Wednesday, March 16, 2016

लांब नाकाची कंदील माशी.

ही कंदील माशी आपल्या जंगलात फार कमी दिसते पण दक्षिणेमधल्या जंगलांमधे तीचा वावर सर्रास आढळतो. खरे तर हीला कंदील माशी अथवा इंग्रजी मधे लॅंटर्न फ्लाय म्हणत असले तरी ही काही माशीच्या कुळातली नाही, ही बग अथवा ढेकणे किड्यांच्या वर्गात येते. सहसा यांचा आकार मोठा असतो आणि त्यांचा एकंदर अविर्भाव एखाद्या फुलपाखरासारखा अथवा पतंगासारखा असतो. यांची रंगसंगती फुलपाखरांसारखीच उठावदार आणि आकर्षक असते आणि त्यावर जाळीदार, ठिपक्यांची नक्षीसुद्धा असते. मात्र यांना ओळखायची मोठी खुण म्हणजे यांचे लांबलचक असणारे नाक. काही काही जातीत तर हे त्यांचे लांब नाक त्यांच्या एकंदर शरीरापेक्षासुद्धा लांब असते. हे नाक नेहेमीच मोठे आणि वरच्या बाजूला वळलेले असते. शरीराच प्रमाणे त्याचा रंग सुद्धा भडक असतो. अतिशय प्राचीन काळी बहुतेक कोणीतरी या किड्याच्या बाजूला चमकणारा काजवा बघितला असावा आणि त्याला तो प्रकाश याच्या नाकातून येत असावा असा भास झाला असावा. याच कारणामुळे याचे नाव लॅंटर्न फ्ल्याय अथवा कंदील माशी असे पडले. त्यामुळे खरेतर याच्या शरीरातून कुठलाही प्रकाश उत्सर्जीत होत नाही.

या कंदील माशीच्या बाबत अचाट गैरसमज आहेत. एकतर यांचे नाक प्रकाशमान होते आणि दुसरा म्हणजे हा किटक कडकडून माणसाला चावतो आणि जर का त्या माणसाचा २४ तासाच्या आत लैंगीक संबंध आला नाही तर तो लगेच मरतो. अर्थातच हे निव्वळ भ्रम आहेत. कारण हा किटक ढेकणे किड्यांच्या वर्गातला आहे त्यामुळे त्याचे तोंडाचे अवयव हे फक्त झाड्याच्या खोडातील रस पिण्यायोग्य असतात आणि तो माणसाला चावूच शकत नाही. याचे नाक लांब भासत असले तरी खरे तर तो तोंडाचा भाग आहे आणि झाडाच्या खोडातून त्यातला रस पिण्याकरता त्याचा वापर केला जातो. जगात इतरत्र सापडऱ्या काही जातीत मात्र हे किडे झाडातील जो रस पितात तो काहीसा उग्र आणि विषारी असतो. ही द्र्व्ये त्यांच्या शरीरार साठवलीए जातात. जेंव्हा या किड्यांना धोका जाणवतो तेंव्हा ही उग्र आणि विषारी द्रव्ये फवारली जातात आणि त्यांचा स्वत:चा बचाव केला जातो. या किटक वर्गाची पंखांबाबत आणि त्यांच्या तोंडाच्या अवयवाबाबत खास वैशिष्ट्ये असतात. तोंडाच्या अवयवाचे दोन भाग असतात, एक भाग कठीण असून तो झाडाचे खोड कुरतडण्यासाठी किंवा एखादया करवतीसारखे ते खोड कापण्यासाठी होतो. दुसरा भाग म्हणजे दोन नलिका असतात. एका नलिकेतून झाडाचा रस शोषला जातो तर दुसरी नलीका मात्र लाळेकरता असते. यांचे पंख जरी वरून दोनच दिसत असले तरी ते ४ असतात. पंखांची वरची जोडी जरा जाड आणि लवचिक असते. हीच जोडी रंगीबेरंगीसुद्धा असते. खालची जोडी मात्र सह्सा अर्धपारदर्शक असून तलम असते आणि त्यांची घडी घालून ती वरच्या पंखांच्या जोडीखाली लपवली जाते.  

या कंदील माशीला सर्वप्रथम केरळच्या अरालम अभयारण्यामधे बघितले. बटरफ्लाय मीट ला गेलो असल्यामुळे आमचा फोकस फुलपाखरे शोधण्यावर होता. एका उंच झाडावर एका ठिकाणी त्या झाडाचा डिंक गळत होता आणि त्या वर ३ बुश ब्राऊन ही फुलपाखरे आकर्षित झाली होती. त्याच्या बाजुलाच एक ग्रे काऊंट फुलपाखरूसुद्धा बसले होते. आम्ही त्यांचे निरिक्षण / छायाचित्रण करत असताना मला त्या खोडाच्या मागच्या बाजूला, बरेच वर अजुन एक रंगीबेरंगी फुलपाखरू दिसले. त्याला दुर्बीणीतून न्याहाळताना जाणवले की त्याचे नाक जरा जास्तच लांब होते आणि मग कळले की त फुलपाखरू नसून दुसराच कुठला तरी किडा आहे. ते बरेच वर बसल्यामुळे त्याचा फक्त रेकॉर्ड शॉट काढून ठेवला. घरी येऊन मग तो कुठला किडा आहे ते शोदून काढले आणि त्याची माहिती मिळवली. आपल्याकडे तो सर्व जंगलात काही दिसत नसल्यामुळे पुढे काही बर्षे त्याचे परत दर्शन झाले नाही. मात्र या वर्षीच्या बटरफ्लाय मीटमधे परत त्याने गोव्यामधे दर्शन दिले. 

बोंडला अभयारण्यामधे आम्ही अगदी पहाटे पोहोचलो होतो त्यामुळे अगदे सकाळी आम्ही जेंव्हा बाहेर पडलो तेंव्हा मला एका झाडाच्या खोडावर हा किटक अगदी खाली बसलेला दिसला. अर्थातच त्यामुळे आम्हाला त्याचे अगदी जवळून आणि सगळ्या बाजूने छायाचित्रण करता आले. त्याच्या निळ्याशार जाळीदार पंखांवर उठावदार जर्द पिवळे मोठे ठिपके होते. त्याचे नाक लांबलचक होते आणि त्याच्या खालच्या बाजूला अगदी लालभडक रंग होता. पंख शरीरावर एखाद्या छपरासारखे ओढले होते. या किड्यानेसुद्धा छायाचित्रणाच्या वेळी पुर्ण सहकार्य दिले आणि अगदी न हलता तो शेवटपर्य़ंत शांत बसून होता. आता सध्या मात्र मी आपल्या महाराष्ट्रात मिळणाऱ्या कंदील माशीच्या शोधात आहे. या किड्याची खासियत म्हणजे त्याचे नाक लांबलचक तर असतेच पण त्याच्या टोकाला एक शेंगदाण्यासारखा फुगीर भाग असतो आणि त्यामुळे अर्थातच विचित्र आणि विनोदी दिसतो.

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

Saturday, March 12, 2016

पाणसाप : दिवड.

भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. गोड्या पाण्यात रहाणारा हा साप नद्या, तलाव आणि मोठ्या पाणथळीच्या जागी दिसतो. पाउस पडायला सुरवात झाली आणि सगळीकडे पाणी भरायला लागले की हे साप आपल्याला सहज दिसतात. २ ते ५ फूट वाढणारा हा साप काळसर, हिरवट, पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही नक्षी काहीशी बुद्धीबळाच्या पटासारखी दिसते म्हणूनच याचे इंग्रजी नाव “checkered keelback”. याचे डोळे बटबटीत आणि बुबुळे गोलाकार असतात. डोळ्यामागे एक तिरकी काळी रेघ असते. हा साप दिवसा आणि रात्रीसुद्धा कार्यरत असतो. याच्या खाण्यामधे प्रामुख्याने मासे, बेडूक, पाण्यातले किटक असतात. हा साप लहान असताना माश्यांची पिल्ले किंबा बेडकाची पाण्यातली लहान पिल्ले खाउन वाढतो. याचा स्वभाव प्रचंड तापट असतो आणि तो दंश करण्यात पटाईत आहे. याचा दंशसुद्धा जोरदार आणि वेदनादायक असतो. पण हा साप पुर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्या चाव्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा साप चिडला की डोके वर काढतो आणि मानेकडचा भाग रूंदावतो. यामुळे पटकन याने फणा काढला की काय असे वाटून हा नाग आहे असा समज होतो. या सापाला हाताळले असताना अतिशय घाण वासाचा स्त्राव तो सोडतो. याच्या बद्दल मात्र बरेच गैरसमज आहेत. हा पाण्याच्या आत चावला तर विष चढत नाही पण जर का हा पाण्याच्या बाहेर येउन चावला तर आपण काही जगू शकत नाही. अर्थात या साऱ्या कल्पना आहेत आणि प्रत्यक्षात हा साप कुठेही चावला तरी दाहक वेदनांच्या पलीकडे त्याचा काहीही त्रास आपल्याला होत नाही. हिवाळ्यात या सापाची मादी अंदाजे ३० ते ९० अंडी घालते. साधारणत: दोन महिन्यांच्या आसपास ती अंड्याच्या बाजूला राहून त्यांचे रक्षण करते.

सापाला नाकपुड्या असल्यामुळे तो सहज श्वसन करू शकतो पण त्याला वास ओळखता येन नाहित. हे गंधज्ञान होण्यासाठी तो आपली जीभ सतत आत बाहेर करत असतो. यासाठी त्याला त्याचे तोंड उघडावे लागत नाही. त्याचा वरचा जबडा आणि खालचा जबडा जिथे मिळतो तिथे एक फट असते त्यातून त्यांची जिभ आत बाहेर होऊ शकते. जेव्हा साप त्याची दूभंगलेली जिभ बाहेर काढतो तेव्हा हवेतील सूक्ष्म कण त्या जिभेवर घेउन जबड्याच्या आत असलेल्या एका खास अवयवापर्य़ंत पोहोचवतो आणि मग त्याला त्या पदार्थाचे ज्ञान होते. सापाची नजर तिक्ष्ण नसाते, त्याला विशिष्ट्य अंतरापर्य़ंत व्यवस्थित दिसते त्यानंतरच्या गोष्टीचे मात्र त्याला ज्ञान होत नाही.

हा साप बऱयाच वेळेला तळ्यात बघितला होता पण याचे छायाचित्रण काही शक्य झाले नव्हते. शहरात जेंव्हा साप पकडले जातात तेंव्हा त्यात नाग, अजगर, घोणस, मण्यार असे मोठे किंवा विषारी साप असले की त्यांचे छायाचित्रण सहसा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र हा साप एवढा सहस दिसणारा आहे की कायमच छायाचित्रणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. नुकताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती तेंव्हा जंगलाच्या आत बरेच छायाचित्रण झाले होते पन त्या तिथे MTDC च्या आवाराच्या मागे, मोहर्ली गावामागे मोठा तलाव आहे. मागच्या ऑगस्ट महिन्यात तो तलान पाण्याने काठोकाठ भरला होता आणि त्यात छान गुलाबी कमळाची फुले फुलली होती. आता मे महिन्यात मात्र पाणी अगदी आत खोलवर गेले होते. सगळीकडे चिखल सुकला होता आणि पाण्याची काही मोजकी डबकी उरली होती. या डबक्यांमधे उघड्या चोचीचे करकोचे मोठ्या संख्येने उतरले होते त्यांचे निरिक्षण करयला गेलो असताना एका डबक्याच्या काठाला हा दिवड आम्हाला दिसला. 

त्याचे अर्धे शरीर चिखलाच्या आत फटीत होते आणि तोंडाचा काही भागच बाहेर दिसत होता. आमची जाणिव अर्थातच त्याला झाली असावी कारण तो सारखी त्याची दूभंगलेली जिभ आत बाहेर करू लागला. मी आधी त्याच्या गोलाकार बूबूळ असलेल्या बटबटीत डोळ्यांचे छायाचित्रण केले आणि मग त्याच्या दूभंगलेल्या जिभेचे छायाचित्रण करू लागलो. त्याची जिभ सारखी आत बाहेर होत असली तरी ती बरोबर बाहेर मिळणे कठिण होते. एक दोनदा तशी बाहेर आलेली जिभ मला टिपताही आली पण बाजूने छायाचित्र घेतल्यामुळे त्यात एवढी मजा येत नव्हती. आता मी त्याच्या अगदी तोंडासमोर जाउन झोपलो आणि त्याच्या बाहेर येणाऱ्या जिभेची वाट बघू लागलो. दोन तिन वेळा प्रयत्न केल्याबर मात्र मला त्याची अगदी दूभंगलेली जिभ बरोबर टिपता आली.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

आयत्या बिळावर ......

पावसाळ्याच्या थोडेसे आधी कोकीळ पक्ष्याची कुहू..S...S..कुहू... आपण ऐकतो आणि आपल्याला माहित असते की ते स्वत: काही घरटे बनवत नाहित, मात्र कावळा आणि इतर पक्ष्यांच्या घरट्यातील त्या त्या पक्ष्याची अंडी ढकलून स्वत:ची अंडी तिथे घालतात. ते बिचारे पक्षी सुद्धा अगदी तेवढ्याच तळमळीने त्या परक्या पिल्लांना आपल्याच पिल्लांसारखे वाढवतात. शिंपी पक्ष्यासारखा अगदी लहानसा पक्षी असेल तर त्याच्या घरट्यातील पिल्ले त्या दांडग्या कोकीळेच्या पिल्लासमोर जगू शकत नाहित आणि ते चिमुकले आई-बापसुद्धा त्या अधाशी पिल्लाला भरवून भरवून हंगामाच्य शेवटी मरूसुद्धा शकतात. आता हे तर कोकीळ पक्ष्याबद्दल झाले पण असे काही किटकसुद्धा आहेत की जे स्वत: काही घरटी बनवत नाहित आणि असेच दुसऱ्याच्या घरात सरळ आपली अंडी घालून मोकळे होतात.

ककू वास्प हा असाच एक लहान माश्यांचा वर्ग आहे. साधारणत: या माश्या अतिशय रंगीबेरंगी, झळाळत्या निळ्या, हिरव्या किंवा लाल रंगाच्या असतात. या त्यांच्या झळाळत्या रंगामुळे त्यांना गोल्ड वास्प, ज्युवेल वास्प, रूबी वास्प अथवा एमराल्ड वास्प अशी अनेक वेगवेगळी नावे आहेत. या परावलंबी माश्या त्यांची स्वत:ची अंडी दुसऱ्या माश्या, मधमाश्या किंवा इतर किटकांच्या घरात घालतात. आज जगात यांच्या जवळपास ३००० उपजाती आढळतात. या माश्या त्यांच्या लहान आकारामुळे आणि चोरटया सवयीमुळे जंगलात, निसर्गात फार कमी दिसतात. पण कधी कधी सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या फुलांना मधाकरता भेट देतात. इतर माश्यांच्या घरट्याजवळ, पोळ्याजवळ त्या आपल्याला दिसू शकतात. त्यांच्या शरीराचे बाह्य आवरण हे टणक असते आणि त्यावर अनेक खड्डे असतात. या टणक आवरणामुळे जर का त्या घरट्याच्या मालकीण माशीने तीला दंश केला तर तीला तो जाणवत नाही. याचबरोबर ती तीच्या शरीराची अशी काही गुंडाळी करून घेते की तीचे नाजूक पोट आतल्या बाजूला सुरक्षित रहाते आणि कठीण भागावर त्या मालकीण माशीच्या दंशाचा काही परिणाम होत नाही आणि मग तिला लगेच तिकडून पळ काढता येतो. या सर्व माश्या एकेकट्या रहाणाऱ्या असतात. यांच्या सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात. काही माश्या इतर माश्यांच्या घरट्याच्या तोंडाशी लपून बसतात आणि त्या घराची मालकीण माशी आली तर तीला कडकडून दंश करून मारतात. त्यानंतर तिच्या आयत्या घरावर त्या ताबा मिळवतात आणि तिथे आपली अंडी घालतात. दुसऱ्या जातीच्या ककू वास्प मात्र त्या घराच्या मालकिणीला न मारता हळूच चोरून तिच्या घरात शिरतात आणि त्या तिथे आपली अंडी घालतात. अंडी घातल्या घातल्या मात्र त्या तिकडून लगेच पळ काढतात. आता त्या घराची मालकिण माशी मात्र तीच्या पिल्लांबरोबरच ह्या उपऱ्या माशीचीसुद्धा पिल्ले वाढवते. दुसऱ्या एक जातीची ककू वास्प मात्र फक्त इतर किटकांच्या घरटयातले अन्न चोरण्याकरता कुप्रसिद्धा आहे. ही वास्प मधमाश्या, कुंभार माशी आणि इतर माश्यांनी त्यांच्या पिल्लांकरता जमवलेले कोळी, फुलपाख्ररांच्या / पतंगांच्या अळ्या, मावा किडे त्यांच्या घरट्यातून पळवते.

मागे एकदा माझ्या घरी खिडकीच्या काचेवर अश्याच झळाळत्या हिरव्या रंगाची माशी आली होती. नेहेमीपेक्षा अर्थातच ती वेगळी असल्यामुळे मी तीचे नीट निरीक्षण केले आणि संदर्भ ग्रंथातून तीला ककू वास्प म्हणून ओळखले. त्यावेळेला तीचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. नंतरसुद्धा त्या मला आपल्या जंगलात दोन / चार वेळा उडताना दिसल्या पण त्या एवढ्या प्रचंड वेगाने तिकडून उडून गेल्या की परत त्यांचे छायाचित्रण शक्य झाले नाही. यावेळी मध्य प्रदेशातील पेंच या राष्ट्रीय उद्यानात गेलो असताना आम्ही रहात असलेल्या रिसॉर्टची बाग अगदी छान जोपासली होती. त्यामुळे सकाळी आणि दुपारी आम्ही वन खात्याने नेमून दिलेल्या वेळी आत जंगलात फिरायचो आणि मधल्यावेळी मी मात्र त्या बागेमधे फुलपाखरे, चतूर, कोळी आणि इतर काही वेगळे किटक दिसतात का हे शोधत फिरायचो. असाच एक दिवसी दुपारी जेवून परत येताना मला एका छोट्या झुडपाच्या पानाखाली काही तरी चमकलेले दिसले. मी निट निरखून बघितले तर ती या ककू वास्प ची जोडी होती आणि अगदी शांतपणे बसली होती. मी धावत रूम मधे गेलो आणि लांब पल्ल्याची झूम लेन्स बदलून मॅक्रो लेन्स कॅमेराला लावली आणि पळतच त्या ठिकाणी परत आलो. पण मधल्या वेळी त्या दोन्ही ककू वास्प तिकडून उडून गेल्या होत्या, माझी परत एकदा निराशा झाली. त्या तिकडून गेल्या होत्या तरीसुद्धा मी तिथे उन्हात त्यांची वाट बघायचे ठरवले. अंदाजे १५/२० मिनीटे तळपत्या उन्हात वाट बघितल्यावर मात्र त्यातली एक माशी अलगद त्याच झाडावर येउन बसली. मी आधी लांबूनच तीची थोडी छायाचित्रे घेतली. त्या नंतर शरीराच्या कमीत कमी हालचाली करत मी तीच्या जवळ सरकलो आणि अगदी जवळून तीची छायाचित्रे घेतली. आता मात्र मला हवी होती तशी छायाचित्रे तिने मला घेऊ दिली.
  
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

लांब मानेचा जीराफ व्हीवील.

आज जगभरात सबंध प्राणीवर्गात किटकांची संख्या सर्वात जास्त आहे. या किटकांचे बरेच प्रकार आहेत आणि त्यातसुद्धा सर्वात जास्त संख्या ही ढालकिड्यांची अथवा बीटल्स ची आहे. फुलपाखरांचे जसे पतंग चुलतभाउ आहेत तसेच या ढालकिड्यांचे व्हीवील हे चुलतभाउ आहेत. या व्हीवीलना ओळखायची खुण म्हणजे त्यांच्या तोंडाचा भाग हा सोंडेसारखा लांबट असतो. अगदी आपल्या घरातले उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या धान्यात आणि खास करून गव्हात जे पोरकीडे सापडतात तीसुद्धा एक व्हीवीलची एक जात आहे. ते पोरकीडे जरी आपल्या त्रासदायक असले तरी सगळेच व्हीवील काही आपल्याला त्रासदायक नसतात आणि इतर जाती फक्त झाडाची पाने खाउनच जगतात. या व्हीवील मधे सर्वात विनोदी प्रकार म्हणजे हा जीराफ व्हीवील. अगदी नावाला साजेल अशी याची मान लांबलचक असते. आपल्या भारतात यांची जी जात सापडते ती भगवी, लालसर असून जेमतेम २ सेंटीमीटर एवढीच लांब असते. या जातीमधे फक्त नरांचीच मान अगदी लांब असते आणि माद्या मात्र इतर किटकांसारख्याच आखुड मान असलेल्या असतात. मादागास्कर बेटांवर आढळणारी जात ही काळी कुळकुळीत असून तीचे पंख फक्त लालभडक असतात. न्यूझीलंड मधे सापडणारी यांची जास्त पुर्ण काळी असून ती जगातील सर्वात लांब व्हीवील म्हणून ओळखली जाते.  


आपल्याकडे हे जीराफ व्हीवील पावसाळ्यामधे अंदाजे जून / जूलै महिन्यात दिसतात. यांचा विणीचा हंगाम याच वेळी असतो. नर मादीची जोडी जमल्यावर ते त्यांच्या अन्नझाडाची कोवळी पाने दुमडून त्यांची गुंडाळी करतात आणि मग त्याच्या आतमधे मादी एक अंडे घालते. ही गुंडाळी करताना पान अगदी खास निवडले जाते. हे पान कोवळे पण नीट वाढलेले आहे की नाही याची मादी खात्री करून घेते. ही गुंडाळी करताना पानाच्या टोकाकडून केली जाते आणि देठाकडचा अर्धा भाग तसाच ठेबला जातो. पानाच्या देठाला धक्का न लावल्यामुळे शेवटपर्य़ंत पान तसेच हिरवेगार रहाते आणि आतल्या जीवाला खायला मऊ पान आणि संरक्षणसुद्ध मिळते. त्या पानाच्या आतला जीव जेंव्हा पुर्ण वाढतो तेंव्हा तो ती गुंडाळी हळूहळू सोडवून बाहेर येतो. हे किडे पुर्ण शाकाहारी असून त्यांना खायला झाडाची कोवळी पानेच लागतात. कधी कधी त्यांच्या अन्नझाडाच्या आसपास ते मोठ्या संख्येने दिसतात.

या कार्टून वाटणाऱ्या किड्याला मी बऱ्याच वर्षांपुर्वी आपल्या जंगलात बघितले आणि आश्चर्य वाटले की याची मान एवढी लांब कशी आणि कश्यासाठी ? अर्थात त्यावेळी कॅमेरा नसल्यामुळे त्याचे छायाचित्रण काही केले नव्हते. त्यानंतर पुढे थोडीशीच लांब मान असलेली त्याची मादी दिसली. त्यावेळी तीचे छायाचित्रण केले, पण तीथे आसपास बरेच शोधूनसुद्धा मला काही लांब मानेचा नर दिसला नाही. पावसाळ्यात काही मोजकेच दिवस हे दिसत असल्यामुळे त्या वेळेस हे किटक दिसले नाही तर त्यांच्या करता थेट एक वर्ष थांबायला लागते. त्यानंतर एका वर्षी मला तो नर दिसला आणि मी त्याचे एकच एक छायाचित्रे घेतले. पण त्यावेळेस फिल्म कॅमेरा असल्यामुळे फ्लॅशचे गणित काही बरोबर जमले नाही. केवळ एकच छायाचित्र देउन तो किडा मात्र तिकडून उडून गेला. त्यामुळे त्यानंतरच्या वर्षी मात्र त्याचे छायाचित्रण व्यवस्थीत करायचे असे ठरवूनच ठेवले. त्यावर्षी डिजीटल कॅमेरा असल्यामुळे छायाचित्र बरोबर आणि अचूक मिळाले आहे की नाही हे लगेच कळणार होते.  त्या वर्षीसुद्धा एक मादीच आधी दिसली तेंव्हा तीचे छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर मला त्यांच्या अन्नझाडाच्या आसपास त्यांची चक्क मिलन जोडी दिसली मी सावकाश त्यांच्या जवळ जाउन त्यांची एक/दोन छायाचित्रे घेतली. पण बहुतेक त्यांना माझी चाहूल लागली असावी कारण ते पटकन तिकडून उडून उंच झाडामागे दाट जंगलात निघून गेले. आता अजून एक वर्ष थांबायला लागणार होते पण त्याला काही इलाज नव्हता. वन्य आणि निसर्ग छायाचित्रणात तुम्ही कीतीही तयार असलात आणि तुमच्याकडे कितीही उच्च दर्जाचे कॅमेराचे साधन असले तरी समोरच्या प्राण्याने दर्शनच दिले नाही किंवा तो तिकडून निघून गेला तर तुम्ही काहीही करू शकत नाही.

या वर्षीच्या जून महिन्यात या जीराफ व्हीवीलना आपल्या जंगलात शोधायचा प्रयत्न केला पण ते कुठेच दिसले नाहीत. त्यांनी केलेल्या पानांच्या गुंडाळ्यासुद्धा कुठे सापडल्या नाहीत. जुलै महिन्यात मात्र जंगलात फिरताना एका जागी त्यांच्या गुंडाळ्या आढळल्या. त्याच्या बाजूच्याच झाडावर हे ३/४ जीराफ व्हीवील आपल्या लांबलचक माने फिरवत बसले होते. त्यांच्या बाजूलाच काही माद्यासुध्दा दिसत होत्या. मला हवे होते तसे लांब मानेच्य नराचे मला छायाचित्र अगदी सहज मिळून गेले, अर्थात त्याकरता मला ३/४ वर्षे वाट बघायला लागली होती.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com