आज जगभरात सबंध
प्राणीवर्गात किटकांची संख्या सर्वात जास्त आहे. या किटकांचे बरेच प्रकार आहेत आणि
त्यातसुद्धा सर्वात जास्त संख्या ही ढालकिड्यांची अथवा “बीटल्स” ची आहे. फुलपाखरांचे जसे पतंग चुलतभाउ
आहेत तसेच या ढालकिड्यांचे व्हीवील हे चुलतभाउ आहेत. या व्हीवीलना ओळखायची खुण
म्हणजे त्यांच्या तोंडाचा भाग हा सोंडेसारखा लांबट असतो. अगदी आपल्या घरातले
उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या धान्यात आणि खास करून गव्हात जे पोरकीडे सापडतात
तीसुद्धा एक व्हीवीलची एक जात आहे. ते पोरकीडे जरी आपल्या त्रासदायक असले तरी
सगळेच व्हीवील काही आपल्याला त्रासदायक नसतात आणि इतर जाती फक्त झाडाची पाने खाउनच
जगतात. या व्हीवील मधे सर्वात विनोदी प्रकार म्हणजे हा “जीराफ” व्हीवील. अगदी नावाला साजेल अशी याची
मान लांबलचक असते. आपल्या भारतात यांची जी जात सापडते ती भगवी, लालसर असून जेमतेम
२ सेंटीमीटर एवढीच लांब असते. या जातीमधे फक्त नरांचीच मान अगदी लांब असते आणि
माद्या मात्र इतर किटकांसारख्याच आखुड मान असलेल्या असतात. मादागास्कर बेटांवर
आढळणारी जात ही काळी कुळकुळीत असून तीचे पंख फक्त लालभडक असतात. न्यूझीलंड मधे
सापडणारी यांची जास्त पुर्ण काळी असून ती जगातील सर्वात लांब व्हीवील म्हणून ओळखली
जाते.
आपल्याकडे हे
जीराफ व्हीवील पावसाळ्यामधे अंदाजे जून / जूलै महिन्यात दिसतात. यांचा विणीचा
हंगाम याच वेळी असतो. नर मादीची जोडी जमल्यावर ते त्यांच्या अन्नझाडाची कोवळी पाने
दुमडून त्यांची गुंडाळी करतात आणि मग त्याच्या आतमधे मादी एक अंडे घालते. ही
गुंडाळी करताना पान अगदी खास निवडले जाते. हे पान कोवळे पण नीट वाढलेले आहे की
नाही याची मादी खात्री करून घेते. ही गुंडाळी करताना पानाच्या टोकाकडून केली जाते
आणि देठाकडचा अर्धा भाग तसाच ठेबला जातो. पानाच्या देठाला धक्का न लावल्यामुळे
शेवटपर्य़ंत पान तसेच हिरवेगार रहाते आणि आतल्या जीवाला खायला मऊ पान आणि
संरक्षणसुद्ध मिळते. त्या पानाच्या आतला जीव जेंव्हा पुर्ण वाढतो तेंव्हा तो ती
गुंडाळी हळूहळू सोडवून बाहेर येतो. हे किडे पुर्ण शाकाहारी असून त्यांना खायला
झाडाची कोवळी पानेच लागतात. कधी कधी त्यांच्या अन्नझाडाच्या आसपास ते मोठ्या
संख्येने दिसतात.
या कार्टून
वाटणाऱ्या किड्याला मी बऱ्याच वर्षांपुर्वी आपल्या जंगलात बघितले आणि आश्चर्य
वाटले की याची मान एवढी लांब कशी आणि कश्यासाठी ? अर्थात त्यावेळी कॅमेरा नसल्यामुळे
त्याचे छायाचित्रण काही केले नव्हते. त्यानंतर पुढे थोडीशीच लांब मान असलेली
त्याची मादी दिसली. त्यावेळी तीचे छायाचित्रण केले, पण तीथे आसपास बरेच
शोधूनसुद्धा मला काही लांब मानेचा नर दिसला नाही. पावसाळ्यात काही मोजकेच दिवस हे
दिसत असल्यामुळे त्या वेळेस हे किटक दिसले नाही तर त्यांच्या करता थेट एक वर्ष
थांबायला लागते. त्यानंतर एका वर्षी मला तो नर दिसला आणि मी त्याचे एकच एक
छायाचित्रे घेतले. पण त्यावेळेस फिल्म कॅमेरा असल्यामुळे फ्लॅशचे गणित काही बरोबर
जमले नाही. केवळ एकच छायाचित्र देउन तो किडा मात्र तिकडून उडून गेला. त्यामुळे
त्यानंतरच्या वर्षी मात्र त्याचे छायाचित्रण व्यवस्थीत करायचे असे ठरवूनच ठेवले.
त्यावर्षी डिजीटल कॅमेरा असल्यामुळे छायाचित्र बरोबर आणि अचूक मिळाले आहे की नाही
हे लगेच कळणार होते. त्या वर्षीसुद्धा एक
मादीच आधी दिसली तेंव्हा तीचे छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर मला त्यांच्या
अन्नझाडाच्या आसपास त्यांची चक्क मिलन जोडी दिसली मी सावकाश त्यांच्या जवळ जाउन
त्यांची एक/दोन छायाचित्रे घेतली. पण बहुतेक त्यांना माझी चाहूल लागली असावी कारण
ते पटकन तिकडून उडून उंच झाडामागे दाट जंगलात निघून गेले. आता अजून एक वर्ष
थांबायला लागणार होते पण त्याला काही इलाज नव्हता. वन्य आणि निसर्ग छायाचित्रणात
तुम्ही कीतीही तयार असलात आणि तुमच्याकडे कितीही उच्च दर्जाचे कॅमेराचे साधन असले
तरी समोरच्या प्राण्याने दर्शनच दिले नाही किंवा तो तिकडून निघून गेला तर तुम्ही
काहीही करू शकत नाही.
या वर्षीच्या जून
महिन्यात या जीराफ व्हीवीलना आपल्या जंगलात शोधायचा प्रयत्न केला पण ते कुठेच
दिसले नाहीत. त्यांनी केलेल्या पानांच्या गुंडाळ्यासुद्धा कुठे सापडल्या नाहीत.
जुलै महिन्यात मात्र जंगलात फिरताना एका जागी त्यांच्या गुंडाळ्या आढळल्या. त्याच्या
बाजूच्याच झाडावर हे ३/४ जीराफ व्हीवील आपल्या लांबलचक माने फिरवत बसले होते.
त्यांच्या बाजूलाच काही माद्यासुध्दा दिसत होत्या. मला हवे होते तसे लांब मानेच्य
नराचे मला छायाचित्र अगदी सहज मिळून गेले, अर्थात त्याकरता मला ३/४ वर्षे वाट
बघायला लागली होती.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
No comments:
Post a Comment