Sunday, February 17, 2013


लुकलुकणारे काजवे...  

सध्या शहरांच्या आसपास हे काजवे दिसत नसले तरी अजुनही गावांमधे, घनदाट जंगलांत किंवा गड किल्ल्यांवर पावसाळ्यातील संध्याकाळे हे लुकलुकणारे काजवे मधेच उडताना दिसतात. कधीतरी आपण जर का एखाद्या किल्ल्यावर रात्री मुक्काम केला असेल किंवा एखाद्या जंगलात रात्री मचाणावर रात्र काढली असेल तर कधीतरी मधेच एखादे झाड या काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते आणि मंद वाऱ्याबरोबर डोलूसुद्धा लागते आणि क्षणार्धात तो प्रकाश परत मावळून जातो.

इंग्रजी मधे या किटकांना “ग्लो वर्म” किंवा “फायर फ्लाय” असे म्हणतात. पण खरेतर हे वर्म सुद्धा नाहित आणि फ्लाय किंवा माश्या सुद्धा नाहित. कोलिऑप्टेरा गणाच्या बिटल्स किंवा ढालकिड्यांच्या (लॅपिरिडी) कुळात यांचा समावेश होतो. हे किटक अर्थातच निशाचर आहेत आणि आणि त्यांच्या सुमारे २००० जाती असून त्यात सतत नविन उपजातींची भर पडत असते. जगभरात सगळ्या देशांमधे काजवे लुकलुकताना दिसतात याला फक्त अंटार्क्टिका खंडाचा अपवाद आहे. बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. मात्र त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या खालील बाजूस सहाव्या व सातव्या खंडांत तर, मादीत त्यामागील खंडांत असतात.

काजव्यांचा प्रकाश सहसा पांढरा, पिवळा, हिरवा किंवा तांबडा असतो. पोटामधल्या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने प्रकाशतात. काही जातीच्या माद्या मात्र सतत काही सेकंद प्रकाशतात. प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते. मात्र याचाच फायदा काही इतर जातीच्या काजव्याच्या माद्या घेतात. त्या प्रकाशून नराला प्रतिसाद देतात पण तो नर मादीच्या जवळ आल्यावर चक्क त्याला खाउन टाकतात. मिलनाचा हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते.


अंड्यातून बाहेर पडलेली काजव्याची अळी आणि पंख फुटलेला प्रौढ काजवा यांची जीवनशैली परस्परविरूद्ध पण परस्परपुरक असते. प्रौढ काजव्याला सगळे लक्ष पुनरूत्पादनावर केंद्रित यावे, अन्न शोधण्यात त्याचा वेळ आणि शक्ती वाया जाऊ नये म्हणून अळीरूपातला काजवा खा खा खाऊन शरीरात चरबीचा साठा करून ठेवतो. या अळीचा आहार मात्र स्पेशल असतो. गोगलगाय व तत्सम प्राण्यांखेरीज इतर कशालाही ही अळी तोंड लावत नाही.

गोगलगायींची हालचाल वाढते ती रात्रीच्या अंधारात त्यामुळे दिवसभर झाडाझुडपांच्या, पालापाचोळ्याच्या आसऱ्याने पडून असणारी काजव्याची अळी रात्रीच गोगालगायीच्या मागावर निघते. या अळीच्या शेपटीमध्ये ल्युसीफेरीन या द्रव्यामुळे प्रकाश उजळतो. पण या दिव्याचा भक्ष्य शोधण्यासाठी तीला काहीच उपयोग नसतो कारण आपल्या काळ्या, गुळगुळीत डोळ्यांनी तिला काहीच दिसत नाही. फक्त समोरच्या उजेडातील कमीजास्तपणा आणि अंधूक हालचाल जाणवते. दृष्टीतील ही जाणीव भरून काढण्यासाठीच निसर्गाने काजव्याच्या अळीला जाडसर चाचपण्या (ऍटेना) दिल्या आहेत. शिवाय या अळीच्या तोंडाभोवती अतीसंवेदनाशील अश्या सहा स्पर्शीकाही असतात. त्यांच्या मदतीने अळी आपले सावज - गोगलगाय शोधते.

सावज सापडल्यावर अळी आपल्या विळ्यासारख्या धारदार जबड्याने गोगलगायीला दंश करते. हा दंश करायला तिला एक सेकंदाहूनही कमी वेळ लागतो. पण या अल्प वेळात ती गोगलगायीच्या शरीरात विषारी द्राव सोडते. विषाचा असर होईपर्यंत अळी अनेकदा गोगलगायीच्या शंखावर घट्ट बसून रहाते. गोगलगायीची हालचाल मंदावली की अर्धमेल्या गोगलगायीवर ताव मारते. काजव्याच्या अळीला आपल्या शरीरातील दिव्याचा काही उपयोग नसला तरी प्रौढ काजव्यांना मादीला आकर्षीत करून घेण्यासाठी हाच दिवा उपयोगी पडतो. या प्रकाशनिर्मितीत कोणतीही उर्जा उत्सर्जीत होत नसल्याने यात उष्णता वा ऊब ही नसते. त्यामुळे याचे वर्णन थंड उजेडाचा दिवा असेही करता येईल.

लुकलुकणारे हे काजवे जरी दिसायला छान दिसत असले तरी त्यांचे छायाचित्रण तेवढेच कठिण असते. जवळपास सर्वच काजवे निशाचर असल्यामुळे त्यांचा वावर रात्रीच्या काळोखातच असतो. यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी फ्लॅशसुद्धा वापरता येत नाही. नर काजवे सतत उडत असल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ जरी पळत सुटलो तरी ते त्या वेळी प्रकाशमान होतीलच असे नाही. ज्यावेळी ते प्रकाशमान असतात त्यावेळी छायाचित्रण केले तर ते त्यावेळी हालचाल करून पुढे पळतात. त्यामुळे प्रकाशमान असलेल्या काजव्याचे छायाचित्र मिळवणे मोठे दिव्याचे काम असते.  नुकताच मी ठाणे जिल्यातील जव्हारच्या आसपासच्या जंगलात फिरत असताना मला बरेच नर काजवे झाडावर चमचमताना दिसले पण ते एवढे वेगाने उडत होते की त्यांच्यामागे पळूनसुद्धा मला त्यांची छायाचित्रे काही मिळाली नाहित. मात्र जंगलामधे मला एका ठिकाणी मला एक काजव्याची मादी सापडली. दिसायला ती अगदी एखाद्या पतंगाच्या अळीसारखी दिसत होती. मात्र माझ्यासाठी महत्वाचे होते की तिचे पोट हिरव्या रंगाच्या मंद प्रकाशाने चमकत होते आणि तो प्रकाशसुद्धा लुकलुकणारा नव्हता आणि सतत तेवत होता. आता दुसरे महत्वाचे काम म्हणजे तो मंद प्रकाश छायाचित्रात पकडणे, याकरता कॅमेरा ट्रायपॉड्वर ठेवून चक्क ३० सेकंदाचे लांबलचक एक्स्पोजर दिल्यानंतर तो हिरवा प्रकाश मला छायाचित्रात पकडता आला.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

बेडकांचे डरॉव डरॉव...  

कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते. काही वर्षांपुर्वि भारतातून पुर्वेकडील देशांमधे बेडकांची निर्यात होत असे. त्यांचे पाय हे मांसल असल्यामुळे खाण्यासाठी त्यांना मोठी मागणी होती. अर्थातच आपल्याकडे शिकारीवर धरबंध नसल्यामुळे त्या बेडकांची बेसुमार कत्तल झाली आणि त्याचा परिणाम भात आणि इतर शेतीवर झाला. यानंतर बेडकांच्या शिकारीवर आणि निर्यातीवर बंदी आली तरीसुद्धा या बेडकांबाबत आपल्याला इतर माहिती काहीच नाही आणि त्यांच्यावर अभ्याससुद्धा झाला नाही.

पण निसर्गचकात बेडकासारख्या उभयचर प्राण्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. कारण पाण्यात निर्माण झालेल्या जिवसृषटीने काठावर उडी मारायचे धाडस पहिल्यांदा केले ते बेडकासारख्या उभयचर प्राण्यांच्या रूपाने. थंड रक्ताचे हे कणावान प्राणी जमिनीवर आले खरे, पण मुलभूत मर्यादांमुळे जमिनीवर स्थिरावू शकले नाहित. उभयचर वर्गात बेडकांखेरीज सिसिलीयन, सॅलॅमेंडर असे प्राणी आढळत असले तरी दादागिरी चालते ती बेडकांचीच. उभयचरांच्या एकूण प्रजातींपैकी नव्वद टक्के प्रजाती या बेडकांच्याच आहेत. भारतात जे २३५ प्रजातींचे उभयचर नोंदविण्यात आले आहेत, त्यापैकी सुमारे २०० प्रजाती या बेडकांच्या आहेत. जमिनीत आणि पाण्यात दोन्हीकडे वावरणारे उभयचर प्राणी कल्ले, फुफ्फुस आणि त्वचा या सगळ्यांच्याद्वारे गरजेनुसार श्वसन करतात. बेडकांच्या त्वचेची जडणघडणच अशी असते की, त्यांच्या त्वचेमधून शरीरातील पाण्याचे बाष्पिभवन झपाटयाने होते म्हणून बेडूक नेहेमीच भरपूर आर्द्र हवामानाच्या ओलसर वातावरणात वावरतात. बेडकांना सभोवतालच्या परिसराप्रमाणे शरीराचा रंग बदलण्याची कला अवगत असते. मात्र बेडकांनी जमिनीवर कितीही उडया मारल्या तरी त्यांना प्रजननासाठी पाण्यातच जावे लागते. 

झाडाझुडुपांवर राहण्याऱ्या वृक्षवासी बेडकांचा एक खास वर्गच आहे. या वृक्षवासी बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो. त्यामुळे त्यांना झाडावर चढणे सोपे जाते. या बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकारने आडव्या असतात. तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पटटे असतात जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रुला चकवतात. आणि स्वत:चा बचाव करतात. झाडावरच्या बेडकांमध्ये रहाकोफोरस या कुळातील बेडकांच्या पायाचे पडदे थोडे मोठे असतात, ज्यांच्या मदतीने ते हवेत तरंगू शकतात. त्यामुळे त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी जमिनीवर उतरावे लागत नाही. एकुणच झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उडया मारण्यातच सामावलेली असते. पश्चिमघाटातील जैवविवीधता संपन्न करण्यात उभयचरांना विशेषत: बेडकांचा सहभाग फार मोठा आहे. झाडावरचे हे बेडूक इतर बेडकांप्रमाणेच पाण्यात अंडी घालत नाहीत तर पाण्यालगतच्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालतात. या अंडयांचा ओलसरपणा टिकावा म्हणून मादी त्यावर वारंवार मुत्रविसर्जन करते. अंडी पक्व झाल्यावर, त्यातून बेडकाची पिल्ले पडतात ती सरळ खालच्या पाण्यामध्ये. प्रौढ झाल्यावर मात्र हे बेडूकराव झाडावरच बस्तान बसवतात. सह्याद्रीतील किंवा एकंदरच पश्चिमघाटातील जंगलांचा नाश यामुळे या बेडकांच्या अनेक जाती अस्तंगत झाल्या आहेत किंवा त्यांची सापडण्याची ठिकाणे अतिशय मर्यादित झाली आहेत. यामुळेच या बेडकांच्या कित्येक जाती गेल्या अनेक वर्षात किंवा शतकातसुद्धा कोणाला दिसलेल्या नाहित. याच कारणामुळे डॉ. एस. डी. बिजू यांनी “Lost Amphibians of India” ही मोहिम काढली आणि भारतातील अनेक जंगलांचे कानाकोपरे शोधून ज्या जाती अनेक वर्षात दिसल्या नव्हत्या त्या परत शोधून काढल्या.

याच मोहिमेच्या अंतर्गत मी गेल्या वर्षी महाराष्ट्रातील भिमाशंकर अभयारण्य आणि फणसाडच्या अभयारण्याला डॉ. एस. डी. बिजू आणि त्याच्या इतर सभासदांसोबत भेट दिली. पावसाळा संपला असला तरी आम्हाला त्यावेळी बेडकांच्या अनेक जाती दिसल्या आणि त्यांचे छायाचित्रण करता आले. पण एरवी पावसाळ्यात संध्याकाळी जंगलात फेरफटका मारला तर आपल्याला बेडकांचे ओरडणे ऐकू येते पण सहसा ते आपल्याला दिसत मात्र नाहित. दिवसा जे बेडूक दिसतात ते त्यावेळे बिलकूल आवाज करत नाहित. याच कारणाकरता मी कित्येक दिवस आवाज काढणाऱ्या बेडकाचे छायाचित्र मिळायची वाट बघत होतो. भिमाशंकर आणि फणसाडच्या अभयारण्यात प्रजननाचा काळ उलटला असल्यामुळे “ओरडणारे” बेडूक काही सापडले नाहित. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर माथेरानच्या जंगलांमधे त्यांना शोधण्यासाठी खास रात्री तिथे जंगलामधे फेरफटका मारला पण याही वेळेस काही मला ओरडणाऱ्या बेडकांची छायाचित्रे मिळाली नाहित.

नुकताच ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा गावात तिथल्या धबधब्याला भेट दिली होती. संध्याकाळपर्यंत आम्ही दाभोसा धबधब्याची छायाचित्रे काढली आणि रात्री जेवून परत येताना आमच्या “नेचर ट्रेल्स” रिसॉर्ट्च्या स्विमिंग पुलच्या मागच्या जंगलात अनेक बेडकांचा आवाज ऐकला. मी त्वरीत जाउन टॉर्चच्या प्रकाशात आवाजाच्या दिशेने त्या बेडकाला शोधायला लागलो. आवाज भलताच मोठा असल्यामुळे मी मोठा बेडूक असेल असे समजत होतो पण तो आवाज करणारा बेडूक काही दिसत नव्हता. आवाज तर येत होता पण तो मोठा बेडूक काही जाम दिसत नव्हता. मी परत अगदी जमिनीवर खालच्या भागात शोधायला लागलो तर मला जेमतेम एका इंचापेक्षा लहान असलेला पिवळसर तपकिरी बेडूक दिसला. आख्या शरीराला फुगवून, त्यात हवा जमवून तो ती गळ्याखालच्या फुग्यातून बाहेर टाकत होता आणो ओरडत होता. इतका चिमुकला जीव एवढा मोठठा आवाज काढत असेल हेच पटत नव्हते पण त्याच बेडकाच्या मागे दुसरा नर त्याला आवाज देउन, दोघांची जुगलबंदी सुरू होती. Ornate Narrow mouthed Frog असे या बारक्याशा बेडकाचे नाव आहे आणि ज्या छायाचित्राची मी गेले कित्येक दिवस वाट बघत होतो ते मला अगदी अचानकच आणि सहज घेता आले.युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

फणसाडचे अभयारण्य....  

आज मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या जवळसुद्धा कर्नाळा, तुंगारेश्वर अशी सुंदर अभयारण्य आहेत. याठिकाणी अगदी एका दिवसात जाता येते. मुंबईपासून अजुन थोड्या लांब अंतरावरचे अभयारण्य आहे फणसाडचे. फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्‍यात आहे. अनेक पर्यटक काशीद, रेवदंडा किनाऱ्यापर्यंत येतात; किंवा पुढे मुरूड जंजीऱ्याला जातात, पण त्यांना फणसाडचे जंगल मात्र माहित नसते. पर्यटकांपासून दूर असल्यानेच ते अद्याप सुरक्षित आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. फणसाड हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते, त्यावेळेस या जंगलाला केसोलीचे जंगल म्हणून ओळखायचे. त्या वेळी शिकारीसाठी नबाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांनी "बारी' असे म्हणतात. १९४८ मध्ये संस्थान खालसा झाल्यानंतर जंगलतोड आणि अवैध शिकारींमुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कोळसानिर्मिती आणि बॉक्‍साईट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा र्र्हास होऊ लागला. त्यामुळे वन खात्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले.

फणसाडच्या अभयारण्यात बिबळया, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, ससे, साळींदर आणि महाराष्ट्राची शान व राज्यप्राणी असणारी मोठी खार किंवा शेकरू आढळते. इथे सुमारे २०० हून अधिक जातीचे रंगीबेरंगी पक्षी आढळतात. सध्या तर इथे आख्या जगात आणि भारतात नामशेष होणारी गिधाडेसुद्धा मोठ्या संख्येनी दिसत आहेत. पक्ष्यांबरोबर अनेक आकर्षक रंगाची फुलपाखरे, चतूर, टाचण्या पाण्याजवळ बागडत असतात. अनेक जातीचे विषारी, बिनविषारी साप, सरडे, विंचू, कोळी इथे मुबलक प्रमाणात दिसतात. या जंगलात पानझडी, शुष्क वने आणि निम्नसदाहरित आणि सदाहरित वने आढळून येतात. समुद्राजवळ असूनही दाट झाडीमुळे येथील तापमान दमट नाही. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. पिंपळ, साग, आवळा, सप्तपर्णी, शिसव, कदंब, कळम, अंजनी, सावर, शिवण, करंज, सीता-अशोक, सुरंगी, लोखंडी, खवस असे सुमारे ७००हून अधिक वृक्ष येथे आढळून येतात. काही ठिकाणी एक झाड सदाहरित आणि त्याच्या शेजारी पाणझडीचे झाड दिसले, तर आश्‍चर्य वाटते. गारंबीची महाकाय वेल येथे असून, त्या वेलीला चार फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आढळून येतात. याशिवाय अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीही येथे आढळतात.

येथील जंगलात पाणी मुरण्याचे आणि साठून राहण्याचे प्रमाणही अजून बऱ्यापैकी आहे. इकडे पाणवठय़ांचा गाणअसा उल्लेख केला जातो. फणसाड गाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजुला आपल्याल वन्यजिवन अगदी सहज बघायला आणि छायाचित्रणासाठी मिळू शकते. मात्र इथे फिरायचे असेल तर तो सच्चा निसर्गेप्रेमी असायला हवा, कारण इथे रहायच्या / जेवायच्या अगदी प्राथमीक सोयी आहेत. या इथे वनविभागाने सुपेगाव येथील परिसरात राहाण्यासाठी तंबूंची  व्यवस्था केलेली आहे. ठाणे, अलिबाग आदी ठिकाणच्या वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्याचे आरक्षण होऊ शकते. जेवणाची सोय सुपे गावातील महिलांच्या बचत गटा मार्फत केली जाते. निसर्गप्रेमींसाठी फणसाडचे जंगल हे सगळ्या हंगामात उत्तम ठरते. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नविन काही बघितले नाही असे होतच नाही. अगदी भर उन्हाळ्यात गेलो तरी चिखल गाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे दिसतात तर फणसाडच्या गाणीवर अगदी शेकरू सुद्धा भल्या पहाटे सहज दिसते. पावसाळ्यात जर का आपण फणसाडच्या जंगलात गेलो तर असंख्य प्रकारचे किटक, फुलपाखरे, त्यांच्या अळ्या, मोठे मोठे पतंग, ढालकिडे, कोळी, सापांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला सहज दिसतात. अर्थात यावेळी आपल्याला चिखलात बरीच पायपिट करावी लागते आणि ठिकठिकाणी जळवांचा त्रास होऊ शकतो.

नुकताच मी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला फणसाडच्या जंगालाला भेट दिली. सोबत भारतातले प्रसिद्ध बेडकांचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. बिजू होते. अर्थातच आमचा सगळ्यांचा भर हा वेगगेवळ्या प्रकारचे बेडूक शोधण्यावर होता. डॉ. बिजू, त्यांचे विद्यार्थी आणि आम्ही चिखलगाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या भागात बेडकांची शोधाशोध करत होतो. याच ठिकाणी मी कॉमन मॅप जातीचे फुलपाखरू कित्येक वर्षांपुर्वी बघितले होते, पण त्याचे छायाचित्र माझ्याकडे नव्हते. त्यानंतरच्या फणसाडच्या प्रत्येक खेपेमधे मी त्या फुलपाखराला शोधत होतो पण दरवेळेस त्याने मला हुलकावणी दिली होती. एकावेळी तर ते फुलपाखरू मला दिसले पण ते जमिनीपासून २०/२५ फुटांवर एका फांदीवर पानाखाली बसून राहिले. ते तिथे दिसत असून सुद्धा मला त्याचे छायाचित्र काही मिळू शकले नव्हते. यावेळी मात्र आम्ही तिथे बेडूक शोधत असताना मला याच फुलपाखरांची एक जोडी तिथे अलगद येउन जमिनीवर उतरत असतना दिसली. मी धावपळ करून कॅमेरा आणला आणि त्यांचे छायाचित्रण सुरू केले. ज्या फुलपाखराला मी तिथे अनेक वर्षे शोधत असताना ते मला मिळाले नव्हते पण अचानक ध्यानीमनी नसताना मला ते तिथेच सापडले आणि त्याने मला त्याची छायाचित्रेसुद्धा घेउ दिली.

याच फणसाडच्या जंगलात मला गारंबीचे वेल दिसले की ज्यांच्यावर अगदी ४/५ फुटांच्या लांब हिरव्यागार शेंगा लटकत होत्या. फेब्रुवारी / मार्चच्या सुमारास गेलो तर तिथल्या सगळ्या माळरानांवर अंजन फुललेला असतो आणि त्याच्या सगळ्या फांद्या ह्या कोनफळी, जांभळ्या रंगाच्या नाजुक फुलांनी भरून गेलेल्या असतात. एवढेच नव्हे तर त्या झाडाखाली त्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या पडून तिथली सगळी जमिनच जांभळी झालेली असते. फणसाडच्या जंगलात पक्षिनिरेक्षण सुद्धा उत्तम होते. मागे मला एका रात्री मी रातव्यांच्या (Nightjar) मागावर होतो तेंव्हा मला रातवा तर दिसलाच पण तीच्या पोटाखाली तीची २ अगदी लहान पिल्ले सुद्धा दिसली. सध्या फक्त दक्षिणेत दिसणारे श्रीलंकन फ्रॉगमाउथ तिथे माळावर दिसत असल्याची बातमी आहे. त्यामुळे अर्थीतच पुढ्च्या भेटीमधे या दुर्मिळ पक्ष्यांना शोधण्याचा अजेंडा आहे.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

Saturday, February 16, 2013

अवाढव्य ऍट्लास मॉथ...  

 साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाखरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि  मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून  लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.
त्यानंतर पुढे काही वर्षांनंतर मला माझा स्वत:चा कॅमेरा घेणे शक्य झाले. त्या ऍटलास पतंगाला मी बघितले असले तरी त्याचे छायाचित्र काही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे नंतरच्या प्रत्येक पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मी या पतंगाला शोधायला लागलो. मुंबई आणि मुंबईच्या आसपासची अनेक जंगले पालथी घातली पण परत काही तो पतंग दिसला नाही. त्याच्या अन्नझाडावर त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतल्या वाढणाऱ्या अळ्या दिसल्या पण प्रौढ पतंग काही सापडत नव्हता. अनेक मित्रांना राजमाची आणि इतर किल्ल्यांवर भेटी देतानासुद्धा हा पतंग दिसला पण बहुदा त्याची आणि माझी वेळ काही जुळत नव्हती.
 २००६ मधे अरुणाचल प्रदेशात “बटरफ्लाय मीट” करता गेलो असताना तिथे आम्ही रात्री पांढऱ्या चादरीच्या वर प्रखर दिवा लावायचो आणि त्यावर आकर्षित होणाऱ्या पतंगांचे निरिक्षण, छायाचित्रण करायचो. दुसऱ्याच रात्री त्या पांढऱ्या चादरीवर एक वेगळ्या प्रकारचा ऍटलास पतंग आकर्षित झाला. अगदी समोरच तो बसला असल्यामुळे आम्हाला त्याची भरपूर छायाचित्रे घेता आली. पण खरे तर त्या छायाचित्राला मजा नव्हती कारण एका पांढऱ्या फटफटीत चादरीवर तो पतंग बसला होता. त्यामुळे परत एकदा माझे त्या ऍटलास पतंगाला शोधणे सुरू झाले.
नुकताच कल्याण जवळच्या मुरबाड तालुक्यातील पळू गावात छायाचित्रण कार्यशाळा आयोजित केली होती. त्या ग्रीन व्हॅली रिसॉर्टमधेच एवढी फुलपाखरे आणि किटक दिसले की आम्ही दिवसभर त्यांचे यथेच्छ छायाचित्रण केले. रात्री जेवणानंतर कोणी तरी टूम काढली की आपण “नाईट ट्रेल”ला जाउ या. सगळेच छायाचित्रणात नविन असल्यामुले सगळ्यांनी उत्साहाने कॅमेरे आणि इतर साहित्य बाहेर काढले आणि आम्ही रिसॉर्ट्च्या आवारातच फेरफटका मारायला बाहेर पडलो. मी त्यांना वाटेन दिसणारे कोळी, छोटे पतंग दाखवत होतो आणि त्यांचे छायाचित्रण सुरू होते. एका ठिकाणी मला बांबूच्या फांदीवर कात टाकणारा नाकतोडा दिसला, सगळे त्यांच्या लेन्स वर करून त्याचे छायाचित्रण करायला लागले. एवढ्यात आमचे बाजूला लक्ष गेले तर एका झुडपावर हा भलामोठा, आवढव्य ऍटलास पतंग पंख पसरवून बसला होता. आता अर्थातच सगळ्यांनी त्या नाकतोड्याला सोडून या पतंगाकडे मोर्चा फिरवला. हे पतंग निशाचर असल्यामुळे रात्रीच कार्यरत असतात त्यामुळे मी त्यांना आधी लांबूनच छायाचित्रे घ्यायला सांगीतली आणि मी धावत माझ्या खोलीकडे कॅमेरा घ्यायला पळालो. कॅमेरा घेउन परत पळतच मी त्या ऍटलास पतंगाच्या ठिकाणी धाव घेतली. मी येइपर्यंत जवळपास सर्वांचे छायाचित्रण करून झाले होते. मी आधी सावकाश त्याची लांबूनच छायाचित्रे घेतली आणि मग हळूहळू त्याच्या जवळ सरकलो. तो बहुदा नुकताच कोषातून बाहेर आलेला असावा कारण त्याचे पंख अगदी तजेलदार होते आणि कुठेही त्याला ईजा पोहोचली नव्हती. मी जवळ गेल्यावर मग सगळेच त्याच्या जवळ पोहोचले आणि छायाचित्रण करायला लागले. त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग हा कॅमेरात बंदिस्त झाला. जवळपास दिड तास आम्ही त्याचे छायाचित्रण करत होतो. रात्रीचे बारा वाजले होते आणि आम्ही तृप्त मनस्थीतीत तिथून परतलो.                   
युवराज गुर्जर.
ygurjar@gmail.com
www.yuwarajgurjar.com
याला मधे बिबळ्याच्या मागावर...  

श्रिलंका हा एकदम चिमुकला देश, जेमतेम ६६,००० स्क्वे. कि.मि. पसरलेला. पण इथले विविधता अगदी भारतासारखीच वाखाणण्यासारखी आहे. तसे म्हटले तर हा देश भारतापासून एकदम जवळ आहे. भारतात आणि श्रिलंकेमधे जेमतेम २९ कि.मि चे अंतर आहे आणि मधे फक्त भारतिय महासागर आहे. याचमुळे श्रिलंकेला पर्ल ऑफ इंडियन ओशन असेही म्हणतात. आपल्या दक्षिण भारतासारखीच घनदाट जंगले आणि तसेच हवामान यामुळे इथली जैव विविधता वाखाणण्यासारखी आहे. इथल्या जंगलात आपल्याला ८४ जातींचे वेगवेगळे सस्तन प्राणी बघायला मिळतात. नुसते सस्तन प्राणीच नाही तर इथे वेगवेगळी सागरी कासवे, सुसरी, मगरी, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, फुलपाखरे अगदी सहज वेगवेगळ्या राष्ट्रीय उद्यानात बघायला मिळतात.

जगात बिबळ्यांकरता इथले याला राष्ट्रीय उद्यान अतिशय प्रसिद्ध आहे. १२९७ स्क्वे.कि.मी पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान श्रिलंकेमधील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध आहे. इथले नर बिबळे अतिशय धिट असल्यामुळे भर दिवसासुद्धा ते रस्त्यावर चालताना आढळतात आणि याच कारणामुळे जगातल्या सर्व वन्यछायाचित्रकारांमधे हे जंगल आफ्रिकेच्या नंतर अगदी वरच्या नंबरावर आहे. भारतातील कान्हा / बांधवगढ मधले वाघ जसे जिपमधल्या पर्यट्कांना सरावले आहेत तसेच इथले बिबळ्या वाघ अगदी जवळून पर्यट्कांना / छायाचित्रकारांना चांगल्या पोजेस देतात. अर्थातच बिबळ्यांबरोबर इथे हत्तींचे प्रमाणसुद्धा खुप जास्त आहे. हत्तींचे मोठे मोठे कळप इथला जंगलातील तळ्यांमधे मजेत डुंबताना, खेळताना सहज दिसतात. इथल्या जंगलात या दोन मोठ्या प्राण्यांबरोबरच चितळ, सांबर, रानडूक्कर, जंगली म्हशी, कोल्हे, मुंगूस असे अनेक प्राणी आणि १२०हून अधिक प्रजातीचे पक्षी दिसतात. हे जंगल सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या काळामधे पर्यटकांसाठी बंद असते. नोव्हेंबर ते जुनचा काळापैकी डिसेंबर ते मार्च हे उत्तम महिने समजले जातात.

याला राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच असलेले बुंदाला राष्ट्रीय उद्यान हे पक्षीनिरिक्षकांसाठी नंदनवन समजले जाते. २० कि.मी. च्या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या या उद्यान अनेल विविध जातींचे पक्षी अगदी सहज बघता येतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या राष्ट्रीय उद्याना पक्ष्यांबरोबर मगर आणि सुसर दिसते, त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते जानेवारी या काळामधे चार वेगवेगळ्या जातीची समुद्री कासवे इथल्या किनाऱ्यावर अंडी घालायला येतात. समुद्रकिनाऱ्या जवळच्या जंगलामधे हत्ती, बिबळ्या दिसायची संधी मिळू शकते. इथे दिसणाऱ्या १९७ जातीच्या पक्ष्यांपैकी १३९ जातीचे पक्षी स्थानीक आहेत, तर इतर जातीचे पक्षी दूरवऊन स्थलांतर करून येतात.


या दोन अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यानांबरोबरच इथे वास्गामुवा, मिनेरीया, उदवालावे, विल्पट्टू, कौडूल्ला अशी अनेक राष्ट्रीय उद्याने बघण्यासारखी आहेत. पण भारतातल्या अनेक जंगलांमधे मला बिबळ्याने हुलकावण्या दिल्यामुळे, मी आता श्रिलंकेच्या याला जंगलामधे माझे नशिब खास बिबळ्याच्या छायाचित्रणाकरता आजमावणार होतो. निदान या जंगलात तरी आख्ख्या जगाने वाखाणणेल्या बिबळ्या मला छायाचित्रणासाठी भेटेल अशी आशा. अर्थात सोबत बुंदालाच्या जंगलाला आणि उदवालावाच्या जंगलालासुद्धा तिथल्या हत्तींकरता आणि स्थलांतरीत पक्षी आणि कासवांकरता भेट दिली. सुरवातीला मी उदवालावाच्या जंगलाला भेट दिली. पर्यटकांना पूरक असलेल्या इथल्या नियमांमुळे इथल्या जंगलात तुम्हाला अगदी दिवसभर आणि कुठल्याही भागात फिरता येत्ते. जंगलात आत शिरल्या शिरल्याच मला एका गरूडाने एका सरड्याची शिकार केलेली बघायला मिळाली. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर हत्तींची दोन पिल्ले दिसली. असेच प्राणी, पक्षी बघत बघत आम्ही एका विस्तीर्ण तलावाच्या काठावर आलो. तळ्यामधे रंगीत करकोचे, बदके, बगळे, पेलीकन असे अनेक पक्षी होते. त्यांचे छायाचित्रण करून आम्ही पुढे निघालो. नंतरच्या एका वळणावर रस्त्याच्या कडेलाच एक हत्तींची मोठी फॅमीली होती. त्यातल्या एका आईच्या कडेला अगदी नुकतेच जन्मलेले छोटेसे पिल्लू होते आणि ते कायम आईच्या आडोश्याने चालत होते. त्या पिल्लाचे एकट्याचे छायाचित्र घेण्याकरता आम्ही बराच प्रयत्न केला पण शेवट्पर्यंत ते त्याच्या आईच्या पलिकडे आणि तिच्या चार पायांमधेच घोटाळत फिरत होते. संध्याकाळी जंगलातून परतायच्या वेळी रस्त्याच्या अगदी मधोमध दोन मोर एकमेकांभोवती गिरक्या घेत घेत फिरत होते. आमच्या गाईड्च्या म्हणण्याप्रमाणे ते एकमेकांशी भांडत होते आणि खरोखरच मधेच त्यांनी दोघांनी अगदी हवेत एक छोटी उडी घेउन एकमेकांवर हल्ला केला. यानंतर ते परत एकमेकांभोवती गिरक्या घ्यायला लागले आणि परत त्यांनी हवेतच हल्ला चढवला. जंगलातल्या अश्या अनेक गमतीजमती बघून आम्ही शेवटी बाहेर पडलो.

यानंतर आम्ही जाणार होतो ते याला च्या जंगलात, अर्थात बिबळ्याचे दर्शन घ्यायला. मात्र निरोपाचा काहीतरी गोंधळ झाला आणि आम्ही जंगलात दिड तास उशीरा पोहोचलो. उन्हे हळूहळू उतरायला लागली होती. रस्त्यामधे आम्हाला तलावांमधे मोठ्या सुसरी दिसल्या. काळ्या मानेचे ससे तर अगदी रस्त्याच्या बाजूलाच गवत खाताना दिसत होते. मोठ्या मोठ्या घोरपडी रस्त्याच्या कडेला, झाडांच्या खोडावर अगदी सहज दिसत होत्या. पण ज्याचे दर्शन व्हायला पाहिजे होते तो बिबळ्या काही दिसत नव्हता. संध्याकाळची वेळ संपत आली होती आणि आम्हाला जंगलाच्या बाहेर पडणे जरूरीचे होते. सगळेच अगदी निराश झाले होते पण आनंदाची गोष्ट म्हणजे दुसरे दिवशी आम्ही आख्खा दिवस, अगदी पहाटे ६ ते संध्याकाळी ६ जंगलात फिरणार होतो.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही जंगलात जाण्याकरता निघालो. रस्त्यात दिसणारे पक्षी, प्राणी यांचे निरिक्षण करत, त्यांचे छायाचित्रण करत करत पुढे जात होतो. मधे भेटणाऱ्य़ा प्रत्येक जीपला आम्ही बिबळ्या दिसला का याची विचारणा करत होतो, पण त्या दिवशी सकाळच्या वेळात बहुतेक कोणीच बिबळ्या बघितला नव्हता. अश्याच एका वळणावरून जाताना आमच्या जिपच्या समोरच एक बिबळ्या अगदी रस्त्याच्य मधून पुढे जात होता. अर्थात आमच्या गाडीचा आवाज ऐकून त्याने त्याच्या वेग वाढवला आनि बाजूच्या दाट झाडीत तो गायब झाला. काही क्षणांकरता त्याने आम्हाला पाठमोरे दर्शन दिले होते. आम्ही पुढे गाडी दामटवली आणि अंदाजे तो कुठे बाहेर पडेल त्याठिकाणी त्याची वाट बघत राहिलो. ५/१० मिनिटे झाल्यावर आम्ही आमच्या कॅमेरात त्याची पाठमोरी आलेली छायाचित्र बघण्यात दंग झालो आणि तेवढ्यात.....मागच्या आमच्या दुसऱ्या जिपमधून आवाज आला. तो बिबळ्या परत एकदा त्यांच्या अगदी समोरून रस्ता क्रॉस करूने गेला आणि आमच्या अगदी मागेच होता. आम्ही मात्र आमच्या मुर्खपणामुळे छायाचित्रणाची संधी गमावली होती. भारतात तर कधी बिबळ्या दिसलाच नाही, श्रीलंकेत दिसला तर त्याचे छायाचित्रणच जमले नाही. परत एकदा नशिबाने दगा दिला.....अर्थात याच कारणामुळे परत एकदा जंगालात त्याला शोधायला बाहेर पडायचे हा निश्चयही याचमुळे पक्का झाला.

युवराज गुर्जर.
ygurjar@gmail.com