पावसाळ्यातील हिरवाई....
एप्रिल / मे च्या
उन्हाळी तडाख्यात जंगलाची पुर्ण रया जाते. सगळीकडे जाउ तिथे रखरखाट, सुकलेली झाडे,
पान नसलेली खराट्यासारखी झुडपे अगदी जमिनीवरसुद्धा सुके पिवळे गवत. पण जून महिन्याच्या
सुरवातीसच आकाश झाकोळायला लागते, प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागतो, काळे ढग जमायला लागतात, गडगडायला लागते आणि
पावसाळा येऊ लागल्याची खात्री पटायला लागते. अचानक टपोरे थेंब कोसळायला सुरूवात होते.
तापलेली, कोरडी जमीन पहिला पाऊस आणि त्याचा ओलेपणा शोषायला लागते. मातीचा छानसा वास हवेत
दरवळायला लागतो. डोंगरावर सुर्यकिरणांना हे काळे ढग झाकोळून टाकतात. त्यांचा क्षणाक्षणाला
बदलणारा आकार आणि गुलाबी, लाल, पिवळा, भगवा आणि एवढेच काय पण सोनेरी रंगसुद्धा मनाला एकदम प्रसन्न करतो.
अगदि एप्रिल, मे महिन्यापर्यंत आपल्याकडचे
जंगल हे पानगळी असल्यामुळे तिथे फक्त निष्पर्ण झाडे आणि त्यांचा कोरडा तपकिरी रंग एवढेच
दिसत असते. मधूनच एखादा कुठे हिरवा भाग असला तर असतो. पण हे चित्र जून महिन्याच्या सुरवातीलाच बदलून जाते. धूळ भरलेली
झाडे पुसल्यासारखी चकचकीत होतात तर सुकलेली वाळकी, तपकिरी झाडे एकदम हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छ्टांमधे बदलून
जातात. आता संपुर्ण वातावरण, हवामान आणि एकंदर सगळे दृष्यच जादूगाराची छडी फिरवावी तसे पालटून जाते. सगळीकडे
चकचकीत, झळाळणारा हिरवा रंग एखाद्या कात टाकलेल्या सापाप्रमाणे दिसू लागतो. रस्त्याच्या
आजूबाजूनी छोटे छोटे नाले सगळा पालापाचोळा,
काटक्या घेउन वाहायला लागतात. नंतर धबधब्यांमधे पांढरेशुभ्र
पाणी खळखळायला लागते.
या मोसमात आपल्याला
किटकांच्या आणि झाडाझूडपांच्या बऱ्याच नवनवीन जाती बघायला मिळतात. अगदी रस्त्यावरच
आपण शेकडोंनी लाल, भगव्या रंगाचे "सिल्क कॉटन बग्ज", जायंट वूड स्पायडरची भलीमोठी जाळी चमकताना दिसतात. पहाटे पहाटे
पावशा (ब्रेन फिव्हर बर्ड) ओरडताना ऐकू येतो. नशीब अगदीच जोरावर असेल तर एखादा मोरसुद्धा
नाचताना आढळू शकतो. पार्श्वभुमीवर बेडकांचे "डराव डराव" सुरू असते. खेकड्यांच्या
माद्या नाल्याच्या आजूबाजूला त्यांची पिल्ले टाकायला पळताना दिसतात.
अगदी पावसाची एखाद
दुसरी सर पडून गेली की काही जंगली लिली, काळी मुसळी ही फुलायला लागते. मजेची बाब
अशी की ह्या वनस्पती जेमतेम ७ / ८ दिवसच दिसतात. त्यामुळे त्यांना बघायला तुम्ही
चुकलात तर थेट पुढच्या वर्षीपर्य़ंत वाट बघायची. थोडा जास्त पाउस झाला की त्यावेळेला
दिसणाऱ्या दुसऱ्या छोट्या वनस्पती आहेत. जंगली हळद किंवा कुरकूमा चे लाल, गुलाबी, जांभळे फुलांचे तुरे
अगदी जमिनीतूनच बाहेर आलेले असतात. बचनाग किंवा ग्लोरी लीली चा वेल याच वेळेस बहरतो.
ह्याच्या फुलांचा रंग आणि आकारसुद्धा अतिशय आकर्षक असतो. रस्त्याच्या दुतर्फा गुलाबी
/ जांभळ्या रंगाच्या तेरड्याचे रान फुललेले असते. सात वर्षांनी फुलणारी जांभळी कारवीसुद्धा
तुम्ही याचे वेळेस दिसू शकते. याच काळात सोनकी,
पेव, लिया ह्यांचीसुद्धा फुले फुलतात ज्यावर खुप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे आणि इतर
किटक आकर्षित होतात.
बऱ्याचश्या पक्ष्यांचा
पण हा विणीचा हंगाम असतो कारण ह्यावेळी त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी खुपसारे
खाणे उपलब्ध असते. ताडाच्या उंच झाडावर बया सुगरण पक्षी आपापली सुंदर घरटी बांधत असतात.
बया पक्षी त्यांच्या उत्तम घरटे बनवण्याच्या कलाकुसरीकरता जगप्रसिद्ध आहेत. नर पक्षी
अर्धे घरटे बांधून मादीची वाट बघतो, घरटे जर मादीच्या पसंतीस उतरले तर जोडी जमते. नंतर मादी घरट्यात अंडी उबवत बसते
आणि नर नविन घरटे बांधून नविन मादीला आकर्षीत करतो. ह्याच वेळेस खंड्या पक्षी नदी नाल्याच्या
बाजूला मातीमधे बीळ खोदून आपले घरटे त्यात बनवत असतो. यामुळे त्याच्या पिल्लांना बारीक
मासे, बेडूक लगेचच बाजूला उपलब्ध होतात. याच काळात बुलबुल, साळुंक्या, मॅग पाय रॉबिन, शिंपी, वेगवेगळ्या
जातीचे मक्षीमार असे अनेक पक्षी आपापली घरटी बनवण्यात, पिल्लांचे जोपासना
करण्यात गर्क असतात.
किटक बघण्याकरता तर
हा काळ सर्वोत्तम असतो. नविन पाने, नविन फुले ह्यांची लयलूट असते त्यामुळे ह्या किटकांना प्रचंड खाणे त्यांच्यासाठी
आणि त्यांच्या पिल्लांसाठी मिळू शकते. ह्यावेळी आपण रंगीबेरंगी नाकतोडे, ढालकिडे, मुंग्या, चतूर बघू शकतो. फुलपाखरे
आणि पतंगांकरता तर ह्यासारखा मोसम नाही. अतिशय रंगीत यामफ्लाय, सिल्व्हरलाईन, ग्रास डेमन, बॅरोनेट सारखी छोटी
तर ब्लू मॉरमॉन सारखी मोठी फुलपाखरे दिसतात. ऍटलास मॉथ सारखा जगातला सर्वात मोठा पतंगपण
याच वेळेला फक्त दिसतो. हा पतंग मोठा म्हणजे अगदी एक फुटाएवढापण मोठा असू शकतो. मून
मॉथ सारखा अतिशय आकर्षक आणि मोठा पतंगसुद्धा फक्त याच वेळी दिसू शकतो. या काळात दिवसा
झळाळणारे ज्युवेल बीटल्स दिसतात तर रात्री काजवे मंदपणे चमकताना दिसतात.
तर असा नितांतसुंदर
निसर्ग बघायला, त्यातले वेगवेगळे आकर्षक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती बघायला आपण आसपासच्या कुठल्याही जंगालात आपण जाउ शकतो. बरीचशी मोठी
जंगले प्राण्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे साधारत: जुनच्या शेवटी प्रवाशांकरता
बंद होतात ती थेट सप्टेंबर महिन्यापर्यंत. त्यामुळे अशा वेळेस लहान जंगलांना, जिथे
आपल्याला चालत फिरायची परवानगी असते तिथे भेट देणे उत्तम. पण याच वेळेस डोंगरावरती
मोठे ओढे किंवा धबधबे असतात तिथे पर्य़टकांचे लोंढेच्या लोंढे येतात. त्यातल्या
बऱ्याच जणांना निसर्गाचा आस्वाद घेण्यापेक्षा दारू पिउन धिंगाणा घालण्यात जास्त रस
असतो. सोबत नेलेल्या दारूच्या कोल्ड्रींकच्या बाटल्या तिथेच टाकणे, फोडणे, इतर
कचरा करणे यामुळे त्या निसर्गरम्य ठिकाणाची वाट लागते. इतर पर्यटकांना त्याचा
त्रास होतो तो वेगळाच. वन खाते, पोलीस खात त्यांचा नेहेमीप्रमाणे सरकारी खाक्या दाखवतात
आणि त्या स्थळावरच बंदी आणतात. त्यांना निसर्गप्रेमी अभ्यासू पर्यटक आणि दारू पिउन
धिंगाणा घालणारे पर्यट्क यात फरकच कळत नाही. अर्थात आपणच कुठलीही घाण तिथे करणार नाही, प्लॅस्टीक, थर्माकोलच्या पिशव्या, ग्लास टाकणार नाही
ह्याची काळजी घेतली, स्वत:च्या वागण्यावर जर नियंत्रण ठेवले तर आपोआपच अनेक प्रश्न
सुटतील.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
No comments:
Post a Comment