Thursday, July 19, 2012


वेळासचा कासव महोत्सव.....   

गेली ६/७ वर्षे मी कोकणातल्या वेळास गावी फेब्रुवारी / मार्च महिन्यात खास कासवांकरता सातत्याने जात आहे. पुर्वी या गावाचे नावही बहुतेक नकाशावर नव्हते आणि रस्त्यावर या गावाच्या नावाची पाटीही नव्हती. पण आता मात्र चित्र अगदी बदलले आहे, आज इंटरनेटवरही वेळासचे Maps, माहिती, ब्लॉग्ज वाचायला सहज मिळतील. २००६ मधे मी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांच्या श्री. भाउ काटदरेबरोबर पहिल्यांदा वेळासला गेलो. त्यांच्या कडून ही कासवे वेळासच्या किनाऱ्यावर कशी अंडी घालायला येतात, त्यांच्या अंड्यांना कोणाचा धोका असतो, मग अंड्यातून पिल्ले कशी बाहेर येतात आणि समुद्रात जातात याची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष बघितले.

यानंतरच्या वर्षी कासव संवर्धनात गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा आणि त्यांनासुद्धा काहीतरी आर्थिक मदत मिळावी म्हणून वेळास कासव महोत्सवाचे आयोजन सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटकांनी वेळास गावाला भेट द्यावी, गावातील लोकांबरोबर त्यांच्या घरी रहावे, जेवावे आणि कासव संवर्धनाचे काम प्रत्यक्ष बघावे असा उद्देश होता. पर्यटक रहायला आल्यामुळे गावातल्या लोकांना थोडेफार उत्पन्न मिळणार होते तर पर्यटकांना गावतल्या घरात रहायचे वेगळेपण. त्याचबरोबर कासवाची लहान लहान पिल्ले कशी सागरात तुरूतुरू पळत जातात त्याची मजा काही औरच असते, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होते.

ऑलिव्ह रिडले ही सागरी कासवांची जात मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी एका जागी येउन अंडी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज जगात मेक्सीको, कोस्टा रिका आणि भारतातील ओरीसा हे जगातील सर्वात मोठ्या घरट्यांच्या जागा असलेले समुद्रकिनारे आहेत. या किनाऱ्यांवत अक्षरश: लाखो कासवे एकाच वेळेस येउन अंडी घालतात. यामुळे ही ठिकाणे कायम शास्त्रज्ञ आणि पर्यटकांनी गजबजलेली असतात. आपल्या महाराष्ट्राला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्याचा प्रमुख भाग कोकणात येतो. मात्र या कुठल्याच भागात सागरी कासवांच्या बाबतीत माहिती उपलब्ध नाही. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांनी २००० साली या किनारपट्टीचे सर्वेक्षण केले आणि त्यांना या संपुर्ण किनाऱ्यावर सागरी कासवे तुरळक प्रमाणात विणीसाठी येत असल्याची नोंद केली. सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात दररोज किनाऱ्यावर गस्त घालून कासवांच्या घरट्यांचा शोध घेण्यात येतो व त्या घरट्यातील अंडी त्याच किनाऱ्यावर उभारलेल्या कुंपणात संरक्षित करण्यात येतात आणि योग्य वेळी घरट्यातून बाहेर आलेली पिल्ले समुद्रात सुरक्षीतपणे सोडण्यात येतात. आजपर्यंत या उपक्रमामुळे जवळपास ३०,००० हून अधिक पिल्ले समुद्रात सोडली गेली. असे समजले जाते की कासवाची मादी प्रौढ झाल्यावर ती ज्या किनाऱ्यावर जन्मली त्याच किनाऱ्यावर अंडी घालायला कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येते. त्यामुळे अजून काही वर्षांनंतर या वेळासच्या किंवा आजूबाजूच्या किनाऱ्यांवर या कासवांचे प्रमाण निश्चीतच वाढलेले दिसेल.

वेळासला जाताना मात्र मनाची पुर्ण तयारी करून जावी लागते कारण कासवाची पिल्ले बाहेर येणे हे पुर्णत: नैसर्गिक आहे आणि ती आपण जाउ त्याच दिवशी बाहेर येतील याची काही खात्री नसते. सकाळी साधारणत: ८ / ८.३० च्या सुमारास आणि संध्याकाळी ५.३० नंतर ही पिल्ले सोडण्यात येतात. या दोनही वेळी प्रकाश तसा कमी असल्यामुळे छायाचित्रण तसे कठिण असते. परत पिल्लांना कॅमेराच्या फ्लॅशचा त्रास होत असल्यामुळे, फ्लॅश वापरणे शक्य नसते त्यामुळे कॅमेरावरच नियंत्रण ठेवून छायाचित्रण शक्य होते. मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला वेळासला गेल्यामुळे मला छायाचित्रणाच्या अनेक संधी मिळाल्या. एकदा संस्थेच्या कार्यकर्त्याने कासवाच्या घरट्यावरची उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घातलेली टोपली उचलली आणि खाली बघतो तर ३ पिल्लांची फक्त डोकी वर आली होती आणि त्यांची पुर्ण बाहेर यायची धडपड सुरू होती. काही सेकंदातच ती वाळूच्या पुर्ण बाहेर आली पण तोपर्यंत मात्र मला त्यांची बाहेर येतानाची आणि त्यांच्या धडपडीची अनेक छायाचित्रे मिळाली होती. 


या नंतरच्या वर्षी संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस जी काही पिल्ले बाहेर आली त्यांचे सुर्यास्ताबरोबर छायाचित्रण करता आले. यावेळेस "वाईड" ऍंगल लेन्स वापरल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पाण्याच्या लाटेजवळ जाणारी इवलीशी कासवे आणि मागे समुद्रात मावळणारा सुर्य असे छायाचित्र घेता आले. पुढच्याच वर्षी मी पोहोचलो त्याच्या आदल्या रात्री एक कासवाची मादी घरटे करून अंडी घालून गेली होती आणि तीच्या पायांचे ठसे समुद्राच्या मऊ वाळूत उमटले होते त्याचे छायाचित्रण करता आले. गेल्या वर्षी ३ पिल्ले तुरूतुरू समुद्राकडे पळत होती आणि समुद्रकाठच्या मऊशार वाळूत त्यांची ईवलीशी पावले उमटत होती त्याचे छायाचित्र मिळाले. याच वेळेस अगदी त्या ओल्या कंच वाळून ओणवून एका कासवाच्या पिल्लाच्या छायाचित्रणात दंग असलेल्या छायाचित्रकारांचेच छायाचित्र मला घेता आले. हे असे काही वेगळे छायाचित्रण किंवा घरट्यातून पिल्ले बाहेर नक्की त्याच दिवशी बाहेर येणार की नाही ही उत्कंठा खरोखरच मजेशीर असते. या वेळासच्या कासवांच्या पिल्लांच्या छायाचित्रणाबरोबरच वेळासला जातानाचा बाणकोटचा किल्ला, वेळासचा स्वच्छ समुद्रकिनारा, त्यावर आलेले स्थलांतरित पक्षी, निळ्याशार सागरावर होणारा सुर्यास्त असे बरेच काही छायाचित्रण करता येते. गावातल्या प्रत्येक घराच्या मागे नारळा, सुपारीच्या बागा आहेत. याच बागांमधे अधेमधे जायफळ, कोकमासारखी सहसा न दिसणारी झाडे बघायला मिळतात. ह्या वाडी मधे मऊशार ओल्या मातीत अनवाणी चालताना आणि तिथेच उघड्यावर विहीरीतून / हौदातून थंडगार पाण्याने अंघोळ करण्याचा अनुभव खरोखरच शब्दात न व्यक्त करण्यासारखा आणि स्वत: प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment