Thursday, January 1, 2009

उडणाऱ्या बिया.
झाडांचे प्रजनन पक्षी, प्राण्यांच्या प्रजननापेक्षा फार वेगळ्या पद्धतीने होते. झाडे झुडपे नविन रोपे बनवण्यासाठी बियांचा वापर करतात. ही नविन रोपे होण्यासाठी उआ बिया लांबवर जाउन जमिनीत रूजाव्या लागतात. पालक झाडापेक्षा जेवढ्या लांबवर या बिया जातील तेवढी त्यांच्या जगण्याची शक्यता जास्त असते. सहसा झाडांच्या या बियांचा प्रवास होण्यासाठी चार पद्धती वापरल्या जातात आणि यालाच बीज प्रसारण असे म्हणतात. सर्वात सोपी आणि सहज पद्धत म्हणजे वाऱ्यामुळे बीज प्रसारण. या प्रकारात बारक्या झाडांच्या बिया ह्या वाऱ्यामार्फत जाउन योग्य त्या जागी रूजल्या जातात. या बिया उडत जाण्यासाठी योग्य त्या आकाराच्या बनलेल्या असतात अथवा त्यांना योग्य तो भाग जोडला असतो. ऎन किंवा तत्सम जातीच्या बिया ह्या भिरभिऱ्यासारख्या चक्राकार हवेत फिरत जातात आणि लांबवर हवेतून वाहून नेल्या जातात. कुडासारख्या झाडाच्या बियांना वाहून नेण्यासाठी त्यांच्यावर बारीक केसाळ कापसासारख्या छत्र्या असतात. एखाद्या पॅराशूटसारख्या ह्या छत्र्या वाऱ्यावर लांब तरंगत जाउन, बऱ्याच अंतरावर ते बी पोहोचवतात. लहानपणी आपण ह्यांनाच "म्हातारी म्हातारी" म्हणून खेळत असायचो. ह्या पद्धतीत हवेतून या बिया लांब तरंगत जातात त्यामुळे ह्या बिया अथवा म्हाताऱ्या या नाजूक आणि हवेपेक्षा जास्त हलक्या असतात.
दुसऱ्या पद्धतीत झाडांचे बीजप्रसारण हे पक्षी, प्राण्यांमार्फत केले जाते. हे प्राणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने हे बीज प्रसारण करतात. बरीच फळे ही गोड, रसाळ आणि खाण्यायोग्य असतात त्यामुळे त्यांच्या आकर्षणाने प्राणी ही फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेतून न पचलेल्या अनेक बिया दुरवर पसरवल्या जातात. दुसरी काही फळे ही काटेरी असतात. ही काटेरी फळे गाई, गुरांच्या केसाळ शरीरावर चिकटून लांबवर प्रवास करतात. तिसऱ्या प्रकारात पाण्यामार्फत बिया लांबवर पोहोचवल्या जातात. या प्रकारात सहसा ही झाडे नदी अथवा समुद्राकाठी असतात. फळे पक्व झाल्यावर ती वरून खालच्या वाहत्या पाण्यात पडतात आणि लांबवर तरंगत जातात. कालांतराने ती काठाला लागतात आणि त्या ठिकाणी रूजतात. या प्रकारात ह्या बियांवर पाण्यावर तरंगण्यासाठी एक खास आवरण असते जे त्या बियाणाला सुरक्षीत ठेवते पण त्याच वेळेस ते सहज पाण्यावर तरंगूही शकते. नारळ अथवा तिवरांची फळे असा पाण्यावर प्रवास करतात आणि लांबवर जाउन रूजतात.
चौथ्या प्रकारात ही बियाणे लांबवर फेकली जातात. सहसा ज्या झाडांना शेंगा येतात त्यांचे बीज प्रसारण असे होते. झाडावरच या शेंगा सुकतात आणि योग्य वेळ आल्यावर जोराने आवाज करून त्या तडकतात व आतल्या बिया लांबवर फेकल्या जातात. लहान झुडपांच्या बिया या ५/६ फुट लांब फेकल्या जातात पण जर गारंबीची वेल असेल तर त्याच्या शेंगेचा एखाद्या बंदूकीच्या गोळीएवढा आवाज होऊन ती शेंग फुटते आणि आतली मोठी बी कीत्येक मीटर लांब फेकली जाते.
बऱ्याच वेळेला पावसाळ्यानंतर, फुलांचा हंगाम संपल्यावर जंगलात फिरताना छायाचित्रण फार कमी होते. पण अश्या वेळेस जर आपण निसर्गातल्या ह्या बारक्या बारक्या गोष्टी न्याहाळल्या तर अनेक गमतीदार प्रकार बघायला तर मिळतातच पण छान, आकर्षक छायाचित्रेसुद्धा मिळू शकतात. जानेवारी, फेब्रुवारीच्या महिन्यात जंगलातील गवत, अनेक बारकी झुडपे यांना फुले, फळे येतात. याच वेळेस अनेक पानगळ होणाऱ्या झाडांना शेंगा, फळे येऊन ती सुकतात अशा वेळेस जर बारकाईने त्यांच्या कडे लक्ष दिले तर खरोखरच सुंदर छायाचित्रे मिळू शकतात.
युवराज गुर्जर.

No comments:

Post a Comment