या झाडाला मराठीत कांडोळ किंवा पांढरीचे झाड म्हणतात आणि इंग्रजीमधे "इंडियन घोस्ट ट्री" म्हणतात. या झाडाचे खोड पांढरेशुभ्र आणि काहिसे चंदेरी असते. ह्या तुळतुळीत खोडावर त्वचेवर भाजून काळे डाग पडावेत तसे व्रण असतात. अंधाऱ्या रात्री हे पांढरे, चंदेरी खोड चमकल्यासारखे दिसून काहीसे भयावह वाटते म्हणून हे "घोस्ट ट्री". या झाडाचा बुंधा अगदी आखीव रेखीव आणि छत्रीसारखा पसारा असलेला असतो. डिसेंबर - जानेवारीच्या सुमारास या झाडावर एकही पान नसते आणि फांदीच्या टोकाला मॉस (शेवाळे) गुंडाळल्यासारखा फुलोरा असतो. आता त्या पसाऱ्याला फुलोरा किंवा फुले का म्हणतात हा प्रश्नच आहे कारण लांबून ना त्यांचा आकार दिसतो ना अस्तित्व. अगदी जवळून निरिक्षण केल्यावर लक्षात येते की ती फुले चांदणीच्या आकाराची आणि अतिशय छोटी असतात. पाच पाकळ्यांची ही फुले हिरवट रंगाची असतात आणि थोडीफार त्यावर लालसर रंगाची नक्षी असते. जशी ही दिसायला अनाकर्षक आणि नगण्य असतात तसाच त्यांचा वासही घाण असतो, कारण या स्टर्कुलिया कुटूंबातील वृक्षांना दुर्गंध असतोच.
जेवढी ह्याची फुले अस्ताव्यस्त असतात तेवढीच यांची फळे व्यवस्थीत, निटनेटकी आणि आकर्षक असतात. जेंव्हा या झाडाला फळे धरायला लागतात तेंव्हा त्याचे सारे रूपच बदलून जाते. स्टारफीशसारखी किंवा पंचपाळ्यासारखी दिसणारी फळे अतिशय उठावदार किरमीजी रंगाची असतात आणि त्यावर मखमली लव असते. काही काही जातीत हा फळांचा रंग गुलाबी असतो. अतिशय साजरी दिसणारी ही फळे जरी मखमली भासत असली तरी ती लव एखाद्या काट्यासारखी रूपते. ही फळे थोडी मोठी होत असतानाच फांद्यांच्या टोकावर पालवी फुटायल लागते. पांढऱ्याशुभ्र झाडावर ही पोपटी हिरवीगार पालवी अगदी शोभून दिसते. या पानांचा आकारही पाच कोन असलेल्या द्राक्षासारखा पण थोडा विस्तारीत असतो. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी ही पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसायला लागते. फळांवर जशी लव असते तशीच लव ह्या पानांवरसुद्धा असते त्यामुळे ही स्पर्शाला अगदी मऊसुत लागतात.
तद्दन भारतीय असलेल्या या झाडाची साल आणि डिंक आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. ह्या झाडाची साल अतिश्य औषधी आहे आणि डायरियावर गुणकारी म्हणून वापरली जाते. दातांच्या कवळ्या बनवण्यासाठी साच्यांमधे पावडर टिकून रहाण्यासाठी याचा डिंक वापरला जातो. खाद्यपदार्थांच्या उद्योगातसुद्धा याचा डिंक वापरला जातो.
ह्या झाडाची माझी पहिली ओळख झाली ती ताडोबाच्या जंगलात. कॉलेजमधे असताना डब्लू.डब्लू.एफ़ च्या कॅंपला गेलो असताना ताडोबाच्या प्रवेशद्वारापाशीच हा एक भलामोठा, पसरलेला वृक्ष होता आणि त्याच्या पारावरच आमची नोंदणी सुरू होती. असा पांढराशुभ्र, पसरलेला वृक्ष पहिल्यांदाच पहात असल्याने त्याच्य सौंदर्याने तो पटकन नजरेत भरला आणि कायमचा लक्षातसुद्धा राहीला. त्यानंतर आमच्या येऊरला आणि अनेक वेगवेगळ्या जंगलात परत परत भेटत गेला, प्रत्येक मोसमात त्याचे बदलणारे रूप न्याहाळताना, छायाचित्रण करताना वेगळाच अनुभव यायचा. येऊरच्या सुक्या धबधब्याच्या उतरंडीवर हा वृक्ष आहे. त्याला फळे धरल्यावर त्यांचे छायाचित्रण करायली गेलो असताना, ती फळे जरा जास्त उंचावर असल्यामुळे पाय उंचावून एका हाताने फांदी खाली खेचली आणि दुसऱ्या एकाच हाताने छायाचित्रण सुरू केले. मात्र ही कसरत करताना पायाखालची माती सरकली आणि वर फांदीवर धरलेला माझा हात खाली थेट फळांवर आला. आता जर फळांचे काटे टोचतात म्हणून फांदी सोडली असती तर मी कॅमेरासकट खाली कोसळलो असतो, त्यामुळे मला त्या काटेरी, टोचणाऱ्या फळांचा आधार घेउनच स्थिर व्हायला लागले. अर्थात या काळात काही मोजकी छायाचित्रे मिळाली होती पण त्यानंतर मात्र २/३ दिवस हातातले खाजणारे काटे काढण्यातच माझे गेले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/