Thursday, January 1, 2009

पाण्यावर धावणारा किटक.
आपण आता आकाशात उडणारे पक्षी किंवा पाण्यात पोहोणारे मासे नेहेमीच बघतो, आपल्या त्यात विशेष असे काहीच वाटत नाही. आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर नवीन नवीन शोध लावून आणि आतातर ते "स्वस्त"ही करून आपणही आज आकाशात विमानातून उडू शकतो किंवा पाणबूडीतून पाण्याखाली खोल जाउ शकतो. पण हा "वॉटर स्केटर" अथवा "वॉटर स्ट्रायडर" म्हणजे एक अदभूत चमत्कार आहे. हा चक्क पाण्यावर चालत, धावत असतो. आपण अगदी रस्त्यावर शांत उभे असू तसा हा पाण्यावर एकदम स्थिर असतो. पण जेंव्हा एखादे भक्ष्य त्याच्या नजरेच्या टप्प्यात येते तेंव्हा हा अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्याच्यावर तुटून पडतो. ते पाण्यावर संथ तरळण्यात एवढे तरबेज असतात की त्यांची ही पाण्यावरची धावपळ पाण्यावर फारसे तरंगही उमटवू शकत नाहीत. पण पाण्यावर पाण्यासाठी आलेल्या भक्ष्याचा मात्र ते तोपर्यंत फन्ना उडवतात.
ह्या किटकाच्या अंगावर अतिसुक्ष्म असे पांढरे केस असतात जे त्याला पाण्यापासुन ओले होण्यास अथवा बुडण्यापासुन बचावतात. ते पाण्यावर लांब लांब उड्यापण मारतात पण अशी ही लांब उडी मारल्यावरसुद्धा जेंव्हा ते पाण्यावर उतरतात तेंव्हा त्याने पाण्यावरचा पृष्ठभाग दुभंगलेला नसतो. हे असे पाण्यावर लिलया तरळण्यासाठी त्यांना त्यांचे मागचे चार पाय उपयोगी ठरतात. हे पाण्यावर तरंगण्यात एवढे कुशल असतात की त्यांचे मिलनही ते पाण्यावर तरंगता, तरंगता, तरळत करतात. हा पाण्यावर तरळण्याचा त्यांचा वेगही जलद म्हणजे ३० इंच प्रतिसेकंद असतो. अशाच ह्या तरळणाऱ्या किटकांची जी समुद्रातील उपजात आहे ती जमीनीपेक्षा कित्येक मैल आत पाण्यावर सहज आणि जलद तरळत जाते. तेथे त्यांना नावलासुद्धा जमीन बघायला, चालायला मिळत नाही.
या किटकाचे वजन एवढे कमी असते की त्याला पाण्यावर तरंगण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागाचा तणाव अथवा ताठरता उपयोगी पडते. त्यातसुद्धा त्याचे ते जेमतेम वजन त्यांच्या शरीराच्या सहा पायांवर विभागलेले असते त्यामुळे ते पाण्यात न बुडता, पाण्यावर चक्क चालू शकतात. त्यानंतर ते वल्ही वल्हवल्यासारखे आपले मागचे पाय हलवतात आणि त्यांना तरळण्यासाठी प्रचंड गती मिळते. असेच पाण्यावर तरळताना त्यांना पाण्यावर उठलेल्या तरंगांमुळे पाण्यामधे कोणतरी किटक, भक्ष्य आले आहे हे समजते आणि मग त्वरेने त्या दिशेने जाउन त्याच्यावर हल्ला करतात. अर्थात हे असे जरी पट्टीचे शिकारी असले तरी त्यांना शह देणारा कोणीतरी असतोच. एक प्रकारचा ढालकीडा त्याच्या पोटातून एक तेलाचा थेंब पाण्यावर सोडतो यामुळे त्या पाण्याच्या पृष्ठभागावरचा तणाव प्रचंड कमी होऊन तो ढालकीडा त्या तेलाच्या थेंबामुळे प्रचंड वेगाने पुढे ढकलला जातो आणि त्याचा बचाव ह्या तरळणाऱ्या "वॉटर स्केटर"पासून होतो.
पाण्यावरचा हा किटक असल्यामुळे त्याचे छायाचित्रण नेहेमीच कठीन आणि चकवणारे असते. पाण्यावर असल्यामुळे तुम्हाला अगदी जपून तुमचा कॅमेरा आणि तुम्हाला संभाळून वावरावे लागते. तुमच्या जराशाही हालचालीने अथवा सावलीमुळे ते पाण्यावर दुरवर आत जातात आणि मग काही त्यांचे छायाचित्रण शक्य होत नाही. लांब पल्ल्याची लेन्स लावली की हवे तेवढे मोठे छायाचित्र मिळत नाही आणि मॅक्रो लेन्स लावली की ते किटक काही हवे तेवढे जवळ येत नाहीत. पाण्यावर ते सुद्धा अथक आणि प्रचंड वेगाने पळत असतात त्यामुळे त्यांचे स्थीर छायाचित्र मिळायला कित्येक वेळ शांतपणे वाट बघायला लागते. आपली जराशीही हालचाल किंवा त्याने बदललेली त्याची दिशा यामुळे बऱ्याच वेळा छायाचित्रात स्पष्ट प्रतिमे ऐवजी धुसर आणि हललेल्याच प्रतिमाच जास्त बघायला मिळतात. अर्थातच न थकता आणि निश्चयाने त्यांच्या मागावर राहिलो तर नक्कीच छान छायाचित्र मिळण्याची हमी असते.
युवराज गुर्जर.

http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment