Saturday, February 16, 2013

याला मधे बिबळ्याच्या मागावर...  

श्रिलंका हा एकदम चिमुकला देश, जेमतेम ६६,००० स्क्वे. कि.मि. पसरलेला. पण इथले विविधता अगदी भारतासारखीच वाखाणण्यासारखी आहे. तसे म्हटले तर हा देश भारतापासून एकदम जवळ आहे. भारतात आणि श्रिलंकेमधे जेमतेम २९ कि.मि चे अंतर आहे आणि मधे फक्त भारतिय महासागर आहे. याचमुळे श्रिलंकेला पर्ल ऑफ इंडियन ओशन असेही म्हणतात. आपल्या दक्षिण भारतासारखीच घनदाट जंगले आणि तसेच हवामान यामुळे इथली जैव विविधता वाखाणण्यासारखी आहे. इथल्या जंगलात आपल्याला ८४ जातींचे वेगवेगळे सस्तन प्राणी बघायला मिळतात. नुसते सस्तन प्राणीच नाही तर इथे वेगवेगळी सागरी कासवे, सुसरी, मगरी, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, फुलपाखरे अगदी सहज वेगवेगळ्या राष्ट्रीय उद्यानात बघायला मिळतात.

जगात बिबळ्यांकरता इथले याला राष्ट्रीय उद्यान अतिशय प्रसिद्ध आहे. १२९७ स्क्वे.कि.मी पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान श्रिलंकेमधील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध आहे. इथले नर बिबळे अतिशय धिट असल्यामुळे भर दिवसासुद्धा ते रस्त्यावर चालताना आढळतात आणि याच कारणामुळे जगातल्या सर्व वन्यछायाचित्रकारांमधे हे जंगल आफ्रिकेच्या नंतर अगदी वरच्या नंबरावर आहे. भारतातील कान्हा / बांधवगढ मधले वाघ जसे जिपमधल्या पर्यट्कांना सरावले आहेत तसेच इथले बिबळ्या वाघ अगदी जवळून पर्यट्कांना / छायाचित्रकारांना चांगल्या पोजेस देतात. अर्थातच बिबळ्यांबरोबर इथे हत्तींचे प्रमाणसुद्धा खुप जास्त आहे. हत्तींचे मोठे मोठे कळप इथला जंगलातील तळ्यांमधे मजेत डुंबताना, खेळताना सहज दिसतात. इथल्या जंगलात या दोन मोठ्या प्राण्यांबरोबरच चितळ, सांबर, रानडूक्कर, जंगली म्हशी, कोल्हे, मुंगूस असे अनेक प्राणी आणि १२०हून अधिक प्रजातीचे पक्षी दिसतात. हे जंगल सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या काळामधे पर्यटकांसाठी बंद असते. नोव्हेंबर ते जुनचा काळापैकी डिसेंबर ते मार्च हे उत्तम महिने समजले जातात.

याला राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच असलेले बुंदाला राष्ट्रीय उद्यान हे पक्षीनिरिक्षकांसाठी नंदनवन समजले जाते. २० कि.मी. च्या समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या या उद्यान अनेल विविध जातींचे पक्षी अगदी सहज बघता येतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या राष्ट्रीय उद्याना पक्ष्यांबरोबर मगर आणि सुसर दिसते, त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते जानेवारी या काळामधे चार वेगवेगळ्या जातीची समुद्री कासवे इथल्या किनाऱ्यावर अंडी घालायला येतात. समुद्रकिनाऱ्या जवळच्या जंगलामधे हत्ती, बिबळ्या दिसायची संधी मिळू शकते. इथे दिसणाऱ्या १९७ जातीच्या पक्ष्यांपैकी १३९ जातीचे पक्षी स्थानीक आहेत, तर इतर जातीचे पक्षी दूरवऊन स्थलांतर करून येतात.


या दोन अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यानांबरोबरच इथे वास्गामुवा, मिनेरीया, उदवालावे, विल्पट्टू, कौडूल्ला अशी अनेक राष्ट्रीय उद्याने बघण्यासारखी आहेत. पण भारतातल्या अनेक जंगलांमधे मला बिबळ्याने हुलकावण्या दिल्यामुळे, मी आता श्रिलंकेच्या याला जंगलामधे माझे नशिब खास बिबळ्याच्या छायाचित्रणाकरता आजमावणार होतो. निदान या जंगलात तरी आख्ख्या जगाने वाखाणणेल्या बिबळ्या मला छायाचित्रणासाठी भेटेल अशी आशा. अर्थात सोबत बुंदालाच्या जंगलाला आणि उदवालावाच्या जंगलालासुद्धा तिथल्या हत्तींकरता आणि स्थलांतरीत पक्षी आणि कासवांकरता भेट दिली. सुरवातीला मी उदवालावाच्या जंगलाला भेट दिली. पर्यटकांना पूरक असलेल्या इथल्या नियमांमुळे इथल्या जंगलात तुम्हाला अगदी दिवसभर आणि कुठल्याही भागात फिरता येत्ते. जंगलात आत शिरल्या शिरल्याच मला एका गरूडाने एका सरड्याची शिकार केलेली बघायला मिळाली. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर हत्तींची दोन पिल्ले दिसली. असेच प्राणी, पक्षी बघत बघत आम्ही एका विस्तीर्ण तलावाच्या काठावर आलो. तळ्यामधे रंगीत करकोचे, बदके, बगळे, पेलीकन असे अनेक पक्षी होते. त्यांचे छायाचित्रण करून आम्ही पुढे निघालो. नंतरच्या एका वळणावर रस्त्याच्या कडेलाच एक हत्तींची मोठी फॅमीली होती. त्यातल्या एका आईच्या कडेला अगदी नुकतेच जन्मलेले छोटेसे पिल्लू होते आणि ते कायम आईच्या आडोश्याने चालत होते. त्या पिल्लाचे एकट्याचे छायाचित्र घेण्याकरता आम्ही बराच प्रयत्न केला पण शेवट्पर्यंत ते त्याच्या आईच्या पलिकडे आणि तिच्या चार पायांमधेच घोटाळत फिरत होते. संध्याकाळी जंगलातून परतायच्या वेळी रस्त्याच्या अगदी मधोमध दोन मोर एकमेकांभोवती गिरक्या घेत घेत फिरत होते. आमच्या गाईड्च्या म्हणण्याप्रमाणे ते एकमेकांशी भांडत होते आणि खरोखरच मधेच त्यांनी दोघांनी अगदी हवेत एक छोटी उडी घेउन एकमेकांवर हल्ला केला. यानंतर ते परत एकमेकांभोवती गिरक्या घ्यायला लागले आणि परत त्यांनी हवेतच हल्ला चढवला. जंगलातल्या अश्या अनेक गमतीजमती बघून आम्ही शेवटी बाहेर पडलो.

यानंतर आम्ही जाणार होतो ते याला च्या जंगलात, अर्थात बिबळ्याचे दर्शन घ्यायला. मात्र निरोपाचा काहीतरी गोंधळ झाला आणि आम्ही जंगलात दिड तास उशीरा पोहोचलो. उन्हे हळूहळू उतरायला लागली होती. रस्त्यामधे आम्हाला तलावांमधे मोठ्या सुसरी दिसल्या. काळ्या मानेचे ससे तर अगदी रस्त्याच्या बाजूलाच गवत खाताना दिसत होते. मोठ्या मोठ्या घोरपडी रस्त्याच्या कडेला, झाडांच्या खोडावर अगदी सहज दिसत होत्या. पण ज्याचे दर्शन व्हायला पाहिजे होते तो बिबळ्या काही दिसत नव्हता. संध्याकाळची वेळ संपत आली होती आणि आम्हाला जंगलाच्या बाहेर पडणे जरूरीचे होते. सगळेच अगदी निराश झाले होते पण आनंदाची गोष्ट म्हणजे दुसरे दिवशी आम्ही आख्खा दिवस, अगदी पहाटे ६ ते संध्याकाळी ६ जंगलात फिरणार होतो.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही जंगलात जाण्याकरता निघालो. रस्त्यात दिसणारे पक्षी, प्राणी यांचे निरिक्षण करत, त्यांचे छायाचित्रण करत करत पुढे जात होतो. मधे भेटणाऱ्य़ा प्रत्येक जीपला आम्ही बिबळ्या दिसला का याची विचारणा करत होतो, पण त्या दिवशी सकाळच्या वेळात बहुतेक कोणीच बिबळ्या बघितला नव्हता. अश्याच एका वळणावरून जाताना आमच्या जिपच्या समोरच एक बिबळ्या अगदी रस्त्याच्य मधून पुढे जात होता. अर्थात आमच्या गाडीचा आवाज ऐकून त्याने त्याच्या वेग वाढवला आनि बाजूच्या दाट झाडीत तो गायब झाला. काही क्षणांकरता त्याने आम्हाला पाठमोरे दर्शन दिले होते. आम्ही पुढे गाडी दामटवली आणि अंदाजे तो कुठे बाहेर पडेल त्याठिकाणी त्याची वाट बघत राहिलो. ५/१० मिनिटे झाल्यावर आम्ही आमच्या कॅमेरात त्याची पाठमोरी आलेली छायाचित्र बघण्यात दंग झालो आणि तेवढ्यात.....मागच्या आमच्या दुसऱ्या जिपमधून आवाज आला. तो बिबळ्या परत एकदा त्यांच्या अगदी समोरून रस्ता क्रॉस करूने गेला आणि आमच्या अगदी मागेच होता. आम्ही मात्र आमच्या मुर्खपणामुळे छायाचित्रणाची संधी गमावली होती. भारतात तर कधी बिबळ्या दिसलाच नाही, श्रीलंकेत दिसला तर त्याचे छायाचित्रणच जमले नाही. परत एकदा नशिबाने दगा दिला.....अर्थात याच कारणामुळे परत एकदा जंगालात त्याला शोधायला बाहेर पडायचे हा निश्चयही याचमुळे पक्का झाला.

युवराज गुर्जर.
ygurjar@gmail.com

No comments:

Post a Comment