Thursday, January 1, 2009

सुसाट जलद उड्डाण.
किटकांमधे प्रमुख अवयव हे त्यांचे पंख समजले जातात. त्यांच्या प्रौढ आयुष्यात त्यांना चार किंवा दोन पंख असतात. ह्या पंखांमुळेच आज जगभरात किटकांचे प्रमाण जास्त असते णि ते यशस्वी व्हायचे मुळ कारण आहे. सहसा हे त्यांचे पंख दोन थरांनी बनलेले असतात. हे दोन थर जरी नाजुक दिसत असले तरी अतिशय चिवट आणि मजबुत असतात. ह्या दोन थरांना मजबुती येण्यासाठी आत असंख्य नलिकांचे जाळे असते जे त्यांना मजबुती तर देतेच पण त्याच वेळेस त्यातुन रक्त प्रवाहाचा पुरवठासुद्धा करते. जेवढी किटकांमधे विविधता आढळते तेवढीच विविधता त्यांच्या पंखांच्या आकारात, रचनेत, रंगात पण असते. काही माश्यांचे पंख अतिशय लहान असतात आणि साध्या डोळ्यांना दिसूनही येत नाहीत तर पतंग, चतूर यांच्यासारख्या काही मोठ्या किटकांचे पंख प्रसंगी अगदी एक फुटाएवढे लांबसुद्धा असू शकतात. माश्यांचे, चतुरांचे, टाचण्यांचे पंख पारदर्शक असतात तर फुलपाखरांचे, ढालकिड्यांचे पंख अतिशय रंगीबेरंगी असतात.
हे किटक जरी चिमुकले असले तरी तरी त्यांच्या उडण्याचा वेग प्रचंड असू शकतो. ह्या त्यांच्या प्रचंड उडण्याच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांचे खाणे मिळवणे सहस साध्य होते. चतुरासारखे किंवा लुटारू माशीसारखे किटक हवेतल्या हवेत, उडता उडताच त्यांच्या तिक्ष्ण नजरेने भक्ष्याचा शोध घेतात आणि हवेतच त्यांच्यावर हल्ला चढवतात. बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ यासारखे पतंग फुलांवर मधाकरता झेपावताना तब्बल ३०० वेळा प्रतिसेकंद पंख हलवतात आणि हवेतल्या हवेतच, उडता उडता आपली लांब सोंड फुलांत खुपसून मध प्राशन करतात. त्यांची ही हालचाल एवढी जलद असते की आपल्याला उडताना त्यांचे फक्त शरीरच दिसते आणि पंखांची हालचाल जाणवून येत नाही. हॉवर फ्लाय किंवा इतर माश्या ह्यांचा तर वेग याहूनही जास्त असतो, त्या प्रतिसेकंद १००० वेळा पंखांची हालचाल करतात. ह्यावरूनच आपल्याला सनजू शकते की त्यांचे उड्डाण किती जलद असू शकते. ह्या जलद उडण्याचे आपल्या सर्वात जवळचे आणि सर्वांना माहित असणारे उडणे असते ते डासांचे. ह्या डासाचे गुणगुणणे आपण सतत ऐकत आलो आहोत. हे गुणगुणणे म्हणजेच त्यांच्या जलद पंख फडफडवण्याचा आवाज असतो.
फुलपाखरू फुलातील मध पित आहे, चतुर नदीच्या काठावर एका फांदीवर बसला आहे, ढालकिडे पानाच्या कडा कुरतडत आहेत अशी छायाचित्रे आपण नेहेमी बघतो आणि काढतोसुद्धा. ही अशी छायाचित्रे काढणे तसे थोडेफार सोपे असते. जर का तुम्हाला त्या किटकाची थोडीफार माहिती असेल, योग्य ते कॅमेराचे साधन असेल आणि थोडेफार थांबण्याची तयारी असेल तर खुप छान छायाचित्रे मिळू शकतात. पण ह्या जलद उडणाऱ्या किटकांची हवेतल्या हवेत, उडतानाची छायाचित्रे मिळवणे तसे थोडेफार कठिणच काम असते. परत यावेळीसुद्धा तुमच्याकडे कॅमेरा, फ्लॅश अशी साधने असावी लागतात, त्या किटकाची माहिती असावी लागते आणि "प्रचंड" वेळ थांबण्याची तयारी, चिकाटी असावी लागते. आता त्या किटकांची, त्यांच्या सवयींची माहिती असावी लागते कारण तो बी हॉक मॉथ हा कुठल्या फुलांना भेटी देतो आणि एकदा भेट दिल्यावर तो परत परत त्याच ठिकाणी येत रहातो असे जर का तुम्हाला माहित असेल तर त्याचे हे सोबतचे हवेतल्या हवेत मध पितानाचे छायाचित्र सहज सुलभ जमते. त्याच प्रमाणे हॉवर फ्ल्याय कुठल्या फुलांवर आकर्षित होतात हे माहित असेल आणि त्या किती वेळ अंदाजे "हॉवरिंग" करतात हा अंदाज असेल तर त्यांचेसुद्धा उडतानाचे छायाचित्रण करणे सोपे जाते. बराचे वेळ वाट बघून तो किटक तिथे येतच नाही, किटक आला तर तो "फ्रेम"मधे येत नाही, फ्रेम मधे आला तर फोकसिंग व्हायच्या आधी तो पुढे किंवा मागे जातो, किंवा अगदी छायाचित्र काढताना तो आजूबाजूला सरकतो अश्या अनेक अडचणी अश्या प्रकारच्या छायाचित्रणात येतात. कित्येक वेळेस तर छायाचित्र काढताना तो किटक पुढे उडून गेलेला असतो त्यामुळे "कोरे" छायाचित्र येते, पण जर का छायाचित्र बरोबर जमले तर असे काही छान दिसते की त्याला तोड नसते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


No comments:

Post a Comment