Thursday, January 1, 2009

डुरक्या घोणस.
साप म्हटले की आपल्या डोळ्यासमोर बारीक, लांब, निमुळता आणि अतिशय झरझर सरपटत जाणार म्हणून दृष्य उभे रहाते. हा डुरक्या घोणस मात्र फक्त दोन ते तीन फुटांपर्यंत वाढतो. ह्याचे शरीर एकदम जाडजुड असून शरीराची लांबी कमी आणि शेपुट अगदी आखूड असते. ह्याच्या शरीरावर गडद तपकीरी धब्बे असतात. कधी कधी हे धब्बे फिकट भगव्या रंगाचेसुद्धा असतात. पिल्लांमधे हे रंग जास्त आकर्षक आणि चमकदार असतात. याचे डोके त्रिकोणी आणि काहीसे विषारी घोणसा सारखे दिसते. मात्र हा साप पुर्णपणे बिनविषारी आहे. याचे शरीर बारिक मानेनंतर एकदम जाड, गोल गरगरीत असते ते थेट शेपटीपर्यंत. शेपुट मात्र अगदीच थोटकी आणि निमुळती असते. याच्या तोंडावरचे आणि शेपटीवरचे खवले अतिशय खरखरीत असतात. पाठीवरचे आणि मधल्या शरीरावरचे खवले मात्र चमकदार आणि गुळगुळीत असतात.
आज भारतात हे साप सर्वत्र सापडतात आणि त्यांना रहाण्यासाठी रेताड जमीन आणि खडकाळ भाग लागतो. बऱ्याच वेळेला तो आपल्या दणकट डोक्याच्या सहाय्याने आणि खरखरीत खवल्यांच्या सहाय्याने मऊ मातीत स्वत:ला पुरून घेतो आणि कित्येक तास दबा धरून बसतो. या वेळेस त्याचे संपुर्ण शरीर आत मातीखाली असते आणि फक्त डोक्याचा, डोळ्यांचा भाग तेवढा जमीनीवर असतो. हा साप निशाचर असून रात्रीच्या वेळी बाहेर पडतो आणि भक्ष्याच्या शोधाकरता हिंडतो. निशाचर साप असल्यामुळे याच्या डोळ्यात उभी बाहुली असते. ही बाहुली दिवसा जास्त प्रकाशात बऱ्याच प्रमाणात आकुंचीत करून येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवले जाते. अर्थातच रात्री अंधाऱ्या कमी प्रकाशात ही बाहुली जास्तीत जास्त उघडी ठेवून जास्तीत जास्त प्रकाश आत घेतला जातो. अगदी कॅमेराच्या लेन्सच्या ऍपरचर सारखे काम ह्या डोळ्यांचे होते. साधरणत: उंदराच्या बिळासमोर दबा धरून हा साप बसतो आणि त्यातुन येणारा अथवा आजुबाजुने जाणाऱ्या उंदरावर, लहान प्राण्यावर तो झडप घालतो आ णि आपल्या वेटोळ्यात जखडून त्याला करकचून आवळतो. काही सेकंदातच गारद केलेल्या त्या प्राण्याला मात्र तो पुर्ण मेल्याशीवाय खात नाही. काहीसा गलथान वाटणारा जरी हा साप असल तरी तो वेटोळे घालून बसतो आणि प्रचंड वेगाने ते वेटोळे एखाद्या स्प्रिंगसारखे सोडून पटकन चावा घेतो. हे चावणे बिनविषारी असले तरी नक्कीच वेदनादायक असते. उंदीर, पाली, सरडे हे त्याचे मुख्य खाणे असले तरी तो बेडूक आवडीने खातो. क्वचीतप्रसंगी तो छोटे छोटे पक्षीही खातो. ह्याच्या पिल्लांना मात्र खाण्यासाठी छोटे किटकही चालतात. उन्हाळ्याच्या सुरवातीस ह्या जातीच्या सापाची मादी थेट सहा ते आठ पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले त्यांच्या पालकांसारखीच दिसतात मात्र त्यांचे रंग अधिक उठावदार आणि चमकदार असतात. आपल्याकडे या जातीच्या सापाला त्याच्या कातडीकरता मारले जाते. आकर्षक रंगसंगतीमुळे या कातडीला परदेशात बरीच मागणी आहे आणि हे शिकारी "बेबी पायथन" या नावाने ही कातडी विकतात.
निसर्गात हा सापच काय पण इतरही साप छायाचित्रणासाठी मिळणे खुपच कठिण असते. त्यातुनही जर का असे निशाचर साप असले तर ते अजुनच कठिण होते. बऱ्याच वेळेला जंगलातील पायवाटांवत फिरताना अधेमधे साप दिसतात पण त्यांना आपली चाहूल पटकन लागते आणि ते त्वरीत जलद गतीने लांबवर पसार होतात. आज आपल्या शहरात, गावात अनेक सर्पमित्र कार्यरत असतात. आजुबाजुला जर का चुकून घरात, घराच्या आसपास हे असे काही साप आले तर त्यांना योग्य ती काळजी घेउन हे सर्पमित्र पकडू नंतर जवळपासच्या जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. अशा वेळेस त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. कित्येक वेळेस तर एकाच वेळी वेगवेगळ्या आकारातील, वयातील, रंगातील एकाच जातीचे साप पण बघायला मिळू शकतात.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

1 comment: