Tuesday, January 12, 2010

मनमोहक चतुर.
असे सांगीतले जाते की मानवाला निसर्गातला अनेक प्राण्यां / पक्ष्यांकडुन त्याच्या शोधांची प्रेरणा मिळालेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेलीकॉप्टर. या हेलीकॉप्टरचा शोध हा अगदी या चतुराला डोळ्यासमोर ठेवुनच केला आहे. या चतुराची निर्मीती जणू फक्त उडण्यासाठीच झाली असावी. त्यांच्या शरीराच्या वजनापैकी ६३ टक्के भाग हा निव्वळ उडण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्नायुंनी बनलेला असतो. याखेरीज त्यांच्या शरीराचा उडण्यासाठी अगदी सोईस्कर असा आकार आणि शरीराच्या मानाने मोठे असलेले पंख यावरून चतुर आणि टाचणी हे किटकांमधील "फ्लाईंग मशीन" असल्याची खात्री पटते. यांच्या उड्डाण कौशल्याची बरोबरी करणे अन्य किटकांना शक्यच नसते. एकाच जागी तरंगत राहण्याबरोबरच, चतुर मागच्या दिशेने किंवा आडव्या पद्धतीतही उडू शकतात. उडता, उडता अन्य उडत्या किटकाचे शिकार करणे हे तर चतुरांचे वैशिष्ट्य. आपल्या काटेरी पायात भक्ष्य पकडून ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन खाणे किंवा उडता उडताच गट्ट्म करणे यात चरुर तरबेज असतात. पतंगांसारख्या मोठया आकाराच्या किटकांवरही ही चतुर बिनधास्त हल्ला करतात. चतुरांच्या थव्यातले काही चतुर ऊंच जागी भक्ष्याची वाट बघत दबा धरुन बसतात आणि जवळून जाणाऱ्या भक्ष्यावर हल्ला करतात तर काही चतुर त्या भागात टेहेळणी करीत भक्ष्य हेरतात.
"ऒडोनाटा" गटातील चतुर या पृथ्वीवर तीनशे दशलक्ष वर्षांपूर्वी अवतरले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. चतुरांच्या जगभरात मिळून ५००० जाती नोंदविण्यात आल्या असून, त्यापैकी ५०० जाती भारतात आढळतात. या ऒडोनाटा गटातील आणखी एक सभासद म्हणजे "टाचणी". ज्या पंखांमुळे चतुरांना उडण्यासाठी सर्वोच्च कौशल्य प्राप्त झाले आहे, त्या पंखांचा वापर ते जोडीदाराला आकर्षित करून घेण्यासाठी, संदेश वहनासाठीही करतात. तसेच सुर्यप्रकाशातील उष्णता शोषून घेण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो. पंखांप्रमाणेच चतुराच्या शरीररचनेतील डोळे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांच्या तोंडाचा जवळजवळ सगळा भाग संयुक्त डोळ्याच्या एका जोडीनेच व्यापलेला असतो. या संयुक्त डोळ्यांमधे सुमारे ३०,००० भिंगे असतात. याखेरीज चतुराला आणखी तीन साधे डोळेही असतात. चतुराची मादी पाणवनस्पतीच्या देठांवर, पानांवर शक्यतो पाण्याखाली अंडी घालते. अंडयातून बाहेर आलेली पिल्ले पुढची दोन / तीन वर्षे जलचर म्हणूनच वावरतात. मात्र या अवस्थेतही पिल्ले प्रौढांइतकीच तरबेज शिकारी आणि खादाड असतात. डासांच्या अळ्या, डास यावर ती ताव मारत असल्याने, माणसासाठी ती फारच उपयुक्त ठरतात. पुर्ण वाढ झाल्यावर ही पिल्ले पाण्याचा आसरा सोडून हवेत उड्डाण करतात.
या चतुरांचे जर का छायाचित्रण करायचे असेल तर पावसाळ्यात आणि पावसाळयानंतरचा मोसम उत्तम ठरतो. कुठल्याही पाणथळीच्या आसपास तुम्हाला ही चतुर मंडळी हमखास भेटणारच. यांची कित्येक जाती पाण्याच्या आसपास आढळतात आणि काही काही खास जाती मात्र घनदाट जंगलातच आढळता. चतुर उडण्यात अतिशय चपळ असतात. अगदी छायाचित्रणाच्या वेळी छायाचित्र काढतानाच ते डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्यात उडून दिसेनासे होता. पण त्यांचे सवय असते की ते त्याच त्याच फांदीवर परत परत येउन बसतात. त्यामुळे जर का त्या फांदीच्या आसपास आपण दबा धरून शांत आणि अगदी निश्चल बसलो तर आपल्याला त्यांची छान छायाचित्रे मिळू शकतात. याचप्रमाणे जेंव्हा हे चतुर फांदीवर बसतात तेंव्हा ते एखाद्या जिमनॅस्ट प्रमाणे कवायती करत बसतात. आधी ते त्यांची शेपटीच वर करून बसतात, मग गिरकी घेउन पंख पसरवून सरळ बसतात. यावेळेला जर का आपल्याला त्यांची छायाचित्रे मिळवता आली तर ती अगदी अचुक अशी असतात. अर्थात या करता आपल्याला अगदी सजग बसायला लागते आणि बरीच छायाचित्रे काढवी लागतात. याचप्रमाणे चतुरांचे डॊळे अगदी आकर्षक असतात त्यामुळे त्यांचे डोळ्यांची छायाचित्रे काढायला नेहेमीच मजा येते. याकरता आपल्याकडे खास "क्लोज अप" ची सोय असलेले कॅमेरा मात्र हवेत, अर्थात यामुळे त्यांच्या डोळ्यातील शेकडो भिंगाचे छायाचित्रण आपल्याला करता येते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८

टणाटण उड्या मारणारे प्लॅंट हॉपर.
हे किटक अतिशय लहान आकाराचे असतात. अगदी २ ते १२ एम एम एवढीच त्यांची लांबी असते. साधारणत: ते झाडांवरच आढळतात आणि तिथेच त्यांचे खाणे पिणे चालते. याच कारणाकरता त्यांना प्लॅंट हॉपर या सर्वसामान्य नावाने ओळखले जाते. त्यांना आपली किंवा भक्षकाची जाणीव झाली की एखादी स्प्रींग लावल्याप्रमाणे पटकन ते उडी मारून नाहीसे होतात. अर्थातच किटक असल्यामुळे त्यांना पंख असतात आणि त्यामुळे ते सहज उडू शकतात. यातील काही जातीचे हॉपर हे हिरव्या किंवा तपकीरी रंगाचे असले तरी काही जातीचे हॉपरहे एकदम मनोहारी रंगाच्या पंखांचे असतात. यात गुलाबी, लाल, पिवळा रंग असतो किंवा अगदी झळझळीत सप्तरंगीसुद्धा असतात.
यातील डर्बीडी जातीतील हॉपर यांचे पंख त्यांच्या शरीराच्या मानाने अतिशय मोठे आणि लांब असतात. त्याचबरोबर त्यांचे डोळेसुद्धा रंगीत आणि बटबटीत मोठे असतात. एखाद्या भिंगरीसारखे ते गरगर आपल्याभोवती गिरक्या घेत पानावर उड्या मारताना आढळतात. सहसा हे मोठे पंख त्यांच्या शरीरावर उभे उंचावू ठेवले जातात त्यामुळे त्यांचा आकार एकदम वेगळा आणि विचीत्र भासतो. हे किटक अन्नासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अळंब्या वापरतात. इतर जातीचे हॉपर मात्र झाडांच्या फांद्यांमधील रस शोषून पितात. हा रस मोठया प्रमाणात शोषल्यामुळे त्यातील जास्तीचा द्राव हा त्यांच्या शरीरातून एका पारदर्शक द्रावाच्या स्वरूपात थेंबाथेंबाने पाझरतो. या द्रावाला "हनी डयू" असे म्हणतात आणि हा द्राव अतिशय गोड व साखरेच्या पाकासारखा, प्रथीनयुक्त असतो. हा द्राव मुंग्यांना फार प्रिय असतो आणि म्हणूनच बऱ्याचवेळा ह्या किटकांच्या आसपास ह्या मुंग्या वावरताना आपल्याला दिसतात. या मुंग्या इतर भक्षकांपासून या लहान किटकांचे संरक्षण करतात आणि त्याबदल्यात हे कीडे त्यांना बक्षीस म्हणून तो गोड द्राव पाजतात.
हे हॉपर आकाराने एकदम लाहान असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण नेहेमीच आवाहन ठरते. कारण हे इतके चिमुकले असतात की त्यांना आधी शोधणे हेच कठीण काम असते. सहसा हे एकेकटे रहातात त्यामुळे त्यांचा ठावठीकाणा कमीच लागतो. एकदा का ते आपल्याला एका झाडावर सापडले तर ते इतके लाजरेबुजरे असतात की त्यांना आपली जराजरी हालचाल जाणवली तर ते पटकन टुणकन उडी मारून लांब पळून जातात. एकदा मी येऊरच्या जंगलात छायाचित्रणासाठी गेलो असताना आम्ही एका ब्लू ओकलीफ या फुलपाखराच्या मागे छायाचित्रणासाठी पळत होतो. ते एका खोडावर शांत बसल्यावर बाकीचे त्याचे छायाचित्रण करत होत. मला मात्र खालच्या एका झाडावर हा चमत्कारीक दिसणारा डर्बीडी हॉपर दिसला. आधीतर मला त्यांचे उंचावलेले दोन पंखच दिसत होते. थोडासा बाजुला वळून गेल्यावर मला त्याचे सोंडेसारखे तोंड आणि बटबटीत डोळे दिसले. मात्र तो हॉपर अतिशय चंचल होता, पानावर सारखा इकडून तिकडून नाचत होता. छायाचित्रण करताना त्याच्या उंचावलेल्या पंखावरून प्रकाश परावर्तित होऊन ते सप्तरंगी चमकत होते.
मी त्याची वेगवेगळ्या ऍंगलनी छायाचित्रे घेत असतानाच मला त्या हॉपरच्यामागे हालचाल जाणवली. एक जंपींग स्पायडर हळूहळू त्या हॉपरच्या दिशेने वाटचाल करत होता. त्या दोघांमधले अंतर हळूहळू कमी होऊ लागले. मी अगदी श्वास रोखून त्यांची शिकार बघायला लागलो, मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्या हॉपरच्या त्याच्या पाठीमागची हालचाल जाणवली आणि त्याने झटक्यात तीथून लांबवर उड्डाण केले. माझे एक हुकमी छायाचित्र हुकले होते अर्थात तरीसुध्दा त्या सुंदर हॉपरचे प्राण वाचल्याचा मला आनंदच होता. हे इतक्या क्षाणार्धात घडले की माझ्याबरोबरच्या मित्रांना काय झाले हे कळलेच नाही. ते त्या ब्लू ओकलीफ फुलपाखराचे छायाचित्रण करून परत आले आणि तोपर्यंत मी या हॉपरचे छायाचित्रण संपवले होते. यामुळे एक खात्री पटली की निसर्गात छायाचित्रणाची संधी कुठे कशी मिळेल किंवा हुकेल याचा नेम नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

नाकाड्या चापडा.
विषारी सापांमधे जगभरात प्रसिद्ध असलेला वर्ग आहे तो "व्हायपर" सापांचा. यांचे लांबलचक सुळे भक्ष्याच्या शरीरात खोलवर दंश करून आतपर्यंत विष टोचतात. हे विष सहसा रक्तभिसरण संस्था आणि स्नायुंवर अंमल करते. यांचे शरीर जाडसर असते, लांबी सहसा कमी असून डोके काहीसे चपट आणि तिकोणी असते. या सापांमधे परत दोन प्रकार आढळतात. पहिल्या प्रकारात सापांच्या तोंडावर दोन उष्णतासंवेदनाग्रहण करणारी छिद्रे असतात. तर दुसऱ्या प्रकारात अशा प्रकारची छिद्रे सापांच्या तोंडावर नसतात. ज्या सापांमधे ही छिद्रे असतात ती डोळे आणि नाकपुडीच्या मधे दोन्ही बाजूला असतात. कधी कधी ही छिद्रे नाकपुडीपेक्षा जास्त मोठी असतात. ही उष्णतासंवेदनाग्रहण करणारी छिद्रे आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताच्या सस्तन प्राणी, पक्ष्यांची हालचाल सहज टिपू शकतात. आपले डोके आजूबाजूला फिरवून जाणवणाऱ्या उष्णते प्रमाणे ते भक्ष्याची योग्य दिशा सहज ओळखतात. हे साप दिसायला जरी सुस्त असले तरी भक्ष्याला पकडण्यासाठी मात्र झपाट्याने त्यावर हल्ला चढवतात. उंदीर, घुशीसारखे छोटे सस्तन प्राणी, पक्षी आणि पाली, सरडे, बेडूक हे त्यांचे मुख्य खाणे असते. या जातीचे साप थेट पिल्लांना जन्म देतात. अर्थात त्यांच्या पोटात एका पारदर्शक पिशवीमधे ही अंडी असतात आणि तिथेच ती उबवली जातात. तिथे पिल्लांना अन्नपुरवठा हा अंड्याच्या बलकामधून होतो. योग्य वेळी मादी सुरक्षीत ठिकाणी थेट पिल्लांनाच जन्म देते.
आतापर्यंत मी आपल्याकडे दिसणारा हिरवा चापडा किंवा बांबू पिट व्हायपर अनेक वेळेला बघितला होता आणि त्याचे छायाचित्रणही कित्येके वेळेला केले होते. नावाप्रमाणेच हा फिकट हिरव्या रंगाचा असतो आणि त्याच्या पाठीवर पुसट काळसर, तपकीरी नक्षी असते. लहान पिल्लांमधे ही नक्षी जास्त गडद असते आणि त्यांचा काही विशिष्ट आकार ठरलेला नसतो. हे साप वेलींवर, लहान झुडपांच्या फांद्यांवर रहातात. त्यांच्या हिरव्या रंगामुळे त्यांचा शत्रुपासून सहज बचाव होतो. याचीच दुसरी जात आहे "लबार पिट व्हायपर". हे साप घनदाट अरण्यात जास्त आढळतात. आपल्या महाराष्ट्रात काही खास ठिकाणे आणि दक्षिणेकडच्या जंगलात हे सर्रास आढळतात. ही जात सुद्धा झाडावरच रहाते आणि यांचा रंगपण हिरवा असतो. या हिरव्या रंगावर काळपट, तपकीरी धब्बे असतात.
यांचा तीसरा भाउबंद आहे "हंप नोज्ड पिट व्हायपर" किंवा मराठीमधे याला नाकाड्या चापडा असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. ही तसा एकदम लहान म्हणजे जेमतेम एक फूटाएवढा वाढतो. याचा रंग लालसर तपकीरी किंवा राखाडी असतो. याचे डोके मानेपासून वेगळे झालेले सहज ओळखता येते. त्याचे नाक काहीसे वरच्या बाजूला वाढलेले असते आणि त्यामुळे त्याच्या नाकावर टेंगूळ आले आहे असए भासते आणि म्हणूनच हा "हंप" नोज्ड पिट व्हायपर. याच्या शरीरावर गडद तपकीरी किंवा राखाडी रंगाचे २०/ ३३ गोलाकार / त्रिकोणी धब्बे असतात. इतर पिट व्हायपर सारखा मात्र हा झाडावर न रहाता खाली जमिनीवरच आढळतो. साधारणत: पालापाचोळ्यामधे, झाडांच्या मुळ्यांमधे, दगडाखाली हा अतिदाट जंगलांमधे आढळतो. उत्तेजीत झाल्यावर तो आपली लालसर, पिवळसर उठावदार रंगाच्या शेपटीची जोरदार हालचाल करतो, त्याच्या भक्ष्याला आकर्षित करण्यासाठीसुद्धा त्याला या सवयीचा उपयोग होतो.
हा साप मला कित्येक दिवस जंगालात बघायचा होता, पण आपल्याकडे हा दिसत नसल्यामुळे आजपर्यंत हे काही शक्य झाले नव्हते. या वेळी बटरफ्ल्याय मीट गोव्याला दसऱ्याच्या सुमारास होती. त्यामुळे या वेळी हा साप मला गोव्याच्या सदाहरित दाट जंगलाच्या पट्ट्यात दिसेल असा माझा अंदाज होता. आमचा मुख्य उद्देश फुलपाखरे बघायचा असला तरी मी तिथल्या स्थानीक मित्रांना सांगीतले की मला हा "नाकाड्या" चापडा बघायचा आहे. दुसरे दिवशी आम्ही "तांबडी सुर्ला" या भागात फिरायला जाणार होतो. आमचा ग्रुप त्या जंगालात शिरतानाच एका मित्राने सांगीतली "इथे चालताना जपून चाला आणि खाली बघत बघत चाला कारण या भागात खुप साप आहेत". आम्ही आपले वेगवेगळी फुलपाखरे बघत बघत, त्यांचे छायाचित्रण करत करत पुढे पुढे जात होतो. अचानक आमचा वाटाड्या एकदम थबकला आणि त्याने मला हळूच खुण करून रस्त्यात बघायला सांगितले. भर रस्त्यात एका झाडाच्या मुळापासून थोड्या अंतरावर हा नाकाड्या चापडा अंगाचे वेटोळे करून त्याच्या खास "पोज" मधे बसला होता. अर्थातच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, कित्येक दिवसांचे स्वप्न पुर्ण झाले होते. अतिशय सावकाश त्याच्या जवळ जाउन त्याची वेगवेगळ्या ऍंगलनी छायाचित्रे घेतली. मागून आमचाच दुसरा ग्रुप आला, पण एवढ्या लोकांच्या चाहूलीमुळे मात्र तो साप पटकन आत झाडात सरपटत जाउन गायब झाला.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


लांब सोंडवाली बी फ्लाय.
पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर जमिनीलगत फुललेल्या असंख्य फुलांजवळ ही लांब सोंडवाली माशी आपल्याला नेहेमी दिसते. खरेतर हीचा अविर्भाव हा मधमाशीसारखा आणि भुंग्यासारखा असतो कारण अगदी तसेच केसाळ, लालसर शरीर आणि फुलांतील मध प्यायची यांना सवय असते. पण यांचे वर्गिकरण मात्र खऱ्या माश्यांमधे झालेले आहे आणि म्हणूनच यांना फक्त दोनच पंख असतात. यामुळे त्यांचे सर्वसामान्य नाव आणि शास्त्रीय नाव हे मधमाशीवरून आहे. आज जगात यांच्या ५०००हून अधिक उपजाती आढळतात आणि अंटार्क्टीका सोडून जगाच्या सर्व काना कोपऱ्यामधे यांचे वास्तव्य आढळून येते.
या बी फ्लायचे शरीर अतिशय केसाळ आणि मऊ फर असलेले असते. सर्वसाधारणपणे ही फर पिवळी, सोनेरी अथवा लालसर असते. या जाडसर फरमुळे त्या अगदी जाडजुड दिसतात. अतिशय लांब सोंड ही त्यांची मुख्य खासियत आहे. यांना दोनच पंख आणि दोन आखुड स्पृशा असतात. पाय अगदी काटकुळे असून शेवटचे दोन पाय खुपच लांब असतात. उडण्यात या अतिशय निष्णात असतात. अगदी मधेच हवेत तरळणे किंवा क्षणार्धात कुठलीही दिशा बदलणे हे त्यांना सहज साध्य होते. या त्यांच्या लांबलचक सोंडेमुळे त्यांना फुलांतील मध उडता उडताच पीता येतो किंवा मध प्यायला अगदी फुलावरच बसायची गरज पडत नाही. याच कारणामुळे त्या फुलांत दबा धरून बसलेल्या क्रॅब स्पायडरपासून किंवा तत्सम भक्षकांकडून नेहेमीच त्यांचा बचाव होतो. हिवाळ्या फुलणाऱ्या अनेक रानफुलांचे परागीभवन करण्यात यांचा मोठा वाटा असतो. यांच्या एकंदर केसाळ शरीरामुळे त्यावर जास्त परागकण चिकटतात जे दुसऱ्या फुलांना भेटी देताना त्यांचा तीथे संयोग होऊन परागीभवन सहज शक्य होते.
या जश्या फायदेकारक परागीभवन करणाऱ्या आहेत तशीच त्यांची काळी बाजुसुद्धा आहे. ह्या जमीनीलगत, झाडावर मधमाश्यांची घरटी, पोळी शोधत उडत रहातात. ह्याच मधमाश्या या बी फ्लायशी मध पिण्या करता स्पर्धा करतात. काही जातीच्या मधमाश्या जमिनीत लांब बिळे खणतात. त्यामधे परगकणांचा व्यवस्थीत साठा त्यांच्या लहानग्या पिल्लांकरता करून ठेवतात. हे परागकण मिळवण्यासाठी त्यांना अनेक फुलांना भेटी द्याव्या लागतात. याच वेळेचा ह्या बी फ्लाय त्यांचा फायदा उठवतात. आई मधमाशी जेंव्हा परागकण आणण्यासाठी बाहेर गेली असत्ते तेंव्हा त्या लगेच त्या बीळाच्या दरवाज्याजवळ जाउन अंडी घालतात. यासाठी त्यांना जमिनीवर उतरावेसुद्धा लागत नाही. अगदी हवेतल्या हवेतच उडत त्या आपले पोट वळवून तीथे त्यांची अंडी घालतात. कालांतराने त्या अंड्यातून अळी बाहेर येउन ते तीचा मार्ग बरोबर निवडते. ती अळी त्या मधमाशीने तीच्या पिल्लांसाठी साठवलेल्या परागकणांच्या साठ्याजवळ हळूहळू सरकत जाते आणि त्यावर डल्ला मारते. त्यानंतर तर ती त्या मधमाशीच्या पिल्लांनाच फस्त करते आणि तिथेच आपला कोष करते. पुढे काही दिवसानंतर त्या कोषातून नवीन बी फ्लाय बाहेर येतात आणि मधमशीच्या घरट्याच्या बाहेर जाउन आपले नविन जीवन सुरू करतात.
ह्या बी फ्लायचे जर का छायाचित्रण करायचे असेल तर अगदी सकाळच्या प्रहरी करावे लागते कारण एकदा का उन चढले की त्यांची हालचाल वाढते आणि मग काही त्या एका जागी स्वस्थ बसलेल्या दिसून येत नाहीत. मात्र अगदी सकाळी जर का आपण फुलांच्या आसपास बघितले तर त्या शांतपणे सकाळच्या कोवळ्या उन्हात आपल्याला चमकताना आढळतात. सकाळच्या उन्हात त्यांच्या अंगावरची फरसुद्धा छान चमकत असते आणि ती आपल्याला छायाचित्रात सहज टिपता येते. हीच्या शरीरामधील तोंडाचा, सोंडेचा भाग खास असल्यामुळे बाजुने जर का तीचे छायाचित्रण केले तर त्यांच्या लांब सोंडेची मजा काही वेगळीच जाणवते. बऱ्याचजणांच्या मते या भयावह दिसत असल्या तरी आपल्याला चावत नाहीत असे त्यांचे म्हणणे असते. मात्र मला बऱ्याच वेळेला या माश्या अगदी जाड जीन्समधूनसुद्धा आपली लांब, जाड सोंड घालून चावल्या आहेत. कित्येक वेळा तर त्या अगदी पाठलाग केल्यासारख्या मागावर येतात आणि मग त्या चावू नयेत म्हणून त्यांना पिटाळावे लागते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/