Friday, October 8, 2010

किटकांचा सापळा : कंदीलपुष्प.

आपल्या आजुबाजुला असणाऱ्या प्रत्येक फळझाडांना, पिकांना आणि इतर सर्वच झाडानाफळधारणेकरता परागीभवनाची फ़रज असते. एका फुलातील परागकणांची आवक-जावक दुसऱ्या फुलांमधे झाली की त्याला परागीभवन झाले असे म्हणतात. अर्थातच या परागीभवनामधे मधमाशा, फुलपाखरे किंवा यासारख्या बऱ्याचशा इतर किटकांचा सहभाग महत्वाचा असतो. या किटकांना आकर्षित आणि उद्युक्त करण्यासाठी फुलांमधे अतिगोड मधुरस असतो आणि हा मधुरस या किटकांचे मुख्य अन्न असते. जर हे परागीभवन शक्य व्हायला हवे असेल तर फुलांना जास्तीत जास्त किटकांना आकर्षित करायला हवे आणि याकरता निसर्ग फुलांना दोन क्लुप्त्या बहाल करतो. या फुलांना किटक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतील असे उठावदार रंग असतात, इतकेच नव्हे तर आत मधाचा साठा कुठे दडलाय हे दाखवणाऱ्या दिशादर्शक रेषा किंवा खुणासुद्धा असतात. आपल्या साध्या डोळ्यांना जरी या खुणा दिसत नसल्या तरी किटकांच्या खास डोळ्यांना त्या सहज बघता येतात. किटकांना अजून आकर्षित करण्यासाठी फुले त्यांच्या सुगंधाचा वापर करतात. फुलांच्या या मादक सुवासाने बरेचसे किटक त्या फुलाकडे आकर्षित होतात. या दोनही पद्धतीत जेंव्हा किटक फुलाकडे भेट देतो तेंव्हा मात्र त्याला त्याचा मोबदला फुलाला द्यावा लागतो. मध, परागकण किंवा दोन्हीही देऊन फुल आपल्या परागीभवनाचा कार्यभाग साधून घेते.

झाडांच्या काही जातीत या परागीभवनाचे काम मात्र एकदम वैशिष्ट्यपुर्ण असते. अशीच एक खास दुर्मिळ जात म्हणजे सेरोपेजीया किंवा कंदीलपुष्प. आज जगभरात या वनस्पतीच्या २३५ जाती उपलब्ध आहेत आणि त्यातील अंदाजे ४० जाती भारतात सापडतात. मिल्कवीड किंवा रूईच्या कुळातल्या या झाडाचे उपजातीप्रमाणे वेगवेगळे आकार, प्रकार असतात. काही दुसऱ्या झाडांच्या आधाराने वाढणाऱ्या वेली असतात तर काही अगदी खुरटी झुडपे असतात. काही जातीत जमिनीवर धावणाऱ्या, पसरणाऱ्या वेली असतात. यांचा आकार वेगवेगळा असला तरी यांची खासियत असते ती यांच्या फुलामधे. कंदीलपुष्प हे नावाप्रमाणेच दिवाळीतल्या एखाद्या आकाशकंदीलासारखे भासते. या फुलाचा आकार म्हणजे फुलाच्या तळाशी, देठाभोवती फुगीर लंबगोल, त्यातून वर जाणारी अरूंद नळी आणि सर्वात वर पाच खिडक्या असलेला नक्षीदार कळस. लिनस या शास्त्रज्ञाप्रमाणे याचे सेरोपेजीया हे नाव “फाउंट्न ऑफ वॅक्स” (केरोस म्हणजे वॅक्स आणि पेगे म्हणजे फाउंट्न) असे आहे. इतर फुलांसारखी ही फुले काही खास रंगीबेरंगी नसतात. साधारणत: फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असतो आणि त्यावर लाल, जांभळे ठिपके, रेघांची नक्षी असते. यांचा रंग आकर्षक नसला तरी त्यांची रचना मात्र नक्कीच आपल्याला थक्क करणारी असते. ही जात किटकभक्षी नसली तरी ती किटकांना परागीभवन होइपर्यंत त्यांच्या पिंजऱ्यात जखडून मात्र ठेवते. या फुलांना विचीत्र, कुजका वास असतो आणि त्यावर सुक्ष्म केस असतात. यामुळे त्यांच्यावर सडक्या मांसावर ज्या माश्या आकर्षित होतात त्याच माश्या या फुलांवरपण आकर्षित होतात. फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजुला आपल्या नळीवर उतरण्याची जागा आणि पुढे कुठे जायचे ते दाखवणारे ठिपके किंवा रेघा असतात. या दिशादर्शक ठिपक्यांप्रमाणे त्या माश्या आत जायला लागतात. आत मेणचट आणि उग्र वास त्यांना अजून अजून आत शिरायला प्रवृत्त करतो. आतल्या नळीच्या घसरगुंडीवर खालच्या बाजूने वळलेले राठ केस असतात. त्यांना दाबत दाबत ती माशी आत शिरते आणि थेट जिथे पुंकेसर, परागकण आहेत तिथे पोहोचते. आता फुलाचा अगदी आत शिरलेली माशी राठे केसांमुळे उलटी परत जाउ शकत नाही. फुलाच्या मध्यभागी पुं आणि स्त्री केसारांच्या जागी अवतीबोवतीच्या अर्धपारदर्शक खिडक्यांतून प्रकाश येत असतो त्यामुळे ती माशी तिथेच घोटाळत रहाते आणि तिच्या या हालचालीमुळे त्या फुलाचे परागीभवन सहज शक्य होते. हे परागीभवन झाल्यावरच ते फुल जे पुर्वी ताठ उभे असायचे ते मलूल होऊन उलटे लटकते आणि त्याच्या आतले राठ केस सुद्धा मऊ होतात. या मऊ झालेल्या केसांमुळे आणि फुल उलटे झाल्यामुळे आत अडकलेल्या माशीला बाहेर पडायला मार्ग मिळतो आणि ती बाहेर उडून दुसऱ्या फुलाकडे जाते. परागीभवनाची एवढी क्लिष्ट प्रक्रिया असल्यामुळे आणि त्यांना विशीष्ट जातीच्या आणि आकराच्या माश्याच लागत असल्यामुळे ही वनस्पती अतिशय दुर्मिळ झालेली आहे. याच बरोबर या वनस्पतीचा जमिनीतला कंद मुंगुसा सारख्या प्राण्यांनी, आदिवासींनी उकरून काढल्यामुळे यांचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे.

अर्थातच दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे यांचे छायाचित्रण करणे म्हणजे एक मोठा “challenge” असतो. या वनस्पतीला शोधणे, त्यात ती त्यावेळी फुललेली असणे हे खुप महत्वाचे असते. कास, महाबळेश्वर या ठिकाणी यांच्या काही जाती आहेत त्या खास शोधायला, छायाचित्रण करायला गेलो. त्या सापडल्यावर त्यांचे वैशिष्ट्य कळले. त्यांना कुठे शोधायचे, त्यांना हवामान कसे लागते, जमिन कशी लागते हे कळले. त्यानंतर तर काही जाती अगदी मुंबईतसुद्धा सापडल्या. त्यांच्या फुलांचे छायाचित्रण करायला कठिण अश्या कड्यांवर कसरत करत गेलो पण त्यानंतर जी काही छायाचित्रे मिळाली त्याचा आनंद काही न्याराच होता. या सेरोपेजीया जातीविषयी फक्त माहिती देणारी एक वेबसाईट आहे (www.ceropegia.minks-lang.de) त्यांच्याकडे या आपल्याकडच्या जातींची जुनी चित्रे होती पण छायाचित्रे नव्हती ती त्यांना मी आणि माझ्या मित्रांकरवी पुरवली आणि या जातीच्या अभ्यासाकरता थोडासा हातभार लावला. उद्देश फक्त एवढाच की अधिकाधिक लोकांना या जातीविषयी शास्त्रीय माहिती मिळावी आणि चुकूनसुद्धा या वनस्पतीला न उपटता या जातींचे कायम जतन व्हावे.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment