Tuesday, December 30, 2008

मिलनाचा जुगार.
कोळ्यांमधे नर हे सहसा मादी पेक्षा आकाराने लहान असतात. आज जगभरात आपल्या भारतात सापडणारे जायंट वूड स्पायडर (नेफिला जाती) आणि हेरेनिया जातीच्या नर मादीतील आकाराची भिन्नता अतिशय प्रसिद्ध आहे. नरांच्या या लहानश्या आकारामुळे मादी बऱ्याचदा त्यांना भक्ष्य म्हणूनच खाउन टाकते. यासाठी मिलनाकरता मादीजवळ जाणे हे कित्येक वेळा त्यांच्या नराकरता अतिशय धोक्याचे आणि जिवघेणे ठरते. अर्थात नरसुद्धा त्यांच्या मादीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेतातच. मादी ज्या वेळा तिची शिकार खाण्यात गुंगलेली असते त्यावेळी तिच्याजवळ जाउन मिलन करणे आणि लगेचच तिथून पळ काढणे असे काहे प्रयोग त्यांच्या सोयीचे ठरतात.
नर कोळी आकाराने लहान असल्यामुळे त्यांची वाढ झटपट होते. यामुळे अर्थातच ते मादी पेक्षा लवकर वयात येतात. या वयात आलेल्या नरांपुढे मोठा प्रश्न असतो तो मादी शोधण्याचा आणि तीला मिळवण्याचा. पण या करता त्याला काही जाळ्यातील विशीष्ट्य रेषमाचे धागे किंवा हवेत सहज पसरणाऱ्या संप्रेरकांचा फायदा होतो आणि तो त्याच्या जातीच्या मादीला शोधू शकतो. काही वुल्फ जातीच्या कोळ्यांमधे मादी जेंव्हा तीचे जाळे विणते तेंव्हा त्यातील काही रेषमाचे धागे हे विशीष्ट्य संप्रेरकाने बनवले जातात किंवा त्यावर या आकर्षित करणाऱ्या संप्रेरकाचे आवरण चढवले जाते. ह्या रेषमाच्या धाग्यांचा शोध घेत घेत नर मादी पर्यंत पोहोचू शकतो. कधी कधी नुकतीच वयात आलेली मादी स्वत:ही अशी उद्दीपीत करणारी संप्रेरके हवेत पसरवते. यामुळे तिच्याकडे जो नर लगेच आणि प्रथम आकर्षित होतो त्याबरोबर तीचे मिलन होते. अर्थात हे मिलन झाल्यावर मादी तो गंध पसरवण्याचे थांबवते आणि त्यामुळे दुसरे नर तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
जेंव्हा एखाद्या नराला त्याची मादी दिसते तेंव्हा तो आधी आपली "संभाव्य जोडीदार" अशी ओळख पटवून देतो. असे जर केले नाही तर कदाचीत ती मादी त्याला भक्ष्य म्हणून खाण्याचाही प्रसंग येउ शकतो. यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या वापारतो. जाळे बनवणाऱ्या जातीमधे जाळ्याचे विशीष्ट्य धागे हलवून साद दिली जाते. वुल्फ जातीचे कोळी जमिनीवर आपले पोट आपटून त्यांची जाणीव करून देतात तर ज्या कोळ्याची दृष्टी अगदीच अधू असते अश्या जातीचे नर तर चक्क मादीसमोर जाउन नाच करून दाखवतात. फनेल वेब कोळी बोगद्यासारख्या जाळ्याच्या दरवाज्याचे रेशीम हलवून मादीला बोलवतात. एवढे प्रयत्न केल्यावर जर मादी तयार असेल तर त्याला स्विकारते नाहीतर त्याला पळवून लावते, त्याचा एखादा पाय तोडते किंवा चक्क त्याला खाउनसुद्धा टाकते.
कोळ्यांच्या जोडीचे छायाचित्रण करायचे असेल तर साहजिकच त्यांचा थोडा अभ्यास करावा लागतो. जर का हा अभ्यास नसेल आणि आपण जायंट वूड स्पायडरच्या भल्या मोठ्या जाळ्यात बसलेली मोठी मादी आणि अगदी चिमुकला नर बघीतला तर आपण नक्कीच त्याला तीचे पिल्लू किंवा दुसराच कुठल्या जातीचा कोळी म्हणून समजणार किंवा दुर्लक्ष करणार. कित्येक वेळेला हे कोळी एकेकटे बरेच वेळेला दिसतात आणि त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते पण नर मादी दोघेही जवळजवळ मिळणे खुपच कठीण असते. अगदी जवळ दिसले तरी ते इतक्या तत्परतेने वेगळे होतात की एकाच छायाचित्रात त्यांना टिपणे खुपच नशिबाचे ठरते. मागे एकदा पावसाळ्यात, अंधाऱ्या जंगलात एका झाडावर क्रॅब स्पायडरने मधमाशी पकडली होती. तिथे त्याचे झटपट छायाचित्रण केले आणि घरी येउन कॉंप्यूटर वर छायाचित्रे डाऊनलोड केली आणि मोठ्या स्क्रीन वर बघीतली तेंव्हा जाणवले की त्या क्रॅब स्पायडरच्या मोठ्या मादीच्या पाठीवर अगदी चिमुकला नर बसला होता. तो काळपट, तपकिरी रंगाचा नर एखाद्या डागासारखा असल्यामुळे नगण्य वाटत होता आणि त्यामुळेच त्याच्याकडे माझे दुर्लक्ष झाले होते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment