Wednesday, March 16, 2016

लांब नाकाची कंदील माशी.

ही कंदील माशी आपल्या जंगलात फार कमी दिसते पण दक्षिणेमधल्या जंगलांमधे तीचा वावर सर्रास आढळतो. खरे तर हीला कंदील माशी अथवा इंग्रजी मधे लॅंटर्न फ्लाय म्हणत असले तरी ही काही माशीच्या कुळातली नाही, ही बग अथवा ढेकणे किड्यांच्या वर्गात येते. सहसा यांचा आकार मोठा असतो आणि त्यांचा एकंदर अविर्भाव एखाद्या फुलपाखरासारखा अथवा पतंगासारखा असतो. यांची रंगसंगती फुलपाखरांसारखीच उठावदार आणि आकर्षक असते आणि त्यावर जाळीदार, ठिपक्यांची नक्षीसुद्धा असते. मात्र यांना ओळखायची मोठी खुण म्हणजे यांचे लांबलचक असणारे नाक. काही काही जातीत तर हे त्यांचे लांब नाक त्यांच्या एकंदर शरीरापेक्षासुद्धा लांब असते. हे नाक नेहेमीच मोठे आणि वरच्या बाजूला वळलेले असते. शरीराच प्रमाणे त्याचा रंग सुद्धा भडक असतो. अतिशय प्राचीन काळी बहुतेक कोणीतरी या किड्याच्या बाजूला चमकणारा काजवा बघितला असावा आणि त्याला तो प्रकाश याच्या नाकातून येत असावा असा भास झाला असावा. याच कारणामुळे याचे नाव लॅंटर्न फ्ल्याय अथवा कंदील माशी असे पडले. त्यामुळे खरेतर याच्या शरीरातून कुठलाही प्रकाश उत्सर्जीत होत नाही.

या कंदील माशीच्या बाबत अचाट गैरसमज आहेत. एकतर यांचे नाक प्रकाशमान होते आणि दुसरा म्हणजे हा किटक कडकडून माणसाला चावतो आणि जर का त्या माणसाचा २४ तासाच्या आत लैंगीक संबंध आला नाही तर तो लगेच मरतो. अर्थातच हे निव्वळ भ्रम आहेत. कारण हा किटक ढेकणे किड्यांच्या वर्गातला आहे त्यामुळे त्याचे तोंडाचे अवयव हे फक्त झाड्याच्या खोडातील रस पिण्यायोग्य असतात आणि तो माणसाला चावूच शकत नाही. याचे नाक लांब भासत असले तरी खरे तर तो तोंडाचा भाग आहे आणि झाडाच्या खोडातून त्यातला रस पिण्याकरता त्याचा वापर केला जातो. जगात इतरत्र सापडऱ्या काही जातीत मात्र हे किडे झाडातील जो रस पितात तो काहीसा उग्र आणि विषारी असतो. ही द्र्व्ये त्यांच्या शरीरार साठवलीए जातात. जेंव्हा या किड्यांना धोका जाणवतो तेंव्हा ही उग्र आणि विषारी द्रव्ये फवारली जातात आणि त्यांचा स्वत:चा बचाव केला जातो. या किटक वर्गाची पंखांबाबत आणि त्यांच्या तोंडाच्या अवयवाबाबत खास वैशिष्ट्ये असतात. तोंडाच्या अवयवाचे दोन भाग असतात, एक भाग कठीण असून तो झाडाचे खोड कुरतडण्यासाठी किंवा एखादया करवतीसारखे ते खोड कापण्यासाठी होतो. दुसरा भाग म्हणजे दोन नलिका असतात. एका नलिकेतून झाडाचा रस शोषला जातो तर दुसरी नलीका मात्र लाळेकरता असते. यांचे पंख जरी वरून दोनच दिसत असले तरी ते ४ असतात. पंखांची वरची जोडी जरा जाड आणि लवचिक असते. हीच जोडी रंगीबेरंगीसुद्धा असते. खालची जोडी मात्र सह्सा अर्धपारदर्शक असून तलम असते आणि त्यांची घडी घालून ती वरच्या पंखांच्या जोडीखाली लपवली जाते.  

या कंदील माशीला सर्वप्रथम केरळच्या अरालम अभयारण्यामधे बघितले. बटरफ्लाय मीट ला गेलो असल्यामुळे आमचा फोकस फुलपाखरे शोधण्यावर होता. एका उंच झाडावर एका ठिकाणी त्या झाडाचा डिंक गळत होता आणि त्या वर ३ बुश ब्राऊन ही फुलपाखरे आकर्षित झाली होती. त्याच्या बाजुलाच एक ग्रे काऊंट फुलपाखरूसुद्धा बसले होते. आम्ही त्यांचे निरिक्षण / छायाचित्रण करत असताना मला त्या खोडाच्या मागच्या बाजूला, बरेच वर अजुन एक रंगीबेरंगी फुलपाखरू दिसले. त्याला दुर्बीणीतून न्याहाळताना जाणवले की त्याचे नाक जरा जास्तच लांब होते आणि मग कळले की त फुलपाखरू नसून दुसराच कुठला तरी किडा आहे. ते बरेच वर बसल्यामुळे त्याचा फक्त रेकॉर्ड शॉट काढून ठेवला. घरी येऊन मग तो कुठला किडा आहे ते शोदून काढले आणि त्याची माहिती मिळवली. आपल्याकडे तो सर्व जंगलात काही दिसत नसल्यामुळे पुढे काही बर्षे त्याचे परत दर्शन झाले नाही. मात्र या वर्षीच्या बटरफ्लाय मीटमधे परत त्याने गोव्यामधे दर्शन दिले. 

बोंडला अभयारण्यामधे आम्ही अगदी पहाटे पोहोचलो होतो त्यामुळे अगदे सकाळी आम्ही जेंव्हा बाहेर पडलो तेंव्हा मला एका झाडाच्या खोडावर हा किटक अगदी खाली बसलेला दिसला. अर्थातच त्यामुळे आम्हाला त्याचे अगदी जवळून आणि सगळ्या बाजूने छायाचित्रण करता आले. त्याच्या निळ्याशार जाळीदार पंखांवर उठावदार जर्द पिवळे मोठे ठिपके होते. त्याचे नाक लांबलचक होते आणि त्याच्या खालच्या बाजूला अगदी लालभडक रंग होता. पंख शरीरावर एखाद्या छपरासारखे ओढले होते. या किड्यानेसुद्धा छायाचित्रणाच्या वेळी पुर्ण सहकार्य दिले आणि अगदी न हलता तो शेवटपर्य़ंत शांत बसून होता. आता सध्या मात्र मी आपल्या महाराष्ट्रात मिळणाऱ्या कंदील माशीच्या शोधात आहे. या किड्याची खासियत म्हणजे त्याचे नाक लांबलचक तर असतेच पण त्याच्या टोकाला एक शेंगदाण्यासारखा फुगीर भाग असतो आणि त्यामुळे अर्थातच विचित्र आणि विनोदी दिसतो.

युवराज गुर्जर.

www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment