Thursday, January 1, 2009

सापाची मावशी.
पावसाळ्यानंतर ओल्या गवतात, पालापाचोळ्यात पटकन झालेली हालचाल जाणवते, ही असते सापसुरळी किंवा सापाची मावशी. इंग्रजीमध्ये हीला "स्किंक" असे म्हणतात. आज जगात ह्यांच्या बऱ्याच जाती आढळत असल्या तरी सर्वात जास्त प्रजाती ऑस्ट्रेलीयात आढळतात. आपल्याकडची ही जी सापसुरळी आहे ती भारतात सर्वत्र सहज सापडते. हीचा रंग गडद तपकिरी असून ती एकदम चमकदार, झळाळी असलेली असते. तीच्या अंगावर डोळ्यापासून ते शेपटीपर्यंत एक पांढरट पट्टा असतो. विणीच्या हंगामात नरांचा गळा गडद लाल, भगवा रंगाचा होतो. सहसा ह्या जमीनीवर सापडतात आणि जमीनीवरच्या ओल्या, सुक्या पालापाचोळ्यातून कायम फिरताना दिसतात. हीच्या हालचाली अतिशय चपळ असतात आणि त्यामुळे पालापाचोळ्यावर आवाजाचा कानोसा घेतला तर फक्त हीची शेपटीच बऱ्याचवेळेस पानाखाली दडताना दिसते. ह्या सापसुरळ्या मांसाहारी असतात आणि जमीनीवर धावत जाउन, झेप घेउन कोळी, मुंग्या आणि किटकांना पकडून खातात.
ह्या सापसुरळ्यांचे जीभ हे त्यांच्याकरता जाणीवेचे प्रमुख साधन आहे. इतर बरेचसे सरिसृप त्यांच्या दृष्टीवर, वास घेण्याच्या क्षमतेवर किंवा ऐकण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात. पण्य ह्या सापसुरळी सारखे काही जण त्यांच्या जिभेनेच चव आणि वास वेगवेगळे ओळखू शकतात. धोक्याची वेळी आपली शेपुट तोडून तिथून पळ काढणे ही त्यांची अजून एक खासियत. या जातीतीले नर विणीच्या हंगामात आक्रमकतेने मादीकरता इतर नरांशी भांडतात. मिलनानंतर माद्या साधारणत: झाडांच्या वठलेल्या ओंडक्यांखाली, दगडांच्या खबदाडीत अंडी घालतात. एका वेळेला अंदाजे ७/८ पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले अतिशय बारकी आणि पालकांपेक्षा अधिक गडद रंगाची असतात. ह्या सापसुरळ्या आणि इतर सरडे यांच्यामधे सहज ओळखण्याची खुण यांची त्वचा सरड्यांएवढी जास्त खरखरीत नसते आणि त्यांच्यासारखे यांचे पाय लांब आणि मजबूत नसतात.
आज जवळपास १००हून अधिक जाती भारतात आढळत असल्यातरी ह्यांचा अभ्यास जास्त न झाल्यामुळे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या सवयींविषयी जास्त माहिती आज उपलब्ध नाही. ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा रखरखीत, खवले असलेली, कोरडी आणि कुठल्याही प्रकारच्या ग्रंथी नसलेली असते. ह्या त्वचेवरील खवल्यांच्या आकडा, आकार, त्यांची जागा यांच्यावरून त्यांची ओळख बऱ्याचवेळेस होते. जेव्हा या सरपटणाऱ्या प्राण्यांचे शरीर वाढते तेंव्हा ही त्वचा त्यांना अपुरी पडते आणि मग ते ही अपुरी त्वचा कातीच्या स्वरूपात काढून टाकतात आणि त्या आत त्यांना नवीन, अधीक लवचीक आणि त्यांचे मोठे, वाढलेले शरीर सामावणारी त्वचा उपलब्ध असते.
अतिशय चपळ असणारी ही सापसुरळी एरवी कधीही एका ठिकाणी थांबत नाही. मात्र शित रक्ताचे हे प्राणी असल्यामुळे थंडीमधे, सकाळच्या प्रहरी कोवळ्या उन्हात त्या "उन खाताना" (बास्कींग) आढळतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात जेव्हा फुलपाखरांचे "चिखल पान" (मड पडलिंग) सुरु असते तेंव्हा हळूच दगडामागे लपून मग झपाट्याने त्यांच्यावर झडप घालताना मी त्यांना कित्येक वेळेला बघितले आहे. अर्थान नुसत्या जरी त्या बऱ्याच वेळेला दिसत असल्या तरी त्यांचे छायाचित्र मिळायला संयम आणि योग्य ती वेळच यायला लागते.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment