तुम्हाला बोटीने फिरावे लागते. इथे तसे वन्य प्राणी अगदी कमी दिसतात. वेगवेगळे पक्षी दिसले तरी त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे नाही कारण एखाद्या जीपसारखी बोट पटकन बंद करता येत नाही. बोट चालता चालता छायाचित्रण करायचे म्हटले तर बोटीची थरथर छायाचित्रणात जाणवते त्याची खास काळजी घ्यावी लागते. असे असले तरी त्या बोटीतून नुसते फिरणे, त्या अनोख्या तिवरांच्या जंगलाचा निरिक्षण करणे आणि मग जमलेच तर छायाचित्रण करणे ही काही वेगळीच मजा आहे.

मी सुंदरबनच्या जंगलात खरतर तिकडच्या खाडीमधे दिवस दिवस प्राण्यांच्या मागावर फिरलो पण म्हणावे तसे काही त्यांचे दर्शन झाले नाही. पक्षी खुप दिसले पण त्यांचे छायाचित्रण काही होऊ शकले नाही. ३/४ दिवस सतत फिरून जेंव्हा परत निघणार त्या दिवशी आम्हाला वनखात्याची बोट दिसली. त्या बोटी मधे एक बोकड बांधला होता. आमच्या नावाड्याने सांगीतले की जवळपास कुठच्या तरी गावाच्या जवळ वाघ आला असणार म्हणून त्याला पकडण्यासाठी वनखात्याचे लोक आमिष म्हणून तो बोकड घेऊन चालले आहेत. त्या गावाच्या जवळ ते वन अधिकारी पिंजऱ्यामधे त्या बोकडाला पिंजऱ्यात बांधणार, त्याला खायला वाघ आला की त्याला पकडून लांब दूरवर सोडून देणार. हे आम्ही ऐकून आमच्या हॉटेल ला सामान न्यायला परत आलो तर बातमी कळली की आमच्या हॉटेलच्या बेटावरच, अगदी आमच्या दरवाज्यासमोरच एक भलामोठा नर वाघ अर्धा तास काठावर बसला होता आणि त्याला पकडण्यासाठीच ते वन अधिकारी आले होते. अर्थातच आम्हाला काही तो वाघ बघता आला नाही पण त्याच्या बद्दलच चर्चा करत करत आम्ही परतेच्या प्रवासाला लागलो.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

वेळासचा कासव महोत्सव.....   

गेली ६/७ वर्षे मी कोकणातल्या वेळास गावी फेब्रुवारी / मार्च महिन्यात खास कासवांकरता सातत्याने जात आहे. पुर्वी या गावाचे नावही बहुतेक नकाशावर नव्हते आणि रस्त्यावर या गावाच्या नावाची पाटीही नव्हती. पण आता मात्र चित्र अगदी बदलले आहे, आज इंटरनेटवरही वेळासचे Maps, माहिती, ब्लॉग्ज वाचायला सहज मिळतील. २००६ मधे मी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांच्या श्री. भाउ काटदरेबरोबर पहिल्यांदा वेळासला गेलो. त्यांच्या कडून ही कासवे वेळासच्या किनाऱ्यावर कशी अंडी घालायला येतात, त्यांच्या अंड्यांना कोणाचा धोका असतो, मग अंड्यातून पिल्ले कशी बाहेर येतात आणि समुद्रात जातात याची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष बघितले.

यानंतरच्या वर्षी कासव संवर्धनात गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा आणि त्यांनासुद्धा काहीतरी आर्थिक मदत मिळावी म्हणून वेळास कासव महोत्सवाचे आयोजन सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटकांनी वेळास गावाला भेट द्यावी, गावातील लोकांबरोबर त्यांच्या घरी रहावे, जेवावे आणि कासव संवर्धनाचे काम प्रत्यक्ष बघावे असा उद्देश होता. पर्यटक रहायला आल्यामुळे गावातल्या लोकांना थोडेफार उत्पन्न मिळणार होते तर पर्यटकांना गावतल्या घरात रहायचे वेगळेपण. त्याचबरोबर कासवाची लहान लहान पिल्ले कशी सागरात तुरूतुरू पळत जातात त्याची मजा काही औरच असते, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होते.

ऑलिव्ह रिडले ही सागरी कासवांची जात मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी एका जागी येउन अंडी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज जगात मेक्सीको, कोस्टा रिका आणि भारतातील ओरीसा हे जगातील सर्वात मोठ्या घरट्यांच्या जागा असलेले समुद्रकिनारे आहेत. या किनाऱ्यांवत अक्षरश: लाखो कासवे एकाच वेळेस येउन अंडी घालतात. यामुळे ही ठिकाणे कायम शास्त्रज्ञ आणि पर्यटकांनी गजबजलेली असतात. आपल्या महाराष्ट्राला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्याचा प्रमुख भाग कोकणात येतो. मात्र या कुठल्याच भागात सागरी कासवांच्या बाबतीत माहिती उपलब्ध नाही. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांनी २००० साली या किनारपट्टीचे सर्वेक्षण केले आणि त्यांना या संपुर्ण किनाऱ्यावर सागरी कासवे तुरळक प्रमाणात विणीसाठी येत असल्याची नोंद केली. सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात दररोज किनाऱ्यावर गस्त घालून कासवांच्या घरट्यांचा शोध घेण्यात येतो व त्या घरट्यातील अंडी त्याच किनाऱ्यावर उभारलेल्या कुंपणात संरक्षित करण्यात येतात आणि योग्य वेळी घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले समुद्रात सुरक्षीतपणे सोडण्यात येतात. आजपर्यंत या उपक्रमामुळे जवळपास ३०,००० हून अधिक पिल्ले समुद्रात सोडली गेली. असे समजले जाते की कासवाची मादी प्रौढ झाल्यावर ती ज्या किनाऱ्यावर जन्मली त्याच किनाऱ्यावर अंडी घालायला कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येते. त्यामुळे अजून काही वर्षांनंतर या वेळासच्या किंवा आजूबाजूच्या किनाऱ्यांवर या कासवांचे प्रमाण निश्चीतच वाढलेले दिसेल.

वेळासला जाताना मात्र मनाची पुर्ण तयारी करून जावी लागते कारण कासवाची पिल्ले बाहेर येणे हे पुर्णत: नैसर्गिक आहे आणि ती आपण जाउ त्याच दिवशी बाहेर येतील याची काही खात्री नसते. सकाळी साधारणत: ८ / ८.३० च्या सुमारास आणि संध्याकाळी ५.३० नंतर ही पिल्ले सोडण्यात येतात. या दोनही वेळी प्रकाश तसा कमी असल्यामुळे छायाचित्रण तसे कठिण असते. परत पिल्लांना कॅमेराच्या फ्लॅशचा त्रास होत असल्यामुळे, फ्लॅश वापरणे शक्य नसते त्यामुळे कॅमेरावरच नियंत्रण ठेवून छायाचित्रण शक्य होते. मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला वेळासला गेल्यामुळे मला छायाचित्रणाच्या अनेक संधी मिळाल्या. एकदा संस्थेच्या कार्यकर्त्याने कासवाच्या घरट्यावरची उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घातलेली टोपली उचलली आणि खाली बघतो तर ३ पिल्लांची फक्त डोकी वर आली होती आणि त्यांची पुर्ण बाहेर यायची धडपड सुरू होती. काही सेकंदातच ती वाळूच्या पुर्ण बाहेर आली पण तोपर्यंत मात्र मला त्यांची बाहेर येतानाची आणि त्यांच्या धडपडीची अनेक छायाचित्रे मिळाली होती. 


या नंतरच्या वर्षी संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस जी काही पिल्ले बाहेर आली त्यांचे सुर्यास्ताबरोबर छायाचित्रण करता आले. यावेळेस "वाईड" ऍंगल लेन्स वापरल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पाण्याच्या लाटेजवळ जाणारी इवलीशी कासवे आणि मागे समुद्रात मावळणारा सुर्य असे छायाचित्र घेता आले. पुढच्याच वर्षी मी पोहोचलो त्याच्या आदल्या रात्री एक कासवाची मादी घरटे करून अंडी घालून गेली होती आणि तीच्या पायांचे ठसे समुद्राच्या मऊ वाळूत उमटले होते त्याचे छायाचित्रण करता आले. गेल्या वर्षी ३ पिल्ले तुरूतुरू समुद्राकडे पळत होती आणि समुद्रकाठच्या मऊशार वाळूत त्यांची ईवलीशी पावले उमटत होती त्याचे छायाचित्र मिळाले. याच वेळेस अगदी त्या ओल्या कंच वाळून ओणवून एका कासवाच्या पिल्लाच्या छायाचित्रणात दंग असलेल्या छायाचित्रकारांचेच छायाचित्र मला घेता आले. हे असे काही वेगळे छायाचित्रण किंवा घरट्यातून पिल्ले बाहेर नक्की त्याच दिवशी बाहेर येणार की नाही ही उत्कंठा खरोखरच मजेशीर असते. या वेळासच्या कासवांच्या पिल्लांच्या छायाचित्रणाबरोबरच वेळासला जातानाचा बाणकोटचा किल्ला, वेळासचा स्वच्छ समुद्रकिनारा, त्यावर आलेले स्थलांतरित पक्षी, निळ्याशार सागरावर होणारा सुर्यास्त असे बरेच काही छायाचित्रण करता येते. गावातल्या प्रत्येक घराच्या मागे नारळा, सुपारीच्या बागा आहेत. याच बागांमधे अधेमधे जायफळ, कोकमासारखी सहसा न दिसणारी झाडे बघायला मिळतात. ह्या वाडी मधे मऊशार ओल्या मातीत अनवाणी चालताना आणि तिथेच उघड्यावर विहीरीतून / हौदातून थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचा अनुभव खरोखरच शब्दात न व्यक्त करण्यासारखा आणि स्वत: प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

पावसाळ्यातील हिरवाई....  

एप्रिल / मे च्या उन्हाळी तडाख्यात जंगलाची पुर्ण रया जाते. सगळीकडे जाउ तिथे रखरखाट, सुकलेली झाडे, पान नसलेली खराट्यासारखी झुडपे अगदी जमिनीवरसुद्धा सुके पिवळे गवत. पण जून महिन्याच्या सुरवातीसच आकाश झाकोळायला लागते, प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागतो, काळे ढग जमायला लागतात, गडगडायला लागते आणि पावसाळा येऊ लागल्याची खात्री पटायला लागते. अचानक टपोरे थेंब कोसळायला सुरूवात होते. तापलेली, कोरडी जमीन पहिला पाऊस आणि त्याचा ओलेपणा शोषायला लागते. मातीचा छानसा वास हवेत दरवळायला लागतो. डोंगरावर सुर्यकिरणांना हे काळे ढग झाकोळून टाकतात. त्यांचा क्षणाक्षणाला बदलणारा आकार आणि गुलाबी, लाल, पिवळा, भगवा आणि एवढेच काय पण सोनेरी रंगसुद्धा मनाला एकदम प्रसन्न करतो.

अगदि एप्रिल, मे महिन्यापर्यंत आपल्याकडचे जंगल हे पानगळी असल्यामुळे तिथे फक्त निष्पर्ण झाडे आणि त्यांचा कोरडा तपकिरी रंग एवढेच दिसत असते. मधूनच एखादा कुठे हिरवा भाग असला तर असतो. पण हे चित्र जून  महिन्याच्या सुरवातीलाच बदलून जाते. धूळ भरलेली झाडे पुसल्यासारखी चकचकीत होतात तर सुकलेली वाळकी, तपकिरी झाडे एकदम हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छ्टांमधे बदलून जातात. आता संपुर्ण वातावरण, हवामान आणि एकंदर सगळे दृष्यच जादूगाराची छडी फिरवावी तसे पालटून जाते. सगळीकडे चकचकीत, झळाळणारा हिरवा रंग एखाद्या कात टाकलेल्या सापाप्रमाणे दिसू लागतो. रस्त्याच्या आजूबाजूनी छोटे छोटे नाले सगळा पालापाचोळा, काटक्या घेउन वाहायला लागतात. नंतर धबधब्यांमधे पांढरेशुभ्र पाणी खळखळायला लागते.

या मोसमात आपल्याला किटकांच्या आणि झाडाझूडपांच्या बऱ्याच नवनवीन जाती बघायला मिळतात. अगदी रस्त्यावरच आपण शेकडोंनी लाल, भगव्या रंगाचे "सिल्क कॉटन बग्ज", जायंट वूड स्पायडरची भलीमोठी जाळी चमकताना दिसतात. पहाटे पहाटे पावशा (ब्रेन फिव्हर बर्ड) ओरडताना ऐकू येतो. नशीब अगदीच जोरावर असेल तर एखादा मोरसुद्धा नाचताना आढळू शकतो. पार्श्वभुमीवर बेडकांचे "डराव डराव" सुरू असते. खेकड्यांच्या माद्या नाल्याच्या आजूबाजूला त्यांची पिल्ले टाकायला पळताना दिसतात.

अगदी पावसाची एखाद दुसरी सर पडून गेली की काही जंगली लिली, काळी मुसळी ही फुलायला लागते. मजेची बाब अशी की ह्या वनस्पती जेमतेम ७ / ८ दिवसच दिसतात. त्यामुळे त्यांना बघायला तुम्ही चुकलात तर थेट पुढच्या वर्षीपर्य़ंत वाट बघायची. थोडा जास्त पाउस झाला की त्यावेळेला दिसणाऱ्या दुसऱ्या छोट्या वनस्पती आहेत. जंगली हळद किंवा कुरकूमा चे लाल, गुलाबी, जांभळे फुलांचे तुरे अगदी जमिनीतूनच बाहेर आलेले असतात. बचनाग किंवा ग्लोरी लीली चा वेल याच वेळेस बहरतो. ह्याच्या फुलांचा रंग आणि आकारसुद्धा अतिशय आकर्षक असतो. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबी / जांभळ्या रंगाच्या तेरड्याचे रान फुललेले असते. सात वर्षांनी फुलणारी जांभळी कारवीसुद्धा तुम्ही याचे वेळेस दिसू शकते. याच काळात सोनकी, पेव, लिया ह्यांचीसुद्धा फुले फुलतात ज्यावर खुप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे आणि इतर किटक आकर्षित होतात.

बऱ्याचश्या पक्ष्यांचा पण हा विणीचा हंगाम असतो कारण ह्यावेळी त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी खुपसारे खाणे उपलब्ध असते. ताडाच्या उंच झाडावर बया सुगरण पक्षी आपापली सुंदर घरटी बांधत असतात. बया पक्षी त्यांच्या उत्तम घरटे बनवण्याच्या कलाकुसरीकरता जगप्रसिद्ध आहेत. नर पक्षी अर्धे घरटे बांधून मादीची वाट बघतो, घरटे जर मादीच्या पसंतीस उतरले तर जोडी जमते. नंतर मादी घरट्यात अंडी उबवत बसते आणि नर नविन घरटे बांधून नविन मादीला आकर्षीत करतो. ह्याच वेळेस खंड्या पक्षी नदी नाल्याच्या बाजूला मातीमधे बीळ खोदून आपले घरटे त्यात बनवत असतो. यामुळे त्याच्या पिल्लांना बारीक मासे, बेडूक लगेचच बाजूला उपलब्ध होतात. याच काळात बुलबुल, साळुंक्या, मॅग पाय रॉबिन, शिंपी, वेगवेगळ्या जातीचे मक्षीमार असे अनेक पक्षी आपापली घरटी बनवण्यात, पिल्लांचे जोपासना करण्यात गर्क असतात.

किटक बघण्याकरता तर हा काळ सर्वोत्तम असतो. नविन पाने, नविन फुले ह्यांची लयलूट असते त्यामुळे ह्या किटकांना प्रचंड खाणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी मिळू शकते. ह्यावेळी आपण रंगीबेरंगी नाकतोडे, ढालकिडे, मुंग्या, चतूर बघू शकतो. फुलपाखरे आणि पतंगांकरता तर ह्यासारखा मोसम नाही. अतिशय रंगीत यामफ्लाय, सिल्व्हरलाईन, ग्रास डेमन, बॅरोनेट सारखी छोटी तर ब्लू मॉरमॉन सारखी मोठी फुलपाखरे दिसतात. ऍटलास मॉथ सारखा जगातला सर्वात मोठा पतंगपण याच वेळेला फक्त दिसतो. हा पतंग मोठा म्हणजे अगदी एक फुटाएवढापण मोठा असू शकतो. मून मॉथ सारखा अतिशय आकर्षक आणि मोठा पतंगसुद्धा फक्त याच वेळी दिसू शकतो. या काळात दिवसा झळाळणारे ज्युवेल बीटल्स दिसतात तर रात्री काजवे मंदपणे चमकताना दिसतात. 


तर असा नितांतसुंदर निसर्ग बघायला, त्यातले वेगवेगळे आकर्षक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती बघायला आपण आसपासच्या कुठल्याही जंगालात आपण जाउ शकतो. बरीचशी मोठी जंगले प्राण्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे साधारत: जुनच्या शेवटी प्रवाशांकरता बंद होतात ती थेट सप्टेंबर महिन्यापर्यंत. त्यामुळे अशा वेळेस लहान जंगलांना, जिथे आपल्याला चालत फिरायची परवानगी असते तिथे भेट देणे उत्तम. पण याच वेळेस डोंगरावरती मोठे ओढे किंवा धबधबे असतात तिथे पर्य़टकांचे लोंढेच्या लोंढे येतात. त्यातल्या बऱ्याच जणांना निसर्गाचा आस्वाद घेण्यापेक्षा दारू पिउन धिंगाणा घालण्यात जास्त रस असतो. सोबत नेलेल्या दारूच्या कोल्ड्रींकच्या बाटल्या तिथेच टाकणे, फोडणे, इतर कचरा करणे यामुळे त्या निसर्गरम्य ठिकाणाची वाट लागते. इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो तो वेगळाच. वन खाते, पोलीस खात त्यांचा नेहेमीप्रमाणे सरकारी खाक्या दाखवतात आणि त्या स्थळावरच बंदी आणतात. त्यांना निसर्गप्रेमी अभ्यासू पर्यटक आणि दारू पिउन धिंगाणा घालणारे पर्यट्क यात फरकच कळत नाही. अर्थात आपणच कुठलीही घाण तिथे करणार नाही, प्लॅस्टीक, थर्माकोलच्या पिशव्या, ग्लास टाकणार नाही ह्याची काळजी घेतली, स्वत:च्या वागण्यावर जर नियंत्रण ठेवले तर आपोआपच अनेक प्रश्न सुटतील.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com