सुगंधी फुलोरा.
ज्या वेळी आपल्याकडे होळी, रंगपंचमीची धमाल सुरू असते त्याचवेळी आपल्या जंगलात तशाच पण नैसर्गिक रंगांची उधळण सुरू असते. पळस, पांगारा, काटेसावर, बहावा, खवस अशी अनेक रंगीबेरंगी फुले मोठ्या प्रमाणावर झाडांवर झळकत असतात. डोळ्याला थंडावा देणारी ही फुले असली तरी सुगंधाच्या बाबतीत मात्र ती कमी पडतात. अर्थात त्यांच्या रंगाचाच प्रभाव एवढा असतो की त्यांच्या परागीभवनाचे काम किटक आणि पक्ष्यांकडून सहज होते. पण अश्या रंगीबेरंगी फुलांबरोबरच निसर्गात अनेक पांढरीशुभ्र किंवा फिकट रंगाचीसुद्धा फुले असतात. त्यात काही तर रात्रीसुद्धा फुलणारी असतात. ह्या अश्या फुलांच्या मदतीकरता त्यांचा सुगंधच त्यांच्या कामी येतो. आकर्षक रंग नसल्यामुळे जरी किटक यांच्याकडे आले नाहीत तरी यांचा मादक सुगंधच त्या किटकांना ह्या फुलांना भेट देण्यास उद्युक्त करतो.
ह्या सुगंधी फुलांमधे गुलाब, मोगरा, सोनटक्का, कवठी चाफा, सोनचाफा अशी अनेक सहज दिसणारी, आढळणारी फुले आहेत. ही फुले आणि त्यांची रोपे, झाडेसुद्धा आपल्याला घरी, बागांमधे सहज बघायला मिळतात. पण या सुगंधी फुलांमधे काही अशी आहेत की जी सहजासहजी दिसत नाहीत किंवा दिसली तरी त्यांचे झाड आपल्याला माहित नसते. सुरंगी हे फुल असेच काहीसे सहसा न दिसणारे. वर्षातील काही मोजक्या दिवसांमधे यांचे गजरे बाजारात विकायला दिसले तर दिसतात. ह्या फुलांचा वास पण एवढा मादक आणि दमदार की तो अगदी अर्ध्या किलोमिटर एवढ्या अंतरावरूनसुद्धा येतो. हा वास एवढा गोड असतो की त्या बाजारातल्या फुलांच्या गजऱ्यावरसुद्धा मधमाश्याअ घोंगावताना दिसतात. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधेच फक्त आढळणारे हे स्थानीक झाड जगात कुठेच आढळत नाही. मध्यम आकाराचे हे झाड सदाहरित असून याची पाने लांबट आणि गडद हिरवी असतात. यांच्या फुलांचे गुच्छ थेट खोडालाच लगडतात. गोलाकार, गुच्छात येणाऱ्या ह्या कळया अतिशय आकर्षक दिसतात. पांढरट, गुलाबी रंगाच्या चार गोलाकार पाकळ्या असून आत पिवळे धम्मक पुंकेसर असतात. हे पुंकेसर एवढे मोठे आणि छान असतात की त्यांचाच पसारा पटकन नजरेत भरतो. मुंबईमधे अगदी कमी दिसणारे झाड फणसाडच्या जंगलात मात्र सहज बघायला मिळते.
सुरंगीसारखेच अजुन एक फुल म्हणजे बकुळीचे. ह्या दोन्ही फुलांची खासियत म्हणजे ही फुले सुकल्यावर सुद्धा पुढे कित्येक दिवस यांचा सुगंध टिकून रहातो. सुरंगीपेक्षा बकुळ जरा जास्त प्रमाणात दिसते. ह्यांचे झाड उंच, सदाहरित असते आणि पाने मध्यम आकाराचे पण चकचकीत असतात. नाजुक चांदण्यांप्रमाणे पांढरट, पिवळसर अशी यांची फुले असतात आणि सहसा झाडाखाली यांचा सडा पडलेला असतो. अतिशय थंडगार सावली असणाऱ्या या झाडाला सध्या अनेक बागांमधे, घरांमधे लावले जाते. आयुर्वेदीक अनेक उपयोग असणाऱ्या या झाडाची फळेसुद्धा खायला छान लागतात. रानजाईचा वेलसुद्धा असाच जंगलात जाता जाता वासावरून ओळखता येतो. जंगलातील पायवाटेवरून जाता जात जर का तुम्हाला या फुलांचा सुगंध आला की तुमची पावले आपसुक थांबतात आणि त्या सुगंधाचा उगम शोधायला नजर आजुबाजुला जाते. पांढऱ्या फुलांचे घोसच्या घोस त्या नाजूक वेलीवर लगडलेले असतात. आणि त्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळत असतो.
वर्षाच्या काही मोजकेच वेळी फुलणारी ही फुले असल्यामुळे त्यांच्या फुलण्याचा काळ हा कायम लक्षात ठेवावा लागतो. बकुळीसारखे मोठे झाड असेल, त्यांची फुले वर टोकावर लागणारी असतील तर त्यांच्या छायाचित्रणासाठी एकतर छोटे झाड शोधावे लागते किंवा लांब पल्ल्याची लेन्स वापरावी लागते. अश्या अनेक दुर्मिळ, सहज न दिसणाऱ्या फुलांना शोधून त्यांचे छायाचित्रण करणे म्हणजे खरोखरच आनंददायक बाब ठरते. ह्या झाडांचे, फुलांचे छायाचित्रण करून ती कशी दिसतात, कशी फुलतात हे दाखवता येते मात्र त्यांचा सुवास, सुगंध कसा आहे हे मात्र दाखवण्याचे, साठवण्याचे तंत्र आपल्याला अजुन अवगत झालेले नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
Friday, May 8, 2009
रंग माझा "वेगळा".
सरड्यासारखा रंग बदलू नकोस असे आपल्यात म्हणायची सवय असते ती या सरड्यांचा रंग बदलण्याच्या सवयीवरूनच. शॅमेलीऑन किंवा इतरही सरडे आजूबाजूच्या परिसरात मिसळून जाण्यासाठी आणि शत्रुंपासुन लपण्यासाठी आपला मुळचा रंगच बदलतात, अर्थात या करता या सर्व सरडे मंडळींचे रंगाचे ज्ञान एवढे प्रगत झालेले असते की त्यांना इतर प्राण्यांपेक्षा रंगाबद्दल जरा जास्तच कळते. साधारणत: सापासारखे दिसणारे हे सरिसृप त्यांच्यापेक्षा काही बाबतीत वेगळे असतात. ह्या सरड्यांना शरीराची हालचाल करण्यासाठी व्यवस्थीत जाणवू शकणारे चार पाय असतात. ह्यामुळे जमिनीवरून जोरात पळणे अथवा झाडावर चढणे, लटकणे त्यांना सहज जमते. सापांना मात्र पाय नसतात पण तरीसुद्धा पळण्यात किंवा झाडावर चढण्यात त्यांचे काहीच अडत नाही. सरड्यांना हवेतून ऐकू येणारे आवाज येतात कारण त्यांना कान असतात. सापांना मात्र स्पंदनातून हालचालींचा अंदाज येतो. सरड्यांना व्यवस्थीत दिसते, त्यांना रंग ओळखता येतात आणि त्यांना उघडमीट होणाऱ्या पापण्या असतात. सापांना मात्र या पापण्या नसतात.
सर्व सरपटणारे प्राणी जेंव्हा त्यांचे शरीर वाढते तेंव्हा कात टाकतात. यावेळेस त्यांची जुनी कातडी पापुद्रयासारखी निघून जाते आणि त्याखाली त्यांना नवीन अधीक लवचीक कातडी जी त्यांचे मोठे वाढलेले शरीर सामावून घेते. सापांच्या बाबतीत सहसा एकसंध कात निघते कारण त्यांच्या शरीरावर कुठेही खंड पडलेला नसतो. सरड्यांची कात मात्र तुकड्या तुकड्यात निघते कारण त्यांच्या शरीराव पायांचे सांधे असतात. ह्या सरड्यांच्या हजारो उपजाती आहेत. यात साधे सरडे, शॅमेलीऑन, पाली, घोरपडी असे वेगवेगळे प्रकार असतात. यांच्या आकारात प्रचंड तफावत जातीनुसार आढळते. जेमतेम काही सेंटीमिटरएवढे शॅमेलीऑन आहेत तर त्याच वेळेस साडे नऊ फुट वाढणारे कोमोडो ड्रॅगनसुद्धा आहेत. हे सरडे सापांसारखे असले तरी विषारी नसतात मात्र त्यांच्या कठीण जबड्याने कडकडून चावू मात्र शकतात. त्यांचे प्रमुख अन्न किटक, कोळी असले तरी काही घोरपडीसारख्या मोठ्या जाती पक्षी, पक्ष्यांची अंडी किंवा छोटे छोटे सस्तन प्राणीसुद्धा मटकावतात.
सापांएवढे हे प्रसिद्ध नाहीत कारं यांच्याबद्दल तेवढ्या गैरसमजुती आपल्याकडे नाहीत. पालींबद्दल भयंकर किळस, ती विषारी असे काही गैरसमज मात्र आपल्याकडे आहेत. अंदमान डे गेको, बॅंडेड गेको किंवा रॉक गेको अश्या अनेक देखण्या पाली आपल्याकडे आहेत. पण एकंदरच यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले गेले आहे. त्यांच्यावर फारसा अभ्यासही झालेला नाही, सर्वसामान्यांकरता त्यांच्यावर पुस्तकेही उपलब्ध नाहीत आणि परदेशात जसे यांना पाळण्याचे खुळ आहे तेसुद्धा आपल्याकडे नाही. गावात / शहरात सरडा दिसला की मुले त्याच्यावर दगड भिरकावणारच. प्रत्यक्षात ते आपल्याला काहीच त्रासदायक ठरत नाहीत. अश्या या निरुपद्रवी सरड्यांच्या छायाचित्रणाचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात असतो. एकतर तो त्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे बरेचदा आपल्याला त्यांच्या जोड्या एकत्र दिसतात. नर आपला लालभडक तुरा आणि डोके मीरवत मादीला आकर्षीत करण्यासाठी "उठा बशा" काढत असतात. मात्र यावर्षी मला भर उन्हाळ्यात त्यांची चांगली छायाचित्रे मिळाली. येऊरच्या जंगलात फुलपाखरांचा चिखलपानाचा हंगाम असल्याने मी थोडासा उन्हापासून बचाब म्हणून मोठ्या दगडाच्या आडोश्याला बसलो होतो. समोर लायसॅनीड जातीच्या "ब्लू" फुलपाखरांचा एक मोठा थवाच्या थवा जमिनीवर चिखल पान करत होता. मी मात्र कुठले मोठे, वेगळ्या जातीचे फुलपाखरू येते का याची वाट बघत होतो. एका छोट्या दगडामागून हा सरडा दबकत दबकत पुढे आला. चिखलपान करण्यात दंग झालेल्या त्या चिमुकल्या फुलपाखरांवर त्याचा डोळा होता आणि त्यातली २/४ जरी त्याला मिळाली असती तर त्याचे काम नक्की होणार होते. अर्थात मी त्याजागी दगडामागे लपून बसलो होतो म्हणून केवळ नशिबामुळेच मला त्यांची छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
"किल्ले"कर वाळव्या.
वाळवीला जरी इंग्रजीमध्ये व्हाईट ऍंट अथवा टरमाईट असे म्हणत असले तरी त्यांचा मुंग्यांशी काही संबंध नाही. पण त्यांची उत्क्रांती झुरळापासून सुमारे १५० कोटी वर्षांपुर्वी झाली. आज जगभरात सुमारे २५०० जातींच्या वाळव्या आढळतात आणि ह्या सर्व एकत्रीत, समुहाने रहाणाऱ्या असतात. ह्या वाळव्या त्यांच्या रहाण्यासाठी उंच उंच किल्ल्यांसारखी वारूळे बनवतात. काही काही जातीत तर ही वारूळे अगदी २० फुटांपर्यंतसुद्धा उंच असतात. आपल्या भारतात काही जंगलात ६/७ फुटांची वारूळे सहज दिसतात. ही वारूळे प्रामुख्याने माती, त्यांची लाळ आणि लाकडातील खास द्र्व्याने बनवलेली असतात. ही वारूळे जेवढी उंच जमिनीवर दिसतात तेवढेच त्यांचे बांधकाम जमिनीखाली सुद्धा असते. ही अनेक खोल्या असलेली वारूळे म्हणजे स्थपत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून समजली जातात. या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या वारूळात अक्षरश: लाखो वाळव्या एकत्र नांदत असतात. वारूळात राणीची "खास" खोली असते आणि तिथे तीची योग्य ती बडदास्त ठेवली जाते. इतर भागात पिल्लांसाठी खोल्या, त्यांच्या अन्नासाठी बुरशी वाढवायच्या खोल्या इतकेच नव्हे तर वारूळ आतून थंड रहावे म्हणून वातानुकूलीत खोल्यासुद्धा खास रचना करून बांधलेल्या असतात.
वाळवीचे मुख्य खाणे हे लाकूड असते आणि त्या निसर्गातील मृत झाडांचे जैवीक विघटन करण्यासाठी मोलाची मदत करतात. पाण याच वेळेस त्यांच्या कित्येक जाती ह्या मानवाने बनवलेल्या इमारती आणि इतर लाकडी सामानावर पण ताव मारत असल्यामुळे आपल्याकरता त्या त्रासदायक आणि उपद्रवी ठरतात आणि त्यांचे वेळीच योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. अतिशय नाजूक शरीर असलेल्या या वाळव्यांची तोंडे आणि जबडे मात्र धारदार असतात आणि त्यांच्या सहाय्याने त्या कठिण अश्या लाकडाचे क्षणात बारीक बारीक तुकडे करतात. त्यांच्या आतड्यात असलेल्या खास रचनेमुळे हे पचण्यास कठिण असणारे लाकूड आणि त्यातील सेल्यूलोज त्वरीत विघटन करून पचवले जाते. या वारूळात राजा आणि राण्या असतात, सैनीक आणि कामकरी असतात, तसेच त्यांची पिल्ले आणि अप्रगत वाळव्या असतात. राणी मादी दिवसाला शेकडो अंडी देण्याचे काम फक्त करते आणि प्रसंगी २००० अंडी दर दिवशी घालते. या करता तिचे शरीर प्रचंड मोठे आणि पोट लांब असते आणि तिला तीचे स्वत:चे काहीही काम करता येत नाही. अर्थात तीच्या दिमतीला अनेक कामकरी वाळव्यांची फौज तैनात असते. मुंग्यांमधे नराचे राणी मादीशी एकदाच मिलने होते आण त्यानंतर तो मरतो किंवा त्याला घरट्यातून हाकलून दिले जाते. मात्र वाळव्यांचे राजे हे कायम वारूळातच रहातात आणि त्यांचे मादीबरोबर प्रजोत्पादनासाठी मिलन कायम सुरू असते.
मुंबईच्या आसपास आपल्या जंगलात ह्या वाळव्यांची वारूळे अगदी लहान असतात. मात्र दक्षिण आणि मध्य भारतातील जंगलात ही वारूळे पुरूष उंचीपेक्षा सहज उंच असतात. ह्या वारूळाच्याआतील वाळव्यांचे छायाचित्रण मी कधी केले नाही कारण त्यासाठी ते वारूळ मोडायला लागले असते. पण जंगलात जर वठलेले, जमिनीवर पडलेले झाडाचे खोड असेल तर त्याखाली बऱ्याच वेळेला या वाळव्या सहज सापडतात आणि मग त्यांचे छायाचित्रण सह्ज शक्य होते. मागे असाच एकदा झाडाच्या खोडाखालील वाळव्यांचे छायाचित्रण करत असताना एक काळा मुंगळा तिथे आला आणि त्याने पटापट त्याच्या तोंडात ५/६ वाळव्या पकडून नेल्या. पावसाळ्याच्या सुरवातीज जेंव्हा नुकता पाऊस पडतो तेंव्हा जंगलात ह्या वारूळाच्या आजूबाजूने किंवा झाडांच्या खोडाखालून असंख्य पंख असलेल्या वाळव्या बाहेर पडतात आणि आकाशा उडायला लागतात. अश्या वेळेस त्यांचे निरिक्षण आणि छायाचित्रण चांगले होते. जंगलातील वाळव्यांचे आणि त्यांच्या घराचे छायाचित्रण करायला मजा येते मात्र घरातल्या फर्निचरल्या लागलेल्या वाळवीचे छायाचित्रण करायची वेळ न येवो एवढे मात्र नक्की.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
उड्डाण "चक्र".
किटक आपण चिमुकले, नगण्य म्हणून संबोधत असलो तरी त्यांच्या जगण्याच्या क्षमता आपल्याला नेहेमीच अचंबीत करतात. आता फक्त चतूर आणि टाचण्यांचेच बघा ना !! एखाद्या जिमनॅस्ट प्रमाणे चपळ आणि सडसडीत असणारे ह्यांचे शरीर त्यांच्या सारखेच लवचीक आणि शक्तीमान असते. त्यांच्या डोळ्यात असलेल्या हजारो भिंगांमुळे त्यांची दृष्टी तर तिक्ष्ण असतेच पण त्यांच्या शरीरातील एकंदर स्नायुंच्या ६५% स्नायु हे फक्त उड्डाणाकरता खास असतात यावरून त्यांचे उडणे कीती उच्च क्षमतेचे असेल याचा आपल्याला अंदाज येतो. चतूर आणि टाचण्यांची बाल्यावस्था ही कित्येक महिन्यांची, वर्षांची असते आणि ती पाण्याखाली जगली जाते तर त्यांची प्रौढ अवस्था केवळ काही आठवड्यांची असते आणि ती जमिनीवर असते. यातीलसुद्धा बराचसा काळ ते हवेत उडण्यातच घालवतात. या उडण्याचा मुख्य उद्देश शिकार पकडण्याचा असू शकतो किंवा त्यांची हद्द सांभाळण्यासाठी, मादी मिळवण्यासाठी असू शकतो.
चतूर आणि टाचण्यांच्या अनेच जाती ह्या हद्दप्रिय असतात. त्यांना त्यांची हद्द राखायला, सांभाळायला अतिशय आवडते आणि कोणी इतर नर जर त्यांच्या हद्दीत आला तर तर त्याला ते पळवून लावतात. यासाठी ते एकतर त्यांच्या हद्दीत पहारा केल्यासारखी गस्त घालतात किंवा उंच झाडावर, फांदीवर बसून आपल्या हद्दीत कोणी येत तर नाही ना याची काळजी घेतात. मात्र जर ला एखादी मादी त्याच्या हद्दीत आली तर मात्र तीला गटवण्यासाठी त्याची धावाधाव होते. नर उडता उडताच खात्री करून घेतो की ती मादी त्याच्याच जातीची आहे आणि मिलनास तयार आहे. मादीसुद्धा आजूबाजूला उडून खात्री करून घेते की हा नर तीच्या योग्य आहे की नाही आणि त्याची हद्द ही अंडी घालण्यासाठी उपयोगी आणि उचित आहे की नाही. जर का दोघांना या सर्व अटी योग्य वाटल्या तर ते मिलनासाठी तयार होतात.
यांच्या मिलनाची अजब तर्हा असते. नर मादीचे डोके अथवा धड आपल्या लांबलचक शेपटीच्या टोकाने गच्च पकडतो. ह्या स्थितीत तो तीला घेउन उडू सुद्धा शकतो. काही वेळानंतर ते एका जागेवर स्थीर बसतात. यानंतर नर आपली पकड अजून घट्ट करून मादी सरकणार नाही याची खात्री करून घेतो. यानंतर मादी आपली लांबलचक शेपटी पुर्ण गोलाकार वळवून नराच्या धडाच्या आणि शेपटीच्या सांध्यावर आणून चिकटवते. यामुळे तीच्या अंड्यांचे या नराकडून फलन होण्यासाठी मदत होणार असते. यावेळी जर त्यांची शरीर आकृती बघितली तर ती पुर्ण गोलाकार असते आणि म्हणूनच त्याला चक्री मिलन असे म्हणतात. या वेळेस आणि त्याच स्थितीत नर मादीला घेऊन उडूसुद्धा शकतो आणि नविन जागी या चक्राच्याच अवस्थेत बसतो. यामुळे या उड्डाणाला "चक्री उड्डाण" असे म्हणतात. यावेळी नर खात्री करून घेत असतो की त्याच्याकडून त्या मादीच्या अंड्यांचे फलन पुर्ण झाले आहे. जोपर्यंत मादी पाण्यात अंडी घालत नाही तो पर्यंत काही जातीचे नर मादीला सोडत नाहीत आणि तिचे डोके आपल्या शेपटीच्या टोकाने घट्ट धरून ठेवतात.
चतूर आणि टाचण्यांची जर अशी छायाचित्रे हवी असतील तर खचीतच पाण्याच्या जवळ आपल्याला वाट बघत बसावे लागेल. नदी, नाले, तलाव, डबकी, धबधबे, खाडीच्या पाणथळ जागा अश्या अनेल ठिकाणी आपल्याला हे चतूर आणि टाचण्या दिसू शकतात. यांचा विणीचा हंगाम एकतर पावसाळ्यानंतर लगेच किंवा मे महिन्यामधे पावसाळ्याच्या थोड्या आधी असतो. अर्थातच यांच्या उडण्याचा वेग भन्नाट असल्यामुळे यांची मनाजोगती छायाचित्रे मिळवताना खुप वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे हे प्रचंड हद्दप्रिय असल्यामुळे आपण यांचे छायाचित्र काढायला गेलो आणि बटन दाबणार याच वेळात जर का दुसरा आगंतुक नर त्यांना आसपास दिसला तर त्याला पळवायला ते त्याच्या मागे जातात आणि मग परत काही आपल्याला त्यांचे छायाचित्र मिळत नाही. जर का एखादी मिलन जोडी आपल्याला दिसली तर ती बराच वेळ एकाच जागी शांत बसलेली असते त्यामुळे त्यांची छायाचित्रे सहज मिळतात. अर्थात त्यावेळी त्यांच्या जास्त जवळ न जाता लांबूनच छायाचित्रे काढणे नेहेमीच उचीत ठरते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
मार्च / एप्रिल महिन्या अजून झाडे उघडी बोडकी असतात किंवा नुकती त्यांना हिरवीगार पालवी फुटायला सुरवात झालेली असते. पानगळीमुळे आपली नजर जास्त दूरवर जाउ शकते आणि एरवी पानान दडून रहाणारे पक्षी आपल्याला सहज आणि जास्त चांगले दिसू शकतात. झाडांच्या या पर्णहीन काळात ही रंगीबेरंगी मंडळी खरोखरच डोळ्यांना आनंद देणारी ठरतात. निसर्गात हे पक्षी, फुलपाखरे, फुले ही त्यांच्या आकर्षक रंगसंगतीमुळेच आपल्याला कायम ओळखता येतात आणि लक्षातही रहातात. हे रंग बऱ्याच वेळेला इतरांना "मी इथे आहे" अशी जाहिरात करून दाखवतात, पण हेच जर त्यांचे शत्रु किंवा शिकारी असतील तर ते त्यांना भारी ठरते. याच कारणासाठी कित्येक इतर प्राणी. पक्षी, किटक, मासे हे त्यांच्या आजुबाजुच्या परिसरात अगदी मिळूनमिसळून जातात व बिलकूल जाणवणार नाही अश्या रंगसंगतीचे असतात.
निसर्गात मिळून मिसळून जाणाऱ्या रंगसंगतीत साधारणत: दोन रंगाचे प्रामुख्याने अस्तित्व जाणवते. यात हिरवा आणि तपकिरी रंगच जास्त आढळतात कारण सहसा निसर्गात झाडीमध्ये रहाणऱ्या ह्या प्राण्यापक्ष्यांना हिरव्या अथवा सुक्या झाडांचे रंगच "मॅच" करणे सोयीचे ठरते. या त्यांच्या रंगसंगतीमुळे हे प्राणी त्याचा दुहेरी फायदा घेउ शकतात. निसर्गात एकदम लपून गेल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या भक्षकांना हे सापडत नाहित अथवा लक्षात येत नाहित आणि त्यांच्यापासून यांचा बचाव होतो. त्याचप्रमाणे हे अगदी आजुबाजुच्या भागात लपले असल्यामुळे इतर किटकांना अथवा प्राण्यांना यांचे अस्तित्व पटकन जाणवून येत नाही आणि मग हे स्वत:च त्यांची शिकार अगदी सहज करू शकतात.
छायाचित्रणासाठी एरवी आम्ही निसर्गात नेहेमीच रंगीबेरंगी प्राणी, पक्षी, किटक शोधत असतो. बऱ्याच वेळेला ते आम्हाला सहजासहजी सापडतात सुद्धा मात्र हे असे निसर्गात समरूप होणारे प्राणी सापडणे किंवा शोधणे खरोख्ररच खुप जिकीरीचे काम असते. बऱ्याचवेळेला तुम्ही अगदी त्यांच्या अधिवासात फिरत असता आणि तुम्हाला अगदी नक्की माहित असते की तो प्राणी तीथे असणार पण शोधुनही तो काही सापडू शकत नाही. कीत्येक वेळेला आम्ही पायवाटांवरून जात असताना माझ्यापुढे २/३ अगदी सहज त्या प्राण्याला ओलांडून जातात पण त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही की तो प्राणी अगदी पायवाटेच्या बाजूलाच झाडावर बसला होता. जेंव्हा तुमची सराईत नजर त्यावर पडते किंवा त्याची थोडीशी हालाचाल होते तेंव्हा मात्र तुम्ही त्याला ओळखू शकता आणि मग त्याचे छायाचित्रण शक्य होते.
झाडांच्या खोडावर रहाणाऱ्या पाली ह्या अशाच सहज न दिसणाऱ्या असतात. त्यांचा रंगसुद्धा थोडाफार त्या झाडाच्या खोडाच्या रंगाप्रमाणे बदलत पण असतो. जेंव्हा मी या पालीचे छायाचित्रण करत होतो तेंव्हा माझ्या बरोबरच्या मित्रांना बराच वेळ मी कसले छायाचित्रण करतो आहे हेच कळत नव्हते. आता ती छायाचित्रात स्पष्ट दिसून येत आहे मात्र प्रत्यक्षात निसर्गात ती एवढी बेमालूम छपली होती की तिथे कोणी आहे हेच जाणवत नव्हते. छायाचित्रातील प्रार्थना किटक सुद्धा असाच छोट्या झुडपाच्या कोवळ्या पालवीवर बसला होता. त्याचा एकंदर रंग, आकार आणि अविर्भाव यामुळे तो जिवंत हालचाल करणारा किटक आहे हेच पटत नव्हते. एका निळ्या माशीवर त्याने अयशस्वी हल्ला चढवला म्हणून तो माझ्या लक्षात आला. त्यामुळे छायाचित्रण करताना दरवेळेस आकर्षक, रंगीत प्राणीच छायाचित्रणासाठी मिळतील अशी अपेक्षा न करता कधी कधी हे "ओळखा पाहू" असे कोडे घालणारे प्राणीही मिळू शकतात. मात्र त्यासाठी कायम सतर्क राहून जंगलात कुठे काय काय आहे हे पहावे लागते. मला नक्की खात्री आहे ही जी काही छायाचित्रे मला मिळाली आहेत ती जेमतेम १ % असतील आणि बाकीची ९९ % मंडळी त्यांच्या प्रभावी छपवणाऱ्या रंगसंगतीमुळे मला दिसलीच नसतील.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/