लुकलुकणारे काजवे...
सध्या शहरांच्या
आसपास हे काजवे दिसत नसले तरी अजुनही गावांमधे, घनदाट जंगलांत किंवा गड
किल्ल्यांवर पावसाळ्यातील संध्याकाळे हे लुकलुकणारे काजवे मधेच उडताना दिसतात. कधीतरी
आपण जर का एखाद्या किल्ल्यावर रात्री मुक्काम केला असेल किंवा एखाद्या जंगलात
रात्री मचाणावर रात्र काढली असेल तर कधीतरी मधेच एखादे झाड या काजव्यांच्या
प्रकाशाने उजळून निघते आणि मंद वाऱ्याबरोबर डोलूसुद्धा लागते आणि क्षणार्धात तो
प्रकाश परत मावळून जातो.
इंग्रजी मधे या
किटकांना “ग्लो वर्म” किंवा “फायर फ्लाय” असे म्हणतात. पण खरेतर हे वर्म सुद्धा
नाहित आणि फ्लाय किंवा माश्या सुद्धा नाहित. कोलिऑप्टेरा गणाच्या बिटल्स किंवा
ढालकिड्यांच्या (लॅपिरिडी) कुळात यांचा समावेश होतो. हे किटक अर्थातच निशाचर आहेत
आणि आणि त्यांच्या सुमारे २००० जाती असून त्यात सतत नविन उपजातींची भर पडत असते. जगभरात
सगळ्या देशांमधे काजवे लुकलुकताना दिसतात याला फक्त अंटार्क्टिका खंडाचा अपवाद
आहे. बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्याच्या नरांना
पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली
की बाहेर पडतात. मात्र त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात.
त्यांच्या आकार मात्र नरापेक्षा बराच मोठा असतो. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या
खालील बाजूस सहाव्या व सातव्या खंडांत तर, मादीत त्यामागील खंडांत असतात.
काजव्यांचा प्रकाश
सहसा पांढरा, पिवळा, हिरवा किंवा तांबडा असतो.
पोटामधल्या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज
विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. सामान्यपणे
काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने
प्रकाशतात. काही जातीच्या माद्या मात्र सतत काही सेकंद प्रकाशतात. प्रजनन काळात नर
आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश
त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते.
मात्र याचाच फायदा काही इतर जातीच्या काजव्याच्या माद्या घेतात. त्या प्रकाशून
नराला प्रतिसाद देतात पण तो नर मादीच्या जवळ आल्यावर चक्क त्याला खाउन टाकतात. मिलनाचा
हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते.
अंड्यातून बाहेर पडलेली
काजव्याची अळी आणि पंख फुटलेला प्रौढ काजवा यांची जीवनशैली परस्परविरूद्ध पण परस्परपुरक
असते. प्रौढ काजव्याला सगळे लक्ष पुनरूत्पादनावर केंद्रित यावे, अन्न शोधण्यात त्याचा
वेळ आणि शक्ती वाया जाऊ नये म्हणून अळीरूपातला काजवा खा खा खाऊन शरीरात चरबीचा साठा
करून ठेवतो. या अळीचा आहार मात्र स्पेशल असतो. गोगलगाय व तत्सम प्राण्यांखेरीज इतर
कशालाही ही अळी तोंड लावत नाही.
गोगलगायींची हालचाल
वाढते ती रात्रीच्या अंधारात त्यामुळे दिवसभर झाडाझुडपांच्या, पालापाचोळ्याच्या आसऱ्याने
पडून असणारी काजव्याची अळी रात्रीच गोगालगायीच्या मागावर निघते. या अळीच्या शेपटीमध्ये
ल्युसीफेरीन या द्रव्यामुळे प्रकाश उजळतो. पण या दिव्याचा भक्ष्य शोधण्यासाठी तीला
काहीच उपयोग नसतो कारण आपल्या काळ्या, गुळगुळीत डोळ्यांनी तिला काहीच दिसत नाही. फक्त समोरच्या उजेडातील कमीजास्तपणा
आणि अंधूक हालचाल जाणवते. दृष्टीतील ही जाणीव भरून काढण्यासाठीच निसर्गाने काजव्याच्या
अळीला जाडसर चाचपण्या (ऍटेना) दिल्या आहेत. शिवाय या अळीच्या तोंडाभोवती अतीसंवेदनाशील
अश्या सहा स्पर्शीकाही असतात. त्यांच्या मदतीने अळी आपले सावज - गोगलगाय शोधते.
सावज सापडल्यावर अळी
आपल्या विळ्यासारख्या धारदार जबड्याने गोगलगायीला दंश करते. हा दंश करायला तिला एक
सेकंदाहूनही कमी वेळ लागतो. पण या अल्प वेळात ती गोगलगायीच्या शरीरात विषारी द्राव
सोडते. विषाचा असर होईपर्यंत अळी अनेकदा गोगलगायीच्या शंखावर घट्ट बसून रहाते. गोगलगायीची
हालचाल मंदावली की अर्धमेल्या गोगलगायीवर ताव मारते. काजव्याच्या अळीला आपल्या शरीरातील
दिव्याचा काही उपयोग नसला तरी प्रौढ काजव्यांना मादीला आकर्षीत करून घेण्यासाठी हाच
दिवा उपयोगी पडतो. या प्रकाशनिर्मितीत कोणतीही उर्जा उत्सर्जीत होत नसल्याने यात उष्णता
वा ऊब ही नसते. त्यामुळे याचे वर्णन थंड उजेडाचा दिवा असेही करता येईल.
लुकलुकणारे हे
काजवे जरी दिसायला छान दिसत असले तरी त्यांचे छायाचित्रण तेवढेच कठिण असते. जवळपास
सर्वच काजवे निशाचर असल्यामुळे त्यांचा वावर रात्रीच्या काळोखातच असतो. यामुळे
त्यांच्या छायाचित्रणासाठी फ्लॅशसुद्धा वापरता येत नाही. नर काजवे सतत उडत
असल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ जरी पळत सुटलो तरी ते त्या वेळी प्रकाशमान होतीलच
असे नाही. ज्यावेळी ते प्रकाशमान असतात त्यावेळी छायाचित्रण केले तर ते त्यावेळी
हालचाल करून पुढे पळतात. त्यामुळे प्रकाशमान असलेल्या काजव्याचे छायाचित्र मिळवणे
मोठे दिव्याचे काम असते. नुकताच मी ठाणे
जिल्यातील जव्हारच्या आसपासच्या जंगलात फिरत असताना मला बरेच नर काजवे झाडावर चमचमताना
दिसले पण ते एवढे वेगाने उडत होते की त्यांच्यामागे पळूनसुद्धा मला त्यांची
छायाचित्रे काही मिळाली नाहित. मात्र जंगलामधे मला एका ठिकाणी मला एक काजव्याची
मादी सापडली. दिसायला ती अगदी एखाद्या पतंगाच्या अळीसारखी दिसत होती. मात्र
माझ्यासाठी महत्वाचे होते की तिचे पोट हिरव्या रंगाच्या मंद प्रकाशाने चमकत होते
आणि तो प्रकाशसुद्धा लुकलुकणारा नव्हता आणि सतत तेवत होता. आता दुसरे महत्वाचे काम
म्हणजे तो मंद प्रकाश छायाचित्रात पकडणे, याकरता कॅमेरा ट्रायपॉड्वर ठेवून चक्क ३०
सेकंदाचे लांबलचक एक्स्पोजर दिल्यानंतर तो हिरवा प्रकाश मला छायाचित्रात पकडता
आला.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com