Sunday, February 17, 2013


बेडकांचे डरॉव डरॉव...  

कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते. काही वर्षांपुर्वि भारतातून पुर्वेकडील देशांमधे बेडकांची निर्यात होत असे. त्यांचे पाय हे मांसल असल्यामुळे खाण्यासाठी त्यांना मोठी मागणी होती. अर्थातच आपल्याकडे शिकारीवर धरबंध नसल्यामुळे त्या बेडकांची बेसुमार कत्तल झाली आणि त्याचा परिणाम भात आणि इतर शेतीवर झाला. यानंतर बेडकांच्या शिकारीवर आणि निर्यातीवर बंदी आली तरीसुद्धा या बेडकांबाबत आपल्याला इतर माहिती काहीच नाही आणि त्यांच्यावर अभ्याससुद्धा झाला नाही.

पण निसर्गचकात बेडकासारख्या उभयचर प्राण्यांचे स्थान फार महत्वाचे आहे. कारण पाण्यात निर्माण झालेल्या जिवसृषटीने काठावर उडी मारायचे धाडस पहिल्यांदा केले ते बेडकासारख्या उभयचर प्राण्यांच्या रूपाने. थंड रक्ताचे हे कणावान प्राणी जमिनीवर आले खरे, पण मुलभूत मर्यादांमुळे जमिनीवर स्थिरावू शकले नाहित. उभयचर वर्गात बेडकांखेरीज सिसिलीयन, सॅलॅमेंडर असे प्राणी आढळत असले तरी दादागिरी चालते ती बेडकांचीच. उभयचरांच्या एकूण प्रजातींपैकी नव्वद टक्के प्रजाती या बेडकांच्याच आहेत. भारतात जे २३५ प्रजातींचे उभयचर नोंदविण्यात आले आहेत, त्यापैकी सुमारे २०० प्रजाती या बेडकांच्या आहेत. जमिनीत आणि पाण्यात दोन्हीकडे वावरणारे उभयचर प्राणी कल्ले, फुफ्फुस आणि त्वचा या सगळ्यांच्याद्वारे गरजेनुसार श्वसन करतात. बेडकांच्या त्वचेची जडणघडणच अशी असते की, त्यांच्या त्वचेमधून शरीरातील पाण्याचे बाष्पिभवन झपाटयाने होते म्हणून बेडूक नेहेमीच भरपूर आर्द्र हवामानाच्या ओलसर वातावरणात वावरतात. बेडकांना सभोवतालच्या परिसराप्रमाणे शरीराचा रंग बदलण्याची कला अवगत असते. मात्र बेडकांनी जमिनीवर कितीही उडया मारल्या तरी त्यांना प्रजननासाठी पाण्यातच जावे लागते. 

झाडाझुडुपांवर राहण्याऱ्या वृक्षवासी बेडकांचा एक खास वर्गच आहे. या वृक्षवासी बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो. त्यामुळे त्यांना झाडावर चढणे सोपे जाते. या बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकारने आडव्या असतात. तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पटटे असतात जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रुला चकवतात. आणि स्वत:चा बचाव करतात. झाडावरच्या बेडकांमध्ये रहाकोफोरस या कुळातील बेडकांच्या पायाचे पडदे थोडे मोठे असतात, ज्यांच्या मदतीने ते हवेत तरंगू शकतात. त्यामुळे त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी जमिनीवर उतरावे लागत नाही. एकुणच झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उडया मारण्यातच सामावलेली असते. पश्चिमघाटातील जैवविवीधता संपन्न करण्यात उभयचरांना विशेषत: बेडकांचा सहभाग फार मोठा आहे. झाडावरचे हे बेडूक इतर बेडकांप्रमाणेच पाण्यात अंडी घालत नाहीत तर पाण्यालगतच्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालतात. या अंडयांचा ओलसरपणा टिकावा म्हणून मादी त्यावर वारंवार मुत्रविसर्जन करते. अंडी पक्व झाल्यावर, त्यातून बेडकाची पिल्ले पडतात ती सरळ खालच्या पाण्यामध्ये. प्रौढ झाल्यावर मात्र हे बेडूकराव झाडावरच बस्तान बसवतात. सह्याद्रीतील किंवा एकंदरच पश्चिमघाटातील जंगलांचा नाश यामुळे या बेडकांच्या अनेक जाती अस्तंगत झाल्या आहेत किंवा त्यांची सापडण्याची ठिकाणे अतिशय मर्यादित झाली आहेत. यामुळेच या बेडकांच्या कित्येक जाती गेल्या अनेक वर्षात किंवा शतकातसुद्धा कोणाला दिसलेल्या नाहित. याच कारणामुळे डॉ. एस. डी. बिजू यांनी “Lost Amphibians of India” ही मोहिम काढली आणि भारतातील अनेक जंगलांचे कानाकोपरे शोधून ज्या जाती अनेक वर्षात दिसल्या नव्हत्या त्या परत शोधून काढल्या.

याच मोहिमेच्या अंतर्गत मी गेल्या वर्षी महाराष्ट्रातील भिमाशंकर अभयारण्य आणि फणसाडच्या अभयारण्याला डॉ. एस. डी. बिजू आणि त्याच्या इतर सभासदांसोबत भेट दिली. पावसाळा संपला असला तरी आम्हाला त्यावेळी बेडकांच्या अनेक जाती दिसल्या आणि त्यांचे छायाचित्रण करता आले. पण एरवी पावसाळ्यात संध्याकाळी जंगलात फेरफटका मारला तर आपल्याला बेडकांचे ओरडणे ऐकू येते पण सहसा ते आपल्याला दिसत मात्र नाहित. दिवसा जे बेडूक दिसतात ते त्यावेळे बिलकूल आवाज करत नाहित. याच कारणाकरता मी कित्येक दिवस आवाज काढणाऱ्या बेडकाचे छायाचित्र मिळायची वाट बघत होतो. भिमाशंकर आणि फणसाडच्या अभयारण्यात प्रजननाचा काळ उलटला असल्यामुळे “ओरडणारे” बेडूक काही सापडले नाहित. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर माथेरानच्या जंगलांमधे त्यांना शोधण्यासाठी खास रात्री तिथे जंगलामधे फेरफटका मारला पण याही वेळेस काही मला ओरडणाऱ्या बेडकांची छायाचित्रे मिळाली नाहित.

नुकताच ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा गावात तिथल्या धबधब्याला भेट दिली होती. संध्याकाळपर्यंत आम्ही दाभोसा धबधब्याची छायाचित्रे काढली आणि रात्री जेवून परत येताना आमच्या “नेचर ट्रेल्स” रिसॉर्ट्च्या स्विमिंग पुलच्या मागच्या जंगलात अनेक बेडकांचा आवाज ऐकला. मी त्वरीत जाउन टॉर्चच्या प्रकाशात आवाजाच्या दिशेने त्या बेडकाला शोधायला लागलो. आवाज भलताच मोठा असल्यामुळे मी मोठा बेडूक असेल असे समजत होतो पण तो आवाज करणारा बेडूक काही दिसत नव्हता. आवाज तर येत होता पण तो मोठा बेडूक काही जाम दिसत नव्हता. मी परत अगदी जमिनीवर खालच्या भागात शोधायला लागलो तर मला जेमतेम एका इंचापेक्षा लहान असलेला पिवळसर तपकिरी बेडूक दिसला. आख्या शरीराला फुगवून, त्यात हवा जमवून तो ती गळ्याखालच्या फुग्यातून बाहेर टाकत होता आणो ओरडत होता. इतका चिमुकला जीव एवढा मोठठा आवाज काढत असेल हेच पटत नव्हते पण त्याच बेडकाच्या मागे दुसरा नर त्याला आवाज देउन, दोघांची जुगलबंदी सुरू होती. Ornate Narrow mouthed Frog असे या बारक्याशा बेडकाचे नाव आहे आणि ज्या छायाचित्राची मी गेले कित्येक दिवस वाट बघत होतो ते मला अगदी अचानकच आणि सहज घेता आले.युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

No comments:

Post a Comment