Sunday, February 17, 2013


फणसाडचे अभयारण्य....  

आज मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या जवळसुद्धा कर्नाळा, तुंगारेश्वर अशी सुंदर अभयारण्य आहेत. याठिकाणी अगदी एका दिवसात जाता येते. मुंबईपासून अजुन थोड्या लांब अंतरावरचे अभयारण्य आहे फणसाडचे. फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्‍यात आहे. अनेक पर्यटक काशीद, रेवदंडा किनाऱ्यापर्यंत येतात; किंवा पुढे मुरूड जंजीऱ्याला जातात, पण त्यांना फणसाडचे जंगल मात्र माहित नसते. पर्यटकांपासून दूर असल्यानेच ते अद्याप सुरक्षित आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. फणसाड हे स्वातंत्र्यापूर्वी जंजिरा संस्थानाचे नबाब सिद्दी यांचे खासगी क्षेत्र होते, त्यावेळेस या जंगलाला केसोलीचे जंगल म्हणून ओळखायचे. त्या वेळी शिकारीसाठी नबाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांनी "बारी' असे म्हणतात. १९४८ मध्ये संस्थान खालसा झाल्यानंतर जंगलतोड आणि अवैध शिकारींमुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. कोळसानिर्मिती आणि बॉक्‍साईट उत्खननामुळे येथील समृद्ध जमिनीचा र्र्हास होऊ लागला. त्यामुळे वन खात्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित केले.

फणसाडच्या अभयारण्यात बिबळया, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, पिसोरी, ससे, साळींदर आणि महाराष्ट्राची शान व राज्यप्राणी असणारी मोठी खार किंवा शेकरू आढळते. इथे सुमारे २०० हून अधिक जातीचे रंगीबेरंगी पक्षी आढळतात. सध्या तर इथे आख्या जगात आणि भारतात नामशेष होणारी गिधाडेसुद्धा मोठ्या संख्येनी दिसत आहेत. पक्ष्यांबरोबर अनेक आकर्षक रंगाची फुलपाखरे, चतूर, टाचण्या पाण्याजवळ बागडत असतात. अनेक जातीचे विषारी, बिनविषारी साप, सरडे, विंचू, कोळी इथे मुबलक प्रमाणात दिसतात. या जंगलात पानझडी, शुष्क वने आणि निम्नसदाहरित आणि सदाहरित वने आढळून येतात. समुद्राजवळ असूनही दाट झाडीमुळे येथील तापमान दमट नाही. वृक्षप्रेमींसाठी हे अभयारण्य सर्व ऋतूंत आल्हाददायक आहे. पिंपळ, साग, आवळा, सप्तपर्णी, शिसव, कदंब, कळम, अंजनी, सावर, शिवण, करंज, सीता-अशोक, सुरंगी, लोखंडी, खवस असे सुमारे ७००हून अधिक वृक्ष येथे आढळून येतात. काही ठिकाणी एक झाड सदाहरित आणि त्याच्या शेजारी पाणझडीचे झाड दिसले, तर आश्‍चर्य वाटते. गारंबीची महाकाय वेल येथे असून, त्या वेलीला चार फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आढळून येतात. याशिवाय अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीही येथे आढळतात.

येथील जंगलात पाणी मुरण्याचे आणि साठून राहण्याचे प्रमाणही अजून बऱ्यापैकी आहे. इकडे पाणवठय़ांचा गाणअसा उल्लेख केला जातो. फणसाड गाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजुला आपल्याल वन्यजिवन अगदी सहज बघायला आणि छायाचित्रणासाठी मिळू शकते. मात्र इथे फिरायचे असेल तर तो सच्चा निसर्गेप्रेमी असायला हवा, कारण इथे रहायच्या / जेवायच्या अगदी प्राथमीक सोयी आहेत. या इथे वनविभागाने सुपेगाव येथील परिसरात राहाण्यासाठी तंबूंची  व्यवस्था केलेली आहे. ठाणे, अलिबाग आदी ठिकाणच्या वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्याचे आरक्षण होऊ शकते. जेवणाची सोय सुपे गावातील महिलांच्या बचत गटा मार्फत केली जाते. निसर्गप्रेमींसाठी फणसाडचे जंगल हे सगळ्या हंगामात उत्तम ठरते. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नविन काही बघितले नाही असे होतच नाही. अगदी भर उन्हाळ्यात गेलो तरी चिखल गाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे दिसतात तर फणसाडच्या गाणीवर अगदी शेकरू सुद्धा भल्या पहाटे सहज दिसते. पावसाळ्यात जर का आपण फणसाडच्या जंगलात गेलो तर असंख्य प्रकारचे किटक, फुलपाखरे, त्यांच्या अळ्या, मोठे मोठे पतंग, ढालकिडे, कोळी, सापांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला सहज दिसतात. अर्थात यावेळी आपल्याला चिखलात बरीच पायपिट करावी लागते आणि ठिकठिकाणी जळवांचा त्रास होऊ शकतो.

नुकताच मी डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला फणसाडच्या जंगालाला भेट दिली. सोबत भारतातले प्रसिद्ध बेडकांचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. बिजू होते. अर्थातच आमचा सगळ्यांचा भर हा वेगगेवळ्या प्रकारचे बेडूक शोधण्यावर होता. डॉ. बिजू, त्यांचे विद्यार्थी आणि आम्ही चिखलगाणीच्या पाणवठ्यावर वेगवेगळ्या भागात बेडकांची शोधाशोध करत होतो. याच ठिकाणी मी कॉमन मॅप जातीचे फुलपाखरू कित्येक वर्षांपुर्वी बघितले होते, पण त्याचे छायाचित्र माझ्याकडे नव्हते. त्यानंतरच्या फणसाडच्या प्रत्येक खेपेमधे मी त्या फुलपाखराला शोधत होतो पण दरवेळेस त्याने मला हुलकावणी दिली होती. एकावेळी तर ते फुलपाखरू मला दिसले पण ते जमिनीपासून २०/२५ फुटांवर एका फांदीवर पानाखाली बसून राहिले. ते तिथे दिसत असून सुद्धा मला त्याचे छायाचित्र काही मिळू शकले नव्हते. यावेळी मात्र आम्ही तिथे बेडूक शोधत असताना मला याच फुलपाखरांची एक जोडी तिथे अलगद येउन जमिनीवर उतरत असतना दिसली. मी धावपळ करून कॅमेरा आणला आणि त्यांचे छायाचित्रण सुरू केले. ज्या फुलपाखराला मी तिथे अनेक वर्षे शोधत असताना ते मला मिळाले नव्हते पण अचानक ध्यानीमनी नसताना मला ते तिथेच सापडले आणि त्याने मला त्याची छायाचित्रेसुद्धा घेउ दिली.

याच फणसाडच्या जंगलात मला गारंबीचे वेल दिसले की ज्यांच्यावर अगदी ४/५ फुटांच्या लांब हिरव्यागार शेंगा लटकत होत्या. फेब्रुवारी / मार्चच्या सुमारास गेलो तर तिथल्या सगळ्या माळरानांवर अंजन फुललेला असतो आणि त्याच्या सगळ्या फांद्या ह्या कोनफळी, जांभळ्या रंगाच्या नाजुक फुलांनी भरून गेलेल्या असतात. एवढेच नव्हे तर त्या झाडाखाली त्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या पडून तिथली सगळी जमिनच जांभळी झालेली असते. फणसाडच्या जंगलात पक्षिनिरेक्षण सुद्धा उत्तम होते. मागे मला एका रात्री मी रातव्यांच्या (Nightjar) मागावर होतो तेंव्हा मला रातवा तर दिसलाच पण तीच्या पोटाखाली तीची २ अगदी लहान पिल्ले सुद्धा दिसली. सध्या फक्त दक्षिणेत दिसणारे श्रीलंकन फ्रॉगमाउथ तिथे माळावर दिसत असल्याची बातमी आहे. त्यामुळे अर्थीतच पुढ्च्या भेटीमधे या दुर्मिळ पक्ष्यांना शोधण्याचा अजेंडा आहे.


युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment