Friday, October 8, 2010

उडणारे पाचू...

आज जगभरात जिवीत असलेल्या प्राण्यांमधे सर्वात जास्त संख्या किटकांची आहे. या किटकांमधेसुद्धा ढालकीडे किंवा बीटल्स यांची संख्या सर्वात जास्त आहे. जगातील प्रत्येक काना कोपऱ्यामधे, निरनिराळ्या अधिवासांमधे हे ढालकीडे वास्तव्य करतात. या ढालकीड्यांमधे अनेक वर्ग आहेत त्यातील एक आहे “बुप्रेस्टीडी”. ह्या वर्गामधे आज सर्वात जास्त म्हणजे १५,००० उपजाती आढळून येतात आणि हा वर्ग ओळखला जातो तो ज्वेल बीटल्समुळे. हे ज्वेल बिटल्स आकाराने मोठे आणि अतिशय झळाळणाऱ्या उठावदार रंगाचे असतात. याच कारणामुळे आज जगभरात किटक छंद म्हणून गोळा करणाऱ्यांमधे त्यांना मोठी मागणी असते. जसे किटक छंद म्हणून जमवणाऱ्यांमधे यांना मागणी असते तसेच यांच्या चमकदार पंखांपासून अनेक दागिने बनवले जातात आणि त्यासाठीसुद्धा त्यांना मोठी मागणी असते. आज या किटकांच्या वरच्या पंखांपासून बनवलेल्या गळ्यातील पदकांना आणि कानातील कर्णफुलांना जगात जबरदस्त मागणी आहे आणि इंटरनेटवर फक्त “इन्सेक्ट ज्वेलरी”च्या अनेक वेबसाईट आहेत. अर्थात हा उद्योग कायदेशीर आहे की नाही हा मोठा वादाचा मुद्दा आहे.
या ज्वेल बिटल्सचा आकारान भिन्नता असते, अगदी ३ mm पासून ते १०० mm पर्यंत ते सापडतात. पण सर्वसाधारणपणे सापडणारे ज्वेल बिट्ल्स हे २० / ३० mm च्या आसपास असतात. यांचा आकार गोलाकार आणि लांबूळका असते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चिकूच्या बी सारखा यांच्या शरीराचा आकार असतो. यांच्या वरच्या पंखावरचे चमकदार, झळाळणारे रंग आणि त्यांची झालेली नक्षी ही अतिशय मनोहारी असते. पण नवलाची गोष्ट म्हणजे हे रंग त्यांच्या पंखांवरील लवकांमुळे (pigments) आलेले नसतात तर त्यांच्या पाठीवर असलेल्या अतिसुक्ष्म खाचांमधे प्रकाश वेगवेगळ्या दिशेने परावर्तित झाल्यामुळे असतात. आपल्याला CD / DVD च्या खालचे रंग हे याच कारणामुळे सप्तरंगी भासतात. यामुळे जेंव्हा जंगलात आपण हे ज्वेल बिटल्स बघतो तेंव्हा ते आपल्या हिरवे भासत असले तरी मधेच ते निळे, तपकीरी किंवा अगदी लाल भडकसुद्धा दिसतात. या बिटल्सची अळी ही झाडाखाली मुळांमधे, खोडामधे किंवा पाना मधे रहाते. यांच्यातील काही जाती या लाकूड पोखरणाऱ्या असल्यामुळे त्या कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरतात.
सध्या कॅनडामधे या ज्वेल बिटल्सवर खास संशोधन सुरू आहे. त्यांच्या अभ्यासामधे असे दिसून आले आहे की यांच्यातील काही जाती या अगदी ८० किलोमिटर दुर वर वणव्याची आग ओळखू शकतात. इतकेच काय पण जळणाऱ्या लाकडाचा फुटणारा आवाज आणि त्यावेळी येणारा धूर सुद्धा ते सहज ओळखू शकतात. या किटकांमधे उष्णता जाणवणाऱ्या खास अवयब असतात यामुळे त्यांना वातावरणातील आगीमुळे वाढलेली उष्णता त्यांना लगेच जाणवते. ही उष्णता जाणवल्यावर तिथे या किटकांच्या माद्या त्वरीत उड्डाण करतात आणि त्या तिथल्या जळक्या लाकडात आपली अंडी घालतात. त्या जळक्या लाकडात त्यांच्या अळ्या पुढे वाढतात. आजूबाजूला आग / वणवा लागल्यामुळे त्या ज्वेल बिटलच्या अंड्यांना आणि अळ्यांना तिथे त्यांचे शत्रु नसणार ही मानसिक भावना त्यापाठी असते. सध्या हे किटक ज्या अवयवानी ही आग ओळखतात त्याचा वापर आपल्याकरता कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे.
आपल्याकडे पावसाळ्यात या झळाळत्या रंगाच्या ज्वेल बिटल्सच्या अनेक जाती दिसतात. यामधे काही अगदी लहान असतात तर काही अगदी २ इंचा एवढ्या मोठ्याही असतात. नुकताच वसईजवळच्या तुंगारेश्वर अभयारण्यात गेलो असताना मला एका झाडावर या ज्वेल बिटलची मादी दिसली. तीचे छायाचित्रण करत असतानाच एक मोठा नर तीच्या बाजूला येऊन क्षणभर विसवला पण अगदी लगेचच दोघेही अगदी उंच झाडावर जाउन बसले. दुपारच्या तळपत्या उन्हात ते अगदी खालुनही जोरदार चमकत होते. मी तिथेच थोडे लांब जाउन त्यांची वाट बघत उभा राहिलो. थोड्या वेळाने ती मादी परत त्याच झाडावर खाली येऊन बसली. आता मला माहित असल्यामुळे मी थोडे लांबूनच तिचे छायाचित्रण केले. तेवढ्यात तो नर परत तिच्याजवळ आला आणि त्यांचे मिलन झाले, अगदी डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच हे सारे काही घडले आणि ते परत उडून उंच जाउन बसले. मी परत लांब जाउन थांबलो आणि आता एकदम तयारीत होतो. काही वेळाने ती मादी परत खाली येउन बसली आणि तो नर तिच्या कडे झेपावतानाच मला त्यांचे छायाचित्र ट्पिता आले. त्यानंतर मल त्यांची मिलनाची आणि बाजूबाजूला बसले असतानाची अनेक छायाचित्र घेता आली.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment